‘माझे शब्द

माझ्या व्यथा

त्यांच्या मिलनातून उगम पावलेल्या कविता... च

माझा परिचय’

आपल्या आगामी कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत सुयशने स्वतःची ओळख करून दिलीये ती अशी. केवळ वयाच्या विशीत त्याने ४०० कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या जोरकस शब्दांमधून त्याचा संताप, उद्वेग, त्याचे विश्वास आणि आशा सगळं प्रतीत होतंय.

सुयश त्याच्या कविता “क्रांतीकारी” आहेत असं मानतो. जातीभेद आणि हिंसा त्याच्या लिखाणाच्या केंद्रस्थानी आहे. “एका दलित [महार] कुटुंबात जन्मल्यामुळे समाजाची मुळं अगदी आजही, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही किती जातीय आहेत हे मी पाहिलंय,” तो म्हणतो. “एखाद्या व्यक्तीचं समाजातलं स्थान त्याची जात ठरवत असते.”

त्याच्या अनेक कविता वैयक्तिक स्वातंत्र्यावरचे वाढते हल्ले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि दलितांच्या बौद्धिक प्रतिपादनाला होणाऱ्या विरोधाबद्दल आहेत. इतर कविताही अनेक विषयांचा आढावा घेतात – स्त्रियांवरचे अत्याचार, सप्टेंबर २०१७ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन पुलावर झालेली चेंगराचेंगरी, डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरेंसारख्या बुद्धीप्रामाण्यवादी नेत्यांचे खून हे त्यातले काही विषय.

त्याचे वडील ५७ वर्षीय श्यामराव कांबळे शेतकरी आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातल्या शिरदवाड गावी तो आपल्या कुटुंबासमवेत राहतो. त्यांच्या पावणे दोन एकरात ५५-६० टन ऊस निघतो. १५ महिन्याच्या या पिकाचा खर्च भागवण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागतं पण उत्पन्नातून थोडा फार नफा होतो. श्यामराव गावाच्या आजूबाजूच्या यंत्रमाग कारखान्यांमध्ये मजुरी करतात आणि आठ तासाच्या पाळीला रु. २५० प्रमाणे रोज मिळवतात.

Portrait of a man standing in front of a wall
PHOTO • Sanket Jain

सुयशच्या वडलांनी, श्यामराव कांबळ्यांनी त्याला दलित लेखक आणि देशभरातल्या दलित चळवळीची ओळख करून दिली.

सुयशची आई, शकुंतला, वय ५५, गृहिणी आहे; त्याचा एक भाऊ, बुद्धभूषण, वय २४, मुंबईला कायद्याचं शिक्षण घेतोय तर दुसरा भाऊ, शुभम, वय २२, इचलकरंजी शहरातल्या एका बांधकामावर मजूर म्हणून काम करतोय.

सुयश त्याच्या गावाहून १२ किलोमीटरवर असलेल्या इचलकरंजीत एका रात्र महाविद्यालयामध्ये शिकतोय. कुटुंबाला हातभार लावावा यासाठी तो दिवसा इलेक्ट्रिशियनचं काम करतो. त्याचे त्याला महिन्याला अडीच हजार मिळतात. “इलेक्ट्रिशियनचं काम असं आहे की मला लोकांच्या घरी जावं लागतं,” तो सांगतो. “आधी लोक मला माझं नाव विचारतात, आणि मग पुढचा प्रश्न तयारच असतो, आडनाव? कधी कधी तर त्यावर ते हेही विचारतात की मी दलित आहे का.”

एकदा सुयश शिरदवाडमधल्या एका वरच्या जातीच्या घरात देव्हाऱ्यातल्या काही दुरुस्तीचं काम करण्यासाठी गेला होता. “माझं नाव विचारल्या विचारल्या त्यांनी देवाच्या चेहऱ्यावर पडदा ओढून घेतला,” तो सांगतो. “एका ठिकाणी तर,” तो सागंतो, “माझं गच्चीवर काम चालू होतं, शॉक बसू नये म्हणून मी पायात रबरी स्लिपर घातलेल्या, त्या मला त्यांनी काढायला लावल्या. मी नकार दिला तर ती बाई मली म्हणाली ‘तुला घरी काय शिकवत नाहीत काय? तुम्ही दलित लोक आधीपासून असंच वागताय’.”

अजूनही बरंच काही तो सांगतो, “कसंय, वरच्या जातीच्या कामगारांना साधारणपणे स्टीलच्या ताट वाटीत जेवण वाढलं जातं, मला मात्र नेहमी पत्रावळी मिळते. रोज असल्या छोट्या छोट्या गोष्टी पाहतो मी. असली जात पात आम्ही किती वेळा अनुभवलीये. सवय झालीये आता सगळ्याची.”

सुयशच्या वडलांनीच सगळ्यात आधी त्याची क्रांतीकारी कवी आणि १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना करणाऱ्या नामदेव ढसाळांच्या लिखाणाशी गाठ घालून दिली. त्यानंतर सुयशने इतरही कवी आणि लेखकांचं भरपूर लिखाण वाचलं. दया पवार, शरणकुमार लिंबाळे, नारायण सुर्वे, लक्ष्मण माने, एकनाथ आव्हाड आणि अशोक पवार हे त्यातले काही. त्याचे वडील त्याला देशभरातल्या दलित चळवळीच्या, संघर्षाच्या कहाण्या सांगत असत आणि मग सुयशने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण वाचायला सुरुवात केली. हा तरुण कवी आता पाच ग्रंथालयांचा सभासद आहे; दोन गावातली, एक शेजारच्या शिवनाकवाडीतलं आणि दोन इचलकरंजीतली.

वयाच्या १६ व्या वर्षी सुयशने कविता करायला सुरुवात केली. तो स्वतःच्या हस्ताक्षरात या कविता लिहून काढतो. आणि आजतागायत १८० पानाच्या ६ डायऱ्या त्याच्या कवितांनी भरल्या आहेत. “जेव्हा जेव्हा मनाला काही तरी विचलित करणारी घटना घडते, मी कविता करतो. माझ्या मनातलं मला सगळ्यात चांगलं कवितेतूनच मांडता येतं. मला जे सामाजिक वास्तव दिसतंय, खालच्या जातींना कसं अजून दारिद्र्यात ढकललं जातंय, त्याबद्दल माझी कविता आहे. जोपर्यंत मी कविता लिहून ते पुढे मांडत नाही तोपर्यंत माझा जीव शांत होत नाही.”

A man sitting on the floor and writing in a book. A copy of the book 'Baluta' is lying next to him
PHOTO • Sanket Jain
Books on Dalit literature lined up against a wall
PHOTO • Sanket Jain

जात आणि जातीच्या प्रश्नांबद्दलच्या कवितांनी सुयशच्या अनेक डायऱ्या भरलेल्या आहेत; तो पाच ग्रंथालयांचा सभासद आहे, त्याच्याकडे दलित साहित्याचा मोठा संग्रह आहे

त्याच्या आधीच्या कविता “क्रांतीकारी” नव्हत्या असं तो म्हणतो, “पण बाबासाहेबांचं निहिलेशन ऑफ कास्ट वाचलं आणि माझ्या कवितेचा सूर बदलला.” आंबेडकरांच्या रिडल्स इन हिंदूइझम नी सुयशला आणिक प्रेरणा दिली. “आता माझ्या कविता दलितांना सहन कराव्या लागणाऱ्या अत्याचारांबाबत आहेत. लोक आरक्षण संपवण्याच्या गोष्टी करतायत, कुणी जाती व्यवस्था संपवण्याबद्दल का काही बोलत नाही?” तो सवाल करतो. “आजच्या भारतात अस्पृश्यता नाही असं कोण म्हणतंय? आम्ही रोज अनुभवतो ती. रोजची जातपात पाहून अस्वस्थ व्हायला होतं मला. आणि मग ही तगमग खूप वाढली की मी कविता करतो.”

१ जानेवारी २०१८ रोजी सुयश पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या कोरेगाव भीमाला गेला होता, त्याच्या गावापासून २९० किमी लांब. या दिवशी मोठ्या संख्येने दलित समाज इथे जमतो. याच दिवशी १८१८ साली पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या वरच्या जातीच्या मराठा सैन्याचा इंग्रजांसाठी लढणाऱ्या महार सैन्याने पराभव केला. त्याची स्मृती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. “मी [दलित] चळवळीत आहे आणि कोरेगाव भीमाची लढाई आम्हाला आमच्या समाजाच्या भल्यासाठी काही करण्याची प्रेरणा देते,” तो सांगतो.

यावर्षी एका विरोधी राजकीय गटाने कोरेगाव भीमाला जाणाऱ्या दलित गटांवर हल्ला केला, अफवा पसरवल्या आणि त्यानंतर मोठा हिंसाचार उसळला. सुयशने ‘दगडांच्या देशा’ या त्याच्या कवितेत त्याचा संताप व्यक्त केला आहे. (खाली त्याची मूळ कविता आणि इंग्रजी अनुवाद दिला आहे)

सुयशला त्याच्या कवितांचा संग्रह छापायचा आहे आणि त्याला पत्रकार व्हायचंय. “आमच्या समाजाविषयी लिहिणाऱ्या दलित वार्ताहरांची आज गरज आहे. ही वेदना काय आहे ते एक दलितच जाणू शकतो आणि तोच याबद्दल नीट लिहू शकतो,” तो म्हणतो. “लोकशाहीचा चौथा स्तंभ आज सरकारच्या ताब्यात आहे. प्रसारमाध्यमं म्हणजे राजकारण्यांच्या हातातली बाहुली झाली आहेत. पण एक चांगला पत्रकार कधीही गप्प राहणार नाही.”

दगडांच्या देशा

दगडांच्या देशा ... नेहमीप्रमाणे कालही आम्ही दगडच खाल्ला!

मस्तकात दगडं......... ठासलेल्यांनी
आम्हा निष्पापांवर केला हल्ला.......
ही जातीची विषवल्ली
ह्याची लावण कुठे रे होते.........
या मादरी कंटकांनी
भूमी पावन कशी रे होते!
नयनी सत्य घेऊन चाललेला जमाव;
जेंव्हा एकाएकी पांगापांग होतो,
संवेदनशीलतेच्या दुर्भिक्षेतेने
शत्रू बुद्धीविकलांग होतो........
तेंव्हा उभं राहतं .......
प्रत्येक निष्पापावर राष्टीयत्त्वाचं प्रश्नचिन्ह!
मग अनावधानाने  मीही
बोलायला लागतो ...भाषा
अंधाराला उजेडाच्या प्रत्युत्तराची !
दुष्क्रिया  आणि त्यावरील प्रतिक्रिया  !
यांच्यां परस्पर संघर्षातून
जी परिस्थिती उद्भवते
तिला बहुतांश दंगल म्हणतात..
अशी प्रामुख्याने संज्ञा.... करतात लोक !
आमचा प्रत्यक्ष  अनुभव याहून भयावह!
जेंव्हा माणसांकडून माणसं जाळली जातात........
तर कधी गाडींवरली अशोकचक्रं पाहून
वाहने जाळली जातात.........
दगडांच्या देशा !!!
पण हे सगळं तुला का सांगतोय मी ?
दगडांच्या देशात ...तूही दगड झाला नसशील कशावरून ?
दगडांच्या देशात ......   माणसाच्या काळजाचाही दगड बनलाय रे.........
बायाबापड्यांवर दगडफेक करून,
त्यांना अमानुष मारहाण करताना,
त्यांच्या जखमेतून ओघळनारं रक्त.....;
डोळे झाकून बसलेल्या बुद्धावर हत्यार घेऊन धावणा-या अंगुलीमालासारखं* भासलं.......
तर कधी....... “जय भीम” म्हणशील का पोच्या**?
म्हणत घातलेले पोचीरामवरचे कु-हाडीचे घाव !
या..... रक्त खवळणा-या प्रसंगानं,
मग माझ्यातलाही “चंदर” रक्तात पेटून उठला .......
मीही उगारला दगड मग कर्मठपणावर...
माणसाला माणूसपण नाकारणाऱ्या
जातियवादावर!
त्यांच्या जळजळीत दळभद्र्या सुडबुद्धीला
आणलं मीही चव्हाट्यावर
छिनाल मनुस्मृतीच्या पहारेकऱ्यांच्या
उदात्त कटाला सुरुंग लावण्यासाठी ,
मीही उतरलो रस्त्यावर !
चोहीकडून दगड ...माझ्या देहाला
स्पर्शून जात होते......आणि विचारत होते,
"बोल परत म्हणशील का?,
भारत माझा देश आहे ...
सारे भारतीय माझे बांधव आहेत ....."
.....दगडांच्या देशा...तुच,
मला हातात दगड घ्यायला
मजबुर केलंस!
मला हातात दगड घ्यायला
मजबुर केलंस!

टिपाः * १००० माणसांना मारायचं आणि त्यांची गणती करण्यासाठी त्यांचं एक बोट कापायचं अशी आज्ञा गुरूने दिल्याने अहिंसकाने अशा बोटांची माळ गळ्यात घालायला सुरुवात केली. तोच पुढे अंगुलीमाल म्हणून प्रसिद्ध झाला.

** औरंगाबाद विद्यापीठाचं नाव बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करण्यासाठीच्या नामांतर चळवळीदरम्यान जो हिंसाचार झाला त्यात पोचीराम कांबळे आणि त्यांचा मुलगा चंदर मरण पावले

कवितेचा इंग्रजी अनुवादः नमिता वाईकर

Sanket Jain

ಸಂಕೇತ್ ಜೈನ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕೊಲ್ಹಾಪುರ ಮೂಲದ ಪತ್ರಕರ್ತ. ಅವರು 2022 ಪರಿ ಸೀನಿಯರ್ ಫೆಲೋ ಮತ್ತು 2019ರ ಪರಿ ಫೆಲೋ ಆಗಿದ್ದಾರೆ.

Other stories by Sanket Jain
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale