‘अखेरचे शिलेदार’ या माझ्या पुस्तकात ज्यांची जीवनकहाणी मी लिहिली त्यातल्या हयात असलेल्या मोजक्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक म्हणजे थेलू महातो – थेलूदादू. गुरुवारी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातल्या पिर्रा गावी आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर हे जग सोडून गेलेले ते पहिले. १९४२ साली पुरुलियातल्या १२ पोलिस ठाण्यांवर मोर्चे निघाले. आज कुणाच्या गणतीतही नसलेल्या या आंदोलनातले हयात असलेले ते एकटेच होते, कदाचित. थेलूदादूंचं वय १०३ किंवा १०५ वर्षं असावं.
थेलूदादू गेले आणि स्वराज्यासाठी लढलेली, भारत एक स्वतंत्र देश व्हावा म्हणून झटलेली ही सोनेरी पिढी अस्तंगत होणार याची जाणीव अधिक गडद झाली. पुढच्या पाच-सहा वर्षांनंतर या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लढलेली एकही व्यक्ती हयात नसेल. तरुणांना, नव्या पिढीला एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाला पाहता येणार नाही, त्यांचे अनुभव ऐकता येणार नाहीत, त्यांच्याशी बोलताही येणार नाही. ही माणसं कोण होती, ती का लढली, कशासाठी लढली हे त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधीच आता मिळणार नाही.
थेलू महातो आणि त्यांचे आयुष्यभराचे साथी लोक्खी महातो आपल्या या गोष्टी सांगायला किती उत्सुक होते. आपल्या देशासाठी ते लढले आणि त्या गोष्टीचा त्यांना अभिमान होता हे नव्या तरुणाईला कळावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. थेलूदादू त्यांची ही गोष्ट आता स्वतः सांगू शकणार नाहीत. आणि खरं तर पुढच्या ५-६ वर्षांत या स्वातंत्र्यसैनिकांपैकी कुणीच हे करू शकणार नाही.
ही नवी पिढी आणि तरुणाई किती मोठ्या ठेव्याला मुकते आहे आणि आता आपणसुद्धा किती तरी गोष्टी कधीच समजून घेऊ शकणार नाही ही जाणीव दुःखद आहे. थेलूदादूंसारख्या अनेकांबद्दल, त्यांनी केलेल्या त्यागाबद्दल आपल्याला किती कमी माहित आहे! आणि खरं तर त्यांच्या कहाण्या आपलं पुढे काय होणार हे ठरवण्यासाठी किती मोलाच्या आहेत हे समजलं की आपण काय गमावलंय हे लक्षात येतं.
आज इतिहासाची मोडतोड केली जात असताना, चक्क खोटा, कपोलकल्पित इतिहास आपल्यावर थोपवला जात असताना तर ही हानी फार मोठी आहे. जनमानसात, मोठ्या प्रमाणावर माध्यमांमध्ये आणि सर्वात भयानक म्हणजे शालेय पुस्तकांमध्ये मोहनदास करमचंद गांधी या महात्म्याच्या खुनाबद्दलची काही कळीची सत्यं पुसून टाकण्याचं काम जोमाने सुरू आहे.
थेलूदादू स्वतःला गांधीवादी म्हणवून घेत नसले तरी थेलूदादू अख्खं आयुष्य, शंभरेक वर्षं अगदी साधे, निष्कांचन जगले. २९-३० सप्टेंबर १९४२ रोजी पुरुलियामधल्या १२ पोलिस ठाण्यांवर मोर्चे काढले गेले त्यात थेलूदादू होते. स्वातंत्र्यलढ्यातलं हे त्यांचं मोलाचं योगदान. ते स्वतःला डाव्या विचाराचे क्रांतीकारक मानत पण त्यांचं तत्त्व होतं अहिंसा. अर्थात भोळ्या भाबड्या लोकांच्या रक्षणासाठी किंवा कधी स्वतःचा जीव वाचवायची वेळ आली तर शस्त्र हातात घ्यावं लागणार असं त्यांचं म्हणणं असायचं.
अहिंसेचे साधक पण त्या पोलिस ठाण्यांवरच्या हल्ल्यात तर तुम्ही सहभागी होतात आणि तिथे बरीच हिंसाही झाली होती. ते कसं? २०२२ साली पिर्रामध्ये त्यांच्या घरी मी त्यांना हा प्रश्न विचारला होता. हिंसा इंग्रजांनी केली होती, त्यांनी प्रत्युत्तर दिलं. “त्यांच्या पोलिसांनी जमावावर बेछूट गोळीबार केला...” हा जमाव पोलिस ठाण्यांवर तिरंगा फडकवण्यासाठी गोळा झाला होता. “आपले मित्र-मंडळी, घरची लोकं किंवा साथीदारांना जर डोळ्यादेखत पोलिस गोळ्या घालत असतील तर लोक उलटा हल्ला करणारच की.”
थेलूदादू आणि आयुष्यभर त्यांची साथ देणारे लोक्खी दादू यांच्याशी बोलत असताना, गप्पा मारत असताना आम्हाला एक गोष्ट सतत जाणवत होती. ती म्हणजे कुठल्याही कल्पनांचा खुल्या मनाने स्वीकार करण्याची त्यांची ताकद. विभिन्न प्रभावांखाली येत त्यांची व्यक्तिमत्त्वं अगदी गुंतागुंतीची झाली होती. थेलूदादू आणि लोक्खीदादूंचे विचार आणि राजकारण निःसंशय डावं असलं तरी जगणं आणि नैतिक मूल्यं मात्र गांधीवादी. निष्ठा आणि ध्यास साम्यवादी, स्वभाव मात्र गांधीवादी. दोघंही अनेक दशकं कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते.
ते ज्या भागात आणि ज्या काळात राहत होते त्यांच्यासाठी एकच नायक-नेता होता – आणि तो म्हणजे, अर्थातच, नेताजी सुभाष चंद्र बोस. थेलूदादू आणि लोक्खीदादूंसाठी नेताजी हे सर्वेसर्वा होते. गांधीजींना त्यांनी कधीही पाहिलं नव्हतं. त्यांच्यासाठी ते दूर कुठे तरी असलेलं थोर, उत्तुंग व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्यासाठी अगदी हिरो म्हणावेत असे आणखी तिघे होते. रॉबिनहूडच म्हणावे असे तिघं डाकू – बिपिन, दिगंबर आणि पितंबर सरदार. ज्यांचा दरारा आणि क्रूरकर्मं ऐकून सगळ्यांना धडकी भरायची असे हे दरोडेखोर. मात्र सरंजामी जमीनदार आणि इतर शोषणकर्त्यांपासून रक्षण आणि न्याय मिळावा म्हणून लोक याच तिघांकडे जायचे. इतिहासकार एरिक हॉब्सबॉम यांनी वर्णन केल्याप्रमाणे यांची दरोडेखोरी क्रूर असली तरी “प्रस्थापित सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला आव्हान देणारी होती.”
थेलूदादू आणि लोक्खीदादू या दोघांना यातल्या अंतर्विरोधाचं बिलकुल वावडं नाही. या डाकूंबद्दल त्यांच्या मनात मिश्र भावना होत्या. थोडा आदर आणि थोडा तिरस्कारही. त्यांना मान देत असले तरी त्यांच्या हिंसक मार्गावर ते कधी गेले नाहीत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक दशकं ते विविध लढ्यांमध्ये, मग ते जमिनीसाठी असोत किंवा इतर मुद्द्यांवर सक्रिय राहिले. गांधींवादी राहणी असलेले स्वतंत्र कम्युनिस्ट.
थेलूदादू कुर्मी होते. जंगलमहल प्रांतातल्या अनेक लढ्यांमध्ये या समुदायाचं योगदान फार मोठं आहे. या संघर्षाची किंमत त्यांना मोजावी लागली. १९३१ साली इंग्रजांनी त्यांचा आदिवासी हा दर्जाच काढून टाकला. पुन्हा एकदा आदिवासी म्हणून आपली गणना केली जावी यासाठी मोठा संघर्ष या भागात सुरू आहे. थेलूदादू ज्या दिवशी वारले त्याच दिवशी जंगलमहल प्रांतात ही मागणी घेऊन नव्याने संघर्षाला सुरुवात झाली आहे.
थेलूदादूंना स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारं पेन्शन मिळालं नाही ना स्वातंत्र्यलढ्यातल्या त्यांच्या भूमिकेची दखल घेतली गेली. आम्ही त्यांना भेटलो तेव्हा वृद्ध व्यक्तींना देण्यात येणाऱ्या १,००० रुपये पेन्शनवर ते गुजराण करत होते. त्यांचं घर म्हणजे मोडकळीला आलेली, पत्र्याचं छत असलेली एक खोली. घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर थेलूदादूंनी स्वतःच्या हाताने बांधलेली एक विहीर आहे. या विहिरीचा त्यांना कोण अभिमान. तिच्या शेजारी उभं राहून त्यांनी आनंदाने आपले फोटो काढून घेतले.
थेलूदादूंनी हाताने खोदलेली विहीर आहे तशीच आहे. या स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींचे आवर्त गहिरे होत जातात.
थेलूदादू, लोक्खीदादूंची पूर्ण गोष्ट आणि इतर चौदा स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनकहाण्या वाचा:
अखेरचे शिलेदार
, लेखकः पी. साईनाथ (अनु. मेधा काळे), मधुश्री प्रकाशन, फेब्रुवारी २०२३.
स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रं आणि चित्रफिती पाहण्यासाठी पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया वरील स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमांचे दालन नक्की पहा.
पूर्वप्रसिद्धीः द वायर, ८ एप्रिल २०२३