रेणुका उंबरेंचा गळा फार गोड होता. कित्येक ओव्या त्यांना तोंडपाठ होत्या. यातल्या बऱ्याच त्यांना त्यांच्या आईकडून आणि लग्नानंतर चुलतसासूकडून शिकायला मिळाल्या. रेणुकाताईंनी आम्हाला सांगितलं की ओवी गाताना बाया जास्त वरच्या पट्टीत गात नाहीत. जात्यावर दळता दळता श्वास टिकायला हवा ना. रेणुकाताईंनी सुरुवात केली आणि जवळ जवळ दहा ओव्या त्यांनी एकाच गळ्यात (चालीत)  म्हटल्या. ओव्यांची कला चांगलीच अवगत असणाऱ्या बायांची ही एक खासियत.

आम्ही २० वर्षांपूर्वी रेणुकाताईंना भेटलो. मावळ तालुक्यात डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या राजमाची गावच्या त्या रहिवासी. त्यांचं कुटुंब दुसऱ्याच्या शेतात नाचणीचं पीक घ्यायचे. तेव्हा नुकतीच त्यांनी रायगड जिल्ह्यात थोडी जमीन घेतली होती आणि तिथे त्यांनी भात लागवड केली होती. कधी कधी त्यांचं कुटुंब आठवडाभर तिथे राहून यायचे किंवा कधी एक दिवस चक्कर टाकायचे. त्यांच्या शेतात पोचायला त्यांना एक अख्खा डोंगर पायी पार करायला लागत असे.

रेणुकाताईंचा नवरा, त्यांचे दोन दीर-जावा सगळे एकाच घरात राहत होते. प्रत्येकाच्या चुली मात्र वेगळ्या होत्या. त्यांच्या दोन नणंदा सासरी नांदवत नाहीत म्हणून माहेरी परत आल्या होत्या, त्याही त्यांच्यातच राहत होत्या.

PHOTO • Bernard Bel

रेणुकाताईंना दोन मुली. त्यांनी सांगितलं, “मुलगा व्हावा म्हणून आम्ही काय नाही केलं? अगदी मांत्रिकाकडेही गेलो. पण काही फायदा नाही. आता मीच विचार करते, दिराची पोरं आहेत ना, मग अजून मला पोरगा व्हावा म्हणून कशाला आस धरू?” रेणुकाताईंची थोरली मुलगी १६ वर्षांची. तिचं १९९७ च्या एप्रिलमध्ये लग्न ठरलं होतं.

उंबरे कुटुंबाचं घर चांगलंच ऐसपैस होतं, राजमाचीतली सगळीच घरं चांगली मोठी आहेत. गावकऱ्यांनी त्यांचं घरबांधणीचं कौशल्य वापरून पारंपरिक पद्धतीची छान घरं बांधली आहेत, दारवरच्या नक्षी आणि सुंदर रंगकामासकट. घरं मोठी कारण मुंबई पुण्याचे भटके आणि पर्यटक शेजारच्या राजमाची किल्ल्यावर येणार ते त्यांच्याकडे उतरत असत. गावातल्या प्रत्येक कुटुंबाने शहरातल्या काही जणांबरोबर नियमित संपर्क ठेवला होता, ओळख वाढवली होती. पर्यटनातून तेवढाच थोडाफार पैसा मिळत असे.

रेणुकाताईंनी आम्हाला सांगितलं की त्या भजनं किंवा गवळण गात नसत. (पाण्याला जाताना आणि नदीवर पाणी भरताना बाया गातात त्या पारंपरिक लोकगीतांना गवळण म्हणतात. या भागातल्या इतर गावांप्रमाणे, राजमाचीलाही पाण्याचे नळ नाहीत. नदीवरूनच पाणी भरून आणावं लागत असे) “मी फक्त ओव्या आणि सणाची गाणी गाते,” रेणुकाताई म्हणाल्या. पण आता तेही हळू हळू कमी व्हायला लागलंय. “आता पर्यटक येतात, त्यांचं हवं नको बघायला लागतं. त्यामुळे ओव्या गायला फारसा वेळच मिळत नाही. किती तरी ओव्या मी पार विसरून गेलीये. पण मला ओव्या गायला, मनातलं उकलून सांगायला आवडतं.”

