पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या शाहू कांबळे शेजारच्या मैत्रिणीने मन दुखावल्यावर घरच्यांच्या, खास करून आईच्या प्रेमाची, त्यातनं मिळणाऱ्या आधाराची आठवण काढतात
एखाद्या मैत्रिणीने आपल्या विश्वासाला धक्का पोचवला आणि आपलं मन मोडलं तर एखादी स्त्री काय करेल? काही दशकांपूर्वी आपल्या जवळच्या मैत्रिणीने असं मन मोडलं तर महाराष्ट्राच्या गावपाड्यांमध्ये त्यातून ओव्या तयार व्हायच्या. जात्याभोवती बसून दिवसभराचं दळण दळता दळता एखादी आपलं दुःख ओवीतून मांडायची. शाहू कांबळेंनी अगदी तेच केलंय.
आपल्या शेजारी राहणाऱ्या आपल्याच मैत्रिणीशी खटका उडाल्यावर जिवाला किती दुःख होतं ते शाहूबाईंनी या २६ ओव्यांमध्ये गायलं आहे. या ओव्यांचा गळाही शाहूबाईंचाच. यातल्या पहिल्या ओवीत त्या गातातः
अशी
शेजी
नं
पाशी
गुज
,
माझं
बोलुनी
गेलं
वाया
अशी
नं
नव्हं
माझी
बया
,
पोटात
गं
साठवाया
आणि शेजारणीने फक्त विश्वासघात केला असं नाही तर तिने असे काही बोल बोलले की त्याने मनच विटून जावं. रात्रंदिवस डोळ्याचं पाणी खळू नये. मग ही आपल्या शेजारणीला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवतेः
खवुट
गं
बोलण्यानी,
मन
माझं
ते
विटलं
अशी
नं
वाऱ्याच्या
समुख,
पान
केळीचं
फाटलं
शेजारीण एकदा गळ्यातले आणि हातातले सोन्याचे दागिने
मिरवत येते तेव्हा ही म्हणते की आपली मुलंच सोन्यासारखी आणि खरं तर
सोन्याहूनही जास्त मोलाची आहेत. पैसा-अडकाच दोघींच्या मैत्रीत विघ्न घेऊन आलाय असं
या ओवीतून प्रतीत होतं.
शेजारणीने दुखवल्यामुळे शेवटी घरच्यांच्या प्रेमाची आठवण तिला येत राहते. ती गाते अशीच एकदा दर्याच्या काठी गेली असता लाटांबरोबर 'माशांनी भरलेली पेटी' आली होती आणि दुसऱ्यांदा कधी तरी ओंजळीत मोतीच घावला. ही रुपकं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी लाभल्याने ती स्वतःला भाग्यवान समजते असा त्यांचा अर्थ होतो.
दुसऱ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नको असं मानत असूनही ती म्हणते की अख्ख्या जगात केवळ आईच अशी एक व्यक्ती आहे की जिच्यावर पूर्णपणे विसंबून राहता येतं. समुद्र जरी समोर असला तरी तिची तहान भागत नाही पण आई म्हणजे गंगेच्या पाण्यासारखी आहे. दुथडी वाहणाऱ्या चंद्रभागेची उपमा ती आपल्या आईच्या सढळ वृत्तीला देते. चंद्रभागेत स्नान केलं तर सगळी पापं धुतली जातात असं संत एकनाथांनी ‘माझे माहेर पंढरी’ या सुप्रसिद्ध अभंगात म्हटलं आहे.
या संचातल्या शेवटच्या १० ओव्यामध्ये आईवर असलेला अढळ विश्वास आणि प्रेम व्यक्त केलं आहे. शेजारणीकडून उसनं आणलं तर परतफेड करण्यासाठी हिशोब तरी ठेवता येईल पण आईने जे देऊ केलं आहे त्याची कोण काय फेड करणार? दुसऱ्या एका ओवीत आईला अमसुलाच्या पुडीची उपमा दिली आहे. जसे अमसुलाला पदर असतात तसंच आईच्या कुडीतून आपण जन्मलो असल्याची सुंदर उपमा दिली आहे.
“माझ्या बयाच्या भोजनाची, याद येती घडोघडी” असं लग्नानंतर घर सोडलेली ही विवाहिता गाते. काटकसरीत संसार कसा करावा याची शिकवण आपल्याला आईकडूनच मिळाली असल्याचं पुढच्या ओवीत सांगितलंय. बारीक दळल्याने एका भाकरीची दीड कशी होते याचं बाळकडूही आईकडूनच मिळालं आहे.
शाहूबाईंच्या ओवीतून त्या एक संदेश स्पष्टपणे देतातः जगरहाटीत वाईट अनुभव आले तर घरच्यांचं आणि खास करून आईचं प्रेम हे दुखावलेल्या मनावर फुंकर असतं, मलम असतं.
२०१७ साली सप्टेंबर महिन्यात पारी-जीएसपी चमू शाहूबाईंना भेटायला त्यांच्या गावी, नांदगावला गेला. पण त्यांची भेट काही होऊ शकली नाही. त्याच्या आदल्याच वर्षी त्यांचं निधन झालं होतं. त्यांची नणंद आणि मैत्रीण असणाऱ्या कुसुम सोनवणे सांगतात. स्वतः ओव्या गाणाऱ्या कुसुमताई पारीशी बोलताना शाहूबाईंच्या ओव्यांविषयी आणि त्यांच्या चालींविषयी म्हणतात, “ती ओव्यांना नवनवीन आणि गोड चाली लावायची. कोणत्या ओवीला कोणता गळा साजेल हे तिला बरोबर समजायचं,” कुसुमताई सांगतात.
सुरुवातीला शाहूबाई 'नेसले गं बाई, आज शालू बनारसी' ही एक सुप्रसिद्ध गवळण गुणगुणतायत. गर्भित अर्थ, वेगवेगळी रुपकं असलेल्या या ओव्यांची खुमारी त्या गुणगुणण्याने निश्चितच वाढवलीये. त्यांच्या खास शैलीत याच गळ्यात त्यांनी पुढच्या ओव्या गायल्या आहेत.
अशी शेजी नं पाशी गुज, माझं बोलुनी गेलं वाया
अशी नं नव्हं माझी बया, पोटात गं साठवाया
अशी शेजीपाशी गुज, शेजी आरध्या गुजाची
कशी आता माझी बया, किती अंतरभेदाची
अशी नं काई बोललीस, तुझ्या बोलण्याचा चटवटी
खवुट गं बोलण्याच्या, माझ्या हृदयी झाल्या गाठी
खवुट बोलण्यानी, माझ्या उरात झाली जाळी
कशी रात्र गं दिवस, नेत्रं माझी पाणी ढाळी
खवुट गं बोलण्यानी, मन माझं ते विटलं
अशी नं वाऱ्याच्या समुख, पान केळीचं फाटलं
शेजी काय लेणी लेती, ही तर येळाची हाडकं
अशी नं चल माझ्या वाड्या, सोनं दाविते भडक
अशी काही लेणं लेती, बाई हिनवती मला
अशी नं चल माझ्या वाड्या, सोनं दाविते तुला
अशी नं लेण्या लुगड्याचे, नको बसू शेजाराला
अशी नं आता माझी बाळ, जर माझ्या पदराला
अशी नं पुतळ्याची माळ, घालिते मी कवाबवा
अशी नं आता माझी बाळ, चंद्रहार केला नवा
अशी जिवाला सोडवण, एक असावी लेक बाळ
अशी नं आता माझी बाई, गळ्या पुतळ्याची माळ
अशी नं पुतळ्याची माळ, लोंबती गं पाठीपोटी
अशी नं माझिया बाळानी, चंद्रहारानी केली दाटी
अशी नं दे रे देवा मला, नाही मागत ठेवाईला
अशी नं आता माझी बाई, कुंकू मागती लावाया
अशी नं दुसऱ्याची आशा, नको करु येड्या मना
माझ्या बाळांच्या बाही बळ, यास दे रे भगवना
अशी दुसऱ्याची आशा, नको करु येड्या जिवा
माझ्या बाळांच्या बाही बळ, यास दे रे तूच देवा
अशी नं आता माझी बाई, हेलव्यानी आली पेटी
अशी नं दरव्याच्या काठी, सहज गेले आंघोळीला
अशी नं आता माझी बाळ, मोती आलं वंजळीला
अशी समींद्र सुकल्यानी, नाही झाली माझी तहान
अशी नं आता माझी बया, गंगा आली आसमान
समींद्र ग सुकल्यानी, नाही ना झाला एक घोट
अशी नं माझिया बयाला, चंद्रभागाला आला लोट
अशी नं बया बया म्हणं, बया कुणीच व्हईना
म्हणं नं बयाईची सर, शेजा नारीला येईना
अशी नं बया बया म्हणं, बया आमसुलाची पुडी
अशी नं त्याही पुडीमंदी, माझी जलमली कुडी
अशी नं बया बया म्हणं, बया काहीच जिनस
अशी नं घेतिईलं सोनं, नाही लाविली कानस
अशी नं शेजीचं उसनं, हाये ना अधुली पायली
माझ्या बयाच्या उसन्याची, याद कुणाला राहिली
अशी नं शेजीचं उसनं, फेडिते मी काडी काडी
माझ्या नं बयाचं उसनं, माझ्या भिडलं हाडोहाडी
अशी नं शेजीच उसनं, कसं दारात बसुनी
माझ्या नं बयाचं उसनं, माझ्या जलमापासुनी
बारीक गं दळ नारी, येकीची गं व्हईल दीड
माझ्या बयानी शिकविली, मला संसाराची मोड
बारीक गं दळणाची, भाकर ना चौफेरी
माझ्या बयाच्या भोजनाची, याद येती घडोघडी
कलावंतः शाहू कांबळे
गावः नांदगाव
तालुकाः मुळशी
जिल्हाः पुणे
जातः नव बौद्ध
वयः ७० (ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांचं गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झालं)
मुलं: दोन मुलं, दोन मुली
व्यवसायः शेतकरी आणि सुईण
दिनांकः या ओव्या आणि सोबतची माहिती ५ ऑक्टोबर १९९९ रोजी संकलित करण्यात आली. छायाचित्रं ११ सप्टेंबर २०११ रोजी घेण्यात आली.
पोस्टरः ऊर्जा
हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.
अनुवादः मेधा काळे