सहरिया आदिवासी असलेल्या गुट्टी समान्याचं नाव ‘चित्ता मित्रांच्या’ मध्य प्रदेश वनखात्याच्या यादीत आलं आणि त्याला सांगण्यात आलं की “चित्ता दिसला तर फॉरेस्ट रेंजरला सांगायचं.”
कसलाही मोबदला नव्हता पण हे काम महत्त्वाचं वाटत होतं. आता ८,००० किलोमीटरचा प्रवास करून, समुद्र पार करत कार्गोमध्ये बसून, सैन्याच्या विमानांमधून आणि अगदी हेलिकॉप्टरमधून हे चित्ते भारतात येणार होते. त्यांना इथे आणण्यासाठी भारत सरकारने भरपूर परदेशी गंगाजळी खर्च केली आणि ते इथे आल्यानंतर त्यांचं वास्तव्य चांगलं असावं यासाठी इथल्या हुंड्याही फोडल्या.
चित्तामित्रांचं काम काय तर शिकाऱ्यांपासून त्यांचं रक्षण करणं आणि जर चुकून ते गावात कुणाच्या घरात शिरले तर गावकऱ्यांनी संतापून त्यांना काही करू नये हे पाहणं. आणि मग कुनो-पालपूर अभयारण्याच्या वेशावरती असलेल्या अनेक छोट्या पाड्यांमध्ये राहणारे आदिवासी, शेतकरी आणि रोजंदारीवर काम करणारे अंदाजे ४००-५०० ‘मित्र’ राष्ट्रासाठी सेवा द्यायला सज्ज झाले.
पण चित्ते इथे अवतरले खरे, त्यांनी जास्तीत जास्त काळ पिंजऱ्यांमध्ये आणि कुनोच्या जंगलातल्या कुंपणाने बंदिस्त भागामध्ये घालवला आहे. दोन्हींचा उद्देश एकच, चित्ते आत रहावेत आणि इतर कुणी तिथे प्रवेश करू नये. “आम्हाला आत जायला परवानगी नाही. सेइसियापुरा आणि बागचामध्ये आता नवीन गेट लावलेत,”श्रीनिवास आदिवासी सांगतो. तोसुद्धा चित्ता मित्र आहे.




















