पुणे जिल्ह्याच्या शिरुरमधल्या विजया मैड या नऊ ओव्यांमधून घरच्या लग्नाचं निमंत्रण सगळ्या देवीदेवतांना पाठवतायत. आणि या ओव्यांमधून घरच्या या सोहळ्याचं आनंदी चित्र रंगवतायत.

“मला पण थोड्या ओव्या येतात, त्या पण लिहून घे की,” विजयाताई आपल्या मुलाला जितेंद्रला म्हणाल्या होत्या. कॉलेजमध्ये शिकणारा जितेंद्र तेव्हा गावोगावी जाऊन ओव्या संकलित करत होता. त्या “थोड्या ओव्यां”ची संख्या भरली १७३. जात्यावरच्या ओव्या संग्रहासाठी त्यांनी इतक्या साऱ्या ओव्या गायल्या आहेत.

१९९० च्या दशकात जात्यावरच्या ओव्या संकलित करणाऱ्या मूळ चमूने एक लाखाहून अधिक ओव्या गोळा केल्या. बहुतेक ओव्या महाराष्ट्रातल्या आणि काही कर्नाटकातल्या बायांनी गायलेल्या आहेत. (जितेंद्र आजही जात्यावरच्या ओव्या प्रकल्पामध्ये सहभागी आहेत आणि आता पारीसोबत या प्रकल्पासाठी ओव्यांचा मराठीतून इंग्रजीत अनुवाद करण्यात आशाताई ओगले यांना सहाय्य करत आहेत.)

“मी फक्त सातवी शिकले पण माझी सगळी मुलं शिकली, स्वतःचा व्यवसाय करतायत, चांगल्या नोकरीत आहेत,” ८० वर्षं वयाच्या विजयाबाई सांगतात. तीन वर्षांपूर्वी आम्ही त्यांना जितेंद्र यांच्या घरी, पुण्यात भेटलो होतो. ओव्या गाऊन दाखवायला त्या आनंदाने तयार झाल्या, मात्र सुरुवातीला त्यांना काही ओळी आठवेनात. मग जितेंद्रच्या मदतीने त्यांना त्या आठवल्या आणि काही ओव्या आम्ही रेकॉर्ड करू शकलो.

विजयाबाई आपल्या आईकडून आणि चुलतीकडून ओव्या शिकल्या. घरात बायांच्या एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे ओव्यांचा वारसा पुढे जात असतो. आठ बहिणी आणि तीन भावांमधल्या त्या सर्वात थोरल्या. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या पळसदेव या गावी हे कुटुंब रहायचं. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. त्या आधी आणि त्या नंतरही भरपूर कष्ट काढल्याचं विजयाबाई सांगतात.

देवावरची श्रद्धा आणि सणावाराला देवधर्म हा विजयाबाईंच्या आयुष्याचा अगदी अविभाज्य भाग आहे. राज्यातल्या बहुतेक बायांसारखा

व्हिडिओ पहाः विजया मैड लग्नाचं आवतन ओवीतून पाठवतायत

लग्नानंतर विजयाबाई शिरुरला स्थायिक झाल्या. त्यांचे पती कांतीलाल मैड तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मापाडी म्हणून काम करायचे. संध्याकाळी ते एका रेशनच्या दुकानावर काम करायचे. या कामाचा मोबदला धान्याच्या रुपात मिळायचा – आठवड्याला पाच किलो ज्वारी किंवा बाजरी.

त्यांच्या कमाईत वाढत्या कुटुंबाचा खर्च भागवणं मुश्किल होतं. “माझी आई शिरूरच्या तंबाखूच्या कारखान्यात कामाला जायला लागली. ती सुटी तंबाखू आणायची आणि छोट्या पाकिटात भरायची,” जितेंद्र सांगतात. ते आणि त्यांची भावंडं – पाच भाऊ आणि एक बहीण आईला मदत करायचे. “रॉकेलच्या चिमणीची ज्योत असते ना, त्याच्यावर आम्ही पाकिटं पॅक करायचो.”

१९८० च्या त्या काळात विजयाबाईंना १,००० पाकिटांमागे बारा आणे (७५ पैसे) मिळायचे. या कामातून महिन्याला ९० रुपये घरात यायचे. घराला हातभार म्हणून जितेंद्र आणि त्यांचे भाऊ मिळेल ती कामं करत असत – भाजी विकायची, पेपरची लाईन टाकायची. शाळेत शिक्षणही सुरू होतं.

राज्यभरातल्या इतर बायांप्रमाणे देवावरची श्रद्धा आणि सणावाराला देवधर्म हा विजयाबाईंच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत घरातल्या लग्नाचं निमंत्रण सगळ्या देवदेवतांना पाठवलं जातंय. अनेक हिंदू घरांमध्ये घरात कोणतंही कार्य असलं तर त्याचं पहिलं निमंत्रण कुलदेवतेला दिलं जातं आणि त्यानंतर सग्यासोयऱ्यांना. देवासमोर पत्रिका ठेवून वधूवरांसाठी देवाकडे आशीर्वाद मागितला जातो.