इथे रेणुकाताईंनी तीन ओव्या गायल्या आहेत. पहिल्या ओवीत बारा आण्याच्या डझन बांगड्या आणि त्याही भाच्याने आणलेल्या त्याचं गाणं आहे. दुसरी आणि तिसरी ओवी, मुलुख सोडून मुंबईला गेलेल्या बाईवर आहेत. मुंबईला गेल्यावर तिचं वागणं-बोलणं शहरातल्यासारखं होतं, ती तिची गावाकडची बोलीही विसरते, मुंबईला जाऊन म्हावरं (मासे) खाते आणि गावच्या भाजीसाठी वावरं हिंडत राहते. कितीही चांगलं चुंगलं खायला-रहायला मिळालं तरी ती गावचं आयुष्य शोधत राहते, तिला त्याची कमी सतत भासत राहते.

बारीक बांगडी, बारा आण्यानी डझन
बहीणी तुझा बाळ, मला भरितो सजण

मुंबईला हिनं गेली नार, बाई मुंबईवाली झाली
आपल्या गं मुलुखाची, बोली विसरुनी गेली

मुंबईला ना गेली नार, खायीती म्हावरं
कुरडूच्या भाजीसाठी, ही नार हिंडत वावयर

टीपः भारतात पूर्वी आणा चलनात होता. चार पैसे म्हणजे एक आणा. १६ आणे म्हणजे एक रुपया, ६४ पैशांचा एक रुपया. आता १०० पैशांचा एक रुपया होतो. कुर्डू ही एक रानभाजी आहे. तिची पानं हिरवी असतात आणि तिला दांड्याला पांढरा, गुलाबी तुरा येतो.


PHOTO • Bernard Bel

रेणुका उंबरे

कलावंत – रेणुका उंबरे

गाव – राजमाची

तालुका – मावळ

जिल्हा – पुणे

लिंग – स्त्री

जात – महादेव कोळी

वय – ३७/३८

मुलं – २ मुली

व्यवसाय – शेती, नाचणीचं पीक घेतात

दिनांक – ह्या ओव्या १५-१६ मार्च १९९७ रोजी रेकॉर्ड केल्या आहेत.

फोटो – बर्नार्ड बेल

पोस्टर – श्रेया कात्यायिनी व सिंचिता माजी

PARI GSP Team

ʼಪರಿʼ ಗ್ರೈಂಡ್‌ಮಿಲ್ ಸಾಂಗ್ಸ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ತಂಡ: ಆಶಾ ಒಗಲೆ (ಅನುವಾದ); ಬರ್ನಾರ್ಡ್ ಬೆಲ್ (ಡಿಜಿಟಲೀಕರಣ, ಡೇಟಾಬೇಸ್ ವಿನ್ಯಾಸ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮತ್ತು ನಿರ್ವಹಣೆ); ಜಿತೇಂದ್ರ ಮೇಡ್ (ಪ್ರತಿಲೇಖನ, ಅನುವಾದ ಸಹಾಯ); ನಮಿತಾ ವಾಯ್ಕರ್ (ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಲೀಡ್ ಮತ್ತು ಕ್ಯುರೇಶನ್); ರಜನಿ ಖಲಡ್ಕರ್ (ಡೇಟಾ ಎಂಟ್ರಿ).

Other stories by PARI GSP Team
Editor and Series Editor : Sharmila Joshi

ಶರ್ಮಿಳಾ ಜೋಶಿಯವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಮಾಜಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಸಂಪಾದಕಿ ಮತ್ತು ಬರಹಗಾರ್ತಿ ಮತ್ತು ಸಾಂದರ್ಭಿಕ ಶಿಕ್ಷಕಿ.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale