जन्माष्टमीची रात्र होती. कृष्णाच्या कानावर आलं होतं की आर्यावर्तातील प्रजा त्याचा जन्म मोठ्या दिमाखात अन् उत्साहानं साजरी करते. पीतांबर नेसलेली मुलं, रस्त्यावर रंगीबेरंगी मिरवणुका, अंगणात कोलाम, मंदिरांत कृष्णलीला, दहीहंडी फोडणं, आनंदाने नाचणं, सारं काही मध्यरात्रीपर्यंत चालू राहतं. आज त्यालाही या सगळ्यात भाग घ्यावासा वाटला.
तो रूप बदलून पृथ्वीवर आला आणि ओळखीच्या ठिकाणी फिरून आनंद घेत होता. तोच अचानक गोरखपुरातून त्याला कोणीतरी दुःखाने विलाप करतंय असा आवाज आला. त्या भयावह आवाजाचा पाठलाग करत गेल्यावर त्याला एक इसम आपल्या हातात अर्भकाचं प्रेत घेऊन हॉस्पिटलच्या आवारात फिरताना दिसला. कृष्णाचं मन दुखावलं. "वत्सा, तुला एवढं दुःख का झालंय?" तो म्हणाला, "आणि तुझ्या हातात हे कुणाचं बाळ आहे?" तो इसम म्हणाला, "तुम्ही यायला फार उशीर केलात, प्रभू! माझा मुलगा नुकताच मेला."
अपराधी भावनेने कृष्णाने त्या शोकाकुल वडिलांसोबत थांबायचं ठरवलं आणि त्याच्यासोबत दहन घाटावर गेला. तिथे त्याला त्याहून भयावह दृश्य पाहायला मिळालं – घाटावर श्वेतवस्त्रात गुंडाळून एकावर एक रचलेले हजारो चिमुकले मृतदेह जमा झाले होते. मातांचा न थांबणारा विलाप, दुःखी कष्टी वडलांचं ऊर बडवणं. त्याला हे अनपेक्षित होतं.
झगमगीत पीतांबर कुठाय? हा कुठला अमंगळ उत्सव आहे? या चिमुकल्यांची कुठल्या कंसाने अशी दुर्दैवी दशा केली? हा कुणाचा शाप आहे? कोणतं हे राज्य? ही कोणती अनाथ प्रजा?
या नगरातली मुलं अनाथ आहेत का?
१. कॅलेंडर पाहा
ऑगस्ट येतो आणि निघून जातो
ज्यांना घालवता येत नाही, त्यांच्या डोळ्यांतून पाझरतो,
थरथरणाऱ्या हातातून खाली पडतो आणि भंगून जातो
नाकात शिरून श्वास घेऊ देत नाही
प्राण हिरावून घेतो
कोणाचं दुःस्वप्न
तर कोणाचा गळफास
माझ्या गोरखपूरच्या मातांचा लडिवाळ आहे
ऑगस्ट काही जणांसाठी वर्षभराचा काळ आहे
२. पण सगळे म्हणतात आयांची भीती खरी नाही
सगळे म्हणतात वडलांनीही खोटं सांगितलंय
इस्पितळात प्राणवायू न मिळण्याची बातमी,
एका मुघल सुलतानाचा डाव होता
खरं तर इतका प्राणवायू उपलब्ध आहे
की प्रत्येक गल्लीबोळात
प्राणवायूचा श्वासोच्छ्वास करत असते गोमाता
इतकं सहज आहे की आता तर प्राणवायूचं नाव ऐकताच
गुदमरू लागतो जीव
३. ही कोणाची मुलं आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर अनाथ
होत चाललेत
ही कोणाची मुलं आहेत ज्यांना गटारात जन्मलेले डास
चावतात
ही कोणाची मुलं आहेत
ज्यांच्या हातात बासरी नाही
कोण आहेत त्यांचे मायबाप
येतात कुठून हे लोक…
ज्यांच्या झोपड्या दुसऱ्या जगाची
झलक बघत असता दिसतच नाहीत
ज्यांच्या घरी मध्यरात्रीच्या प्रहरी
कृष्ण अवतार घेत नाहीत,
नुसताच जन्म घेतात
आणि यांना प्राणवायू हवाय!
यांना हव्यात इस्पितळात खाटा!
कमाल आहे!
४. गोरखाची भूमी दुभंगू लागलीये
कबीर शोकनृत्यात लीन आहे
आगीच्या ज्वाळांमध्ये जळतायत राप्तीचे किनारे
ज्या शहराने ओक्साबोक्शी रडायला हवं
ते मूग गिळून बसलंय
गावचे महंतांचं सांगणं आहे
देवांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी
मुलांचा बळी द्यावा लागतो म्हणे.
आर्यावर्त : इतिहासात वेगवेगळ्या टप्प्यांवर भारताच्या आणि संपूर्ण उपखंडाच्या संदर्भात वापरण्यात आलेली संज्ञा. वैदिक संस्कृती, रामायण आणि महाभारत, तसंच बुद्ध आणि महावीर यांची भूमी असा अर्थ अभिप्रेत आहे.
कोलम : बारीक तांदळाच्या पिठीपासून काढलेल्या ठिपक्यांच्या रांगोळीसाठी तमिळ भाषेतील शब्द
गोरख : १३व्या शतकातील 'नाथ' संप्रदायाचे संस्थापक व प्रवर्तक. त्यांच्या रचना 'गोरख बाणी' या नावाने ओळखल्या जातात.
राप्ती : उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात वाहणारी एक नदी, जिच्या काठावर गोरखपूर वसलंय.
अनेकांच्या एकत्रित प्रयत्नातून ही कविता आणि कथा तयार झाली आहे. त्यात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल स्मिता खा तो र हिचे आभार.