आजचा दिवस म्हणजे पारीचं विलक्षण असं अनुवादकार्य साजरं करण्याचा दिवस आहे. अनुवादकांचा आमचा तब्बल १७० जणांचा गट आहे, ज्यातले किमान ४५ जण मिळून दर महिन्यात १३ भाषांमध्ये काम करतायत. आम्ही अगदी योग्य पावलं टाकत, योग्य दिशेने निघालो आहोत. याची साक्ष म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ३० सप्टेंबर रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन.
संयुक्त राष्ट्रसंघ म्हणतो, हा दिवस “भाषाविषयक काम करणाऱ्या सगळ्यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. राष्ट्रांना एकत्र आणण्यात, संवाद, समज आणि सहकार्य वृद्धींगत करण्यात आणि विकासामध्ये सहयोग देण्यात त्यांचं काम मोलाचं आहे...” शिवाय इतरही बरंच काही. आणि म्हणूनच आज आम्ही आमच्या अनुवादक गटाचं अभिनंदन करतोय. पत्रकारितेच्या कोणत्याही वेबसाइटपाशी ही अशी टीम नाही.
कोण आहेत हे अनुवादक? डॉक्टर, इंजिनियर, भौतिकशास्त्रज्ञ, भाषातज्ज्ञ, गृहिणी, शिक्षक, कलावंत, पत्रकार, लेखक, विद्यार्थी आणि प्राध्यापक असे सगळे. सर्वात ज्येष्ठ अनुवादक आहेत ८४ वर्षांच्या आणि सगळ्यात तरुण केवळ २२. काही जण भारताच्या बाहेर आहेत. काही जण देशाच्या दुर्गम कानाकोपऱ्यांमध्ये. जिथे नेटवर्कसुद्धा व्यवस्थित मिळत नाही.
पारीवरचं अनुवादाचं हे विलक्षण काम या देशातल्या सगळ्याच भाषांना समान आदर आणि समान वागणूक मिळावी या उद्देशाने सुरू आहे. पारीवरचा प्रत्येक लेख जवळपास १३ भाषांमध्ये उपलब्ध आहे – नसलाच तरी लवकरच असेल. आता हीच गोष्ट पहा – आपल्या स्वातंत्र्यांसाठी संघर्षरत भगत सिंग झुग्गियां - १३ भाषांमध्ये अनुवादित. आणि आमच्या अनुवादकांनी आजवर ६,००० लेख अशाच प्रकारे अनुवादित केले आहेत. आणि यातल्या अनेकांमध्ये बहुविध माध्यमांचा वापर केला आहे.



