“२०२० साली टाळेबंदी लागली होती तेव्हा काही लोक आले आणि आमच्या १.२० एकर जागेला त्यांनी कुंपण घातलं,” खुल्या माळावर विटांच्या भिंतीकडे बोट दाखवत तिशी पार केलेला फगुवा उरांव सांगतो. खुंटी जिल्ह्याच्या डुमरी गावामध्ये आम्ही बोलत होतो. इथे उरांव आदिवासींची संख्या अधिक आहे. “त्यांनी जमीन मोजायला सुरुवात केली आणि म्हणाले, ‘ही दुसऱ्या कुणाची तरी जमीन आहे. ही तुमची नाही.’ आम्ही विरोध केला.”
“त्यानंतर दोन आठवड्यांनी आम्ही उप-विभागीय दंडाधिकाऱ्यांकडे गेलो, खुंटीला. इथून ३० किलोमीटरवर. दर खेपेला २०० रुपये खर्च येतो. तिथे वकिलाची मदत घ्यायला लागली. त्याने आतापर्यंत आमच्याकडून २,५०० रुपये घेतलेत. पण काहीच झालेलं नाहीये.”
“त्या आधी आम्ही आमच्या तालुक्याच्या प्रांत कार्यालयात गेलो होतो. आम्ही या प्रकाराची तक्रार द्यायला पोलिस स्टेशनलाही गेलोय. आम्ही त्या जमिनीवरचा आमचा ताबा सोडून द्यावा म्हणून आम्हाला धमक्या सुद्धा आल्या आहेत. एक कडवी उजव्या विचाराची संघटना आहे. त्यांच्या जिल्हा पदाधिकाऱ्याने आम्हाला धमकावलंय. पण कोर्टात कसलीही सुनावणी झाली नाहीये. और हम दो साल इसी तरह से दौड-धूप कर रहे है.”
“माझ्या आज्याने, लुसा उरांवने १९३० साली जमीनदार बालचंद साहूकडून ही जमीन विकत घेतली. आम्ही तेव्हापासून ही कसतोय. या जागेच्या खंडाच्या पावत्या आहेत १९३० ते २०१५ पर्यंतच्या. त्यानंतर [२०१६] ऑनलाइन सुरू झालं सगळं. तिथे, त्या ऑनलाइन रेकॉर्डमध्ये पूर्वीच्या जमीनदाराच्या वारसांची नावं आलीयेत. हे कसं झालं त्याची आम्हाला काहीही कल्पना नाही.”
केंद्र सरकारने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम (DILRMP) आणला आणि फगुवा उरांवच्या हातून त्याची जमीनच गेली. सर्व जमिनींचे उतारे डिजिटाइझ करायचे आणि त्याचा एक केंद्रीय विदासंग्रह तयार करायचा असा हा कार्यक्रम आहे. जमिनींच्या उताऱ्यांचं व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने व्हावं या उद्देशाने सुरू केलेल्या या कार्यक्रमाअंतर्गत जानेवारी २०१६ मध्ये राज्य सरकारने लँड बँक पोर्टलचं उद्घाटन केलं आणि त्यामध्ये जिल्हावार जमीनधारणेची माहिती सादर करण्यात आली. या सगळ्याचा उद्देश होता “जमिन-संपत्तीवरून होणारे तंटे कमी करणे आणि भू-अभिलेख यंत्रणा अधिक पारदर्शी करणे.”
फगुवा आणि त्याच्यासारख्या अनेकांना याच्या अगदी विरुद्ध अनुभव येत आहे.
“ऑनलाइन पोर्टलवर आमच्या जमिनीची काय माहिती मिळते ते पहायला आम्ही प्रग्या केंद्रात गेलो.” थोडं शुल्क आकारून ग्राम पंचायत पातळीवर लोकांना सार्वजनिक सुविधा देणाऱ्या एक खिडकी केंद्रांना झारखंडमध्ये प्रग्या केंद्र म्हटलं जातं. “इथल्या ऑनलाइन उताऱ्यांनुसार नागेंद्र सिंग यांची नोंद जमीन मालक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या आधी संजय सिंग यांची मालक म्हणून नोंद आहे. त्यांनी ही जागा बिंदू देवींनी विकली आणि त्यांनी ती नंतर नागेंद्र सिंग यांना विकल्याची नोंद आढळते.”
“जमीनदाराचे वारस हीच जमीन आम्हाला पूर्ण अंधारात ठेवून विकत होते, खरेदी करत होते असं दिसतं. पण हे कसं काय शक्य आहे? कारण आमच्याकडे याच जमिनीच्या १९३० ते २०१५ सालच्या पावत्या आहेत. आजपावेतो आम्ही २०,००० रुपये खर्चले आहेत आणि पैशासाठी पळापळ सुरूच आहे. त्या जमिनीचे पैसे भरण्यासाठी आम्ही घरातलं धान्य विकलं होतं. आज जेव्हा मी त्या जमिनीवर ती भिंत पाहतो ना, तेव्हा वाटतं की आपल्या मालकीचं काही तरी आपण गमावलंय. आता या लढ्यात आम्हाला कोण मदत करेल, काहीच माहीत नाही.”







