हरमनदीप सिंग उभा होता आणि त्याच्या सभोवती रंगीबेरंगी पतंग पडलेले होते. तिथूनच पुढे पंजाब आणि हरयाणाच्या मधल्या शंभू सीमेवर दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना थोपवण्यासाठी पोलिसांनी मोठमोठाले बॅरिकेड्स लावले आहेत.
अमृतसरच्या १७ वर्षीय हरमनदीपने पतंग उडवून अश्रूधूरल सोडणारे ड्रोन खाली खेचले होते. हल्ला परतवून लावण्याचा हा फारच कल्पक उपाय होता. “मी डोळ्याच्या भोवती टूथपेस्ट लावलीये म्हणजे अश्रुधुराचा त्रास कमी होतो. आम्ही असेच पुढे जात राहणार आणि ही लढाईसुद्धा जिंकणार,” तो म्हणतो.
१३ फेब्रुवारी २०२४ रोजी पंजाबमधले हजारो शेतकरी आणि मजूर शांततामय पद्धतीने दिल्लीच्या दिशेने निघाले. त्यातलाच एक हरमनदीप. शंभू सीमेपाशी त्यांची गाठ पडली शीघ्र कृती दलाचे अधिकारी आणि पोलिसांशी. रस्त्यात लोखंडी खिळे ठोकलेले आणि काँक्रीटच्या भिंती उभ्या केलेल्या. दिल्लीतल्या आंदोलनस्थळी शेतकऱ्यांना पोचता येऊ नये यासाठी हा खटाटोप.
पहिल्या बॅरिकेडपाशी गुरु जंड सिंग खालसा याने सभेसमोर आपल्या पाच मागण्या मांडल्या – स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान हमीभावाची हमी, शेतकरी आणि शेतमजुरांना संपूर्ण कर्जमाफी, लखीमपूर हत्याकांडातल्या शेतकऱ्यांना न्याय आणि दोषींना अटक, शेतकरी आणि मजुरांसाठी पेन्शन योजना आणि २०२०-२१ साली जे शेतकरी शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई.
























