यंदाच्या मोसमात मराठवाड्यात सगळ्यात मोठं पीक आहे – तहान. ऊस वगैरे विसरा. तहान - माणसांना आणि उद्योगांना लागलेली तहान बाकी सर्व काही झाकोळून टाकतीये. आणि संपूर्ण मराठवाड्यात या तहानेचं पीक घेणारे दर दिवशी लाखो रुपये कमवत आहेत. वाळून गेलेला ऊस गाड्या भरभरून जनावरांच्या छावण्यांकडे चारा म्हणून चाललाय. आणि त्याच रस्त्यावरचे अगणित टँकर नफा कमवायला शहरं, गावं आणि उद्योगांकडे धावतायत. सध्या सर्वात मोठा बाजार आहे पाण्याचा. आणि त्यांचं प्रतीक म्हणजे हे टँकर.
मराठवाड्यात रोज हजारो टँकर पाणी भरतायत, वाहून नेतायत आणि विकतायत. यातले सरकारी टँकर हाताच्या बोटावर मोजण्याइतके आणि काही तर फक्त कागदावर. तेजीत वाढणाऱ्या पाण्याच्या बाजाराचा कणा आहेत खाजगी टँकर.
ठेकेदारीत उतरलेले आमदार आणि नगरसेवक आणि नगरसेवक आणि आमदार झालेले ठेकेदार या टँकर अर्थकारणासाठी फार महत्त्वाचे आहेत. प्रशासकीय अधिकारीसुद्धा. काहींचे स्वतःच्या नावावर टँकर आहेत तर काही बेनामी.
पण हा टँकर नक्की आहे तरी काय? खरं तर, स्टीलचे पत्रे वाकवून केलेल्या मोठ्या टाक्या. १०,००० लिटरच्या एका टँकरमध्ये ५ फूट x १८ फूट मापाचे तीन पत्रे असतात, प्रत्येकाचं वजन १९८ किलो. पत्रे वाकवून तयार केलेल्या टाक्या एकमेकाला जोडल्या जातात. या टाक्या ट्रकवर, लॉऱ्यांमध्ये किंवा इतर मोठ्या वाहनांवर वेगवेगळ्या प्रकारे लादून नेता येतात. छोटी वाहनं कमी पाण्याच्या छोट्या टाक्या वाहून नेतात. ५,००० लिटरची छोटी टाकी मोठ्या व्हॅनच्या ट्रॉलीत मावू शकते. तिथपासून ते अगदी १,००० आणि ५०० लिटरच्या टाक्या छोट्या ट्रॅक्टर आणि विना छपराच्या रिक्षांमध्ये आणि बैलगाड्यांमधनं नेल्या जातात.
पाण्याचं संकट जसजसं गंभीर व्हायला लागलंय तसं राज्यात दर दिवशी शेकडो टँकरची जोडणी होऊ लागली आहे. जालना जिल्ह्याच्या जालना शहरात सुमारे १२०० टँकर, ट्रक, ट्रॅक्टर आणि रिक्षा विविध आकाराच्या टाक्या वाहून नेण्याचं काम करत आहेत. पाण्याचा स्रोत आणि तहानलेले लोक यांच्यामध्ये त्यांच्या वाऱ्या चालू असतात. टँकरचालक मोबाइलवर गिऱ्हाइकाशी भाव ठरवून घेतात. मात्र सर्वात जास्त पाणी उद्योगांना जातं, जे मोठ्या प्रमाणावर पाणी विकत घेतात. “टँकरमालक रोज साधारणपणे ६० ते ७५ लाखांचे व्यवहार करतात,” मराठी दै. लोकसत्ताचे लक्ष्मण राऊत सांगतात. “पाण्याच्या बाजाराच्या एका अंगाचं हे इतकं मूल्य आहे – तेही या एका शहरात.” राऊत आणि त्यांच्या सहयोगी वार्ताहरांनी गेली अनेक वर्षं या भागातल्या बाजार आणि व्यापाराचा मागोवा घेतला आहे.
टाक्यांचे आकार वेगवेगळे आहेत. पण या शहरात, राऊत सांगतात, “सरासरी क्षमता अंदाजे ५००० लिटर भरेल. हे सगळे १२०० टँकर दिवसातून तीन फेऱ्या तरी करतातच. म्हणजे सगळे मिळून २४ तासात किमान १.८ कोटी लिटर पाणी वाहून नेतात. चालू दर आहे, हजार लिटरला ३५० रुपये. म्हणजे दिवसाला ६० लाख रुपये. पाणी घरगुती वापरासाठी आहे, जनावरांसाठी की उद्योगांसाठी, त्याप्रमाणे भाव ठरतो.”
पाण्याची टंचाई टँकर अर्थकारणाला चालना देते. टँकर तयार होतायत, दुरुस्त होतायत, भाड्याने जातायत, विकले जातायत आणि विकत घेतले जातायत. जालन्याच्या वाटेवर आम्ही एका बरीच लगबग चालू असलेल्या ठिकाणी पोचलो – अहमदनगर जिल्ह्यातलं राहुरी. इथे १०,००० लिटरच्या टँकरची टाकी बनवण्यासाठी सुमारे ३०,००० रुपये लागतात. त्याच्या दुप्पट पैशात ती विकली जाते. राहुरीच्या कारखान्यात, छोट्या इंडस्ट्रियल एरियामध्ये आमची टँकर तंत्रज्ञानाशी छान तोंडओळख होते. “एमएस प्लेटचा ५ फूट x १८ फूटचा पत्रा ३.५ मिमि जाड असतो (याला ग्रुप १० म्हणतात),” एका फॅब्रिकेशन युनिटचे मालक श्रीकांत मेलवणे आम्हाला माहिती देतात. ते आम्हाला “पत्रा वाकवण्याचं यंत्र” दाखवतात. यावर प्रत्येक पत्रा हाताने वाकवावा लागतो.



