विराट कोहली म्हणजे त्याचं दैवत. तिला आवडायचा बाबर आझम. कोहलीने शतक ठोकलं की तो तिला मुद्दामहून सांगायचा. आणि बाबर चांगला खेळला की ती देखील त्याला चिडवायची. क्रिकेटवरनं अशी चिडवाचिडवी म्हणजे नुरुल आणि आयेशाची प्रेमाची भाषा होती. त्यांचं ते एकमेकांना चिडवणं, हास्यविनोद पाहिल्यावर या दोघांचं अगदी स्थळं पाहून लग्न झालंय यावर कुणाचा विश्वासच बसायचा नाही.
२०२३ साली जून महिन्यात होणाऱ्या
क्रिकेट विश्वचषक स्पर्धांचं वेळापत्रक आलं आणि आयेशाचे डोळे एकदम लुकलुकले. भारत
वि. पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला गुजरातेत अहमदाबादला होणार होता. “मी नुरुलला
म्हणाले, ही मॅच आपण स्टेडियममध्ये बसून पहायची,” ३० वर्षीय आयेशा सांगते. पश्चिम
महाराष्ट्रातल्या राजाचे कुर्ले या तिच्या माहेरी आम्ही बोलत होतो. “भारत आणि
पाकिस्तान या दोन देशांमध्ये आता कुठे मॅचेस होतायत? आमच्या दोघांच्या आवडत्या
खेळाडूंना एकत्र पाहण्याची अगदी दुर्मिळ संधी होती.”
३० वर्षीय नुरुल सिव्हिल इंजिनियर.
त्याने एक दोन फोन केले आणि चक्क दोन तिकिटं मिळवली. दोघंही जाम खूश झाले. आयेशाला
तेव्हा सहावा महिना सुरू होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या पुसेसावळी या
आपल्या गावाहून ७५० किमी लांबचा प्रवास कसा करायचा याचं अगदी तपशीलवार नियोजन
दोघांनी केलं. रेल्वेची तिकिटं काढली आणि राहण्याचंही बुकिंग करून टाकलं. मॅचचा
दिवस आला पण हे दोघं काही तिथे पोचू शकले नाहीत.
१४ ऑक्टोबर २०२३ उजाडला. नुरुलला
जाऊन एक महिना उलटला होता आणि आयेशा उद्ध्वस्त झाली होती.
*****
महाराष्ट्राच्या सातारा शहरापासून साठेक किलोमीटरवर असलेल्या पुसेसावळी गावामध्ये १८ ऑगस्ट २०२३ रोजी एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला. इन्स्टाग्रामवरच्या एका कमेंटमध्ये गावातला २५ वर्षीय आदिल बागवान हा मुस्लिम युवक हिंदू देवतांसंबंधी काही तरी अपमानकारक बोलत असल्याचं दिसतं. आजही आदिलचं स्पष्ट म्हणणं आहे की हा स्क्रीनशॉट कुणी तरी मॉर्फ केला आहे, म्हणजेच त्यात छेडछाड करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवरच्या त्याच्या मित्रांनी कुणीच ही कमेंट पाहिलेली नाही.
तरीही, कायदा सुव्यवस्था अबाधित
रहावी म्हणून पुसेसावळीतल्या मुस्लिम समाजातल्या काही जुन्याजाणत्या लोकांनी
त्याला पोलिसांकडे नेलं आणि या प्रकरणाचा तपास करा असं सांगितलं. “आम्ही सरळ
म्हणालो, आदिल दोषी असेल तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे आणि आम्ही देखील या कृत्याचा
निषेध करू,” पुसेसावळीत गॅरेज चालवणारे ४७ वर्षीय सिराज बागवान सांगतात.
“पोलिसांनी आदिलचा फोन जप्त केला आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं कृत्य
केल्याबद्दल त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.”
तरीही साताऱ्यातल्या कट्टरपंथी हिंदू गटांच्या संतप्त सदस्यांनी दुसऱ्या दिवशी पुसेसावळीमध्ये एक मोर्चा काढला आणि त्यामध्ये मुस्लिमांना धडा शिकवण्याचं आवाहन करण्यात आलं. आम्ही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ अशी धमकी द्यायलाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही.
सिराज आणि इतर काही मुस्लिम
बांधवांनी गावातल्या पोलिस स्टेशनला लगेच हे कळवलं आणि स्क्रीनशॉटची न्याय्य
तपासणी केली जावी तसंच गावातल्या या प्रकरणाशी कसलाही संबंध नसलेल्या
मुस्लिमांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशी त्यांना विनंतीही केली. “दंगे होण्याची
दाट शक्यता आहे असं आम्हीच पोलिसांना सांगितलं,” सिराजभाई सांगतात. “प्रतिबंधात्मक
पावलं उचला म्हणून आम्ही त्यांना विनवण्या देखील केल्या.”
मात्र औंध पोलिस स्टेशनचे सहाय्यक
पोलिस निरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांनी त्यांना वेड्यात काढलं होतं, सिराज भाई
सांगतात. “प्रेषित मोहम्मद एक साधासुधा माणूस होता तरी आम्ही त्याचे अनुयायी कसे
असा सवाल त्यांनी आम्हाला केला,” ते सांगतात. “वर्दीतला एखादा माणूस असं काही तरी
बोलू शकतो यावर माझा विश्वासत बसेना.”
पुढचे दोन आठवडे हिंदू एकता आणि
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या दोन कट्टरपंथी हिंदू संघटनांचे लोक पुसेसावळीमध्ये
कुणाही मुस्लिम पुरुषाला थांबवून जय श्रीराम म्हणायला भाग पाडत होते. नाही तर घरं
जाळून टाकण्याच्या धमक्या देत होते. अख्खं गाव अगदी कडेलोटावर पोचलं होतं. हवेत
तणाव भरून राहिला होता.
८ सप्टेंबर रोजी पुन्हा तशाच
स्वरुपाचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. मुझम्मिल बागवान, वय २३ आणि अल्तमाश बागवान,
वय २३ या दोघा स्थानिक युवकांनी इन्स्टाग्राम पोस्टखाली कमेंटमध्ये हिंदू देवतांचा
अपमानकारक काही तर लिहिल्याचं त्यात दिसत होतं. आदिलबाबत झालं तसंच. आणि
त्याच्यासारखंच या दोघांचंही हेच म्हणणं आहे की स्क्रीनशॉट फोटोशॉप करण्यात आले
आहेत. वरची पोस्टदेखील हिंदूंना काही मुस्लिम पुरुष शिव्या देत आहेत त्याचं एक
कोलाज होतं.
अति कडव्या हिंदू गटांनी हा मजकूर
तयार केला असल्याचं बोललं जात आहे.
या सगळ्याला पाच महिने उलटून गेले
तरी पोलिस अजून या तीन स्क्रीनशॉट्सची तपासणीच करतायत.
मात्र गावात जे अघटित घडवून आणायचं होतं ते झालंय. धार्मिक तणाव वाढत चालला होता आणि एक दिवस त्याची परिणती हिंसाचारात झालीच. ९ सप्टेंबर रोजी प्रतिबंधात्मक कारवाईची मुस्लिम समाजाची मागणी फोल ठरली.
१० सप्टेंबर रोजी दिवस मावळला आणि
शंभरहून अधिक कट्टरपंथी हिंदूंचा संतप्त जमाव गावात घुसला. मुस्लिमांची दुकानं,
घरं आणि वाहनं जाळायला आणि मोडतोड करायला त्यांनी सुरुवात केली. इथल्या मुस्लिम
समाजाच्या अंदाजानुसार एकूण २९ कुटुंबांवर हल्ला झाला आणि त्यामध्ये किमान ३०
लाखांचं नुकसान झालं. काही मिनिटांमध्ये आयुष्यभराची शिदोरी मातीमोल झाली.
अश्फाक बागवान, वय ४३ पुसेसावळीत ई सेवा केंद्र चालवतात. आपला फोन काढून ते मला त्याच्यावरचा एक फोटो दाखवतात. एक किरकोळ अंगकाठीचे म्हातारे गृहस्थ जमिनीवर बसलेत आणि त्यांचं डोकं रक्ताने माखलंय. “माझ्या दुकानावर त्यांनी दगड मारला तेव्हा काचा फुटून माझ्या वडलांच्या डोक्याला लागल्या,” ते सांगतात. “भयंकर होतं सगळं. जखम इतकी खोल होती की घरी इलाज पण करता येईना.”
पण गावात डोकं बिथरलेल्या त्या
जमावाने असा काही धुमाकूळ घातला होता की अश्फाक यांना घराबाहेर पडणं अशक्य होतं.
आणि त्यांनी ते धाडस केलं असतंच तर क्रिकेटप्रेमी नुरुल हसनसारखीच त्यांचीही गत
झाली असती.
*****
त्या दिवशी संध्याकाळी नुरुल कामावरून पुसेसावळीला परतला तोपर्यंत जाळपोळ वगैरे काही सुरू झालं नव्हतं. आदल्या दिवशी गावात जमाव गोळा झाला होता किंवा काही घटना घडल्या होत्या याची कसलीच कल्पना त्याला नव्हती. घरी येऊन, हात पाय धुऊन मशिदीत नमाज अदा करायला जावं असं ठरवून तो आवरायला लागला. “मी त्याला म्हटलं, घरी पाहुणे आहेत तर आज मशिदीऐवजी घरीच नमाज अदा कर,” आयेशा सांगते. “पण लगेच येतो जाऊन म्हणून तो बाहेर पडला.”
एक तास उलटल्यानंतर नुरुलने
मशिदीतूनच आयेशाला फोन केला आणि काहीही झालं तरी घराबाहेर पडू नकोस असं बजावून
सांगितलं. नुरुलचा विचार करून आयेशाच्या पोटात गोळाच आला पण तो मशिदीत आहे हे
कळाल्यावर तिने सुटकेचा निःश्वास टाकला. “कुठलाही जमाव असा प्रार्थनास्थळावर हल्ला
करेल असं माझ्या मनाला शिवलंही नव्हतं,” ती सांगते. “सगळ्या गोष्टी इतक्या
हाताबाहेर जातील, कुणालाच वाटलं नव्हतं. मस्जिदमध्ये तो सुरक्षित असेल असंच वाटत
होतं.”
पण तिची खात्री खोटी ठरली.
मुसलमानांच्या दुकानांवर, घरांवर
हल्ला केल्यानंतर हा जमाव मशिदीवर चालून गेला. आतून दारं बंद होती. काही जणांनी
बाहेर लावलेल्या गाड्या पेटवून दिल्या, आणि इतर काही जणांनी आत शिरायला सुरुवात
केली. बाहेरून एकेक धक्का बसायला लागला आणि कडी निघाली. थोड्या वेळाने दारं उघडली.
काठ्या, विटा, फरशा जे काही हाताला लागेल ते घेऊन या माथेफिरू जमावाने तिथे
गोळा झालेल्या मुसलमानांवर हल्ला करायला सुरुवात केली. काहीच क्षणांपूर्वी शांतपणे
हे सगळे नमाज अदा करत होते. जमावातल्या एकाने फरशी घेतली आणि नुरुलच्या डोक्यावरच
फोडली. त्यानंतर मारहाण करून त्याचा जीव घेण्यात आला. या हल्ल्यात इतर अकरा जण
गंभीर जखमी झाले. “त्याचा मृतदेह स्वतःच्या डोळ्यांनी बघेपर्यंत माझा विश्वास बसत
नव्हता,” आयेशा सांगते.
