एखाद्या कोराई तोडण्यात तरबेज असणाऱ्या बाईला एक कोरई तोडायला १५ सेकंद लागतात, ती झोडपण्यासाठी अर्धा मिनिट आणि पुढची काही मिनिटं मोळी बांधण्यासाठी. एक प्रकारचं गवत असलेलं हे झाड त्यांच्याहून उंच आणि प्रत्येक मोळीचं वजन भरतं जवळपास पाच किलो. या बायांकडे पाहिलं तर त्यातले कष्ट जाणवतही नाहीत. डोक्यावर एका वेळी १२-१५ मोळ्या घेऊन अर्धा किलोमीटर उन्हाच्या कारात चालत जायचं – एका मोळीमागे मिळणाऱ्या दोन रुपयांसाठी.

दिवस संपता संपता त्यांच्यातल्या प्रत्येकीने कोरईच्या १५० मोळ्या गोळा केलेल्या असतात. तमिळ नाडूच्या करूर जिल्ह्यात नदीकाठच्या जमिनीत ही झाडं भरपूर उगवतात.

कावेरीच्या तीरावर करूरच्या मनवासी गावातल्या नाथमेडू वस्तीवरच्या बाया दिवसाचे आठ तास सलग कोरई तोडण्याचं काम करतात. सुट्टी जवळपास नाहीच. आणि काम करणाऱ्या सगळ्या बायाच. दाट पाल्यातून वाकून त्या कोरई तोडतात, हाताने साळतात आणि मोळ्या बांधतात. नंतर एका ठिकाणी या मोळ्या आणून टाकतात, जिथे त्या गोळा केल्या जातात. हे सगळं मेहनतीचं काम आहे.

अगदी पोरवयात असल्यापासून कोरई तोडण्याचं काम करत असल्याचं बहुतेकींचं म्हणणं आहे. “मी जन्माला आले तेव्हापासून कोरई काडू (जंगल) हेच माझं जग आहे. मी १० वर्षांची होते तेव्हापासून या रानांमध्ये काम करतीये. दिवसाला तीन रुपये मिळायचे तेव्हा,” ५९ वर्षांच्या ए. सौभाग्यम सांगतात. त्यांच्या कमाईवर त्यांचं पाच जणांचं कुटुंब निर्भर आहे.

एम. नागेश्वरी, वय ३३ विधवा आहेत. त्यांची दोघं मुलं शाळेत जातात. त्यांचे वडील गुरं राखायला आणि कोरई तोडायला त्यांना पाठवायचे ते त्यांच्या स्मृतीत आहे. “मी तर शाळेची पायरी देखील चढली नाहीये. ही रानंच माझं दुसरं घर आहेत,” त्या म्हणतात. आर. सेल्वी, वय ३९ आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून हेच काम करतायत. “ती पण कोरई तोडायची. मी खूप लहानपणीच हे काम करायला सुरुवात केलीये,” त्या सांगतात.

व्हिडिओ पहाः करूरमध्ये कोरईची तोड

या सर्व जणी मुथरय्यार या मागास वर्गात मोडणाऱ्या समाजाच्या आहेत आणि सगळ्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या अमूरच्या आहेत. नाथमेडूपासून ३० किलोमीटरवर असणारं मुसिरी तालुक्यातलं हे गावही कावेरीच्या तीरावर आहे. मात्र वाळूच्या उत्खननामुळे इथे पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. “आमच्या गावातल्या [नदीच्या] कालव्यात जरा पाणी आहे त्यामुळे तिथे कोरई उगवते. पण गेल्या काही काळात पाणी आटत चाललंय त्यामुळे आम्हाला कामासाठी जास्त लांब जावं लागतं,” मागेश्वरी सांगतात.

