“पाणी परत थांबेल आहे,” आपली बांबूची काठी टेकत टेकत शेताकडे जाताना धर्मा गरेल म्हणतात. “यो जून महिना ईचित्रच झालाय. २-३ तास पाणी पडतो. कधी टिपकलतो तं कधी जोर धरतो. मंगा सहन नाय होय असा गरमा. जमीन सुखी ठाक प़डते. त्यातूच ई माती कोरडी. रोपा जगायची कशी?”

ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातल्या गरेलपाडा या १५ वारली कुटुंबांच्या पाड्यावरती आपल्या एक एकर शेतात ८० वर्षांचे धर्मा गरेल भातशेती करतात. २०१९ च्या जूनमध्ये त्यांनी लावलेला भात पूर्ण वाळून गेला. तेव्हा ११ दिवसांमध्ये फक्त ३९३ मिमी पाऊस झाला (महिन्याच्या सरासरी ४२१.९ मिमीपेक्षाही कमी).

त्यांचं साळीचं बी उगवूनदेखील आलं नाही – बी, खत, ट्रॅक्टरचं भाडं आणि बाकी गोष्टींवर खर्च केलेले १०,००० रुपये वाया गेले.

“ऑगस्ट महिना उजाडला तेव्हा कुठे जमीन जरा गार व्हायला लागली. दुसर्यांदा पेराय घेतला तं हाती पीक लागंल, ना काय तरी फायदा होल असा वाटत होता,” धर्मांचा मुलगा, ३८ वर्षीय राजू सांगतो.

जून तसा कोरडाच गेला, त्यानंतर जुलै महिन्यात मात्र भरपूर पाऊस झाला – १५८६.८ मिमी जो एरवीच्या ९४७.३ मिमीपेक्षाही जास्त होता. त्यामुळे मग गरेल कुटुंब दुबार पेरणीवर आशा ठेवून होते. ऑगस्ट उजाडला आणि पावसाचा जोर चांगलाच वाढला – पार ऑक्टोबरपर्यंत तो तसाच राहिला. ठाणे जिल्ह्यातल्या सातही तालुक्यांमध्ये ११६ दिवसात अतिरिक्त १२०० मिमी पाऊस पडला.

“सप्टेंबर महिन्यापर्यंत पडला तेवढा पाणी पिकाला बस होता. आता आपले माणूस पण पोट फुट तव पर्यात खात नाय, म बारिक रोपाचा काय सांगायचा?” राजू म्हणतो. ऑक्टोबरच्या पावसाने गरेल कुटुंबांच्या शेतात पाणी साचलं. “आम्ही सप्टेंबरच्या शेवटी भातं कापायला सुरुवात केली होती आणि भारं बांधून ठेवलं होतं,” राजूची बायको, ३५ वर्षांची सविता सांगते. “बाकीचा भात कापायचा होता. ५ ऑक्टोबरनंतर अचानक पाण्यानी जोर धरला. आम्ही कापलेल भात कसा-बसा करून घरात आणला, पण काही मिनिटीत आख्खा शेत पाण्याशी भरला..”

ऑगस्टच्या दुबार पेरणीचा ३ क्विंटल भात गरेल कुटुंब कसं तरी करून वाचवू शकले. एरवी त्यांचा एका पेऱ्यातच ८-९ क्विंटल भात निघायचा.

Paddy farmers Dharma Garel (left) and his son Raju: 'The rain has not increased or decreased, it is more uneven – and the heat has increased a lot'
PHOTO • Jyoti Shinoli
Paddy farmers Dharma Garel (left) and his son Raju: 'The rain has not increased or decreased, it is more uneven – and the heat has increased a lot'
PHOTO • Jyoti Shinoli

भातशेती करणारे धर्मा गरेल (डावीकडे) आणि त्यांचा मुलगा राजूः ‘पाणी कमी-जास्त नाय तं तो लयरी झालाय– आणि उकाडा भरपूर वाढलाय’ – आणि उकाडा भरपूर वाढलाय’

“गेली धा वरसा या असाच चाललाय,” धर्मा सांगतात. “पाणी कमी-जास्त नाय तं तो लयरी झालाय – आणि उकाडा पण भरपूर वाढलाय.” २०१८ साली त्यांना चार क्विंटलच भात झाला कारण त्या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला. २०१७ साली ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसामुळे भाताचं नुकसान झालं होतं.