“नुरुलच्या खुनाचा आरोप असलेल्या लोकांना मी ओळखते. भाई म्हणायचे त्याला. त्याला मारहाण करून त्याचा जीव घेताना त्यांना कसा काय विसर पडला असेल,” आयेशा विचारते. तिच्या आवाजात काळीज पिळवटून टाकणारी वेदना आहे.
पुसेसावळीतल्या मुस्लिम समाजाने किती
तरी दिवस आधीपासून पोलिसांकडे काही तरी खबरदारीचे उपाय करण्याची सातत्याने मागणी
केली होती. संकटाची चाहूल त्यांना दुरूनच लागली होती. वाट होती सातारा पोलिसांची.
ते मात्र आले नाहीत.
*****
मशिदीवर झालेल्या या भयंकर हल्ल्याला पाच महिने उलटून गेले आहेत. पण पुसेसावळी मात्र आजही दुभंग आहे. हिंदू आणि मुस्लिम पूर्वीसारखे आता एकमेकांमध्ये मिसळत तर नाहीतच पण नजरेतही एकमेकांबद्दल संशय आहे. कधी काळी एकमेकांच्या घरी जाऊन एका पंगतीत जेवणारे लोक आता केवळ कोरडा व्यवहार करतायत. हिंदू देवतांविरोधात अवमानकारक काही लिहिल्याची तक्रार दाखल झालेले तीन मुस्लिम युवक आता जिवाच्या भीतीने गाव सोडून गेले आहेत. नातेवाईक किंवा मित्रांकडे ते आता राहतायत.
“भारतात गुन्हा सिद्ध होईपर्यंत
माणूस निर्दोष मानला जातो,” मुझम्मिल बागवान म्हणतो. तो कुठे आहे त्याचं ठिकाण उघड
न करण्याच्या अटीवर तो माझ्याशी बोलायला तयार झाला. “पण तुम्ही मुसलमान असाल ना तर
निर्दोष सिद्ध होईपर्यंत तुम्हाला अपराधीच मानलं जाणार.”
१० सप्टेंबरच्या रात्री मुझम्मिल
घरचा एक कार्यक्रम आटोपून पुसेसावळीला परत येत होता. साधारण तीस किलोमीटर अलिकडे
काही तरी खायला म्हणून तो एका ठिकाणी थांबला. खाणं येईपर्यंत त्याने आपलं व्हॉट्सॲप उघडलं. त्याच्या काही हिंदू मित्रांनी त्यांचं स्टेटस अपडेट केलं
होतं.
ते काय आहे ते पहायला त्याने त्यावर
क्लिक केलं आणि तो अक्षरशः थिजून गेला. वाटलं पोटातलं सगळं बाहेर पडणार. सगळ्यांनी
मुझम्मिलचा निषेध करत त्याने पोस्ट केलेली तथाकथित कमेंट टाकली होती. “असलं काही
तरी पोस्ट करून मी स्वतः संकट कशासाठी ओढवून घेईन?” तो विचारतो. “फोटोशॉप करून
टाकलेला फोटो आहे तो. हिंसाचार व्हावा म्हणूनच टाकलीये.”
मुझम्मिल लागलीच गावातल्या पोलिस
स्टेशनला गेला आणि आपला फोन त्याने पोलिसांच्या ताब्यात दिला. “अगदी नीट तपासा असं
मी स्वतः त्यांना सांगितलं,” तो पुढे सांगतो.
त्या कमेंटचा खरेखोटेपणा अजूनही
सिद्ध झालेला नाही कारण पोलिसांना मेटाकडून उत्तराची प्रतीक्षा आहे. इन्स्टाग्राम
मेटाच्या मालकीचं असल्याने ते त्यांच्या सर्वरवर हे सगळं तपासून मग ते आम्हाला
उत्तर पाठवतील असं सातारा पोलिसांचं म्हणणं आहे.
