जयपूर उच्च न्यायालयाचा परिसर एकदम छान, सुखद आहे. फक्त तिथली एक गोष्ट मात्र राजस्थानातल्या अनेकांच्या डोळ्यात खुपणारी आहे. संपूर्ण देशातलं बहुधा हे एकच न्यायालय असावं ज्याच्या आवारात कायद्याच्या उद्गात्याचा, मनूचा पुतळा उभारलेला आहे (पहिले छायाचित्र पहा).
मनू नावाची कुणी व्यक्ती कधी खरंच अस्तित्वात होती याचे कसलेही पुरावे नसल्याने हा पुतळा कलाकाराच्या कल्पनेतून साकारला गेला आहे. अर्थातच या कल्पनांची भरारी फार मोठी नाही. इथे साकारलेला मनू चित्रपटांमधल्या एखाद्या ठोकळेबाज ऋषीसारखा दिसतो.
असं मानीव आहे की या नावाच्या एका व्यक्तीने मनुस्मृती लिहिली. अनेक शतकांपूर्वी ब्राह्मणांना संपूर्ण समाजावर कोणते नियम लादायचे होते ते म्हणजे या स्मृती. हे नियम/रिवाज भयंकर जातीय आहेत. इ.स. पूर्व २०० ते इ.स. १००० या काळात अनेक स्मृती लिहिल्या गेल्या. अनेक लेखकांनी मोठ्या कालखंडात त्या संग्रहित केल्या. यातली सर्वात प्रसिद्ध आहे ती मनुस्मृती. एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या लोकांना वेगवेगळ्या शिक्षा हे तिचं खास वैशिष्ट्य.
या स्मृतीनुसार, खालच्या जातीच्या लोकांच्या आयुष्याला काहीच मोल नव्हतं. उदा. “शूद्राच्या हत्येसाठीचं प्रायश्चित्त” पहा. एखाद्याने “बेडूक, कुत्रा, घुबड किंवा कावळा” मारला तर जे काही करावं लागेल तितकीच शिक्षा शूद्राच्या हत्येसाठी. जास्तीत जास्त म्हणजे एखाद्या ‘सत्कर्मी शूद्राच्या’ हत्येसाठीचं क्षालन हे एखाद्या ब्राह्मणाच्या हत्येच्या शिक्षेच्या एक षोडशांश असावं.
कायद्यासमोर सगळे समान या तत्त्वावर चालणाऱ्या एखाद्या यंत्रणेने पालन करावं असं यात कणभरही काही नाही. आपल्यावरच्या अत्याचारांचं प्रतीक असणारा हा पुतळा न्यायालयाच्या आवारात असलेला पाहून राजस्थानातल्या दलितांना संताप अनावर होतो. त्याहूनही वेदनादायी हे की भारतीय संविधानाच्या शिल्पकाराला मात्र न्यायालयाच्या आवारात स्थान नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा रस्त्याच्या कोपऱ्यावर गर्दीकडे तोंड करून उभा आहे. मनू मात्र न्यायालयात येणाऱ्या सगळ्यांकडे पाहत तोऱ्यात उभा.