उलट, धर्मांचं असं निरीक्षण आहे की उष्णता मात्र सातत्याने वाढत चाललीये आणि “असह्य” झालीये. जागतिक तापमान वाढ आणि वातावरणासंबंधी न्यू यॉर्क टाइम्सच्या एका संवादी पोर्टलवरच्या आकडेवारीतून असं दिसतं की १९६० साली जेव्हा धर्मा २० वर्षांचे होते तेव्हा ठाण्यामध्ये ३२ अंश सेल्सियस तापमानाचे सुमारे १७५ दिवस होते. आज, तोच आकडा २३७ दिवसांपर्यंत जाऊन पोचलाय.

शहापूर तालुक्याच्या अनेक आदिवासी पाड्यांवर इतर अनेक घरं भाताचा उतारा कमी झाल्याचं सांगतायत. या जिल्ह्यात कातकरी, मल्हार कोळी, म ठाकूर, वारली आणि इतर आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. ठाणे जिल्ह्याची आदिवासी लोकसंख्या सुमारे ११.५ लाख (जनगणना, २०११) इतकी असून ती एकूण लोकसंख्येच्या तब्बल १४ टक्के इतकी आहे.

“पावसावर येणाऱ्या भाताला नियमित पाणी लागतं, त्यामुळे पाऊस वेळेवर पडणं महत्त्वाचं आहे. पावसाने कधीही ओढ दिली तर त्याचा उताऱ्यावर परिणाम होतो,” पुण्याच्या बाएफ शाश्वत उपजीविका आणि विकास संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक सोमनाथ चौधरी सांगतात.

अनेक आदिवासी कुटुंबं आपल्या जमिनीच्या छोट्या तुकड्यात खरिपात भाताचं पीक घेतात आणि त्यानंतर सहा महिने वीटभट्ट्यांवर, ऊसतोडीला जाऊन चरितार्थ चालवतात. मात्र लहरी पावसामुळे भाताचा उतारा कमी होत चालल्याने आता दर वर्षीही ही कसरत करणं त्यांना आता जड जाऊ लागलंय.

जिल्ह्यामध्ये खरिपात १,३६,००० हेक्टर जमिनीवर पावसाच्या जिवावर भातपेरणी केली जाते आणि ३,००० हेक्टर क्षेत्रात रबीमध्ये (मुख्यतः विहिरी आणि बोअरवेल) सिंचनाच्या सहाय्याने (सेंट्रल रीसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चरचा २००९-१० ची आकडेवारी). तृणधान्यं, डाळी आणि भुईमूग ही इथली काही महत्त्वाची पिकं आहेत.

Savita Garel and Raju migrate every year to work in sufarcane fields: We don’t get water even to drink, how are we going to give life to our crops?'
PHOTO • Jyoti Shinoli

सविता गरेल आणि राजू दर वर्षी ऊसतोडीसाठी स्थलांतर करतातः ‘आम्हाला साधा पाणी नाय पिया मिलं, तं पिका कशी जगवू?’

खरं तर ठाणे जिल्ह्यात दोन मोठ्या नद्या आहेत, उल्हास आणि वैतरणा, दोन्ही नद्यांच्या अनेक उपनद्या आहेत, शिवाय शहापूर तालुक्यात चार मोठी धरणं आहेत – भातसा, मोडक सागर, तानसा आणि ऊर्ध्व वैतरणा – तरीही आदिवासी पाड्यांवरची शेती मात्र अजूनही पावसाच्याच भरवश्यावर होते.

“या चारही धरणांचं पाणी मुंबईला जातं. इथल्या लोकांना मात्र डिसेंबर ते मे पाण्याची टंचाई भोगावी लागते. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे टँकर हाच पाण्याचा मुख्य स्रोत झालाय,” बबन हरणे सांगतात. ते शहापूर स्थित सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि भातसा सिंचन प्रकल्प पुनर्वसन समितीचे समन्वयक आहेत.

