“इथे कागदोपत्री नोंद असलेल्या विणकरांची कमतरता नाहीये पण माझ्या मृत्यूनंतर (व्यावहारिकदृष्ट्या) सर्व काही संपलेलं असेल,” रूपचंद देबनाथ त्यांच्या बांबूच्या झोपडीत हातमागावर विणकामातून विश्रांती घेत उसासा टाकून बोलत होते. ह्या झोपडीत बहुतांश जागा हातमागाने व्यापली होती आणि त्या व्यतिरिक्त तुटलेलं फर्निचर, धातूचे सुटे भाग, कचऱ्याचा ढीग आणि बांबूचे तुकडे पडलेले होते. एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी इथे जागाच नव्हती.
७३ वर्षीय रूपचंद हे त्रिपुरा राज्यातील भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरील धर्मनगर शहराच्या बाहेरील गोबिंदापूर इथे राहतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावात एक अरुंद खडड्यांच्या रस्ता जातो, एकेकाळी इथे २०० विणकर कुटुंबे आणि ६०० हून अधिक कारागीर रहात होते. गोबिंदापूर हातमाग विणकर संघटनेचे कार्यालय अरुंद गल्ल्यांमधल्या काही घरांमध्ये उभे आहे, त्याच्या गंजून गेलेल्या भिंती हरवलेल्या वैभवाची आठवण करून देतात.
“इथे एकही घर असं नव्हतं की जिथे हातमाग नव्हता,” नाथ समाजाचे (राज्यातील इतर मागासवर्गीय म्हणून नोंदलेले) रूपचंद सांगत होते. सूर्य तळपत होता आणि पुढे जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला. समाज आमचा आदर करायचा. “आता, कुणालाच आमची पर्वा नाही, मला सांगा ज्या व्यवसायात पैसा नाही अशा व्यवसायाचा आदर कोण करेल?” त्यांनी प्रश्न विचारला आणि ते गहिवरले.
या अनुभवी विणकराला त्याने हाताने विणलेल्या, फुलांचं विणकाम असलेल्या ‘नक्षी’ साड्या आठवतात. “१९८० च्या दशकात जेव्हा पूर्वाशाने (त्रिपुरा सरकारच्या हॅण्डक्राफ्ट एम्पोरिअम) धर्मनगरमध्ये एक आउटलेट उघडलं तेव्हा त्यांनी आम्हाला ‘नक्षी’ साड्या बंद करून साध्या साड्या बनवायला सांगितलं,” रूपचंद सांगतात. त्यांच्या कामातले बारकावे आणि एकूण गुणवत्ता फारच कमी होती आणि म्हणूनच त्या साड्या स्वस्तात मिळायच्या.
ते पुढे सांगतात, “नक्षी साड्या या प्रदेशात कमी होत गेल्या आणि आज इथे ना कुणी कारागीर उरलाय ना हातमागांना सुटे भाग पुरवले जाताय.” गेल्या चार वर्षांपासून विणकर संघटनेचे अध्यक्ष असलेले रवींद्र देबनाथ यांचे शब्द आजही कानात घुमतात. ते म्हणतात, “आम्ही तयार केलेल्या कपड्यांना बाजारपेठ नव्हती.” ही ६३ वर्षीय व्यक्ती सांगते की ती यापुढे विणकामाची गरज पूर्ण करू शकत नाही.














