कमला पहाडिया यांना भेटून आता १६ वर्षं झालीत. एक आदिवासी विधवा आणि चार मुलांची आई असलेल्या कमला ओडिशातील बलांगीर जिल्ह्यातील धुसामुंडा गावाच्या अगदी लांबच्या टोकाला एका मातीच्या झोपडीत राहतात. त्या काळी, कमला यांनी हैदराबादेतील एका विटभट्टी मालकाने जबरदस्ती डांबून ठेवलेल्या आपल्या दोन वर्षांच्या मुलाची, कौतुकचा सुटका कारण्यासाठी कांटाबांजीमधील दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात याचिका केली होती.
हे कुटुंब पहाडिया जमातीचं आहे. टोपल्या विणणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय. कामाच्या शोधात ते शहरात आले होते, पण कमला गरोदर होत्या आणि त्यांची प्रकृती खालावली, आणि त्यांना गावी परत यावं लागलं. कुटुंबाला दिलेली उचल परत मिळावी म्हणून वीटभट्टीच्या मालकाने त्यांच्या मुलाला आपल्याकडेच ठेवलं.
न्यायालयाने पोलिसांना मुलाला सोडवण्याचे आदेश दिले आणि कौतुक घरी परतला.
कमार म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या पहाडिया समुदायासाठी आजही फार काही बदललेलं नाही. पूर्वेकडच्या ओडिशा राज्यात अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा म्हणून संघर्ष करत असलेल्या पहाडिया लोकांच्या छत्तीसगढमधील सोयऱ्यांना मात्र विशेष बिकट स्थितीतील आदिवासी समूहाचा (पी.व्ही.टी.जी.) दर्जा मिळाला आहे. आता १८ वर्षांचा झालेल्या कौतुकला स्थलांतरावाचून पर्याय नाही. तो सध्या मुंबईत बांधकामावर काम करतो.
“आठवीत त्याने शाळा सोडली, त्यानंतर कामासाठी शहरात जायची ही त्याची दुसरी वेळ आहे,” कमला सांगतात. “शिक्षण चालू ठेव म्हणून मी किती गयावया केली पण त्यानं ऐकलंच नाही.” या भागातील तरुणांच्या मते त्यांना बांधकामावरचं काम अधिक पसंत आहे - तिथे त्यांना जास्त स्वातंत्र्य मिळतं आणि वीटभट्टीपेक्षा हे काम कमी कष्टप्रद आहे.
कौतुक हा कमला यांच्या चार मुलांपैकी सर्वांत थोरला. त्यांच्या सर्व मुली शाळेत जातात. १४ वर्षांची शक्राबती नववीत आहे, १३ वर्षांची चंद्रकांती आठवीत तर १० वर्षांची प्रेमलता चौथीत आहे. चंद्रकांती आणि प्रेमलता दोघी शहरातल्या कस्तुरबा आश्रम या अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलांच्या निवासी शाळेत शिकतात. शक्राबती हीदेखील अगोदर आश्रम शाळेत जायची, पण ती आता सायकलने जवळच्या गावी असलेल्या उच्च माध्यमिक शाळेत जाते.
“कमला यांनी खूप संघर्ष केलाय पण त्या कधीच हार मानत नाहीत,” बिष्णु शर्मा म्हणतात. ते एक स्थानिक वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते असून या भागातील स्थलांतराच्या विषयात त्यांचा हातखंडा आहे. “आपल्या मुलींना आश्रम शाळेत दाखल करण्यासाठी त्यांना व्यवस्थेशी झगडा करायला लागला. पहाडिया अनुसूचित जमात नसल्याचं कारण देत अगोदर अधिकाऱ्यांनी त्यांना शाळेत प्रवेश देण्यास मनाई केली होती.”




