आठ महिने झाले २२ वर्षाची सुषमा माळी अहमदनगर जिल्ह्यातल्या आंधळगावला गेली आहे. आपली तीन वर्षांची मुलगी आणि शेतकरी असणाऱ्या नवऱ्याबरोबर राहण्यासाठी. पण दर वर्षीच्या मे ते ऑगस्ट या सुटीवर जाण्याआधी तिला तिच्या तमाशाच्या फडमालकांबरोबर सगळा हिशोब चुकता करावा लागतो.

हिशोब करायचा म्हणजे काय? साताऱ्यातल्या करवडी गावातल्या आपल्या घराच्या दिवाणखान्यात फडाच्या मालक मंगला बनसोडे किंवा सगळ्यांच्या ‘मम्मी’ खुर्चीवर बसलेल्या असतात. काही पुरुष मंडळी हातात जाडजूड चोपड्या घेऊन जमिनीवर बसलेले असतात. फडाचे १७० सदस्य – कलावंत, मजूर, ड्रायव्हर, वायरमन, मॅनेजर आणि आचारी – एक एक करत आत येतात, मागे दरवाजा लावून घेतला जातो.

Kiran Bade (centre) cracks a joke during a performance with Nitin Bansode, Mummy’s younger son
PHOTO • Shatakshi Gawade ,  Vinaya Kurtkoti

नीतीन बनसोडे ( डावीकडे ) आणि किरण बडे ( मध्यभागी ) कार्यक्रमात काही तरी विनोद करतायत . नीतीन मंगलाताईंचा सर्वात धाकटा मुलगा आणि फडाच्या मालकांपैकी एक


मंगलाताईंचा जन्म तमाशाच्या दिग्गज कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या पोटी झाला. सात वर्षाच्या वयात त्यांनी आईच्या फडात काम करायला सुरुवात केली. तिथेच पुढे त्यांचे भावी पती, रामचंद्र बनसोडे यांच्याशी त्यांची भेट झाली. मग त्यांनी १९८३ मध्ये त्यांच्यासोबत नवा फड सुरू केला. (ते स्वतः दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि नट होते, मात्र आता तब्येत साथ देत नसल्याने ते काम करत नाहीत). आता त्यांच्या फडाचं नाव आहे – ‘मंगला बनसोडे आणि नीतीनकुमार तमाशा फड’ (नीतीन त्यांचा सर्वात धाकटा मुलगा).

आता त्यांच्या दिवाणखान्यात आलेल्या फडातल्या काही मंडळींमधला एक म्हणजे किरण बडे; तो ५०,०००ची उचल घेऊन निघालाय. फड बंद असतात त्या चार महिन्यात अहमदनगरमधल्या पाथर्डीतलं आपलं कुटुंब चालवायला हा पैसा कामी येईल. त्याचे वडील आणि भाऊ दुसऱ्या तमाशात काम करतात.

मुख्यतः आजारपण, अचानकचा दवाखाना आणि लग्न यासाठी उचल घ्यावी लागते. “खरं तर” किरण म्हणतो, “एखाद्या कलाकाराला अडकवून ठेवण्यासाठीच मालक उचल देतात.”

किरणच्या दर महिन्याच्या १५००० पगारातून त्याचं हे कर्ज २०१७-१८ च्या हंगामात हप्त्याने वसूल केलं जाईल. या हंगामाची तयारी सप्टेंबरमध्येच सुरू होते आणि बाऱ्या मेमध्ये संपतात. “मी जेवढं काम करतो ते पाहता मला यापेक्षा किती तरी जास्त पगार मिळायला पाहिजे!” किरण म्हणतो. नाच, गाणं आणि अभिनय या सगळ्या कला त्याच्याकडे आहेत.

पण जेव्हा त्याच्या बायकोने त्याला तमाशा सोडायला सांगितलं, तेव्हा त्याने सपशेल नकार दिला. तमाशा त्याचं वेड आहे, त्याचा प्राण आहे. “मी तिला सांगितलं, मी एक वेळ दुसरी बायको करेन पण फड सोडणार नाही. तमाशा एका तुरुंगासारखा आहे, ज्यातून मला कधीही सुटका नकोय.”

तमाशाचा हंगाम सुरू झाला की किरणला दिवसाला शिधा म्हणून ५० रुपये मिळतात. जादा पैसे मिळावे म्हणून तो ड्रायव्हर आणि एलेक्ट्रिशियनचंही काम करतो – त्यासाठी दिवसाला २०० रुपये. हंगामाच्या शेवटी त्याला त्याच्या नावचे सगळे पैसे मिळणार, त्यातनं शिध्यासाठी दिलेले पैसे वगळले जाणार.

