दिया खरं तर तिथून सुटलीच असती.
ती बसमध्ये बसली होती. बस भरून कधी सुटणार याचाच तिला खरं तर घोर लागलेला होता. सुरत ते झालोड तिकिट काढलं होतं. तिथून एक तासभराचा प्रवास आणि गुजरातची सीमा पार करून ती राजस्थानच्या कुशलगडला आपल्या घरी पोचली असती.
खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक रवी तिच्या मागून बसमध्ये आला. आणि ती काही म्हणायच्या आत तिच्या हाताला धरून त्याने तिला बसमधून खाली उतरवलं.
लोक आपापल्या घाईत होते. कुणी सामान चढवत होतं, कुणी लेकरांना आवरत होतं. एक माणूस संतापून एका तरुण मुलीला ओढून नेतोय हे कुणी पाहिलंही नाही. “मला ओरडायची पण भीती वाटत होती,” दिया सांगते. रवीचा संताप काय आहे हे ती पुरतं ओळखून होती. त्यामुळे तिने शांत बसायचं ठरवलं.
आणि मग त्या रात्री ती परत एकदा बांधकामावरच्या आपल्या घरी आली. गेल्या सहा महिन्यांपासून हे घर म्हणजे तिच्यासाठी तुरुंग होता. दियाला झोप लागलीच नाही. सगळं अंग ठणकत होतं. रवीच्या मारहाणीत किती तरी ठिकाणी कापलं होतं, जखमा झाल्या होत्या. “त्याने मुठी आवळून मारलं. लाथा घातल्या,” ती सांगते. “तो मारत होता पण त्याला कुणीही थांबवू शकलं नाही.” कुणी पुरुष मध्ये पडला तर त्याचा दियावर डोळा आहे असा आरोप केला जायचा. बाया ही सगळी मारहाण पाहत होत्या पण त्या काही मध्ये पडल्या नाहीत. आणि कुणी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलाच तर रवी म्हणायचा, ‘मेरी घरवाली है, तुम क्यों बीच में आ रहे हो?’
“तो मला मारायचा आणि दर वेळी मला मलम पट्टी करण्यासाठी दवाखान्यात जावं लागायचं, ५०० रुपये खर्च व्हायचे. माझा दीर कधी कधी पैसे द्यायचा आणि सोबत दवाखान्यात यायचा. तो इतकंच म्हणायचा, ‘तू घर पे चले जा’,” दिया सांगते. पण ते कसं जमवून आणायचं हे दोघांनाही माहित नव्हतं.

















