एका लाकडाच्या ओंडक्यातून सूर उमटण्यासाठी बरेच दिवस लागतात. आणि तसं होण्यासाठी त्याला अत्यंत निपुण कारागिरांचे हात लागावे लागतात. (तमिळ नाडूच्या कुंभकोणम जवळच्या) नरसिंगपेट्टईमध्ये आजही हाताने नादस्वरम घडवणारी चार कुटुंबं आहेत. ते या कलेत इतके निपुण आहेत की हे काम अगदी सोपं वाटावं. त्यांच्या घराच्या परसात कच्चा माल नीट रचून ठेवलेला दिसतो. त्यांच्या घराशेजारीच असणाऱ्या त्यांच्या कार्यशाळेत लाकडाचे ओंडके केले जातात, त्याला आकार दिला जातो, तासून भोकं पाडली जातात. हे सगळं ज्या अचूकतेने केलं जातं ती केवळ सरावातूनच येते. नादस्वरम कलाकार – ज्यातले काही अगदी नावाजलेले संगीतकार आहेत – याच कार्यशाळांमध्ये त्यांचं वाद्य घेण्यासाठी अनेक दिवस तिष्ठत उभे राहिले आहेत. याच वाद्यांमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि हजारो, लाखोंची बक्षिसं देखील. पण ही वाद्यं घडवणाऱ्या कारागिरांच्या हातात नफा म्हणून प्रत्येक वाद्यामागे केवळ १००० रुपये पडतात. आणि त्यांचं नशीब चांगलं असेल तर ५०० रुपये अधिक.
तरी, दररोज सकाळी ठीक १० वाजता एन. आर. सेल्वराज त्यांच्या कार्यशाळेत येतात. ५३ वर्षीय सेल्वराज यांची नादस्वरम कारागिरांची चौथी पिढी आहे. त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणेच कृश, काटकुळे असणारे सेल्वराज पूजेच्या खोलीतून लोखंडी कानस बाहेर काढतात – त्यातल्या काही तर दोन फूट लांब आहेत. लांबुळका लाकडी ओंडका झटक्यात ‘पट्टरई’ (लाकडी लेथ) वर ठेवतात आणि सेल्वराज मला त्यांच्या गावाचा आणि या स्वरवाद्याचा संबंध समजावून सांगतात. कोणतंही तमिळ लग्न किंवा मंदिरातली रथयात्रा या वाद्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.
“नादस्वरम एक ‘मंगल वाद्य’ आहे. त्याचा उगम याच भागात, मायावरमजवळच्या एका गावात झालाय. माझे पणजोबा, गोविंदसामी अचारी तिकडे गेले आणि ते बनवण्याचं कसब शिकले.” हाताने फिरवायच्या लेथ मशीनच्या वरच्या स्वरात सेल्वराज मला सांगतात की त्यांच्या पणजोबांनी या गावाला नवा व्यवसाय मिळवून दिला असला तरी या जगाला एक नवं वाद्य मिळवून देण्याचं काम मात्र त्यांच्या वडलांनी केलंय. “१९५५ साली माझे वडील, रंगनाथन अचारी यांनी काही प्रयोग केले, मूळ वाद्यामध्ये काही बदल केसे आणि एक असं वाद्य निर्माण केलं ज्यात सातही स्वर उमटत होते.”
अंजन वृक्षाच्या लाकडापासून नादस्वरम घडवण्याची परंपरा आहे. “पण तुम्ही नवं लाकूड वापरून चालत नाही. ते किमान ७५-१०० वर्षं जुनं हवं. नवं लाकूड वाकतं. हे जे लाकूड दिसतंय ना ते जुन्या घराचे वासे आणि खांबांचं आहे.” त्यांच्या परसात रचलेल्या लाकडाकडे बोट दाखवत ते सांगतात. “पण आम्हाला लाकूड घेऊन यायचं म्हणजे डोकेदुखी असते. आम्हाला चेक पोस्टवर अडवतात, बिलं मागतात. आता मला सांगा कोणता विक्रेता मला जुन्या लाकडाची पावती देणारे?” वर कडी म्हणजे त्यांच्यावर चंदनचोरीचाही आरोप केला जातो.
लाकूड आणलं की त्यांच्या अडचणी संपल्या असं होत नाही. “एक वाद्य तयार करणं म्हणजे तीन माणसांचं काम आहे. आणि सगळा खर्च वगळता – लाकूड आणि मजुरी – आमच्या हातात एका नादस्वरममागे १०००-१५०० रुपये राहतात,” सेल्वराज नाराजीच्या सुरात सांगतात.
“कलाकार एका वाद्याचे ५००० रुपये देतात. त्यातून ते लाखो कमावू शकतात. मात्र अनेक वर्षांनी नवीन वाद्य विकत घ्यायला आल्यावरही त्यांना सवलत हवी असते!” सेल्वराज यांचे चुलते सक्तीवेल अचारी सांगतात. इथून थोडं पुढे गेल्यावर त्यांची कार्यशाळा लागते. सरकारच्या अनास्थेचाही सक्तीवेल यांना राग येतो. त्यांचं म्हणणं आहे, सगळे पुरस्कार किंवा मान मरातब केवळ वादकांसाठी का? ज्या गावात पारी नादस्वरमचा जन्म झाला (रंगनाथन अचारींच्या हस्ते) तिथले कारागीर मात्र कोणाच्या खिजगणतीतही नाहीत.
पण प्लास्टिकच्या आवरणात सुरक्षित असलेल्या एक हस्तलिखित पत्रात मात्र रंगनाथन अचारींच्या संगीतक्षेत्रातील योगदानाची स्तुती केली आहे. सेल्वराज यांनी ते नीट जपून ठेवलंय. आणि हे पत्र लिहिलंय, नादस्वरम विद्वान टी. एन. राजरत्नम पिल्लै यांनी.
जेवता जेवता सतीश मला त्यांच्या गाड्यांच्या प्रेमाविषयी सांगतात. मातीच्या चुलीवर कार्यशाळेतलं उरलं सुरलं लाकूड चुलीत सरपण म्हणून वापरून जेवण रांधलं होतं. “लोकांच्या मोबाइल फोनवर देवांचे किंवा त्यांच्या पालकांचे फोटो असतात. माझ्या फोनवर एक व्हॅन आहे!” साधारण वर्षभरापूर्वी मी त्यांना पहिल्यांदा भेटले असेन, तेव्हा एक प्रवासी व्हॅन चालवण्याचा त्यांचा पक्का इरादा होता. आता मात्र ते (त्यांचे चुलते, बहिणी आणि आईच्या हट्टाखातर) आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात शिरलेत. “पण मी माझा पर्यटनाचा व्यवसाय आणि शेती चालूच ठेवणारे.”
सतीश यांना ते सगळं चालू ठेवावंच लागणार आहे. (आणि सध्या अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा त्यांचा धाकटा भाऊ प्रकाश यालाही.) पूर्ण वेळ वाद्य तयार करण्याचा व्यवसाय कुटुंबाचं पोट भरण्यासाठी पुरेसा नाही. आपल्या घराण्याचं नाव चालू ठेवणं मानाचं आहे पण त्याने रोजचा खर्च भागत नाही. एवढं सारं लाकूड तर त्यातून निश्चितच विकत घेता येणार नाही.
सक्तीवेल यांच्याही कुटुंबासमोर हे काम पुढे कोण नेणार हा प्रश्न आहेच. त्यांचा नातू, सबरी, ज्याला अध्ययनात रुची आहे हा त्यांचा एकमेव वारस. सक्तीवेल यांचा मुलगा सेंथिलकुमार ज्यांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून नादस्वरम तयार केली आहेत यांना मात्र असा विश्वास वाटतो की सबरी “सीएनसी तंत्रज्ञान वापरून, त्यात आधुनिकता आणेल.” त्याने आपल्या घरात काय काय आधुनिक गोष्टी केल्या आहेत त्या ते मला दाखवतात – नवा, चकचकीत गोठा, परसातलं जनित्र आणि कार्यशाळेत १ अश्वशक्तीच्या मोटरवर चालणारं लेथ मशीन. “कुणालाच – अगदी माझ्या वडलांनाही – हे शक्य होईल असं वाटत नव्हतं. पण हे अगदी सुंदर चालतं.” आणि मजुरांची वानवा पाहता तर त्याचा फारच उपयोग होतो. “आता ते हात जोडून आमच्यासमोर उभे राहीपर्यंत आम्हाला काळजी नाही!” सक्तीवेल म्हणतात.
पण ही उच्चतम कला जिवंत रहायची असेल, नवी पिढी त्यात यायची असेल, तर कामासाठी तयार मजूर किंवा मोटरवर चालणारं लेथ मशीन या पलिकडे काही गरजेचं आहे. “जी चार कुटुंबं आजही या व्यवसायात आहेत, त्यांना पुरस्कृत करायला पाहिजे,” सेल्वराज म्हणतात. रास्त भावात लाकूड मिळावं आणि वृद्ध कारागिरांना पेन्शन याही त्यांच्या मागण्या आहेत. नवीन नादस्वरमला अनुसु (वाद्याचा खालचा पसरट भाग) जोडून झाल्यावर सेल्वराज उठून उभे राहतात आणि आदरपूर्वक ते वाद्य थांबलेल्या संगीतकाराकडे सुपूर्द करतात. कलाकार असलेले मुरुगनंदम या नव्या आणि अजून न रुळलेल्या वाद्यातून काही क्लिष्ट सुरावटी काढू पाहतात. सेल्वराज मला सांगतात की सध्या या वाद्याला ‘नरसिंगपेट्टई नादस्वरम’ असं भौगोलिक चिन्हांकन मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
“काही अधिकारी इथे आले, आमच्याशी बोलले,” सेल्वराज सांगतात. “जीआय एखाद्या ट्रेडमार्कसारखा असतो असं लोक म्हणत होते, पण त्याचा आम्हाला कसा फायदा होणार हे काही मला उमगलेलं नाही.” इतरांनाही फारशी स्पष्टता नाही, मात्र त्यांना इतकं माहित आहे की चिन्हांकन मिळो वा ना मिळो, त्यांचा व्यवसाय आहे तसा चालू राहणार आहे. आणि रोज सकाळी उठल्यावर त्यांना सतावणाऱ्या त्यांच्या मनातल्या चिंताहीः त्यांना चांगलं अंजनाचं लाकूड मिळेल का, त्यांची मुलं त्यांच्याकडून ही कला शिकतील का, संगीतक्षेत्रातलं त्यांचं योगदान या शासनाला कधी कळेल का...
पूर्वप्रसिद्धीः द हिंदू, http://www.thehindu.com/features/magazine/narasingapettais-nadaswaram-makers/article7088894.ece
हा लेख ‘तमिळ नाडूतील लुप्त होत चाललेल्या उपजीविका’ या मालिकेचा भाग आहे आणि भारतीय प्रतिष्ठानाच्या राष्ट्रीय माध्यम पुरस्कार २०१५ चे त्याला सहाय्य मिळाले आहे.
अनुवादः मेधा काळे