“मेटाला
उत्तर द्यायला इतका वेळ लागतोय यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही,” ओसामा मन्झर
म्हणतात. ते डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशनचे संस्थापक आहेत. “या गोष्टींना त्यांचं
प्राधान्यच नाहीये. आणि पोलिसांनाही याचा छडा लावण्यात फारसा रस नाहीये. त्यामुळे
ही सगळी प्रक्रियाच एक प्रकारे शिक्षा होऊन जाते.”
मुझम्मिल म्हणतो की आपण निर्दोष आहोत हे सिद्ध होईपर्यंत तो गावी परतणारच
नाहीये. सध्या तो २,५०० रुपये महिना भाड्यावर एक फ्लॅट घेऊन राहतोय. पंधरा
दिवसांतून एकदा तो आपल्या आई-वडलांना भेटतो पण त्यांच्यात फारसं बोलणं होत नाही.
“आम्ही भेटलो की त्यांना रडू कोसळतं,” तो म्हणतो. “पण मला कोलमडून चालणार नाही.
त्यांच्यासमोर धीराने सामोरं जावं लागतं.”
भाडेखर्च आणि घरखर्च भागवण्यासाठी मुझम्मिल सध्या एका किराणा मालाच्या दुकानात काम करतोय. पुसेसावळीमध्ये त्याचं स्वतःचं चांगलं जोरात चालू असलेलं आइस्क्रीमचं दुकान होतं. “भाड्याचं दुकान होतं,” तो सांगतो. “मालक हिंदू होता. हे सगळं घडल्यानंतर त्याने मला हाकलून लावलं आणि म्हणाला मी निर्दोष सिद्ध झाल्यानंतरच मला दुकान परत मिळेल म्हणून. सध्या घरचं भागवण्यासाठी माझे आई-वडील भाजीपाला विकतायत. पण गावातले हिंदू लोक त्यांच्याकडून भाजीसुद्धा विकत घेत नाहीयेत.”
या ध्रुवीकरणाची झळ लहानग्यांनाही
बसली आहे.
एक दिवस संध्याकाळी अश्फाक बागवानचा
नऊ वर्षांचा मुलगा उझेर शाळेतून अगदी हिरमुसून घरी आला. कारण तिथे बाकी मुलं
त्याला खेळायलाच घेत नव्हती. “हिंदू पोरं त्याला घेत नव्हते का तर तो ‘लांड्या’
आहे म्हणून. मुसलमानांत सुंता करतात म्हणून हे असले शब्द वापरले जातात,” अश्फाक
सांगतो. मुसलमानांसाठी सर्रास वापरण्यात येणारी ही शिवी आहे. “पोरांना काय दोष
द्यायचा? घरी ऐकलेलंच ते शाळेत बोलणार. वाईट याचं वाटतं की आमच्या गावात हे असलं
वातावरण कधीच नव्हतं.”
पुसेसावळीत
दर तीन वर्षांनी पारायणाचा सप्ताह असतो. आठवडाभर गावात हरिनाम आणि इतर ग्रंथांचं
पारायण केलं जातं. सर्वात अलिकडचा सप्ताह ८ ऑगस्टला संपन्न झाला. गावावर हल्ला
झाला त्याच्या फक्त एक महिना आधी. सप्ताहाच्या सुरुवातीचं पहिलं जेवण गावातल्याच
मुसलमान समाजाकडून देण्यात आलं होतं. १,२०० हिंदूबांधवांसाठी १५० लिटर शीर खुर्मा बनवण्यात
आला होता.
“आम्ही जेवणावर ८०,००० रुपये खर्च
केले असतील,” सिराज भाई सांगतात. “समाजाच्या सगळ्यांनी हातभार लावला होता. तीच आमची
संस्कृती आहे. आता वाटतं, त्याच पैशातून मशिदीला लोखंडी दरवाजा बसवून घेतला असता
तर आमच्यातला एक जण आज जिवंत असता.”
*****
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस निरीक्षक देवकर साहेबांच्या सांगण्यानुसार ६३ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून १० सप्टेंबरच्या हिंसाचारासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३४ जण फरार आहेत आणि ५९ जणांना याआधीच जामीन मिळाला आहे.
“राहुल कदम आणि नीतीन वीर या
प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत,” ते सांगतात. “दोघंही हिंदू एकता या संघटनेचं काम
करतात.”
पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या
हिंदू एकता या कट्टरपंथी संघटनेचा प्रमुख नेता विक्रम पावसकर महाराष्ट्र भाजपचा
उपाध्यक्ष आहे. समाजमाध्यमांवर त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरचे फोटो आहेत. माजी
मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्याची सलगी
आहे.
विक्रमचे वडील विनायक पावसकर हिंदुत्ववादी नेत्यांपैकी एक. आजवर त्याने अनेकदा
द्वेषमूलक आणि धार्मिक हिंसा भडकवणारी भाषणं दिली आहेत. २०२३ साली एप्रिल महिन्यात
त्याने साताऱ्यामध्ये एक ‘अनधिकृत मशीद’ पाडण्यात यावी यासाठी आंदोलन केलं होतं.
जून २०२३ मध्ये एका मोर्चामध्ये पावसकरने समस्त “हिंदूना संघटित व्हा” आणि ‘लव्ह जिहाद’ उखडून काढा अशी चिथावणी दिली होती. मुस्लिम पुरुष हिंदू स्त्रियांना आपल्या जाळ्यात ओढतात, लग्नानंतर इस्लाम स्वीकारायला लावतात आणि यातून पुढे जाऊन मुसलमानांची संख्या वाढून भारतामध्ये त्यांचं प्राबल्य वाढेल अशी कट्टर हिंदूंनी मांडलेली पूर्णपणे कपोलकल्पित म्हणजे लव्ह जिहाद. “आपल्या मुली, बहिणी अपहरण होऊन लव्ह जिहादच्या शिकार होतायत,” तो म्हणाला होता. “या जिहाद्यांना हिंदूंची संपत्ती आणि स्त्रिया लुटायच्या आहेत. आपण त्यांना सडेतोड उत्तर द्यायला पाहिजे.” मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार आणि भारत हे हिंदू राष्ट्र करायचं आहे असंही आवाहन त्याने केलं होतं.
पुसेसावळीत झालेल्या हल्ल्याच्या
काही दिवस आधी पावसकरने एका आरोपीच्या घरी एक बैठक घेतली होती असं एका साक्षीदाराने
सांगितलं आहे. गावावर हल्ला करणाऱ्या जमावामध्ये शंभरेक जण अनोळखी होते. पण
त्यातले २७ जण गावातलेच होते आणि पावसकरच्या त्या बैठकीला हजर होते असंही या साक्षीदाराने
पोलिसांकडे नोंदवलं आहे. जेव्हा हा माथेफिरू जमाव मशिदीत शिरला तेव्हा त्यातल्या
एकाचे शब्द होते, “एकाही लांड्याला आज जिवंत सोडायचं नाही. विक्रम पावसकर आपल्या
पाठीशी आहे. बिलकुल दयामाया दाखवायची नाही.”
इतकं असूनही पोलिसांनी त्याला अटक
केलेली नाही. या वार्तांकनासाठी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समार शेख यांच्याशी
संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. “आवश्यक
ते सगळे तपशील सार्वजनिक करण्यात आले आहेत,” ते म्हणाले. मात्र चौकशी किंवा
पावसकरची भूमिका याबद्दल काहीही बोलायचं त्यांनी टाळलं.
जानेवारी २०२४ मध्ये मुंबई उच्च
न्यायालयाने देखील पावसकरविरोधात काहीही कारवाई न केल्याबद्दल सातारा पोलिसांची
कानउघाडणी केली.
*****
सातारा पोलिसांची सगळीच चालढकल पाहता आपल्याला कधी तरी न्याय मिळेल का, नुरुलच्या खुन्यांना शिक्षा होईल का किंवा त्यांच्या खऱ्या सूत्रधाराला पकडलं जाईल का या सगळ्याबाबत आयेशा साशंक आहे. स्वतः वकील असलेल्या आयेशाला हे सगळं प्रकरण दाबून टाकण्यात येतंय अशीही शंका येते.
“बहुतेक आरोपी जामिनावर बाहेर आहेत
आणि बिनधास्त गावात फिरतायत,” ती सांगते. “सगळीच मस्करी चाललीये.”
सध्या ती राजाचे कुर्ले गावी आपल्या
आई-वडलांसोबत राहते. पुसेसावळीत सुरक्षित वाटत नाही आणि नुरुलची फार जास्त आठवण
येत राहते. “फक्त चार किलोमीटर अंतर आहे. मी सहज येऊन जाऊन करू शकते,” आयेशा
सांगते. “पण सध्या तरी आयुष्याची गाडी पुन्हा एकदा रुळावर आणायची आहे, बस्स.”
आपली वकिली सुरू करावी असा विचार तिने केला होता पण सध्या तरी तो तिने बाजूला ठेवला आहे. छोट्या गावामध्ये या कामाला फार वाव नसतो. “मी सातारा किंवा पुण्याला रहायला गेले तर गोष्ट वेगळी आहे,” आयेशा म्हणते. “पण मला आई-वडलांपासून फार दूर रहायचं नाहीये. त्यांची आजारपणं सुरू असतात आणि त्यांचं पहायला मला इथे रहायला पाहिजे.”
आयेशाची आई, शमा, वय ५० यांना
मधुमेहाचा त्रास आहे आणि वडील हनीफ, वय ७० यांना डिसेंबर २०२३ मध्ये हृदयविकाराचा
झटका येऊन गेला. आपल्या मुलीची परिस्थिती त्यांना सहन झाली नाही. “मला इतर कुणी
भावंडं नाहीत,” आयेशा सांगते. “आपल्याला मुलगा नाही असं त्यांना नेहमी वाटायचं,
आणि नुरुलने ती पोकळी भरून काढली होती. तो गेल्यापासून माझे वडील पूर्वीसारखे
नाहीतच.”
आयेशाने माहेरी राहण्याचा निर्णय
घेतला असला तरी तिला इतरही अनेक गोष्टी करायच्या आहेत. आयुष्याला अर्थ पाहिजे आणि
हेतूही. आपल्या नवऱ्याची एक इच्छा तिला पूर्ण करायची आहे.
नुरुल गेला त्याच्या पाच महिने आधीच
त्या दोघांनी मिळून एक बांधकाम कंपनी सुरू केली होती – अशनूर प्रायवेट लिमिटेड. तो
कामं आणणार होता आणि कायदेशीर बाजू ती पाहणार होती.
आता तो तर नाही पण तिला ती कंपनी बंद
करायची नाहीये. “मला बांधकामातलं फार काही कळत नाही,” ती म्हणते. “पण मी सगळं
शिकून घेईन आणि ही कंपनी नावारुपाला आणेन. सध्या पैशाची तंगी सुरू आहे पण पैसे उभे
करून मी ते करूनच दाखवणार आहे.”
त्याची दुसरी इच्छा पूर्ण करणं तसं फारसं
अवघड नाही.
आपल्या मुलाने क्रिकेट शिकावं अशी
नुरुलची फार इच्छा होती. आणि अशा तशा स्पोर्ट्स अकॅडमीतून नाही तर जिथे विराट कोहली
शिकला तिथूनच. आता आयेशाला त्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात आणायचं आहे. “मी ते पूर्ण
करणार म्हणजे करणार,” ती निर्धाराने सांगते.