दररोज सकाळी १० वाजता सुरतेच्या उत्तरेकडच्या मीना नगरमध्ये राहणाऱ्या रेणुका प्रधान यांचं घर हेच त्यांचं कामाचं ठिकाण बनतं. त्यांच्या घरी आणून दिलेल्या रंगीबेरंगी साड्या स्वयंपाकघरातल्या सिंकपाशी, दारापाशी आणि अगदी पलंगाखाली कोंबून ठेवल्या जातात. त्यानंतर रेणुका झटकन एक गडद गुलाबी आणि निळ्या रंगाची पॉलिस्टरची साडी काढतात आणि त्यांच्या खोलीबाहेरच्या पाण्याच्या पाइपवर टांगतात.
जवळच्याच वेद रोडवरच्या कापड कारखान्यातून ही साडी इथे आली आहे. मशीनवरच्या भरतकामादरम्यान पॉलिस्टर कापडावर काही धागे तसेच सुटे राहून जातात. इस्त्री करून, घडी मारून कपड्यांच्या कारखान्यात पाठवण्याआधी हे सुटे धागे काढून टाकावे लागतात. आणि इथेच रेणुकासारख्या घरबसल्या काम करणाऱ्यांचं काम सुरू होतं.
एका दिवसात किमान ७५ साड्यांचे असे जादाचे धागे चिमटीत धरून ओढून काढण्याचं काम रेणुका करतात. साडी भारी पॉलिस्टर रेशमाची असेल तर मग असे धागे काढण्यासाठी त्या पत्तीचा वापर करतात. “एका साडीला मला पाच ते सात मिनिटं लागतात,” त्या सांगतात. “चुकून जास्तीचे धागे ओढले गेले आणि कापड खराब झालं तर मला मुकादमाला अख्ख्या साडीचे पैसे भरून द्यावे लागतील. त्यामुळे बारीक लक्ष द्यावं लागतं.”
एका साडीचे २ रुपये अशा दराने रेणुकांना दिवसाचे १५० रुपये मिळतात. छोटीशी चूक झाली तरी पाच दिवसांची मजुरी बुडाली समजायचं. “दिवसभर [आठ तास] काम केल्यानंतर, माझी बोटं सुन्न पडतात,” त्या सांगतात.
ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातल्या पोलोसारा तालुक्यातल्या सनबरगाम गावातून स्थलांतरित झालेल्या रेणुका आपला यंत्रमाग कामगार नवरा आणि चार लेकरांसोबत १७ वर्षांपासून सुरतेत राहत आहेत. वरवरचा अंदाज काढला तरी सुरतेत ओडिशाचे ८,००,००० कामगार काम करत असावेत (पहाः कृत्रिम कापड, अस्सल हिरमोड आणि Living in the rooms by the looms ) यातले बहुतेक जण देशातली कापडाची राजधानी मानल्या जाणाऱ्या या शहरात यंत्रमाग आणि कापड कारखान्यांमध्ये काम करतात. जुलै २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या फेडरेशन ऑफ गुजरात वीवर्स असोसिएशन आणि त्यांची शाखा असणाऱ्या पांडासेरा वीवर्स असोसिएशनच्या अहवालानुसार या व्यवसायाची वार्षिक उलाढाल रु. ५०,००० कोटी इतकी आहे.
इथल्या हजारो अदृश्य घर-कामगारांपैकी रेणुका प्रधान एक आहेत – आणि यातल्या बहुतेक ओडिशाच्या यंत्रमाग कामगारांच्या पत्नी आहेत – ज्या सुरतेच्या उत्तरेकडच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये किंवा त्याच्या जवळ राहतात. त्यांचं काम म्हणजे धागे तोडणं (राहिलेले धागे काढणं) आणि कापडावर खडे चिकटवणं. त्यांच्या कामासाठी त्यांना कोणतंही संरक्षण साहित्य दिलं जात नाही किंवा त्यांना हे काम करताना काही शारीरिक त्रास झाला, उदा. डोळ्यांवर ताण येणं, कापणं, पाठदुखी, इ. तर त्याच्यासाठीही काही भरपाई दिली जात नाही. त्यांच्याबरोबर कामाचा कसलाही करार केला जात नाही, सामाजिक सुरक्षेची सोय नाही आणि तसं पाहता त्या कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करू शकत नाहीत.
“मी जवळ जवळ गेली १५ वर्षं काम करतीये, पण मला साधं त्या कंपनीचं किंवा तिच्या मालकांचं नावही माहित नाही. रोज सकाळी गठ्ठे येतात, आणि दर पंधरा दिवसांनी मला पैसे मिळतात,” रेणुका सांगतात.
रेणुकांच्या घरापासनं हाकेच्या अंतरावर शांती साहूदेखील हेच काम करतात. गंजम जिल्ह्याच्या ब्रह्मपूर सदर तालुक्यातलं बुडुका हे त्यांचं गाव. चाळिशीच्या साहू पहाटे ५ वाजता उठतात आणि मीना नगरमधल्या आपल्या मैत्रिणींसोबत जवळच्या सशुल्क शौचालयात जातात. पुढचे काही तास घरकाम उरकण्यात जातात – पाणी भरणं, स्वयंपाक, धुणी आणि यंत्रमाग कारखान्यातल्या रात्रपाळीवरून परत आलेल्या आपल्या नवऱ्याचं – अरिजीत साहूचं हवं नको पाहणं.
हे सगळं चालू असताना त्यांची मुलगी आशा साड्यांचे गठ्ठे सोडायला लागते. “आम्ही दोघी एकत्र काम करतो,” आपल्या १३ वर्षांच्या लेकीकडे निर्देश करत शांती सांगतात. आशाची सुरत महानगरपालिका चालवत असलेली उडिया माध्यमाची शाळा ८ वी पर्यंतच होती त्यामुळे नंतर ती सोडावी लागली आणि खाजगी शाळेत जाणं त्यांना परवडणारं नव्हतं. या मायलेकी जरा महागाच्या असणाऱ्या, जास्त भरतकाम असणाऱ्या साड्यांवर एकत्र काम करतात आणि साडीमागे ५ ते १० रुपये कमवतात. यात काही तरी चूक होण्याची शक्यता पण तशी जास्त असते. “आमच्या खोलीचं छत उंचीला कमी आहे आणि उजेड पण कमीच असतो त्यामुळे घराच्या आत काम करणं मुश्किल होतं. त्यामुळे मग आम्ही बाहेर उंचावरती या साड्या अडकवतो आणि जवळ जवळ दिवसभर उभ्याने काम करतो. कापडावर एखादा डाग पडला तरी आमच्या मजुरीतून पैसे कापून घेतात,” शांती सांगतात.
कपड्यांच्या कारखान्यामधलं त्यांचं अगदी खालचं स्थान आणि अधिकृत आकडेवारीमध्ये कुठेही उल्लेखच नाही यामुळे अशा घरी बसून काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या किती आहे याचाही स्पष्ट अंदाज बांधता येत नाही. “त्यांच्यापैकी कुणीही कसलाही लेखी करार केलेला नाही, खरं तर त्यांना काम देणाऱ्या मुकादमाचं नावही त्यांना माहित नसण्याची शक्यता आहे,” भारताच्या पश्चिमेकडच्या राज्यांमध्ये काम करणाऱ्या ओडिशातल्या कामगारांबरोबर कार्यरत आजीविका ब्यूरो या सुरतेतल्या सामाजिक संस्थेचे प्रकल्प समन्वयक संजय पटेल सांगतात. “अनेकदा तर त्यांचं काम म्हणजे श्रम आहेत हेदेखील त्या स्त्रियांना आणि त्यांच्या घरच्यांना पटत नाही कारण हे काम घरी बसून केलेलं असतं. दिवसाकाठी किती नग द्यायचे हे पक्कं असल्याने कधी कधी तर लहान मुलांनाही कामात ओढलं जातं. आणि त्यामुळेच त्या त्यांना मिळणाऱ्या मजुरीबाबत काहीच घासाघीस करत नाहीत.”
गुजरात किमान वेतन (एप्रिल ते सप्टेंबर २०१९, दर सहा महिन्यांनी यात महागाई दराशी सुसंगत बदल केले जातात) कायद्यानुसार ‘तयार कपडे बनवणे, किंवा त्यासोबतच्या गोष्टी तयार करणे आणि शिलाई काम’ यामध्ये गुंतलेल्या कामगारांना आठ तासांच्या पाळीसाठी दिवसाला रु. ३१५ इतकी मजुरी मिळायला पाहिजे. मात्र रेणुका, शांती आणि इतर महिला जे काम करतायत ते नगावर मोजलं जातं आणि त्यांना राज्याने निर्धारित केलेल्या किमान वेतनाच्या निम्म्याहून कमी मजुरी दिली जाते. इथल्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना याच धागा तोडण्याच्या कामासाठी महिन्याला ५,००० ते ७,००० रुपये मिळतात आणि कदाचित जादा कामासाठी भत्ता, कामगार विमा अशा सामाजिक सुरक्षेचाही लाभ मिळू शकतो. घरी बसून काम करणाऱ्या कामगार मात्र महिन्याला ३००० रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकत नाहीत आणि कामासंबंधीचे सगळे खर्चही त्यांनाच उचलावे लागतात.
“दहा वर्षांपूर्वी देखील मला एका साडीमागे २ रुपयेच मिळत होते. मी जर कधी मुकादमापाशी पैसे वाढवून देण्याचा विषय काढला तर तो मला सांगतो की मी घरी बसूनच काम करतीये आणि तसंही या कामात फार काही कौशल्य लागत नाही. पण मला विजेचं बिल, खोलीचं भाडं भरावं लागतं, त्याचं काय?” ३२ वर्षांची गीता सामल गोलिया विचारते. तिचा नवरा राजेश यंत्रमाग कामगार आहे. गोलिया कुटुंब मीना नगरपासून चार किलोमीटरवर विश्राम नगरमध्ये राहतं.
फेब्रुवारी २०१९ मध्ये कॅलिफॉर्नियाच्या बर्कले विद्यापीठाने एक अभ्यास प्रसिद्ध केला – 'कलंकित कपडेः भारताच्या घरबसल्या काम उद्योगातील मुली आणि स्त्रियांचं शोषण'. या मध्ये असं म्हटलं आहे की भारताच्या घरबसल्या काम उद्योगातील ९५.५ टक्के कामगार स्त्रिया आहेत. आधुनिक गुलामगिरीचे अभ्यासक सिद्धार्थ कारा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार यातल्या कोणत्याही कामगार महिलेला काम करत असताना काही इजा झाली तर आरोग्य सुविधा मिळत नाही, ती कामगार संघटनेची सदस्य नाही किंवा कामासंबंधी कोणतेही लिखित करार केले जात नाहीत.
सुरतेच्या कापड उद्योगासाठी स्त्रिया घरबसल्या जे काम करतात – जे खरं तर त्यांचं काम ठिकाण गणलं गेलं पाहिजे – ते काम रोजगार मानलं जात नाही. त्यामुळे त्यांच्या कामाचा समावेश कोणत्याही कामगार कायद्यात, उदा. फॅक्टरीज ॲक्ट, १९४८ होत नाही ज्याद्वारे उद्योगांमधल्या कामगारांच्या हक्कांचं रक्षण केलं जातं.
“घरी बसून कामाचा करार हा एक दिवाणी नातेसंबंध आहे [मालक-कामगार नातेसंबंध नाही] जिथे कामगार कायदे लागू होत नाहीत. त्यात पुन्हा काम एकाकडून दुसऱ्याला देऊन करून घेतलं जातं आणि त्यामध्ये कोणतेही नियम पाळले जातात का हे पाहण्याची यंत्रणाच अस्तित्वात नसते,” सुरत प्रांताचं सहाय्यक कामगार आयुक्त, जी. एल. पटेल सांगतात.
“विमा किंवा कोणतीही भरपाई अशाच कामगारांना देता येते ज्यांना नोंदणीकृत कारखान्याच्या स्थळी अपघात किंव इजा झाली आहे,” (वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे गठित) यंत्रमाग सेवा केंद्राचे सहाय्यक संचालक सिद्धेश्वर लोंबे सांगतात. “स्त्रियांचा या उद्योगात सहभाग आहे हे माहित असलं तरी त्यांचे कामाचे तास, कामाचं ठिकाण, तिथली परिस्थिती आणि तिथे झालेल्या इजा, इत्यादींची नोंद ठेवणं अवघड आहे कारण त्या त्यांच्या स्वतःच्या घरांमध्ये त्यांच्या सोयीनुसार काम करतात.”
कोणतीही व्यवस्थात्मक सुरक्षा नाही, सामाजिक संरक्षण नाही अशा परिस्थितीत गंजम जिल्ह्यातल्या बुगुडा तालुक्यातल्या भोगोडा गावातली ३० वर्षांची रंजिता प्रधान आता विश्राम नगरमधली एकमेव “ओडिया महिला एजंट” म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. “पुरुष मुकादमांबरोबर काम करणं फार अवघड होतं, ते आम्हाला वेळेवल पैसेही द्यायचे नाहीत. काही कारण नसताना ते आमची मजुरी कापायचे,” रंजिता सांगते. तेरा वर्षांपूर्वी तिने घरून काम करायला सुरुवात केली.
२०१४ साली, रंजिताने वेद रोडवरच्या एका कपडे कारखान्याच्या मालकाची भेट घेतली आणि त्याला सांगितलं की त्याने जर थेट तिला काम दिलं तर ती “चांगलं काम” करून देण्याची हमी घेईल. तेव्हापासून तीन कारखान्यांमधनं कापडावर खडे चिकटवायचं काम घेऊन ती वस्तीतल्या ४० बायकांना घरी काम देते. त्यांच्यातल्या अलिखित कराराप्रमाणे रंजिता दर पंधरवड्याला या महिला कामगारांना एक किलो खडे आणि डिंक पोचता करते. ड्रेसचं कापड दर रोज सकाळी त्यांच्या घरी पोचवलं जातं. प्रत्येक घर-कामगार रोज २,००० हून अधिक खडे चिकटवण्याचं काम करते आणि दिवसाला २०० रुपये कमावते (दर १० खड्यांमागे एक रुपया).
“त्यांचा माझ्यावर विश्वास आहे कारण त्यांना माहितीये, की मी पण त्यांच्यातलीच एक आहे,” रंजिता सांगते. “या कामामध्ये बायांना सलग तासंतास वाकून बारीक नक्षी भरायची असते. त्यामुळे पाठीला रग लागते, डोळ्यांवर ताण येतो. आणि तरीही, आम्ही तर काही तक्रार केली, तर आमच्या नवऱ्यालाही असंच वाटतं की हे काही खरंखुरं काम नाही, ‘टाइम-पास’ आहे.”
संध्याकाळचे ७ वाजलेत. रंजिता यंत्रमाग कारखान्यातून आपला नवरा भगवान कधी परततोय त्याची वाट पाहतीये. दिवसभराचं काम करून तिने कापडाचे गठ्ठे परत बांधून ठेवलेत. गेली १३ वर्षं, आला दिवस असाच जातो. “आम्ही सुरतेला येताना असा विचार केला होता की परत जाऊन गंजमला आपल्या कुटुंबासाठी एक घर बांधायचं,” ती म्हणते. “पण बचतीचं सोडा इथला रोजचा दिवस जरी नीट भागला तर शप्पथ.”
अनुवादः मेधा काळे