छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यातल्या धमतरीपासून पाच किलोमीटरवर लोहरसीची प्राथमिक कन्या शाळा आहे. ही शाळा एकदम खास आहे. बाहेरनं पाहताच या शाळेचं वय आपल्या लक्षात येतं. दारातल्या पिंपळाचा घेरच सांगतो की तो ८० ते ९० वर्षांचा आहे. आत प्रवेश केला आणि विद्यार्थ्यांना भेटल्यावर मात्र आपल्याला वर्तमानाची जाणीव होते. या मुलींचा उत्साह पाहताना शाळेतलं सळसळतं चैतन्य आपल्यालाही जाणवतं.
शाळेची स्थापना १९१८ मध्ये झाली, स्वातंत्र्याच्या तब्बल तीस वर्षं आधी. तेव्हापासून, गेली ९६ वर्षं शाळेने सर्व विद्यार्थिनींची नोंद काळजीपूर्वक केली आहे. शाळेच्या शिक्षिका नीलिमा नेताम सांगतात, त्यांना एका संदुकीत वाळवी लागलेलं एक जुनं रजिस्टर सापडलं ज्यात शाळा सुरू झाली तेव्हापासूनच्या शिक्षिका आणि विद्यार्थिनींची नावं नोंदवली आहेत. या रजिस्टरला नवं वेष्टन घालून ते नीट जतन करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. शाळेचा इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने हा दस्तऐवज फार मोलाचा आहे.
आम्ही त्या दस्तांच्या संग्रहातली काही पानं चाळली. उदा. प्रमोशन बुक. पानाचा काही भाग वाळवीने खाल्ल्याने काही नावं दिसेनाशी झाली होती. मात्र बाकी माहिती अगदी स्पष्ट वाचता येत होती. शाईत टाक बुडवून सुवाच्य, टपोऱ्या अक्षरात ही नावं लिहिलेली आहेत.
काही नावं अशी – बानीन बाई तेलिन, सोना बाई कोष्टिन, दुरपत बाई लोहारिन, रामसीर बाई कलारिन, सुगंधीन बाई गोंडिन – प्रत्येकीच्या जातीचा स्पष्ट उल्लेख. या रजिस्टरमध्ये नावासाठी एकच रकाना असल्याने असा उल्लेख असावा. कारण नंतरच्या नोंदवह्यांमध्ये नाव, जात, पालकांचं नाव यासाठी वेगवेगळे रकाने दिसतात.
या दस्तावेजामध्ये इतक्या वर्षांपूर्वी शिकवण्यात येणारे विषयही वाचायला मिळतात. उदा. साहित्याच्या अभ्यासामध्ये संवाद, कथा, नाटक, गद्य, अभिव्यक्ती, शब्दसंग्रह, काव्य, उतारा, सही आणि अनुलेखन अशी यादी सापडते. गणितामध्ये आकडेमोड, क्रिया, चलन, साधं मोजमाप, लेखन पद्धती, गुणाकाराची सारणी, तोंडी बेरीज, वजाबाकी असे विषय दिसतात. शाळेचे शिक्षक, ज्योतिष विश्वास यांच्या मते, “त्या काळी सातत्यपूर्ण आणि बहुअंगी शिक्षण प्रचलित होतं.”
शाळेच्या पटावरून हे दिसून येतं की किती तरी मुली वयात आल्यावर शाळा सोडून देतात. शाळा सोडून देण्याचं कारण म्हणून अशी स्पष्ट नोंद केलेली दिसते. कामासाठी स्थलांतर आणि गरिबी ही कारणंदेखील नोंदवण्यात आली आहेत. त्या काळी लोहरसीसोबत आमडी आणि मुजगहन गावातल्या मुलीही या शाळेत शिकायला येत असत.
जुनी कागदपत्रं चाळत असताना तो काळ, तेव्हाचा समाज कसा होता याबद्दलही बरंच कळतं. १९१८ च्या रजिस्टरमध्ये अशी नोंद आढळते की आधी या शाळेचं नाव डॉटर्स स्कूल, पुत्री शाला असं होतं, जे नंतर कन्या प्राथमिक शाळा असं करण्यात आलं. १९१८ मध्ये शाळेत ६४ विद्यार्थिनी होत्या, आज हाच आकडा ७४ आहे. त्यातली एक अनुसूचित जातीतली, १२ अनुसूचित जमातीच्या आणि २१ मागासवर्गीय आहेत. शाळेत तीन शिक्षक आहेत.
शाळेचा फक्त भूतकाळच रोचक आहे असं नाही, तिची वर्तमानही तितकाच आशादायी आणि उज्ज्वल आहे. पोषण आहाराच्या वेळी शिक्षिका आणि मुली किती तरी गोष्टी एकमेकीशी बोलत असताना दिसतात. शिक्षिका आणि मुलींमध्ये मोकळं आणि मैत्रीचं नातं असलेलं दिसतं. मुलींना खूप गाणी येतात. हिंदी आणि छत्तीसगडीमधली ही गाणी त्या एकत्र गात असतात. पशुपक्ष्यांच्या रंगीबेरंगी चित्रांनी वर्गाच्या भिंती सजलेल्या आहेत. ज्योतिष विश्वास या शिक्षकाने ही चित्रं रंगवली आहेत. ते म्हणतात, “ही चित्रं शाळेच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहेत. मुलींना वाचायला, लिहायला आणि विचार करायला या चित्रांची मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चित्रं विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी एकत्र रंगवली आहेत.”
सध्या सुशील कुमार यादू हे मुख्य शिक्षक आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यावा यासाठी ते कष्ट घेतायत.
शाळेच्या सगळ्यात जुन्या इमारतीची डागडुजी करणं फार गरजेचं आहे. किंवा खरं तर जास्त मोकळी जागा असणारी नवी इमारत गरजेची आहे. तरीदेखील शाळेचा इतिहास समजून घेणं आणि विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्साह पाहणं फार सुखावणारं आहे. किती तरी मुली अगदी गरीब घरातल्या आहेत, पायात चपलाही नाहीत. पण त्यांचा एकूणच जोश पाहिला की त्या पुढे जाऊन शाळेचं नाव काढणार याची खात्री पटते.
मराठी अनुवादः मेधा काळे
इंग्रजी अनुवादः रुची वार्श्नेय