मग अमूरचे रहिवासी शेजारच्या करूर जिल्ह्यातल्या ओलिताखालच्या रानांमध्ये जातात. त्या बसने तिथे जातात, कधी कधी ट्रकने. दिवसाचे ३०० रुपये कमवण्यासाठी त्या प्रवासावर खर्च करतात. ४७ वर्षांचे व्ही. एम. कन्नन आपल्या पत्नीसोबत, ४२ वर्षीय के. अक्कंदींसोबत कोरई तोडतात. ते खेदाने म्हणतात, “कावेरीचं पाणी इतरांसाठी उपसलं जातंय आणि भूमीपुत्रांना मात्र थेंबासाठी वणवण करावी लागतीये.”

ए. मरियारी, वय ४७ वयाच्या १५ व्या वर्षापासून कोरई तोडतायत. “तेव्हा आम्ही दिवसाला १०० मोळ्या बांधायचो. आता कमीत कमी १५० बांधतोय आणि ३०० रुपये रोज मिळतोय. इथे मजुरी खूप कमी आहे. एका मोळीमागे ६० पैसे.”

“१९८३ साली एका मोळीमागे १२.५ पैसे मिळायचे,” कन्नन सांगतात. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षापासून कोरई तोडायचं काम केलं आहे. तेव्हा त्यांना दिवसाला ८ रुपये मिळायचे. गेल्या १० वर्षांमध्येच ठेकेदारांना खूप विनंती केल्यानंतर हा दर मोळीमागे १ रुपया आणि नंतर २ रुपये करण्यात आला, ते सांगतात.

अमूरच्या कामगारांना कामावर घेणारे ठेकेदार, मणी १-१.५ एकर जमीन भाड्याने घेतात आणि त्यावर विक्रीसाठी कोरईची लागवड करतात. जेव्हा पाण्याची पातळी कमी असते तेव्हा जमिनीचं भाडं महिन्याला एकरी १२,०००-१५,००० इतकं असतं, ते सांगतात. “पाणी वाढलं की तेच तिप्पट-चौपट होतं.” त्यांचा महिन्याचा निव्वळ नफा एकरामागे १,०००-१,५००० इतका असल्याचं ते सांगतात. पण हा आकडा खूपच लहान आहे.


Left: V.M. Kannan (left) and his wife, K. Akkandi (right, threshing), work together in the korai fields. Most of the korai cutters from Amoor are women
PHOTO • M. Palani Kumar
Left: V.M. Kannan (left) and his wife, K. Akkandi (right, threshing), work together in the korai fields. Most of the korai cutters from Amoor are women
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः व्ही. एम. कन्नन (डावीकडे) आणि त्यांच्या पत्नी, के. अक्कंदी (उजवीकडे, गवत झोडपताना) कोरईच्या रानात एकत्र काम करतात. अमूरमध्ये कोरई तोडण्याचं काम बहुतेक करून स्त्रियाच करतात

कोरई म्हणजेच नागरमोथा लव्हाळ्याच्या जातीचं गवत असून ते सुमारे सहा फूट उंच वाढतं. करूरमध्ये चटया विणण्यासाठी या गवताची लागवड करण्यात येते. मुसिरी हे लोकप्रिय अशा पाई (चटई) आणि इतर उत्पादनांचं प्रमुख केंद्र आहे.

हा उद्योगाचा डोलारा रानात काम करणाऱ्या कामगारांच्या श्रमावर उभा आहे. दिवसाला ३०० रुपये कमावणं या स्त्रियांसाठी सोपं नाही. त्यांचा दिवस सकाळी ६ वाजता सुरू होतो. कमरेत वाकून कोयत्याने गवताचा दांडा सफाईने तोडायचा. पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर वर्षभर त्यांचं काम सुरूच असतं.

त्यांचं काम सोपं नाही, ४४ वर्षीय जयंती सांगतात. “मी रोज पहाटे चार वाजता उठते, घरच्यांसाठी स्वयंपाक करते, मग पळत पळत बस पकडायची आणि रानात जायचं. माझी जी काही कमाई होते ती बसचं भाडं, खाण्यावर आणि घरावरच खर्च होते.”