PHOTO • Shatakshi Gawade ,  Vinaya Kurtkoti

मंगला , ६६ आणि त्यांचा सर्वात थोरला मुलगा अनिल कराडच्या सावळज गावात एका बारीबद्दल चर्चा करतायत . त्यांचा तमाशा महाराष्ट्रातल्या मोठ्या फडांपैकी एक आहे

बहुतेक तमाशा कलावंतांचे सगळा आर्थिक व्यवहार अशा रितीने होत असतातः उचल घ्यायची, ती फेडायला काम करायचं, आणि पुढच्या वर्षासाठी परत उचल घ्यायची. २१० दिवसाच्या हंगामासाठी फडमालकाबरोबर झालेल्या नोटरी केलेल्या करारामुळे ते बांधील असतात. पगाराशिवाय, त्यांना दिवसाला दोन जेवणं आणि कपडे दिले जातात. पण मेकअपचं साधन मात्र त्यांचं त्यांनाच घ्यावं लागतं.

फडाला जेव्हा चार महिन्याची सुटी असते तेव्हा हे कलावंत आणि कामगार आपापल्या रानात किंवा ड्रायव्हर किंवा घरकामगार म्हणून काम करतात. तमाशाच्या कमाईतून केलेल्या बचतीच्या जोरावर या काळात ते निभावून नेतात.

Woman dancing in tamasha
PHOTO • Shatakshi Gawade ,  Vinaya Kurtkoti

सुषमा माळीने आईच्या पावलावर पाऊल ठेवत वयाच्या १२व्या वर्षीच तमाशात कामाला सुरुवात केली


कोणत्याही फडात तमाशात नाचणाऱ्या बायांना – या फडात १६ जणी आहेत – सगळ्यात जास्त पैसे दिले जातात, मंगलाताईंचे थोरले चिरंजीव आणि फडाचे मॅनेजर, अनिल बनसोडे सांगतात. “२०१६-१७ च्या हंगामात, सगळ्यात जास्त पगार ३०,००० रुपये होता, तोही तमाशात नाचणाऱ्या बाईला,” ते सांगतात. त्यांच्यामुळेच सगळ्यात जास्त गर्दी गोळा होते आणि त्यांचंच सगळ्यात जास्त कौतुकही होतं. पण आठ महिने फडाबरोबर फिरायला तयार असणाऱ्या नृत्य येणाऱ्या बाया मिळणं सोपं नसतं. “त्यामुळे चांगला पगार हाच त्यांना टिकवून ठेवायचा एकमेव मार्ग असतो.”

या हंगामात अनेक गाण्यांमध्ये सुषमा माळी मुख्य कलावंत होती. तिने १२-१३ वर्षाची असतानाच तमाशात काम करायला सुरुवात केली. आपल्या आईला फडावर नाचताना पाहतच ती मोठी झाली. सुषमाने तमाशात यायचा निर्णय घेतला तो काही तिच्या आईला फारसा पसंत नव्हता. आपल्यासारख्याच हाल अपेष्टा तिलाही सोसाव्या लागू नयेत असंच त्यांना वाटत होतं. पण सुषमाने काही निर्णय बदलला नाही कारण तमाशातलं आर्थिक स्वातंत्र्य तिला खुणावत होतं. “माझा नवरा शेतकरी आहे. त्यालाही मी तमाशात काम केलेलं आवडत नाही. पण मला माझ्या आठ वर्षांच्या भावाला आणि तीन वर्षाच्या मुलीला मोठं करायचंय,” ती म्हणते. सुषमालाही आपल्या मुलीने तमाशात यावं असं मुळीच वाटत नाही. आपण तमाशात नाचतो हेही तिने तिला सांगितलेलं नाही.

आई-वडील किंवा मोठी भावंडं तमाशात काम करतात म्हणून अनेक जण फडात येतात. शेतमजुरीपेक्षा तमाशात कमाईचा जास्त भरवसा असतो. फडात असल्यामुळे त्यांना कलावंत म्हणून ओळखलं जाईल आणि त्यांची समाजातली पत वाढेल असंही काही जणांना वाटतं.

सांगली जिल्ह्याच्या दुबळ धुळगावच्या शारदा खाडेंसारखी इतर काही कुटुंब फडासोबतच राहतात. शारदा नर्तकी आहेत आणि वगात काम करतात. त्यांचा एक मुलगा ढोलकी वगैरे वाजवतो आणि दुसरा वायरमन आहे. त्यांचा नवरादेखील नट आहे. त्यांच्यासाठी तमाशा हाच जीविकेचा सगळ्यात चांगला पर्याय आहे. शेतमजुरी करणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांना दिवसाला जास्तीत जास्त २०० रुपये मिळतात आणि रोज काम मिळेलच याचीही कसलीच खात्री नसते.

पण तमाशातल्या नियमित कमाईसाठी बरंच काही गमवावंही लागतं. दर रोज नव्या गावात तंबू ठोकायचा हे काही सुखाचं काम नाहीये, शारदा म्हणतात. आणि कामाच्या वेळांना काही धरबंधच नसतो, रात्री उशीरापर्यंत काम, जेवणाच्या वेळा नाहीत आणि बहुतेक वेळा घाणीत रहायला लागतं.

Sharda gets ready for the last performance of the season. Her husband Nagesh Khade (centre) is an actor in the vag natya and her son Sagar Khade is a percussionist
PHOTO • Shatakshi Gawade ,  Vinaya Kurtkoti

या हंगामातल्या शेवटच्या प्रवेशासाठी शारदा तयार होतात . त्यांचा नवरा नागेश ( मध्यभागी ) अभिनय करतात तर मुलगा सागर ( डावीकडे ) ढोलकी वाजवतो


पण तमाशातल्या नियमित कमाईसाठी बरंच काही गमवावंही लागतं. दर रोज नव्या गावात तंबू ठोकायचा हे काही सुखाचं काम नाही. कामाच्या वेळांना धरबंध नाही, उशीरापर्यंत काम, अवेळी जेवणं आणि घाणीत राहणं – शिवाय लोकांची अचकट विचकट बोलणी

कित्येकदा पुरुष प्रेक्षक मोठ्याने वाईट साईट बोलतात किंवा अश्लील खाणाखुणा करतात. शारदा अनेकदा त्यांना विचारते की तुम्ही असं का करताय? तुमच्या घरी आया-बहिणी नाहीयेत का? त्यांचं उत्तर असतं – “आमच्या बाया तुमच्यासारख्या तमाशातल्या बायांसारखं वागत नाहीत!” पुरुषांसमोर असं नाचावं लागणार नाही असं दुसरं काही काम त्या करत नाहीत असं विचारल्यावर त्यांचं उत्तर असतं, “हेदेखील कामच आहे ना!”

तमाशातल्या पुरुषांनाही बोचरे बोल ऐकावे लागतातच. लहानपणी गावातले लोक त्यांना आणि त्यांच्या भावंडांना “तमासगिर बाईची पोरं” म्हणून चिडवायचे हे अनिल आजही विसरलेले नाहीत.

* * *

Mohit in the rahuti [tent] in Narayangaon
PHOTO • Shatakshi Gawade ,  Vinaya Kurtkoti

आपला फड लोकांच्या स्मरणात रहावा अशी मोहित नारायणगावकरांची इच्छा आहे


तमाशाचे सगळे व्यवहार रोखीवर चालतात. फडाचे मालकच खाजगी सावकारांकडून महिना ४-५% व्याजाने कर्ज घेतात. “बँका आम्हाला कर्ज देत नाहीत. त्यामुळे आम्ही खाजगी सावकाराकडून कर्ज घेतो आणि फड चालू असताना पुढच्या आठ महिन्याच्या काळात ते फेडून टाकतो,” मंगलाताईंच्या भावाचा कैलास यांचा मुलगा, आणि एका तमाशा फडाचा मालक असणारे मोहित नारायणगावकर सांगतात.

मंगलाताईंच्या फडाला मात्र बँका कर्ज देतात कारण त्यांची तितकी पत आहे. त्यांचा फड काही मोजक्या फडांपैकी आहे ज्यांच्याकडे स्वतःची यंत्रसामुग्री आहे आणि मुळात कर्जाचा कसला बोजा नाही. कामगारांची संख्या आणि कमाई या दोन्ही बाबींचा विचार करता ग्रामीण महाराष्ट्रातल्या मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये या फडाची गणती होईल. दर वर्षी मंगलाताईंच्या फडाचे एकूण आर्थिक व्यवहार एक कोटीच्या घरात जातात. पश्चिम महाराष्ट्रात ७०-१५० सदस्य असणारे असे ३०-४० फड आहेत आणि २०-२२ मंडळी असणारे २०० फड आहेत, अर्थात सगळेच काही संपूर्ण हंगामात तमाशा सादर करत नाहीत. पुण्याचे छायाचित्रकार-पत्रकार संदेश भंडारे सांगतात. त्यांनी तमाशावर एक पुस्तक लिहिलेलं आहे.

सप्टेंबर ते मे या काळात फडाची दोन पद्धतीने कमाई होते. तिकिट लावून होणारे खेळ दसऱ्यानंतर सुरू होतात. तिकिट ६० रुपयाच्या आसपास असतं. हे खेळ गुढी पाडव्यापर्यंत म्हणजेच मार्च-एप्रिलपर्यंत चालू असतात.

The audience stayed on till the end of the show in Gogolwadi village, Pune district
PHOTO • Shatakshi Gawade ,  Vinaya Kurtkoti

तमाशा मोकळ्या रानात सादर केला जातो . दोन तासामध्ये कामगार तात्पुरता मंच उभा करतात


तिकिट लावून होणाऱ्या खेळाचा खर्च निघायचा असेल तर त्याला किमान १००० तरी प्रेक्षक यावे लागतात. प्रेक्षकांमध्ये ९०% पुरुष, तमाशा उतरतो त्या गावातले किंवा आसपासच्या पंचक्रोशीतले. एक खेळ सुमारे ५-६ तास चालतो. पण जर तो रात्री ११ च्या पुढे सुरू झाला तर मध्यरात्री २-३ ला संपतो.

तमाशा मोकळ्या रानात सादर केला जातो. दोन तासामध्ये कामगार तात्पुरता मंच उभा करतात. प्रत्येक फड रोज वेगवेगळ्या ठिकणी तमाशा सादर करतो. काही गावात तर फडाला सकाळीही छोटासा खेळ करावा लागतो. त्याला सकाळची हजेरी असं म्हणतात, हा खेळ २-३ तास चालतो.

कमाईचा दुसरा मार्ग म्हणजे गावची जत्रा समिती सालाबादच्या जत्रांमध्ये तमाशा फडासोबत करार करते. मोठे फड प्रत्येक खेळासाठी किमान १ लाखाची सुपारी घेतात.

सुपारी घेऊन सादर केलेल्या तमाशाला तिकिट लावलेलं नसतं. कुणीही येऊन बसू शकतं. “२०१७ च्या मेपर्यंत चालू राहिलेल्या हंगामात आम्ही ६० लाखाचा नफा कमवला पण तो उचल देण्यावर खर्च करावा लागला. पण आम्ही हे टाळू शकत नाही. आमचे कलाकार दुसऱ्याच्या फडावर जाण्याची भीती असतेच,” मोहित सांगतात.

दुष्काळ पडला की त्या वर्षी तिकिटाचे आणि सुपारी घेऊन केलेले सगळेच खेळ मार खातात. गावाकडे लोकांच्या हातात पैसाच नसतो. “पण कलाकारांना तर पैसे द्यावेच लागतात, आणि त्यांनाही दर वर्षी पगार वाढवून हवा असतो,” मोहित म्हणतात. “हा तोटा फडमालकालाच सहन करावा लागतो.”

Babaso Nyanu Mane (centre) is going to apply for a pension this year. He tried setting up his own phad, but had to return to his life as just an actor when his phad failed
PHOTO • Shatakshi Gawade ,  Vinaya Kurtkoti

बाबासाहेब ज्ञानू माने ( मध्यभागी ) मंगलाताईंच्या फडात नटाचं काम करतात . यंदा शासनाच्या पेन्शनसाठी अर्ज करण्याचा त्यांचा विचार आहे


पण नफा हा मूळ उद्देशच नाहीये, मंगला आणि मोहित दोघांचं एकमत होतं. “आमचा मुख्य उद्देश काय आहे?, आमचा फड लोकांच्या स्मरणात रहावा,” मोहित सांगतात. “तमाशाची कला जिवंत रहायला पाहिजे.” मंगलाताईंना हा व्यवसाय चालू ठेवण्याचं बळ देणारी एकच गोष्ट आहे – आपल्या घराण्याचं नाव टिकलं पाहिजे. “आमची सगळी कमाई आम्ही कलाकार आणि कामगारांवर खर्च करतो. आम्हाला त्यातनं फारसं काही मिळत नाही,” त्या सांगतात.

आणि या व्यवसायातून निवृत्त झाल्यावर? ४८ वर्षाच्या शारदा म्हणतात, “आम्हाला महिना ३००० रुपयाची पेन्शन मिळायली हवी [शासनाने जाहीर केलेली, मात्र ती मिळेल याची काहीच शाश्वती नाही]. पण ती कशी पुरी पडावी? माझं शरीर साथ देतंय तोवर मी काम करतच राहणार. त्यानंतर माझ्या पोरांच्या भरोशावरच आहे सगळं.”

ता . . – १७ सप्टेंबर ला बीड जिल्ह्याच्या वळवड गावातून २०१७ च्या फडांची सुरुवात झाली . ऑक्टोबरला मंगला बनसोडेंना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे सर्जनशील कला विभागसासाठी वयोश्रेष्ठ सन्मान २०१७ ( राष्ट्रीय पुरस्कार ) देण्यात आला .


Shatakshi Gawade

Shatakshi Gawade is an independent journalist based in Pune. She writes about the environment, rights and culture.

Other stories by Shatakshi Gawade
Vinaya Kurtkoti

Vinaya Kurtkoti is a copy editor and independent journalist from Pune. She writes about arts and culture.

Other stories by Vinaya Kurtkoti
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale