ममता परेड. पारीमधली आमची सहकारी. समाजाप्रती घट्ट बांधिलकी असलेली अतिशय हुशार अशी ममता गेल्या वर्षी, ११ डिसेंबर २०२२ रोजी हे जग सोडून गेली.
आज या घटनेला एक वर्ष पूर्ण होतंय. ममताने आपल्या स्वतःच्या गावाची, तिथल्या गावकऱ्यांसोबत झालेल्या अन्यायाची गोष्ट स्वतः रेकॉर्ड केली होती, तिच्या जाण्याच्या काही काळ आधी. आज तिच्या आठवणीत आम्ही ही गोष्ट आणि तिचा आवाज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
किमान गरजांसाठी आणि मूलभूत हक्कांसाठी आदिवासींच्या संघर्षाबाबत ममता लिहीत होती. पत्रकार म्हणून ती अगदी दुर्गम, नकाशावरही न सापडणाऱ्या गाव-पाड्यांमध्ये जाऊन तिथलं जगणं सर्वांसमोर आणत होती. भूक, उपासमार, बालमजुरी, वेठबिगारी, शिक्षण, जमिनीचा अधिकार, विस्थापन, आदिवासींच्या उपजीविका आणि अशा अनेक विषयांचा मागोवा ती घेत होती.