“शहापूरमध्ये बोअवरवेलची मागणी वाढतीये,” ते सांगतात. “जल विभागातर्फे बोअर पाडल्या जातातच पण खाजगी कंत्रादटार बेकायदेशीर पद्धतीने ७०० मीटरहून जास्त खोल भोकं पाडतायत.” भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेच्या संभाव्य पाणी टंचाई अहवाल, २०१८ नुसार शहापूरसह, ठाणे तालुक्याच्या तीन तालुक्यांमधल्या ४१ गावांमध्ये भूजलाची पातळी खालावली आहे.

“आम्हाला साधा पाणी नाय पिया मिलं, तं पिका कशी जगवू? मोठं पैसंवालं शेतकरी पैसं देऊन धरणाचा पाणी घेतील ना भागवतील, नाय तं म त्यांच्या इहिरी, नाय तं मोटारी आहेतच,” राजू म्हणतो.

नोव्हेंबर ते मे या काळात शहापूरच्या आदिवासी पाड्यांवरचे अनेक जण कामासाठी स्थलांतर करू जातात याचं एक कारण म्हणजे पाण्याची टंचाई. ऑक्टोबरमध्ये खरिपाची पिकं काढली की ते महाराष्ट्र आणि गुजरातेतल्या वीटभट्ट्यांवर कामासाठी जातात किंवा राज्यातच ऊसतोडीसाठी. ते परत येतात ते खरिपाच्या पेरण्यांच्या वेळेपर्यंत. पुढचे काही महिने थोडा फार खर्च निघेल इतकाच पैसा गाठीला बांधून.

राजू आणि सविता देखील नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या प्रकाशाला ऊसतोडीसाठी जातात. २०१९ साली ते थोडं उशीरा, डिसेंबर महिन्यात निघाले, त्यांचा १२ वर्षांचा मुलगा अजय आणि धर्मा माघारी राहिले. या चार जणांच्या कुटुंबाला जूनपर्यंत तीन क्विंटल भातावर भागवावं लागणार होतं. “नायतर आम्ही अघई गावातले शेतकर्यांना भात दियाचू ना त्यांचेकडून तूर डाळ घियाचू. औदा काय त्या जमणार नाही...” पिकाचा उतारा घटल्यामुळे राजू सांगतो.

Many in Shahapur speak of falling paddy yields. Right: '...the rain is not trustworthy,' says Malu Wagh, with his wife Nakula (left), daughter-in-law Lata and her nieces
PHOTO • Jyoti Shinoli
Many in Shahapur speak of falling paddy yields. Right: '...the rain is not trustworthy,' says Malu Wagh, with his wife Nakula (left), daughter-in-law Lata and her nieces
PHOTO • Jyoti Shinoli

शहापूरमध्ये अनेक जण भाताचा उतारा घटत चालल्याचं सांगतात. उजवीकडेः ‘ पाणी काय भरोशाचा रहला नाय, ’ मालू वाघ म्हणतात, सोबत त्यांची पत्नी नकुला (डावीकडे), सून लता आणि पुतण्या

ऊसतोडीवर राजू आणि सविता दोघांचे मिळून सात महिन्याचे सुमारे ७०,००० रुपये कमवतात. राजू शहापूरपासून ५० किलोमीटरवर भिवंडी तालुक्यातल्या एका ऑनलाइन खरेदीकेंद्राच्या गोदामात हमाल म्हणून काम करतो. जून ते सप्टेंबर या काळात त्याला अंदाजे ३०० रुपये रोजाने ५० दिवसांचं काम मिळतं.

गरेलपाड्याहून ४० किलोमीटरवर बेरशिंगीपाड्यावर मालू वाघ यांचं कुटुंबही भाताच्या घटत्या उताऱ्यामुळे चिंतेत आहे. गवताने शाकारलेल्या मातीच्या त्यांच्या घरात कोपऱ्यातल्या कणगीत लिंबाचा पाला घालून ठेवलेला २ क्विंटल भात आहे. “सद्या ही घरातली सगळ्यात किमतीची गोष्ट आहे,” गेल्या नोव्हेंबर महिन्यात मालू मला म्हणाले होते. “पाणी काय भरोशाचा रहला नाय. त्यामुळं आलेला धान फार जपून वापराय लागल. पाणी त्याचे मनाचा राजा, आमचे थोडीच. तो आमचा काय नाय ऐकं.”

