“मी १०८ [रुग्णवाहिका सेवा] नंबर वर किती तरी वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला. लाइन एकतर व्यस्त होती किंवा पोहचू शकत नव्हती,” गणेश पहाडिया सांगतत. त्याच्या पत्नीला गर्भाशयाच्या संसर्गाने ग्रासलं होतं आणि औषधोपचार चालू असले तरी आजार बळावला होता. आता रात्र झाली होती आणि तिच्या वेदना वाढल्या होत्या. गणेश पहाडिया तिला वैद्यकीय मदत मिळावी म्हणून अगदी व्याकुळ झाले होते.
“शेवटी मी मदतीच्या आशेने स्थानिक मंत्र्यांच्या सहाय्यकाशी संपर्क साधला. “त्यांच्या [निवडणूक] प्रचारादरम्यान त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं होतं,” ते सांगतात. पण ते इथे नसल्याचं सांगून त्यांचा सहाय्यक आता आम्हाला सतत नकारच देतोय. "त्यांनी मदत करायला चक्क टाळाटाळ केली."
गणेश अगदी उद्विग्न होऊन म्हणतात, “जर रुग्णवाहिका उपलब्ध असती तर मी तिला [मोठ्या शहरांमध्ये] बोकारो किंवा रांचीच्या चांगल्या सरकारी रुग्णालयात घेऊन जाऊ शकलो असतो.” ते तर दूरच, त्यांना पत्नीला जवळच्या खाजगी आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जावं लागलं आणि त्यासाठी नातेवाईकाकडून ६०,००० रुपये उसने घ्यावे लागले.
"निवडणुकीच्या काळात, ते सगळंच सांगतात, काय काय कबूल करतात- हे होईल, ते होईल... फक्त आम्हाला जिंकून द्या. पण नंतर, तुम्ही त्यांना भेटायला गेलात तरी त्यांच्याकडे तुमच्यासाठी वेळही नसतो,” गावाचे मुखिया असलेले ४२ वर्षीय गणेश म्हणतात. त्यांच्या मते, पहाडिया समुदायाच्या सदस्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे.
धनघडा हे पाकूर जिल्ह्याच्या हिरणपूर तालुक्यातलं एक लहानसं गाव. इथे पहाडिया जमातीची ५० कुटुंबं राहतात. गावात पोहोचण्यासाठी, राजमहाल पर्वतरांगेतील एका टेकडीच्या बाजूला केवळ त्यांचाच एकच पाडा आहे. अत्यंत खराब रस्त्यावरून आठ किलोमीटरचा प्रवास केल्यावर आपण तिथे पोचतो.
“आमच्या सरकारी शाळेची अवस्था खूपच वाईट आहे. आम्ही नवीन शाळेची मागणी केली. कुठे आहे?” गणेश विचारतात. बहुतेक पहाडिया विद्यार्थ्यांची पटावर नोंद नाही आणि त्यामुळे त्यांना राज्याने अनिवार्य केलेली मध्यान्ह भोजन योजना देखील मिळू शकत नाही.