“पण माझ्याकडे दुसरा पर्याय आहे का? इथे माझ्यासाठी हे एवढं एकच काम आहे,” मागेश्वरी सांगतात. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं. “माझी दोघं मुलं आहेत. एक ९ वीत आणि एक ८ वीत,” त्या पुढे सांगतात.

जवळपास या सगळ्याच जणी कोरई तोडून जी कमाई होते, त्यातच घर चालवतायत. “मी दोन दिवस जरी तोडीला आले नाही, तर घराच खायला अन्नाचा दाणा नसतो,” सेल्वी सांगतात. त्यांचं चौघांचं कुटुंब त्यांच्या कमाईवर चालतं.

PHOTO • M. Palani Kumar

दिवसभर वाकून आणि कोरई तोडून एम. जयंती यांची छाती दुखते. त्यांच्या कमाईतला बराचसा पैसा औषधपाण्यावर खर्च होतो

पण हाही पैसा पुरेसा नाही. “माझी एक मुलगी नर्सिंगला आहे. आणि माझा मुलगा ११ वीत. त्याच्या शिक्षणासाठी पैसा कसा उभा करायचा मला माहित नाही. माझ्या मुलीची फी भरायलाच मला कर्ज काढावं लागलंय,” मरीयायी सांगतात.

त्यांचं वेतन दिवसाला ३०० रुपये इतकं वाढवण्यात आलं त्यालाही तसा काहीच अर्थ नाही. “पूर्वी आम्हाला २०० रुपयेच मिळत होते. पण त्यात चिक्कार भाजीपाला यायचा. पण आता ३०० रुपये सुद्धा पुरत नाहीयेत,” सौभाग्यम सांगतात. त्यांच्या घरी पाच जण आहेत. त्यांची आई, नवरा, मुलगा आणि सून. “सगळे माझ्या कमाईवर अवलंबून आहेत.”

इथली अनेक घरं केवळ स्त्रियांच्या कमाईवर जगतायत कारण पुरुष दारूच्या विळख्यात अडकलेत. “माझा मुलगा मिस्त्री आहे. दिवसाला १००० रुपये कमावतो,” सौभाग्यम सांगतात. “पण त्याच्या बायकोला पाच पैसे सुद्धा देत नाही. सगळा पैसा दारूवर उडवतो. आणि त्याच्या बायकोने विचारलंच तर तिला मारहाण करतो. माझ्या नवऱ्यांचं आता वय झालंय. ते काही काम करू शकत नाहीत.”

या अंगमेहनतीच्या कामाचा स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. “माझा अख्खा दिवस वाकून कोरई तोडण्या जातो, मला छातीत खूप जास्त दुखतं,” जयंती सांगतात. “मी जवळ जवळ दर आठवड्यात हॉस्पिटलला जाते. आणि दर वेळी ५००-१००० रुपये बिल होतं. जे काही कमावते ते सगळं दवाखान्यावर चाललंय.”

“अजून फार काळ मी हे काम करू शकणार नाही,” त्रस्त मरियायी सांगतात. त्यांना आता कोरई तोडण्याचं काम थांबवायचंय. “माझे खांदे, कंबर, छाती, हात-पाय सगळं दुखतं. गवताची पाती हातापायाला कापतात. उन्हात त्याचा किती त्रास होतो तुम्हाला माहितीये का?”

PHOTO • M. Palani Kumar

तिरुचिरापल्ली जिल्ह्याच्या मुसिरीतालुकमधल्या अमूरच्या या बाया कोरई तोडून चार पैसे कमवण्यासाठी प्रवास करून करूरला येतात. तमिळ नाडूमध्ये कावेरीच्या काठावर ही गवतासारखी भासणारी वनस्पती मोठ्या प्रमाणावर उगवते

PHOTO • M. Palani Kumar

ए. मरियायी गेल्या तीस वर्षांपासून कोरईच्या रानांमध्ये काम करतायत. आजकाल त्यांचं अंग दुखायला लागतं त्यामुळे त्या वाकून दांडे उचलू शकत नाहीत. मरियायींनी त्यांच्या कमाईतून आपल्या पाच मुली आणि एका मुलाचं शिक्षण पूर्ण केलंय. इतकंच नाही कोरई तोडून मिळणाऱ्या पैशातूनच त्यांनी आपल्या तीन मुलींची लग्नं देखील लावून दिली आहेत

PHOTO • M. Palani Kumar

एम. मागेश्वरी सांगतात की आयुष्य कायमच असं खडतर होतं. त्या विधवा आहेत आणि त्यांची दोघं मुलं माध्यमिक शाळेत आहेत. “मी कधी शाळा पाहिली नाही. मला त्याचा फार पश्चात्ताप होतो. मी जर शिकले असते तर मला आणखी काही तरी काम करता आलं असतं.” त्या लहान असल्यापासून कोरई तोडतायत

PHOTO • M. Palani Kumar

आर. सेल्वी कोरईचे दांडे झोडपतात आणि सगळा सुका पाला पडून जातो. त्यांच्या कमाईवरच त्यांचं चौघांचं कुटुंब तगून आहे. “मला ३०० रुपये जरी मिळाले तरी घरखर्चाला मला त्यातले १०० रुपयेच हाती राहतात. उरलेले २०० माझा नवरा दारूवर उडवतो. आमच्या घरची माणसं दारू पीत नसती ना, जिणं जरा तरी सुखाचं झालं असतं,” त्या म्हणतात

PHOTO • M. Palani Kumar

आर. कवितांच्या डोळ्यात धूळ गेलीये ती काढायला मागेश्वरी (डावीकडे) मदत करतायत तर एस. राणी (उजवीकडे) पंचाच्या मदतीने आपले डोळे पुसतायत. गवताचे दांडे झोडपताना जो धुरळा उडतो त्यामुळे या बायांना सतत डोळ्याला झोंबतं आणि त्रास होतो

PHOTO • M. Palani Kumar

सकाळी ६ वाजता काम सुरू होतं, सलग आठ तास तोड सुरू असते, त्यातली १० मिनिटांची सुट्टी. विसाव्याला सावलीही नाही, त्यामुळे घोटभर चहा उन्हातच प्यायचा

PHOTO • M. Palani Kumar

तोडलेली कोरई झोडपायच्या तयारीत एम. निर्मला. कोरईच्या मोळ्या तिरुचिरापल्लीच्या मुसिरीतल्या प्रक्रिया केंद्रात पाठवल्या जातात. कोरईच्या चटया विणण्याचं काम इथे मोठ्या प्रमाणावर चालतं

PHOTO • M. Palani Kumar

आपली सगळा जोर लावून कविता मोळी झोडपतायत. सगळा पाला झाडण्यासाठी शक्ती लागते तसंच कौशल्यही. या कामात तरबेज असणाऱ्या बाया बरोबर मोळीच्या आकाराचे कांडके तोडतात

PHOTO • M. Palani Kumar

सतत हसतमुख असणाऱ्या, काही तरी विनोदी बोलणाऱ्या कविता काम करता करता इतरांना हसवत असतात. त्यांनी लग्न झाल्यानंतर कोरई तोडण्याचं काम सुरू केलं

PHOTO • M. Palani Kumar

डावीकडून उजवीकडेः एस. मेघला, आर. कविता, एम. जयंती आणि के. अक्कंडी उन्हामध्ये अखंड काम करतायत. उन्हाळ्यात त्या गरमीपासून बचाव म्हणून अंगावर पाणी ओतून घेतात, काम करत राहतात

PHOTO • M. Palani Kumar

मेघलांचे पती अंथरुणाला खिळेलेल आहेत त्यामुळे चरितार्थासाठी म्हणून त्यांनी कोरई तोडायला सुरुवात केली

PHOTO • M. Palani Kumar

ए. कामच्चींचे पती २० वर्षांपूर्वी वारले आणि त्यांचा मुलगा २०१८ साली. आज वयाच्या ६६ व्या वर्षी त्या एकट्याच राहतात आणि कोरईच्या रानात काम करून आपलं पोट भरतात

