सकाळचे ९ वाजलेत. शनिवार-रविवारचा मुहूर्त साधून धमाल क्रिकेट खेळायला आलेल्या बच्चे कंपनीनी आझाद मैदान फुलून आलंय. खेळ रंगात आला की मधूनच हुर्यो आणि शिट्ट्या कानावर येतायत.

हे सामने सुरू आहेत तिथून मोजक्या ५० मीटर अंतरावर एक वेगळाच ‘खेळ’ सुरू आहे. ५,००० जणांची ही टीम मूकपणे आपला डाव टाकून बसलीये. हे काही खेळाडू नाहीत. गेल्या महिनाभरापासून मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी धरणं धरून बसलेल्या या राज्यभरातल्या आशा कार्यकर्त्या आहेत. ९ फेब्रुवारीला सुरू झालेल्या या आंदोलनाच्या पहिल्याच आठवड्यात किमान ५० आंदोलक महिलांना तब्येत ढासळल्यामुळे दवाखान्यात दाखल करावं लागलं आहे.

समोर गोंधळगर्दी असलेला रस्ता. तिशीची एक आशा तिथेच जमिनीवर बसते. चिंतातुर होत आजूबाजूला नजर टाकत ती लोकांच्या नजरा टाळायचा प्रयत्न करतीये. काही महिला तिच्या भोवती गोळा होतात. ओढणी आणि चादर घेऊन आडोसा तयार करतात आणि ती आशाताई पटकन कपडे बदलून घेते.

माथ्यावरचा सूर्य आग ओकत असतो. जेवायची वेळ होते. काही आशा आपलीच सहकारी रिटा चावरेभोवती गोळा होतात. कुणाच्या हातात रिकामे डबे, रिकाम्या ताटल्या किंवा नुसती झाकणं. ४७ वर्षीय रिटाताई घरनं खाणं बनवून घेऊन आलीये. ती आलेल्या प्रत्येकीला जेवण वाढते. “इथे आंदोलन करणाऱ्या ८० ते १०० आशांना मी जेवण देऊ शकतीये,” ती म्हणते. ठाणे जिल्ह्याच्या तिसगावहून रोज दोन तास प्रवास करत रिटाताई आझाद मैदानात येते. सोबत १७ आशा कार्यकर्त्या असतात.

“आम्ही आळीपाळीने डबा घेतोय, जेणेकरून कुणीच भुकेलं रोहू नये. पण आता आमची तब्येत बिघडायला लागलीये. आणि आता थकून गेलोय आम्ही,” ती सांगते. फेब्रुवारी महिना संपता संपता आम्ही त्यांच्याशी बोलत होतो.

PHOTO • Swadesha Sharma
PHOTO • Swadesha Sharma

गेल्या महिन्यात मुंबईच्या आझाद मैदानात हजारो आशा कार्यकर्त्या आंदोलन करत होत्या. रिटा चावरे आणि त्यांच्यासोबतच्या १७ आशा कार्यकर्त्या रोज कल्याणहून इथे मुंबईला प्रवास करून येत आणि शक्य तितक्या आशांसाठी जेवण पुरवत होत्या. रिटा (उजवीकडे) २००६ सालापासून आशा म्हणून काम करत आहेत आणि तिसगावच्या १५०० लोकसंख्येला त्या आरोग्यसेवा पुरवतात

PHOTO • Swadesha Sharma
PHOTO • Ujwala Padalwar

३६ जिल्ह्यांमधून आलेल्या आशा कार्यकर्त्या इथे एकजुटीने आंदोलन करत आहेत. अनेक दिवस चाललेल्या या आंदोलनाचा ताण येऊन अनेकींना दवाखान्यातही दाखल करावं लागलं आहे

२१ दिवस आंदोलन केल्यानंतर १ मार्च रोजी अखेर या आशा आपापल्या घरी परतल्या. “आशाची निराशा करणार नाही” असं वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर. आदल्या दिवशी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.

आशा कार्यकर्त्या म्हणजे किमान ७० प्रकारच्या आरोग्यसेवा देणारी महिलांची फळी. मात्र राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत त्यांची नेमणूक कार्यकर्ती म्हणून करण्यात आली आहे. आणि त्या सेवाभावी काम करत असल्याने त्यांना त्यांच्या कामासाठी पगार किंवा रोजगार मिळत नाही. त्यांना केवळ मानधन मिळतं.

हे मानधन वगळता त्यांना जितकं काम करू त्यावर आधारित भत्ते मिळतात. सार्वत्रिक लसीकरण, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये येणाऱ्या सेवा दिल्या तर त्यांना त्या त्या कामाचा भत्ता दिला जातो.

पैसा अजिबात पुरेसा नाही, रमा मानतकर सांगतात. “बिन पगारी फुल अधिकारी! त्यांची अपेक्षा आहे आम्ही अधिकारी असल्यासारखं काम करावं. पण पैसा देण्याच्या बाबत मात्र त्यांचा हात आखडता असतो.”

मुख्यमंत्र्यांनी नुकतंच आश्वासन दिलं आहे. गेल्या काही महिन्यात तशी तर त्यांनी अनेक आश्वासनं दिली आहेत. पण त्या आश्वासनानंतरही जीआर किंवा शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. किमान आजपर्यंत तरी नाही. आजवर तरी केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात अशी गत आहे.

आणि म्हणूनच या हजारो आशांनी सरकारने आपण दिलेल्या शब्दाला जागावं यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. सर्वात पहिल्यांदा ऑक्टोबर २०२३ मध्ये त्यांना असं वचन देण्यात आलं होतं. पगारवाढीचा जी आर काढल्याशिवाय मागे हटायचं नाही असा निर्धार त्यांनी केला आहे.

PHOTO • Ritu Sharma
PHOTO • Ritu Sharma

डावीकडेः वनश्री फुलबंधे गेली १४ वर्षं नागपूरमध्ये आशा आहेत. उजवीकडेः यवतमाळच्या प्रीती करमनकर (डावीकडे) आणि अंतकला मोरे (उजवीकडे) सांगतात की डिसेंबर २०२३ पासून त्यांना मानधन देण्यात आलेलं नाही

“लोकांचा आपल्या घरच्या माणसांपेक्षा आशांवर जास्त विश्वास आहे! अख्खं आरोग्य खातं आमच्यावर अवलंबून आहे,” वनश्री फुलबंधे सांगतात. अगदी परिघावरच्या समूहांपर्यंत केवळ आमच्यामुळे आरोग्याच्या सेवा पोचतात याकडे त्या लक्ष वेधतात. “कुठलाही नवा डॉक्टर येऊ द्या, ते पहिलं विचारणारः आशा कार्यकर्ती कुठे आहे? तिचा नंबर मिळेल का आम्हाला?”

वनश्रीताई गेली १४ वर्षं आशाचं काम करतायत. “सुरुवात १५० रुपयांनी झाली. वनवासच म्हणायला पाहिजे ना हा? प्रभू श्रीराम १४ वर्षांनी अयोध्येला आले तेव्हा त्यांचं स्वागत केलं होतं ना? स्वागत वगैरे सोडा किमान आमचं मानधन तरी आम्हाला द्या,” त्या म्हणतात.

आणखी एक मागणी आहेः इतरांना मिळतं तसं मानधन महिन्याच्या महिन्याला वेळेवर मिळावं. दर वेळी तीन महिन्यांचा विलंब नको.

“सतत उशीराने पैसे मिळायला लागले तर आम्ही कसं जगावं?” आशा प्रीती करमानकर विचारतात. त्या यवतमाळच्या जिल्हा उपाध्यक्ष आहेत. “आशा इतरांना सेवा देते पण तिला तिचं पोटही आहे. तिला जर पैसे मिळाले नाहीत तर ती जगू शकेल का?”

