आषाढी एकादशी आणि विठ्ठलाच्या भक्तांनी धरलेला उपवास यावरच्या ओव्या फुलाबाई भोंग यांनी इथे गायल्या आहेत. एकादस धरली तर जन्म-मरणाच्या फेऱ्यातून जिवाला मुक्ती मिळते अशी अनेकांची श्रद्धा आहे.
यंदा आषाढी एकादशी २० जुलै रोजी आली. अनेक सश्रद्ध हिंदू संपूर्ण दिवस कडक उपास करतात, फक्त पाणी पितात. पण महाराष्ट्रात अनेक जण दिवसभर उपवास न करता, ज्याला मजेत “मराठी फास्ट फूड” म्हटलं जातं, असा साधा सोपा फराळ करतात. त्यात साबुदाणा खिचडीही आली. टॅपिओका (ज्यापासून साबुदाणा तयार करतात), बटाटा आणि शेंगदाणे अशा “उपासाला चालणाऱ्या” पदार्थांचा यात समावेश असतो.
जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकीच्या फुलाबाई भोंग यांनी आषाढी एकादशीच्या उपासाबद्दल पाच ओव्या गायल्या आहेत. हिंदू कालगणनेनुसार आषाढ महिन्याच्या अकराव्या दिवशी पूर्ण दिवस उपवास धरला जातो. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती हवी असेल तर हा उपवास करायला पाहिजे अशी भाविकांची धारणा आहे.
फुलाबाई गातात की विठ्ठलसुद्धा या दिवशी उपवास धरतो. आणि गोविंद फळ येणाऱ्या वाघाटीच्या उंच वेलाजवळ रखुमाई शिड्या उभारते. हिरव्या रंगाचं हे फळ औषधी असून एकादशीचा उपवास सोडताना ते शिजवून खाल्लं जातं.