अनेक अभ्यासही अगदी हेच चित्र मांडतायत – पाऊस बिथरलाय. “आम्ही महाराष्ट्राची गेल्या १०० वर्षांची पावसाची आकडेवारी अभ्यासली आहे,” डॉ. पुलक गुहाठाकुरटा सांगतात. भारतीय हवामान वेधशाळेने २०१३ साली केलेल्या अभ्यासाचे ते मुख्य लेखक आहेत. Detecting changes in rainfall pattern and seasonality index vis-à-vis increasing water scarcity in Maharashtra (पाऊसमान व हंगामांमधील बदल आणि महाराष्ट्रातील पाणीटंचाईचा परस्परसंबंध) असं शीर्षक असणाऱ्या या अभ्यासात १९०१ – २००६ या काळासाठी राज्याच्या ३५ जिल्ह्यांमधील दर महिन्यामध्ये पडलेल्या पावसाचं विश्लेषण करण्यात आलं. “या विश्लेषणात एक बाब स्पष्ट समोर येते. वातावरणातल्या बदलांचा अगदी छोट्या क्षेत्रातल्या भौगोलिक आणि कालनिहाय स्वरुपावरही परिणाम होत आहे... शेतीच्या आणि त्यातही पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीच्या संदर्भात तर हे बदलतं स्वरुप कळीचं आहे,” पुण्यातील भारतीय हवामान वेधशाळेमध्ये वातावरण संशोधन व सेवा कार्यालयात शास्त्रज्ञ असलेले डॉ. गुहाठाकुरटा सांगतात.

या बदलांचा परिणाम प्रत्यक्षात जमिनीवर थेट पहायला मिळतोय. कातकरी असणारे ५६ वर्षांचे मालू वाघ आणि त्यांचं कुटुंब नोव्हेंबर २०१९ मध्ये गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातल्या वापी शहरात वीटभट्टीवर मजुरीसाठी गेले. त्यांच्या पाड्यावरची बाकीची २७ कुटुंबंही मजुरीसाठी बाहेर पडली. त्यांनी सोबत ५० किलो तांदूळ घेतला होता आणि बेरशिंगीपाड्यावरच्या त्यांच्या घरी राहिला केवळ २ क्विंटल. मे-जून महिन्यात परतल्यावर ऑक्टोबरपर्यंत त्याचाच काय तो पोटाला आधार.

“५ ते १० वरसा आधी आम्हालं ८ ते १० क्विंटल भात(धान) मिलं ना [जवळपास] ४ ते ५ क्विंटल धान भरलेल असं. गरज लागल तसा आम्ही भाताच्या बदल्यात दूसरे शेतकर्यांकडून तूर डाळ, नागली, वरई ना हरभरा घियाचू,” मालूंच्या पत्नी, ५० वर्षीय नकुला सांगतात. इतका भात अख्खं वर्ष पुरायचा. “आता पाच वर्ष झाली असतील, आम्हाला ६ ते ७ क्विंटलहून जास्त भात होतच नाय.

“दर वर्षी येणारा धान कमीच होत चाललाय,” मालू म्हणतात.

In one corner of Malu Wagh's hut, paddy is stored amid neem leaves in a kanagi: 'That’s the most precious thing in the house now'
PHOTO • Jyoti Shinoli
In one corner of Malu Wagh's hut, paddy is stored amid neem leaves in a kanagi: 'That’s the most precious thing in the house now'
PHOTO • Jyoti Shinoli

मालू वाघ यांच्या झोपडीत एका कोपऱ्यात लिंबाचा पाला घालून कणगीत भात साठवून ठेवलायः ‘सध्या ही घरातली सगळ्यात किमतीची गोष्ट आहे’

गेल्या वर्षी, ऑगस्ट महिन्यात, जेव्हा पावसाचा जोर वाढायला लागला तेव्हा त्यांच्या आशाही बळावल्या. पण ऑक्टोबर महिन्यातल्या फक्त ११ दिवसात १०२ मिमी पाऊस झाला आणि त्यांच्या एक एकर खाचरात पाणी साचलं. कापलेली भातं देखील भिजून गेली – कसाबसा तीन क्विंटल भात वाचवता आला. “यो पाणी लागला ते मुळं,” मालू सांगतात, “बी, खतं आणि बैलजोडीवर खर्च केलेले १०,००० रुपयेही पाण्यात गेले.”

ठाण्याच्या शहापूर तालुक्यातल्या या पाड्यावरच्या १२ कातकरी घरं आणि १५ मल्हार कोळी घरांना असंच नुकसान सहन करावं लागलंय.

“नैऋत्य मोसमी वारे तसेही बरेच लहरी म्हणून प्रसिद्ध आहेत. आता वातावरणातल्या बदलांमुळे हा लहरीपणा जास्तच वाढलाय. परिणामी शेतकरी त्यांचं पिकाचं चक्र आणि रुळून गेलेली पीक पद्धत पाळू शकत नाहीयेत,” प्रा. डी. पार्थसारथी सांगतात. ते भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई इथे वातावरण अभ्यास – आंतरशाखीय कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासातून असं स्पष्ट दिसतं की १९७६-७७ नंतर नाशिक आणि कोकण जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची तीव्रता वाढली आहे, तर ठाणे जिल्ह्यात अति जोराच्या पावसाच्या दिवसांमध्ये फरक झालाय.

या अभ्यासात वातावरणातील बदलांच्या शेतीवरील परिणामांवर भर दिला गेला आहे. १९५१ ते २०१३ या ६२ वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यातल्या रोजच्या पावसाचं यात विश्लेषण करण्यात आलं आहे. “वातावरणातल्या बदलांचा पावसाचा जो नेम असतो त्याच्यावर परिणाम होतोय. अभ्यास दाखवतायत की पावसाळ्याची सुरुवात, आणि परती, पावसाचे दिवस, ओढ तसंच एकूण पाऊसमान हे सगळं बदलत चाललंय आणि याचा पेरणीची तारीख, उगवणीचा दर आणि एकूण उताऱ्यावर परिणाम होतोय. कधी कधी तर मोठ्या प्रमाणावर पिकं हातची जातायत,” प्रा. पार्थसारथी म्हणतात.

बेरशिंगी पाड्यापासून १२४ किलोमीटरवर असलेल्या नेहरोली गावात म. ठाकूर समुदायाच्या ६० वर्षांच्या इंदु आगिवले देखील या बदलत्या नेमाबद्दल बोलतायत. “आम्ही रोहिण्यांमधी [२५ मे ते ७ जून] बी पेरणार. पुस येय पर्यात [२० जुलै ते २ ऑगस्ट] आवणीसाठी रोप तयार होतं. चित्रा उगवल्या [१० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर] का धान कापायचा आणि झोडायच. आता ह्या समदा उशीरानं होतंय. कती तरी वरसांशी नक्षत्रा धरून पाणी येयूच नाय. का त्या कलंच नाय.”

इंदुताई देखील वाढत्या उष्णतेबद्दल बोलतात. “मी ओढा गरमा मी माझे उभे आयुषात पाहिला नाय. मी बारीक होतू ना, तव्हा रोहिण्या निंघल्या का जोर्ह्यान पाणी लागायचा. गरमाचे तोपलेल जमीन त्या पाण्यानी गार होयाची. हवेन निसता मातीचा वास ईयाचा. आता तसा वास कव्हा कव्हाच येतंय...” त्या म्हणतात. आपल्या दोन एकर शेताच्या कडेने कुंपण रोवण्यासाठी त्या जमिनीत खड्डे करतायत.

Top row: 'For a long time now, the rainfall is not according to the nakshatras,' says Indu Agiwale. Botttom row: Kisan Hilam blames hybrid seeds for the decreasing soil fertility
PHOTO • Jyoti Shinoli

वरच्या रांगेतः ‘कती तरी वरसांशी नक्षत्रा धरून पाणी येयूच नाय,’ इंदु आगिवले म्हणतात. खालच्या रांगेतः किसन हिलम मातीची कस कमी होतोय त्याचा ठपका संकरित बियाण्यावर ठेवतात

वेडावाकडा पाऊस, पिकाचा घटलेला उतारा आणि वाढतं तापमान याच्या जोडीला शहापूर तालुक्यात मातीचा कस देखील कमी होत चाललाय, असं इथले शेतकरी सांगतात. ६८ वर्षांचे किसन हिलम याचा ठपका संकरित बियाणं आणि रासायनिक खतांवर ठेवतात. “मसुरी, चिकंदर, पोशी डांगे... असा या जूना [पारंपरिक] बी कोनाकं रहलाय? एकाकं पण नाय. समदे जन घरचा(गावठी) बी सोडून औसदवाल्या बीचे मागं लागल्यान. आज काल कोनी घरचा बी ठेवं हू नाय...” ते म्हणतात.

आम्ही भेटलो तेव्हा ते लांब दांड्याच्या पंज्याने मातीत संकरित बी मिसळत होते. “मला तं या परायचाच नाय होता. घरचे (गावठी) बीला धान कमी येय पण मूळ धरून रयतयं. हे नवं बी औषध मारलं नाही तर जगत नाही. माती शुद्ध राहत नाही – पाऊस चांगला झाला काय किंवा कमी.”

“दिवसेंदिवस शेतकरी स्वतः गावरान बी जतन करण्याऐवजी बियाण्याच्या कंपन्यांवर अवलंबून रहायला लागलेत. पण या संकरित बियांना लागणारं खत, कीटकनाशकं आणि पाण्याचं प्रमाणही वाढत जातं. आणि हे सगळं घातलं नाही तर दावा केलेला उतारा पण या बियांपासून मिळत नाही. याचा अर्थ हा की सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये संकरित बी बिलकुल साजेसं नाहीये,” संजय पाटील सांगतात. पुण्याच्या बाएफ शाश्वत उजजीविका व विकास संस्थेमध्ये ते प्रकल्प समन्वयक आहेत. “जागतिक तापमान वाढ आणि वातावरणातील बदलांमुळे नेमाने येणारा, निश्चित असा पावसाळा विरळाच. त्यामुळे आपल्या रोजच्या गरजेचं धान्य या अशा बदलांशी जुळवून घेणारं असणं फार महत्त्वाचं आहे.”

“या भागातलं भाताचं पारंपरिक बी, तिथल्या परिस्थितींशी जुळवून घेणारं असतं, आणि वातावरणात बदल झाले तरीही थोडंफार पीक हाती येऊ शकतं,” बाएफचे सोमनाथ चौधरी सांगतात.

संकरित बियांना बहुतेक वेळा पाणी देखील जास्त लागतं. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांमध्ये जर पाऊस वेळेवर आला नाही तर पिकांचं नुकसान होतं.

तर, वापीच्या वीटभट्टीवर उभारलेल्या तात्पुरत्या झोपडीत मालू, नकुला, त्यांचा मुलगा राजेश, सून लता आणि १० वर्षांची नात, सुविधा जेवत होते. मी फोनवर त्यांच्याशी बोलले तेव्हा समजलं की रोजचा भात, सोबत वांगी, बटाटा किंवा टोमॅटोचा रस्सा इतकं साधं जेवणही ते दिवसातून एकदाच करतायत.

Along with uneven rainfall, falling yields and rising temperatures, the fertility of the soil is also decreasing, farmers in Shahapur taluka say
PHOTO • Jyoti Shinoli
Along with uneven rainfall, falling yields and rising temperatures, the fertility of the soil is also decreasing, farmers in Shahapur taluka say
PHOTO • Jyoti Shinoli

वेडावाकडा पाऊस, पिकाचा घटलेला उतारा आणि वाढतं तापमान याच्या जोडीला शहापूर तालुक्यात मातीचा कस देखील कमी होत चाललाय, असं इथले शेतकरी सांगतात

“विटा बनवायचा काम काय सोपा नाय. पाण्यागत आमचा घाम मिसळतो मातीनं. काम करायचा तं नीट खाया लागं. पण आता आम्ही दिसातून एकदाच जेवतावं, जूनच्या पेरण्या येत तव पर्यात धान पुरला पायजे,” मालू सांगतात.

वीटभट्टीचा हंगाम संपेपर्यंत, म्हणजेच मे पर्यंत, ते शक्यतो चार जणांच्या मजुरीचे ८०,००० ते ९०,००० रुपये गाठीला बांधून घरी, बेरशिंगीपाड्याला परततात. पुढचं वर्षभर शेतीला लागणारं सामान, वीजबिल, औषधं, मीठ-मसाला, भाजीपाला आणि बाकी सगळ्यासाठी हा पैसा पुरायला पाहिजे.