आरोग्य विभागाच्या किंवा जिल्हा पातळीवरच्या बैठकांना जाणं त्यांच्यासाठी बंधनकारक असतं. पण त्याचा प्रवास भत्ता देखील तीन ते पाच महिने विलंबाने मिळतो. “आरोग्य विभागाने २०२२ साली आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा प्रवास भत्ता अजून आम्हाला मिळायचाय,” यवतमाळच्या कळंबच्या अंतकला मोरे सांगतात. “आम्ही डिसेंबर २०२३ मध्ये संपावर होतो. कुष्ठरोगाच्या सर्वेक्षणासाठी त्यांनी आम्हाला आमचा संप मागे घ्यायला लावला. पण त्याचे पैसेही आम्हाला आजवर मिळालेले नाहीत.” प्रीतीताई पुढे म्हणतात, “गेल्या वर्षी आम्ही पोलिओ, हत्ती रोग आणि जंत-नाशक कार्यक्रमाचं काम केलं, त्याचेही पैसे मिळालेले नाहीत.”

*****

रिटाताईंनी २००५ साली ५०० रुपये पगारावर आशा म्हणून काम करायला सुरुवात केली. “आज मला महिन्याला ६,२०० रुपये मिळतात. त्यातले ३००० केंद्र सरकारकडून आणि बाकीचे मनपाकडून मिळतात.”

२ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घोषणा केली होती की राज्यातल्या ८०,००० आशा कार्यकर्त्या आणि ३,६६४ गट प्रवर्तकांना अनुक्रमे रु. ७,००० आणि रु. ६,२०० पगारवाढ देण्यात येईल. दिवाळीचा बोनस म्हणून २,००० रुपये देण्यात येतील.

PHOTO • Courtesy: Rita Chawre
PHOTO • Swadesha Sharma

महासाथीच्या काळात आशा कार्यकर्त्याच आरोग्यसेवा देण्यात आघाडीवर होत्या. करोनायोद्धा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला असता तरी बदलापूरची आशा, ममताताई (उजवीकडे बसलेली) सांगते की त्यांना संरक्षक साहित्य अगदीच तोकडं मिळालं होतं

PHOTO • Courtesy: Ujwala Padalwar
PHOTO • Swadesha Sharma

डावीकडेः आंदोलनाच्या एक आयोजक उज्वला पडलवार (निळ्या कुर्त्यामध्ये) सांगतात की पहिल्या आठवड्यातच ५० हून अधिक आशांना तब्येत बिघडल्याने दवाखान्यात दाखल करावं लागलं पण तिथून बाहेर आल्यावर त्या परत एकदा आझाद मैदानात आंदोलनासाठी आल्या. उजवीकडेः तीन आठवडे दिवस रात्र आंदोलन करणाऱ्या आशा मुख्यमंत्र्यांनी ‘निराशा करणार नाही’ असा शब्द दिल्यानंतर अखेर १ मार्च २०२४ रोजी आपापल्या गावी परतल्या

संतप्त झालेल्या ममताताई म्हणतात, “दिवाळी होऊन आता होळी आली पण आमचे हात रिकामेच आहेत अजून.” त्या पुढे म्हणतात, “आम्ही ७,००० किंवा १०,००० पगारवाढ मागितलीच नव्हती. ऑक्टोबरमधला आमचा संप जादाच्या ऑनलाइन कामाविरोधात होता. आम्हाला सांगण्यात आलं होतं की दररोज प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी १०० लाभार्थ्यांची नोंद करायची.”

या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीप्रमाणे, “गरोदरपणामुळे रोजगारात घट येते त्याची अंशतः भरपाई म्हणून आर्थिक भत्ता देण्यात येईल.” अशाच पद्धतीने गरदोर बाया आणि मुलांच्या लसीकरणाच्या नोंदी ठेवण्यासाठी नव्याने आणण्यात आलेल्या यू-विन ॲपसाठी देखील अशाच प्रकारचं लक्ष्य देण्यात आलं होतं.

फेब्रुवारी २०२४ मध्ये १०,००० हून अधिक आशा कार्यकर्त्यांनी शहापूरहून ५२ किलोमीटर पायी चालत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. “चालून आलोय, तंगड्या तुटल्या. आम्ही अख्खी रात्र ठाण्यात रस्त्यावर काढली,” ममताताई सांगते.

इतक्या महिन्यांच्या सलग आंदोलनाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. “सुरुवातीला इथे आझाद मैदानात ५,००० हून जास्त आशा कार्यकर्त्या होत्या. त्यातल्या किती तरी गरोदर होत्या आणि काही आपल्या तान्ह्या बाळांना घेऊन इथे आल्या होत्या. इथे असं उघड्यावर राहणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं म्हणून आम्ही त्यांना परत पाठवलं,” उज्ज्वला पडलवार सांगतात. त्या सिटूच्या नांदेडच्या जिल्हाध्यक्ष आणि राज्य सचिव असून या आंदोलनाच्या आयोजकांपैकी एक आहेत. अनेक जणींना छातीत आणि पोटात दुखायला लागलं, काहींना डोकेदुखी सुरू झाली, शोष पडला आणि दवाखान्यात दाखल करावं लागलं.

दवाखान्यात सोडल्यावर या आशा कार्यकर्त्या पुन्हा आझाद मैदानात आल्या आणि त्यांनी एकजुटीत एकच नारा दिलाः “आता आमचा एकच नारा, जीआर काढा, जी आर काढा!”

*****

PHOTO • Swadesha Sharma

ऑक्टोबर २०२३ मध्ये महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी आशांना दिवाळीचा २,००० रुपये बोनस जाहीर केला होता. ममताताई म्हणते, ‘दिवाळी जाऊन होळी यायची वेळ आली पण आमचे हात अजूनही रिकामेच आहेत’

कागदोपत्री आरोग्यसेवा सर्वांपर्यंत पोचवणे हे जरी आशाचं काम दिसत असलं तरी प्रत्यक्षात वर्षानुवर्षे लोकांमध्ये काम केल्यानंतर त्या या पलिकडे जाऊन सेवा आणि मदतीचा हात देतात. आशा असलेल्या ममताताईचंच उदाहरण घ्या. बदलापूरच्या सोनिवली गावातल्या एका आदिवासी बाईला त्यांनी घरी बाळंतपण न करता दवाखान्यात बाळंतपणासाठी तयार केलं.

त्या सांगतात, “त्या बाईच्या नवऱ्याने सोबत यायला चक्क नकार दिला आणि वर म्हणाला, ‘माझ्या बायकोला जर काही झालं तर तू जबाबदार’.” तिला कळा सुरू झाल्या तेव्हा “मी तिला बदलापूरहून एकटी उल्हासनगरला घेऊन गेले,” ममताताई सांगते. बाळंतपणात ती बाई वारली. बाळ आधीच गर्भात दगावलं होतं.

ममताताई पुढे सांगते, “मी विधवा आहे, माझा मुलगा दहावीला आहे. सकाळी ६ वाजता मी घर सोडलं होतं आणि ती ताई रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवाने दगावली. हॉस्पिटलच्या व्हरांड्यात मला रात्रीच्या दीड वाजेपर्यंत थांबवून ठेवलं होतं. पंचनामा वगैरे सगळं झाल्यानंतर ते म्हणाले, ‘आशा ताई, आता तुम्ही जाऊ शकता’ दीड वाजता मी एकटी जाऊ?”

दुसऱ्या दिवशी जेव्हा ती आपल्या रजिस्टरमध्ये नोंदी करण्यासाठी गावात गेले तेव्हा मृत पावलेल्या ताईचा नवरा आणि इतर काही लोकांनी येऊन तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. एक महिन्यानंतर जिल्हा समितीने ममताताईला चौकशीसाठी बोलावून घेतलं. “त्यांनी विचारलं, ‘गरोदर बाईचा मृत्यू कसा झाला आणि आशाताईची यामध्ये काय चूक होती?’ आता सगळा दोष आमच्याच माथ्यावर टाकायचा असेल तर आमचं मानधनसुद्धा वाढवा ना?” ती म्हणते.

महासाथीच्या संपूर्ण काळात सरकारने आशा कार्यकर्त्यांच्या कामाचं कौतुक केलं, त्यांना करोना योद्धा म्हणून मान दिला. राज्याच्या कानाकोपऱ्यात रुग्णांचा शोध आणि त्यांच्यापर्यंत औषधं पोचवण्याच्या कामाची नोंद घेतली. पण त्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी संरक्षक साहित्य मात्र पुरेसं मिळालंच नाही.

PHOTO • Swadesha Sharma
PHOTO • Swadesha Sharma

कागदोपत्री आशाचं काम म्हणजे सर्वांपर्यंत आरोग्यसेवा पोचवणं. पण वर्षानुवर्षं लोकांमध्ये काम केल्यानंतर त्या यापलिकडे जाऊनही किती तरी गोष्टी आणि सेवा करतात. मंदा खतान (डावीकडे) आणि श्रद्धा घोगले (उजवीकडे) २०१० साली आशा म्हणून रुजू झाल्या आहेत आणि आपल्या गावी १५०० लोकसंख्येला आरोग्यसेवा देत आहेत

मंदा खतान आणि श्रद्धा घोगले कल्याणच्या नांदिवली गावात आशा म्हणून काम करतात. महासाथीच्या काळातले आपले अनुभव त्या सांगतात. “प्रसूतीनंतर एका बाईला कोविडची लागण झाला होता. तिला जेव्हा आपल्याला लागण झालीये हे समजलं तेव्हा ती घाबरली आणि दवाखान्यातून [आपल्या बाळाला घेऊन] पळून गेली.”

“तिला वाटलं की आता तिला [आणि तिच्या बाळाला] पकडून नेणार आणि मारून टाकणार,” श्रद्धाताई सांगते. करोना विषाणूबद्दल अशी भीती आणि गैरसमज होते लोकांमध्ये.

“कुणी तरी आम्हाला सांगितलं की ती एका खोलीत लपून बसलीये. आम्ही लगेच तिच्या घरी गेलो. तिने आतून दाराला कडी घातली होती,” मंदाताई सांगते. ती काही तरी बरं वाईट करेल या भीतीने त्या मध्यरात्री दीड वाजेपर्यंत तिच्या दाराबाहेर थांबून राहिल्या. “आम्ही तिला विचारत राहिलो, ‘तुझं तुझ्या बाळावर प्रेम आहे ना?’ मग आम्ही तिला कसं तरी करून पटवून सांगितलं की बाळाला जवळ ठेवलंस तर त्याला पण लागण होईल आणि त्याच्या जिवाला धोका निर्माण होईल.”

तीन तासांच्या समुपदेशनानंतर त्या आईने दार उघडलं. “तिथे रुग्णवाहिका आधीपासूनच येऊन थांबली होती. इतर कुठलेच आरोग्य अधिकारी किंवा ग्राम सेवक तिथे नव्हते. होतो फक्त आम्ही दोघी.” पुढची गोष्ट सांगताना मंदाताईचे डोळे पाणावतात. “रुग्णवाहिकेत बसण्याआधी त्या ताईने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, ‘माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून माझं बाळ तुझ्या भरोशावर सोपवून जातीये. त्याची काळजी घे’ पुढचा आठवडाभर आम्ही रोज तिच्या घरी जाऊन त्या नवजात बाळाला बाटलीने दूध पाजत होतो. आम्ही तिला व्हिडिओ कॉल करून तिच्या बाळाचा चेहरा दाखवत होतो. अगदी आजसुद्धा ती ताई आम्हाला फोन करून आमचे आभार मानते.”

“आम्ही वर्षभर आमच्या स्वतःच्या लेकरांना जवळ घेतलं नाही, पण इतरांची बाळं वाचवली,” मंदाताई सांगते. तिचा मुलगा आठवीत होता आणि श्रद्धाताईचा केवळ पाच वर्षांचा.

PHOTO • Cortesy: Shraddha Ghogale
PHOTO • Courtesy: Rita Chawre

डावीकडेः श्रद्धाताईं लॉकडाउनच्या काळात रुग्णांना सेवा देत होत्या. आपल्या पाच वर्षांच्या मुलापासून आणि घरच्यांपासूनही त्यांना अंतर ठेवून रहावं लागलं होतं. उजवीकडेः संरक्षक साहित्य, ग्लोव्ज आणि मास्क काहीच मिळालं नसल्याने रिटाताई (सर्वात डावीकडे) तोंडाला ओढणी बांधून विषाणूपासून आपला बचाव करत होती

कोविडच्या काळात लोक त्यांच्या तोंडावर दार आपटत होते हे श्रद्धाताई आजही विसरलेली नाही. “आम्हाला पीपीई किट घालून येताना पाहिलं की लोक पळून जायचे. त्यांना वाटायचं आम्ही पळून चाललोय.” तितकंच नाही, “आम्ही दिवसभर ती किट घालून असायचो. कधी कधी तर दिवसातून चार किट बदलावी लागायची. तासंतास ते सगळं घालून चेहरा काळा पडला होता. ती किट घालूनच आम्ही उन्हातून जायचो. अंग खाजायचं आणि झोंबल्यासारखं व्हायचं.”

मंदाताई मध्येच तिला थांबवत म्हणते, “पीपीई आणि मास्क तर फार उशीरा मिळाले. महासाथीचा बहुतेक काळ आम्ही बाहेर पडताना तोंडावर पदर किंवा ओढणी बांधून फिरत होतो.”

“तेव्हा आमच्या जिवाची कुणाला काही किंमत नव्हती?” ममताताई म्हणते. “तुम्ही काय करोनाशी लढायला आम्हाला वेगळं काही कवच दिलं होतं का? महामारी सुरू झाली तेव्हा तुम्ही आम्हाला काहीसुद्धा दिलं नव्हतं. आमच्या आशाताईंना कोविड व्हायला लागला तेव्हा इतर रुग्णांप्रमाणेच त्यांचीही हालत झाली होती. लसीच्या चाचण्या सुरू होत्या तेव्हासुद्धा स्वतःहून लस घेणाऱ्यांमध्ये आशाच पहिल्या होत्या.”

एक क्षण असा आला होता जेव्हा वनश्री फुलबंधेंनी हे आशाचं काम सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. “माझ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम व्हायला लागला होता,” त्या सांगतात. नागपूरच्या वाडोदा गावामध्ये १,५०० लोकांना ४२ वर्षीय वनश्रीताई आरोग्यसेवा पुरवतात. “मला आठवंतय एकदा मुतखड्यामुळे मला प्रचंड वेदना होत होत्या. कंबरेला घट्ट कापड गुंडाळून त्याही स्थितीत मी काम करत होते.”

एक बाई आणि तिचा नवरा वनश्रीताईंच्या घरी आले. “ती पहिलटकरीण होती. त्यामुळे ते दोघं एकदम चिंतातुर होते. मी त्यांना समजावून पाहिलं की मदत करण्यासारखी माझी परिस्थिती नाही. पण ते आडूनच बसले की बाळंतपणाच्या वेळी मी तिथे असावं म्हणून. त्यांना नाही म्हणणं अवघड झालं आणि मी त्यांच्यासोबत गेले. दोन दिवस, बाळाचा जन्म होईपर्यंत मी तिथे राहिले. तिचे नातेवाईक माझ्याकडे पाहून चेष्टेने म्हणायचे, ‘तिची डिलिव्हरी झालीये का तुमची?’”

PHOTO • Ritu Sharma
PHOTO • Ritu Sharma

वनश्रीताई (चष्मा घातलेल्या) आणि पूर्णिमाताई ७ फेब्रुवारीला नागपूरहून इथे आंदोलनात भाग घेण्यासाठी आल्या. आंदोलनाच्या नवव्या दिवशी वनश्री आपल्या घरच्यांशी फोनवर बोलत होत्या

लॉकडाउनच्या काळात त्यांचा दिनक्रम त्यांना आजही आठवतोय. आशाचं सगळं काम झालं की विलगीकरणात असलेल्या रुग्णांना त्या डबा द्यायला जायच्या. “अखेर त्या सगळ्याचा माझ्या तब्येतीवर परिणाम झाला. किती तरी दिवस माझं बीपी खूप जास्त वाढलेलं होतं. मग मी हे कामच सोडायचं ठरवलं.” पण त्यांची काकी म्हणाली,  “हे पुण्याचं काम आहे. ती म्हणाली, दोन जीव [आई आणि मूल] माझ्यावर अवलंबून असतात. त्यामुळे ही नोकरी कधी पण सोडायची नाही.”

हे सांगत असताना वनश्रीताई मध्येच आपला फोन पाहते आणि म्हणते, “घरचे सारखे विचारतयात की मी परत कधी येणार म्हणून. आले तेव्हा माझ्याकडे ५,००० रुपये होते. आता फक्त २०० रुपये उरलेत.” डिसेंबर २०२३ पासून त्यांना त्यांचं महिन्याचं मानधन मिळालेलं नाही.

नागपूरच्या पांढुर्णा गावात आशा असलेल्या पूर्णिमा वासे अशाच एक कठीण प्रसंगाची आठवण सांगतात. “मी एका एचआयव्ही पॉझिटिव्ह बाईची अँब्युलन्समध्येच प्रसूती केली होती. तिला एचआयव्ही आहे हे दवाखान्यातल्या लोकांना कळाल्यावर त्यांनी खूपच कांगावा केला. मी त्यांना सांगितलं, ‘मी एक आशा असून तिचं बाळंतपण केलं, फक्त ग्लोव्ज आणि माझा स्कार्फ सोडून माझ्याकडे दुसरं काही पण सामान नव्हतं. मग तुम्ही हे असे नखरे का करताय?’”

२००९ पासून आशा म्हणून काम करणाऱ्या पूर्णिमाताई ४,५०० लोकसंख्येला आरोग्यसेवा पुरवतात. “मी पदवीधर आहे. आणि मला नोकरीच्या किती तरी संधी येत असतात. पण आशाचं काम करायचं हा माझा निर्णय होता आणि मी आयुष्यभर आशा म्हणूनच काम करत राहणार. पैसा मिळो, न मिळो, अगर मुझे करनी है सेवा तो मरते दम तक आशा का काम करुंगी.”

आझाद मैदानावर क्रिकेटचा सामना रंगात  आलाय. आशांची लढाईत सध्या तरी अल्पविराम आला आहे.

Ritu Sharma

ఋతు శర్మ PARIలో అంతరించిపోతున్న భాషల కంటెంట్ ఎడిటర్. ఆమె భాషాశాస్త్రంలో ఎమ్.ఎ. పట్టా పొందారు. భారతదేశంలోని మాట్లాడే భాషలను సంరక్షించడానికి, పునరుత్తేజనం చేయడానికి కృషి చేయాలనుకుంటున్నారు.

Other stories by Ritu Sharma
Swadesha Sharma

Swadesha Sharma is a researcher and Content Editor at the People's Archive of Rural India. She also works with volunteers to curate resources for the PARI Library.

Other stories by Swadesha Sharma

పి సాయినాథ్ పీపుల్స్ ఆర్కైవ్స్ ఆఫ్ రూరల్ ఇండియా వ్యవస్థాపక సంపాదకులు. ఆయన ఎన్నో దశాబ్దాలుగా గ్రామీణ విలేకరిగా పని చేస్తున్నారు; 'Everybody Loves a Good Drought', 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom' అనే పుస్తకాలను రాశారు.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

మేధా కాలే పూణేలో ఉంటారు. ఆమె మహిళలు, ఆరోగ్యం- ఈ రెండు అంశాల పైన పనిచేస్తారు. ఆమె పీపుల్స్ ఆర్కైవ్ ఆఫ్ ఇండియాలో మరాఠీ భాషకు అనువాద సంపాదకులుగా పని చేస్తున్నారు.

Other stories by Medha Kale