Left: Vijaya Maid at her son's home in Pune. Right: Vijayabai with her son Jitendra, daughter-in-law and grandson
Left: Vijaya Maid at her son's home in Pune. Right: Vijayabai with her son Jitendra, daughter-in-law and grandson

डावीकडेः विजया मैड पुण्यात आपल्या लेकाच्या घरी. उजवीकडेः जितेंद्र, सून सोनाली (उजवीकडे) आणि नातू यश यांच्यासमवेत विजयाबाई

पहिल्या ओवीत विजयाबाई जेजुरी गडावरच्या खंडेराव आणि म्हाळसेला लग्नाची चिठ्ठी पाठवतायत आणि वऱ्हाडासोबत यायचं आवतण देतायत. तुळजापूरच्या अंबिकेच्या रथाला वाघ जुंपलेत, तिलाही लग्नाची चिठ्ठी पाठवलीये. अंबाबाईला लग्नाचं निमंत्रण देऊन विजयाबाई पातळाचे घोळ गणरायाच्या पायी ठेवत असल्याचं गातात. गणरायाला रेलून बसण्यासाठी लोड हवेत, त्यासाठी मांडवाच्या मेडी दूर सारण्याची विनवणी त्या पुढच्या ओवीत करतात.

पुढच्या ओव्यांमधून लग्नाचा दिवस आपल्यासमोर चित्रासारखा उभा राहतो. लग्न लावणाऱ्या ब्राह्मणाला त्या म्हणतात की काही खोड काढू नको नाही तर “माझ्या नवरी बाईच्या नावाने बोभाटा व्हायचा.” नवरीच्या बापाने अंगणात पूजेआधी अंघोळ केल्याने सगळा चिखल झाल्याचं त्या गातात. लगीनसराईत कापडाचा भाव वाढला असला तरी बहीणच वरमाई असल्याने तिच्यासाठी साडी घ्यावीच लागणार बरं असं पुढच्या ओवीत भावाला उद्देशून गायलंय. लग्नाच्या दिवशी साड्यांच्या झोळ्यांमध्ये नवरीच्या लेकुरवाळ्या बहिणींचं लेकरं झोपू घातलीयेत, त्या गातात.

शेवटच्या ओवीत विजयाबाई परत एकदा गणराजाला घरच्या लग्नाला येण्याचं निमंत्रण देतात. सोबत शारदेला घेऊन या असंही सांगतात. येताना पातळाचे घोळ (आहेराची लुगडी) आणण्याची विनंती देखील त्या करतात. दिलेला आहेर त्याच्याच आशीर्वादाने दिलाय असंच यातून सुचवायचं असावं.

विजयाबाईंनी गायलेल्या नऊ ओव्या ऐका

लग्नाची बाई चिठ्ठी गड जेजुरी जाऊ द्या
खंडेराव म्हाळसा मूळ वऱ्हाडी येऊ द्या

लग्नाची चिठ्ठी माझी तुला अंबाबाई
पातळाचे बाई घोळ गणराज तुझ्या पायी

लगनाची चिठ्ठी तुळजापुरच्या लाडीला
आई आंबिकेने वाघ जुंपले गाडीला

लग्नाची चिठ्ठ नको मोडू बामन भटा
मैनाच्या माझ्या बाई उपर नवरीचा बोभाटा

लग्नाच्या दिवशी चिखल कश्याचा झाला
पूजा ना गं मैनाचा बाप नवरीचा न्हाला

लग्न गं सराई कापडाला मोल झालं
बहिण गं वरमाई बंधु तुला घेणं आलं

मांडवाच्या मेडी तुम्ही दूर दूर सारा
देवा गणपतीच्या लोडाला जागा करा

लग्नाच्या दिवशी कश्या खांबो खांबी झोळ्या
नवरीच्या माझ्या बाई बहिणीच्या लेकुरवाळ्या

मांडवाच्या दारी गणराज तुम्ही यावा
पातळाचे घोळ संगे शारदाला घ्यावा

कलावंत – विजया मैड

गाव - शिरुर

तालुका – शिरुर

जिल्हा – पुणे

जात – सोनार

दिनांक – व्हिडिओ आणि ओव्या ८ ऑक्टोबर २०१८ रोजी रेकॉर्ड केल्या आहेत

पोस्टर – ऊर्जा


हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.

నమితా వైకర్ పీపుల్స్ ఆర్కైవ్ ఆఫ్ రూరల్ ఇండియాలో రచయిత, అనువాదకురాలు, మేనేజింగ్ ఎడిటర్. ఈమె, 2018లో ప్రచురించబడిన 'ది లాంగ్ మార్చ్' నవల రచయిత.

Other stories by Namita Waikar
PARI GSP Team

PARI Grindmill Songs Project Team: Asha Ogale (translation); Bernard Bel (digitisation, database design, development and maintenance); Jitendra Maid (transcription, translation assistance); Namita Waikar (project lead and curation); Rajani Khaladkar (data entry).

Other stories by PARI GSP Team
Translator : Medha Kale

మేధా కాలే పూణేలో ఉంటారు. ఆమె మహిళలు, ఆరోగ్యం- ఈ రెండు అంశాల పైన పనిచేస్తారు. ఆమె పీపుల్స్ ఆర్కైవ్ ఆఫ్ ఇండియాలో మరాఠీ భాషకు అనువాద సంపాదకులుగా పని చేస్తున్నారు.

Other stories by Medha Kale