मालू वाघ, धर्मा गरेल किंवा शहापूरमधल्या आदिवासी पाड्यांवरच्या इतरांना ‘वातावरण बदल’, ही संज्ञा माहित नसेलही पण हे बदल काय आहेत हे मात्र त्यांना नुसतं माहित नाहीये, ते रोजचा त्यांचा सामना करतायत. वातावरणात होणाऱ्या स्थित्यंतराच्या अनेक पैलूंबद्दल ते स्पष्टपणे बोलतातः मनमानी पाऊस, जो सब सारखा पडत नाही, उकाड्यातली भयंकर वाढ, बोअरवेलकडे वाढलेला ओढा आणि त्याचा पाण्याच्या स्रोतांवर होणारा परिणाम आणि या सगळ्याचा जमीन, पिकं आणि शेतीवर होणारा परिणाम, बियाण्यातले बदल आणि त्यामुळे पिकाच्या उताऱ्यात येणारी घट, आणि वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आपल्याला वारंवार सावध केलंय ती घटत चाललेली अन्नाची हमी.

या सगळ्यांसाठी, हे त्यांचं स्वतःचं जगणं आहे. आणि खरं तर त्यांची निरीक्षणं शास्त्रज्ञांशी विलक्षण जुळणारी आहेत पण वेगळ्या भाषेत मांडलेली आहेत. या सगळ्यासोबत अधिकारी लोकांशी त्यांचा झगडा चालू असतो तो वेगळाच. आणि या पाड्यांवर हे अधिकारी बहुतेक वेळा वनखात्याचे असतात.

मालू म्हणतात तसं: “निसता पाणीचं नाय आमचा झगडा हू चालूच आसतो. फारेस्टवाल्यांशी [जमिनीच्या मालकीसाठी], रेशन अधिकाऱ्यांबरोबर. त्यात पाणी तरी आमचेवं कशा कुरपा करंल?”

तिथे, त्यांच्या शेतात उभे असलेले ८० वर्षांचे धर्मा म्हणतात, “हवामान बदलेल आहे. खूप गरम झालंय. पहले यियाचा तसा पाण्याचा काय नेम नाय. पहलेसारखी प्रजाच नीट राहिली नाही, तर निसर्ग तरी कसा रहंल? तो हू बदलं...”

अनुवादः मेधा काळे

वारली भाषेतील संवादांसाठी विशेष सहाय्यः ममता परेड

Reporter : Jyoti Shinoli

ಜ್ಯೋತಿ ಶಿನೋಲಿ ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಹಿರಿಯ ವರದಿಗಾರರು; ಅವರು ಈ ಹಿಂದೆ ‘ಮಿ ಮರಾಠಿ’ ಮತ್ತು ‘ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ1’ನಂತಹ ಸುದ್ದಿ ವಾಹಿನಿಗಳೊಂದಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.

Other stories by Jyoti Shinoli
Editor : Sharmila Joshi

ಶರ್ಮಿಳಾ ಜೋಶಿಯವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಮಾಜಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಸಂಪಾದಕಿ ಮತ್ತು ಬರಹಗಾರ್ತಿ ಮತ್ತು ಸಾಂದರ್ಭಿಕ ಶಿಕ್ಷಕಿ.

Other stories by Sharmila Joshi

ಪಿ. ಸಾಯಿನಾಥ್ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಸ್ಥಾಪಕ ಸಂಪಾದಕರು. ದಶಕಗಳಿಂದ ಗ್ರಾಮೀಣ ವರದಿಗಾರರಾಗಿರುವ ಅವರು 'ಎವೆರಿಬಡಿ ಲವ್ಸ್ ಎ ಗುಡ್ ಡ್ರಾಟ್' ಮತ್ತು 'ದಿ ಲಾಸ್ಟ್ ಹೀರೋಸ್: ಫೂಟ್ ಸೋಲ್ಜರ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯನ್ ಫ್ರೀಡಂ' ಎನ್ನುವ ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ.

Other stories by P. Sainath
Series Editors : Sharmila Joshi

ಶರ್ಮಿಳಾ ಜೋಶಿಯವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಮಾಜಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಸಂಪಾದಕಿ ಮತ್ತು ಬರಹಗಾರ್ತಿ ಮತ್ತು ಸಾಂದರ್ಭಿಕ ಶಿಕ್ಷಕಿ.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale