“बजेट बजेट जयघोष सुरू आहे, पण आमच्या आयुष्यात काही तरी फरक पडणारे का?” के. नागम्मा म्हणतात. नागम्मांचे पती २००७ साली सेप्टिक टँक साफ करत असताना मरण पावले. तेव्हापासून दोन मुलींचा सांभाळ नागम्मांनी एकटीनेच केला आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर नागम्मा सपाई कर्मचारी आंदोलनाच्या संपर्कात आल्या आणि आता त्या संघटनेच्या निमंत्रक आहेत. त्यांची थोरली मुलगी, शैला नर्स आहे आणि धाकटी आनंदी सध्या एक तात्पुरती सरकारी नोकरी करतीये.
“बजेट हा आमच्यासाठी फक्त एक भारी शब्द आहे. आमची जी काही कमाई होते त्यात आमच्या एका घराचं बजेट सांभाळणं जमेनासं झालंय. सरकारच्या सगळ्या योजनांमधून आम्हाला मात्र वगळण्यात आलंय. कसलं डोंबलाचं बजेट? माझ्या पोरींची लग्नं लागणारेत का या बजेटने?”
नागम्मांचा जन्म होण्याआधीच त्यांच्या आई-वडलांनी चेन्नईला स्थलांतर केलं होतं त्यामुळे त्यांचा जन्म चेन्नईत झाला आणि त्या इथेच लहानाच्या मोठ्या झाल्या. १९९५ साली नागुलपुरममध्ये राहत असलेल्या आपल्या सख्ख्या बहिणीच्या मुलाशी वडलांनी त्यांचं लग्न लावून दिलं. आंध्र प्रदेशच्या प्रकासम जिल्ह्यातल्या पामुरुजवळ असलेल्या या गावी नागम्मांचे पती कन्नन गवंडीकाम करायचे. नागम्मा आणि कन्नन माडिगा जातीत जन्माला आले आहेत. “२००२ साली दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा विचार करून आम्ही चेन्नईला आलो,” नागम्मा सांगतात. त्यानंतर तीनच वर्षांत कन्नन मरण पावले.




