पश्चिम विदर्भाचं विभागीय मुख्यालय असणाऱ्या अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात २०१७ चं हे संकट जास्त चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं कारण तिथे कोलायनोस्टेरास तपासणीची सोय आहे. कोलायनोस्टेरास हे एक प्रकारचं विकर आहे ज्यामुळे असेटिलकोलाइनचं (एका प्रकारचं चेतापारेषक) कार्य व्यवस्थित चालू राहतं. ऑरगॅनोफॉस्फेट विषबाधेमुळे कोलायनोस्टेरासचं काम थांबतं ज्यामुळे शरीरातले महत्त्वाचे अवयव निकामी होतात, ज्यात चेता संस्थेचाही समावेश होतो, परिणामी मृत्यू येऊ शकतो. अमरावतीच्या रुग्णालयात अशा प्रकारच्या विषबाधेवर उतारा ठरणारी औषधंदेखील उपलब्ध आहेत असं विशेष तपास पथकाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
अमरावतीच्या रुग्णालयात ज्या पद्धतीने ही विषबाधा हाताळली गेली तशाच प्रकारची तयारी इतर ठिकाणी असावी यासाठी शासनाने यवतमाळच्या वणी आणि पुसद या तालुक्यांच्या ठिकाणी असणाऱ्या उप जिल्हा रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करावेत, सोबतच यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात ३० खाटांचा आणि अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात २० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करावा अशीही शिफारस पथकाने केली आहे.
यवतमाळ जिल्ह्याचा कीटकनाशकांमुळे होणाऱ्या विषबाधेचा इतिहास पाहता शासकीय रुग्णालयात एक अद्ययावत विषशास्त्रविषयक प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी अशी शिफारसही करण्यात आली आहे. २०१७ च्या आपत्तीदरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांनी रक्ताचे नमुने विषशास्त्रीय परीक्षणासाठी तात्काळ पाठवले नव्हते, विषबाधेवरच्या उपचारांमधली ही मोठी त्रुटी आहे.
मोनोक्रोटोफॉसवर बंदी घाला, उतारा औषधं तयार ठेवा
विशेष तपास पथकाने मोनोक्रोटोफॉसवर संपूर्ण बंदी घालण्याची शिफारस केली आहे. हे एक प्रकारचं ऑरगॅनोफॉस्फेट आहे ज्याचा पिकावर आतून आणि बाह्य संपर्कातून प्रभाव होतो, अनेक देशात यावर बंदी घालण्यात आली आहे कारण मनुष्य आणि पक्ष्यांसाठी हे विषारी परिणाम करतं.
महाराष्ट्र शासनाने यावर अंशकालीन बंदी घातली, नोव्हेंबरमध्ये या कीटकनाशकाच्या विक्री आणि विपणनावर ६० दिवसांची बंदी घालण्यात आली, मात्र संपूर्ण बंदी जाहीर करण्यात आली नाही. कीटकनाशक कायद्यानुसार देशात मोनोक्रोटोफॉसवर बंदी घालण्याचे अधिकार केवळ केंद्राला आहेत.
कीटकनाशकांच्या उत्पादकांचे आणि विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचे, नवीन परवाने किंवा त्यांचं नूतनीकरण थांबवण्याचे अधिकार राज्य शासनांना आहेत. आणि पंजाबने हे केलं आहे – संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेने “अति धोकादायक” गणलेल्या मोनोक्रोटोफॉससह २० कीटकनाशकांवर पंजाब सरकारने २०१८ चा जानेवारी सरता सरता बंदी घातली. केरळनेही काही काळ आधी या कीटकनाशकावर बंदी घातली आहे. आणि सिक्किममध्ये, जे संपूर्णतः जैविक राज्य आहे, कोणत्याच रासायनिक कीटकनाशकांच्या वापराला परवानगी नाही.
विशेष पथकाने अशीही शिफारस केली आहे की जोपर्यंत कीटकनाशकांवरची प्रतिविषं किंवा उतारा असणारी औषधं उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कोणत्याच शासनाने अशा कीटकनाशकांच्या वापराला परवानगी देऊ नये. रोप वर्धकांच्या वापरात वाढ झाल्याचंही या अहवालात नोंदवण्यात आलं आहे आणि शासनाने अशा रसायनांच्या वापराला परवानगी देण्याआधी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत शास्त्रीय अभ्यास हाती घ्यावा असंही अहवालात म्हटलं आहे.
कृषी विस्तार यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली आहे याचा मात्र अहवालात उल्लेख केलेला नाही. नवी कीटकनाशकं किंवा नव्या कीडरोधक तंत्रांबद्दल आणि त्यांच्या योग्य वापरावर लक्ष ठेवण्याची कोणतीही यंत्रणा कृषी विद्यापीठं किंवा राज्य शासनाचं कृषी खातं यांच्याकडे नाही. खरं तर अशा संकटकाळी या यंत्रणा महत्त्वाची भूमिका पार पडू शकतात.
प्रत्यक्षात शेतकरी मात्र माहितीसाठी किंवा नव्या रसायनांसाठी अशी औषधं विकणाऱ्या दलालांवर किंवा दुकानदारांवर अवलंबून आहेत. आणि दलाल किंवा दुकानदारांना त्यांच्या मालाची विक्री करायची असल्यामुळे ते या रसायनांच्या गंभीर विषारी परिणामांबद्दल माहिती देण्याची शक्यता कमीच आहे. या अहवालात असं नमूद केलंय की शेतकरी काहीही करून अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि चांगलं पीक व्हावं, रोपांची जोमदार वाढ व्हावी यासाठी अशा दलालांच्या सल्ल्यानेच कीटकनाशकांचे प्रयोग करतायत. “[२०१७ च्या फवारणीच्या काळात] नव्या कीटकनाशकांचं आणि इतर रसायनांचं मिश्रण केल्यामुळे विषाची तीव्रता वाढली आणि दमट हवामानामुळे श्वासावाटे विषारी घटक आत जाण्याचं किंवा संपर्कातून विषबाधा होण्याची शक्यता जास्त वाढली,” असं अहवालात म्हटलं आहे.