‘कॅप्टन भाऊ’ (रामचंद्र श्रीपती लाड)
स्वातंत्र्य सैनिक आणि तुफान सेनेचे प्रमुख
२२ जून १९२२ – ५ फेब्रुवारी २०२२
ते गेले. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले त्या देशाकडून कोणताही मानाचा मुजरा नाही ना शासकीय इतमाम. पण १९४० च्या दशकात जगातल्या सर्वात बलशाली सत्तेविरोधात जे आपल्या सहकाऱ्यांसह दंड थोपटून उभे राहिले त्यांची महती माहित असणाऱ्या हजारोंच्या उपस्थितीत हा शिलेदार अनंतत्वात विलीन झाला. १९४३ साली क्रांतीसिंह नाना पाटलांनी सातारा इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाल्याचं जाहीर करत भूमीगत प्रति सरकार स्थापन केलं आणि याच प्रति सरकारचा कॅप्टन म्हणजे रामचंद्र श्रीपती लाड.
पण कॅप्टन भाऊ (भूमीगत असतानाचं त्यांचं नाव) आणि त्यांचे सैनिक तितक्यावर थांबले नाहीत. पुढची तीन वर्षं, १९४६ पर्यंत त्यांनी इंग्रजांना त्यांच्या राज्यात थारा दिला नाही. जवळपास ६०० गावांमध्ये प्रति सरकारचं राज्य होतं. समांतर आणि जनतेचं राज्य. ५ फेब्रुवारी रोजी भाऊ गेले. गोऱ्या साहेबाच्या राजवटीला धूळ चारणारं सरकारच विलीन झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.







