"मिर्ची, लसूण, आलं... दुधी-भोपळा, कारलं आणि गूळ."
ही काही मिरची, लसूण, आले, वापरून केल्या जणाऱ्या पदार्थाची रेसिपी नव्हे, तर सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या गुलाबरानी यांच्या गुणकारी सेंद्रिय खत आणि कीटकनाशक बनवण्यासाठी वापरण्यात येणारे घटक पदार्थांची नावं आहेत. या खताची निर्मिती त्या पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या काठावर असलेल्या त्यांच्या चुंगुना गावात तयार करतात.
५३ वर्षे वयाच्या गुलाबरानी पहिल्यांदा यादी ऐकली हे आठवून जोरात हसतात. “मी विचार करायचे की हे सगळं कुठून मिळणार? पण तेव्हा माझ्याकडे जंगलात आलेले भोपळे होते.” त्या पुढे सांगतात. आणि खतासाठी लागणाऱ्या गूळ किंवा इतर गोष्टी त्यांनी बाजारातून विकत घेतल्या.
त्या नक्की काय बनवत आहेत याबद्दल उत्सुकता असणाऱ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना तरी काय म्हणणार? पण इतर लोकांच्या मते गुलाबरानी यांनी लोक काय म्हणतील याकडे कधीच लक्ष दिलं नाही आणि म्हणूनच सुमारे 500 लोकसंख्या असलेल्या गावात सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.
“आपण बाजारातून जे काही विकत घेतो त्यात औषधं आणि विविध प्रकारची रसायनं टाकली जातात, त्यामुळे ते का खायचं, याचा आम्ही एक कुटुंब म्हणून विचार केला,” चार वर्षांपूर्वी घरात झालेल्या संभाषणाचा संदर्भ देऊन त्या सांगतात.
“मग आमच्या घरच्यांना वाटलं की सेंद्रिय खत वापरून शेती करणं ही निश्चितच चांगली कल्पना आहे. आम्ही सगळ्यांनी विचार केला की जैविक [सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले] अन्न खाल्लं तर आपल्या आरोग्याला फायदाच होईल. जैविक खतांनी, कीटकांचं आरोग्य [आरोग्य] धोक्यात येतं पण आपल्या आरोग्याची भरभराट होते!” त्या आनंदाने हसत हसत सांगतात.
