PHOTO • M. Palani Kumar

जमिनीवर जोरात आपटून कोरईची मोळी एकसारखी केली जाते आणि बांधली जाते. ठेकेदार मणी (डावीकडे) दांड्यांचा वरचा हिस्सा तोडून टाकतात आणि एका उंचीत आणतात

PHOTO • M. Palani Kumar

डोक्यावरचा भारा तोलत ए. वसंता पायाच्या आणि पावलाच्या बोटांच्या सहाय्याने एक मोळी उचलतायत. आधी कंबरेपर्यंत आणि मग ती डोक्यापर्यंत नेतात – कुणाच्याही मदतीशिवाय. प्रत्येक मोळीचं वजन पाच किलोपर्यंत भरतं

PHOTO • M. Palani Kumar

बाया एका वेळी १०-१२ मोळ्या वाहून नेतात. उन्हाच्या कारात अर्धा किलोमीटर चालत जाऊन त्या संकलन केंद्रावर मोळ्या टाकतात. मागेश्वरी म्हणतातः “मला इथे काम करताना सुरक्षित वाटतं कारण इथे काम करणाऱ्या बऱ्याच जणी माझ्या नातातल्याच आहेत”

PHOTO • M. Palani Kumar

मरियायी डोक्यावर चांगलंच वजन घेऊन चालल्या आहेत. “उठायचं, घाईघाईत इथे [रानात] पोचायचं, दिवसभर काम करायचं, घाईत परत घरी जायचं – उसंत म्हणून नाही. बरं नसलं तरीदेखील मी घरी जरा पडून राहू शकत नाही. मी इथे येते आणि काम करत असतानाच जरा आराम करते.”

PHOTO • M. Palani Kumar

या मोळ्या संकलन केंद्रामध्ये आणल्यावर तिथून ट्रकमध्ये भरून पुढच्या प्रक्रियेसाठी नेल्या जातात

PHOTO • M. Palani Kumar

दिवसभराचं काम संपल्यानंतर, दुपारी २ वाजता अखेर या कामगार जेवायला बसतात. “आम्हाला जवळपास काम मिळालं तर आम्ही १ वाजेपर्यंत घरी परततो. नाही तर मग घरी पोचायला संध्याकाळी उशीर होतो किंवा पार रात्र होते,” वसंता सांगतात

लेखन सहाय्यः अपर्णा कार्तिकेयन

अनुवादः मेधा काळे

M. Palani Kumar

ಪಳನಿ ಕುಮಾರ್ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಸ್ಟಾಫ್ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್. ದುಡಿಯುವ ವರ್ಗದ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಅಂಚಿನಲ್ಲಿರುವ ಜನರ ಬದುಕನ್ನು ದಾಖಲಿಸುವುದರಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಆಸಕ್ತಿ. ಪಳನಿ 2021ರಲ್ಲಿ ಆಂಪ್ಲಿಫೈ ಅನುದಾನವನ್ನು ಮತ್ತು 2020ರಲ್ಲಿ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ ಮತ್ತು ಫೋಟೋ ದಕ್ಷಿಣ ಏಷ್ಯಾ ಅನುದಾನವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಅವರು 2022ರಲ್ಲಿ ಮೊದಲ ದಯನಿತಾ ಸಿಂಗ್-ಪರಿ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟರಿ ಫೋಟೋಗ್ರಫಿ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದರು. ಪಳನಿ ತಮಿಳುನಾಡಿನ ಮ್ಯಾನ್ಯುವಲ್‌ ಸ್ಕ್ಯಾವೆಂಜಿಗ್‌ ಪದ್ಧತಿ ಕುರಿತು ಜಗತ್ತಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿದ "ಕಕ್ಕೂಸ್‌" ಎನ್ನುವ ತಮಿಳು ಸಾಕ್ಷ್ಯಚಿತ್ರಕ್ಕೆ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.

Other stories by M. Palani Kumar
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale