१५ मार्चला मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील येल्लोरी गावात गारपीट झाली तेंव्हा रावसाहेब वाळके नुकतेच आपल्या शेतातून घरी निघाले होते. “गारा भल्या मोठ्या होत्या आणि प्रचंड जोरात खाली कोसळत होत्या. माझं नशीब बरं की मी कडब्याखाली लपून बसलो; पण आजूबाजूला पक्षी ओरडायले होते.”

१९ मिनिटांनंतर जेंव्हा ७० वर्षीय रावसाहेब उठून उभे राहिले तेंव्हा त्यांना आपलं शेत ओळखू येईना. “मेलेले पक्षी, उन्मळून पडलेली झाडं, उद्ध्वस्त झालेले टमाटे आणि जखमी प्राणी”, वाळके म्हणतात, “झालेल्या नुकसानीवर माझा विश्वास बसेना. मला वाटत होतं की माझ्या शेतात मेलेल्या पक्ष्यांचा खच पडला होता. त्यापैकी एकावरही पाय पडू न देण्याची काळजी घेत मी जात होतो.” आपल्याला कुठलीही मोठी जखम झाली नाही, याचंच काय ते समाधान होतं.

पण त्यांचं समाधान फार काळ टिकलं नाही. वाळके यांची ११ एकरांची दोन वेगवेगळी रानं आहेत. घरी परतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, त्यांची धाकटी सून, २५ वर्षीय ललिता, त्यांच्या दुसऱ्या रानातून परतत असताना वादळात अडकली होती. “हातात टोपली असल्याने तिला आडोशाला लपून बसता आलं नव्हतं. गारपीट एवढी भयंकर होती की, तिची तीन बोटं कापली गेली होती.”

वाळके यांच्या कुटुंबात १७ सदस्य आहेत. वादळ शांत होताच ललिताला इस्पितळात हलविण्यात आलं. “तिची उजव्या हाताची तीन बोटं गेली. शिवाय, भरपूर रक्तस्राव झाला. सध्या ती माहेरी आहे.”



PHOTO • Parth M.N.

'मेलेले पक्षी , उन्मळून पडलेली झाडं , उद्ध्वस्त झालेले टमाटे आणि जखमी प्राणी' , येल्लोरी गावचे वाळके म्हणतात , ' झालेल्या नुकसानीवर माझा विश्वास बसेना'


मराठवाड्यातले लातूर, बीड आणि उस्मानाबाद हे जिल्हे १५ मार्चला झालेल्या गारपिटीच्या तडाख्यात सापडले. वादळ येऊन गेल्याला सहा आठवडे झाले तरीही येल्लोरी गावातून फिरत असताना तसंच भयाण चित्र डोळ्यांपुढे दिसतं –  उखडलेली झाडं, तुटलेल्या विजेच्या तारा, पडलेले खांब आणि पक्ष्यांचा मागमूस नाही. “ते मोर दिसायलेत का?”, वाळके विचारतात, “गारपिटीआधी तिथं जवळपास ३०० मोर असायचे. आता मोजून २५ मोर शिल्लक राह्यलेत.”

वादळाने येत्या जून महिन्यात सुरू होणाऱ्या खरीपाकरिता पेरणी करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना निराश केलंय. या वादळात वाळके यांचे ४ लाख रुपयांचे सुमारे २० टन टमाटे नष्ट झाले. वाळके यंदाच्या खरिपात गहू, ज्वारी आणि सोयाबीनचं पीक घेऊ पाहत होते.

येल्लोरीचेच ६० वर्षीय गुंडाप्पा निटुरे यांनी आपल्या २३ एकर रानातलं मातीमोल झालेलं पीक काढून रान साफ केलेलं नाही. “माझ्या रानात जाऊन पुन्हा तो दिवस जगायचा... लई दुखतं काळजात”, असं म्हणत ते मला आपल्या शेतात घेऊन आले. नास झालेली डाळिंबं मातीत रुतून सडून गेलीयेत, सर्वत्र चिरलेली झाडं, झाडांच्या बुंध्यावर गारांच्या माराच्या निशाण्या अजून दिसतायत.



व्हिडिओ पाहा : येल्लोरी गावातील गुंडाप्पा निटुरे १९ मिनिटांच्या तांडवाचं वर्णन करताना


मार्चच्या मध्यात जेंव्हा फलोत्पादक शेतकरी आपली फळं काढतात आणि खरिपाकरिता पैशाची जुळवाजुळव करतात, त्याच वेळी हे वादळ आलं. फळबागांचा खर्च जास्त असला तरी त्यातून मिळणारं उत्पन्नदेखील तेवढंच चांगलं असतं. “किलोभर डाळिंबाला अंदाजे १०० रुपये भाव मिळतो,” निटुरे म्हणतात, “या गारपिटीत माझ्याकडे असलेलं ४० टन डाळिंब नासून गेलं. त्यामुळे मला ४० लाखांचं नुकसान झालंय.”

त्यांच्या द्राक्षबागा आणि टमाट्यांचंदेखील नुकसान झालंय. त्यांच्या मते हे वादळ दोन दिवसांनंतर आलं असतं तरी ते आपलं पीक वाचवू शकले असते. “माझ्याकडे असलेला सगळा माल मी गमावून बसलोय, सोबत पिकांवर लावलेले अतिरिक्त २० लाख रुपये देखील वाया गेले. “मी ह्यातून कसा बाहेर पडू? मागील काही वर्षांपासून सतत पाण्याचा तुटवडा जाणवायला होता. म्हणून मी टँकरनं फळबागा पिकविल्या. यंदाच्या वर्षी अनायासं पीक चांगलं आलं तर ऐन वेळी वादळाने घोळ घातला.”



PHOTO • Parth M.N.

मार्च महिन्यात आलेल्या गारपिटीमुळे निटुरे यांची ४० लाखाची डाळिंबं वाया गेली ; त्यांच्या द्राक्षबागा टमाट्याचंदेखील नुकसान झालंय. त्यांच्यावर असलेलं एकूण कर्ज १७ लाख रुपयांवर गेलं आहे


निटुरे यांच्यावर असलेलं कर्ज आता १७ लाखांवर गेलं आहे. दोन मुलं, एक सून आणि एक वर्षाचा नातू, असा त्यांचा परिवार आहे. आपल्या कर्जाची बेरीज करून सांगताना ते म्हणतात: “८ लाख रुपये बँकेकडून, ५ लाख रुपये खाजगी कर्ज आणि वेगवेगळ्या दुकानदारांना द्यायचे एकूण ४ लाख.” ते म्हणतात, “देव त्या दुकानदारांचं भलं करो! निदान माझ्यामागे तगादा लावून किंवा फोनवर फोन करून त्यांनी मला त्रास तर दिला नाही.”

यापूर्वी देखील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गारपिटीचा सामना करावा लागला आहे, पण त्यांच्या मते मागील पाच वर्षांत गारपिटीची तीव्रता आणि सातत्य दोघेही वाढत गेले आहेत. मॉन्सून देखील अनिश्चित झाला आहे, निटुरे म्हणतात: “ मला चांगल्याने आठवतं, एक काळ होता जेंव्हा दोन तीन दिवस संततधार पाऊस पडत असे. असा पाऊस पडलेला पाहून कितीतरी वर्षं झाले.”

संततधार पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, त्यामुळे भूजलाची पातळी वाढण्यास मदत होते. मात्र आजकाल असं दृश्य बघायला मिळतं की, पडला तर तासाभरात मुसळधार पाऊस कोसळतो नाहीतर कित्येक दिवस जमीन पावसाशिवाय कोरडी राहते. २०१४ मध्ये लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि परभणीत चक्क २०० मिमी एवढा पाऊस पडला, पैकी १२३ मिमी पाऊस केवळ १०० मिनिटांत पडून गेला.



PHOTO • Parth M.N.

गुंडाप्पा निटुरे येल्लोरी गावातील त्यांच्या रानात : पुढचा डाव काय पडतोय त्याला सज्ज


लातूरस्थित पर्यावरण-विषयक पत्रकार अतुल देऊळगांवकर यांच्या मते एका हंगामात सरासरी पाऊस कितीही पुरेसा का पडेना, जर पाऊस ठराविक अवकाशाने पडत नसेल तर पिकाला फार नुकसान होऊ शकतं. “अशा प्रकारचं अनिश्चित वातावरण हे हवामान बदलाचं चिन्ह आहे,” ते म्हणतात, “रात्री अवेळी पाऊस पडणे किंवा सतत गारपीट होणे हे त्याचंच द्योतक आहे. आपण संशोधनात अधिक गुंतवणूक करून हवामान बदलावर विचार करायला हवा.”

अशा परिस्थितीत शेती एक प्रकारचा जुगारच होऊन बसलीये. आपत्तीचा सामना करण्यासाठी शेतकरी पीक विमा घेऊ शकतात. मात्र, विम्याअंतर्गत नुकसान भरपाई करण्याची पद्धत हास्यास्पद आहे.

जिल्हा परिषद ४० गावांच्या वर्तुळातून सात निवडक गावांमध्ये १००० चौरस मीटर पेक्षा किंचित जास्त क्षेत्र चाचणीसाठी निश्चित करते. या क्षेत्रफळानुसार काढलेली नुकसान भरपाई त्या वर्तुळातील सर्व ४० गावातील शेतांना लागू होते.

मागील वर्षी पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या कित्येक शेतकऱ्यांनी यंदा योजनेतून काढता पाय घेतला. शिवशंकर ओंजळे यांना २०१६ मध्ये आलेल्या गारपिटीत केवळ १४,००० रुपये नुकसान भरपाई मिळाली. (पीक विमा ही राज्यस्तरीय योजना आहे. शेतकरी खाजगी कंपन्यांना हप्ते देतात आणि राज्य सरकार दोघांमध्ये दुवा म्हणून काम करतं.) “माझ्या असलेल्या जखमेवर मीठ चोळायचं काम आहे हे,” ओंजळे म्हणतात, “माझं गारपिटीत १० लाखाचं नुकसान झालं. चाचणीकरिता निवडलेला भाग इथनं बराच लांब आहे आणि अगोदर नुकसान झालेल्या भागातच गारपीट जास्त तीव्र होताना दिसते.”



PHOTO • Parth M.N.

निटुरे आणि वाळके यांच्यासारखे शेतकरी कपाळाला हात लावून बसू शकत नाहीत. शेतीचं चक्र चालूच राहणार आणि त्यांना परत एकदा आपलं नशीब आजमावून पहावंच लागणार


गारपीट आणि अनिश्चित हवामानापासून पिकांना संरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे २०१५ मध्ये राज्यात ठिकठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केली होती. या केंद्रांद्वारे शेतकऱ्यांना वाईट हवामानाची पूर्वसूचना देता येईल जेणेकरून त्यांना पिकम वाचवता यावीत. या वर्षी एप्रिल महिन्यात नागपूरजवळ डोंगरगाव येथे त्यांनी पहिल्या केंद्राचं उद्घाटन केलं.

राज्यातील ६५ लाख शेतकऱ्यांना लाभ व्हावा या दृष्टीने सरकार येत्या काळात राज्यभर अशी एकूण २०६५  केंद्रं स्थापन करण्याच्या विचारात आहे. राज्याचे मुख्य कृषी सचिव बिजय कुमार यांच्या मते आतापर्यंत ९०० केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. “येत्या ऑगस्टपर्यंत आम्ही २०६५ केंद्राचं लक्ष्य निश्चित गाठू. यापूर्वीच्या प्रणालीत मानवी पद्धतीने सरासरी पर्जन्यमान मोजले जाई. आता, नव्या प्रणालीनुसार दर दहा मिनिटांनी हवामानाची बित्तंबातमी मिळणं शक्य होईल.”

दुर्गम गावांसाठी ही केंद्रं किती चांगल्या क्षमतेने काम करतात आणि ती केंद्रं किती शाश्वत आहेत हे येणारी काळच सांगेल. या वर्षी तर गारपिटीने नुकसान झालंच आहे, निटुरे आणि वाळके यांच्यासारखे शेतकरी वादळाच्या धक्क्यातून सावरत आहेत. झालेल्या नुकसानीला बोल लावत ते काही बसून राहू शकत नाहीत. “कामं तर उरकावी लागणारच,” निटुरे म्हणतात, “मातीमोल झालेली डाळिंबं वेटून रान साफ करायचंय. आणि खत व बी-बियाणासाठी पैशाची जुळणी कशी करायची त्यासाठी डोकं चालवावं लागणारे.”

येत्या खरिपाच्या पेरण्या वेळेत झाल्या नाहीत, तर पुढचे सहा महिने रान पडून रहायची भीती निटुरेंना आहे. ती भयंकर १९ मिनिटं मागे सारून पुढे जाणं, हाच त्यांच्यापुढचा पर्याय आहे. पुढचा डाव टाकायची वेळ आली आहे.

फोटो : पार्थ एम . एन .

अनुवाद : कौशल काळू

Parth M.N.

2017 ರ 'ಪರಿ' ಫೆಲೋ ಆಗಿರುವ ಪಾರ್ಥ್ ಎಮ್. ಎನ್. ರವರು ವಿವಿಧ ಆನ್ಲೈನ್ ಪೋರ್ಟಲ್ ಗಳಲ್ಲಿ ಫ್ರೀಲಾನ್ಸರ್ ಆಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕ್ರಿಕೆಟ್ ಮತ್ತು ಪ್ರವಾಸ ಇವರ ಇತರ ಆಸಕ್ತಿಯ ಕ್ಷೇತ್ರಗಳು.

Other stories by Parth M.N.
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo