Portrait of Sita Devi

“रामस्वरूप आमच्यातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याच्या मालकीची थोडीशी जमीन आहे.” सगळे त्याला चिडवतात आणि हसतात. या शेतमजुरांच्या गटात रामस्वरूप हा एकच माणूस आहे ज्याच्याकडे एक एकर जमीन आहे. त्याच्या बापाकडे दोन एकर होते. ती जमीन त्याच्या भावाबरोबर वाटली गेली आणि मग रामस्वरूप एक एकराचा मालक झाला.

हा साधारण १५० मजुरांचा गट एका ठेकेदाराने गुडगाव शहराच्या सीमेवर सुरु असलेल्या एका प्रकल्पात काम करण्यासाठी, फतेहाबाद जिल्ह्याच्या गावांमधून आणला आहे. कामाच्या ठिकाणी पोचताना वझीर सांगतो की, “हे सगळे माझ्या जिल्ह्यातील – फतेहाबाद मधील- आहेत, त्यामुळे मी त्यांना ओळखतो. पूर्वी मी सुद्धा यांच्यासारखाच होतो. वीस वर्षांपूर्वी, मी माझ्या भट्टू या गावातून शहरात काम शोधायला आलो होतो.” कामाच्या जागी पोचण्याआधीच दोन मजूर स्त्रिया नजरेस पडतात.  आम्ही त्या बायांशी बोलायला थांबतो. त्या कुठे निघाल्या होत्या?

03_Migrant women at work in Gurgaon

“आम्ही बांधकामांच्या साईटवर काम करतो. विटा किंवा वाळू डोक्यावर वाहून नेण्याचं काम आम्ही करतो.  गेले दोन महिने मी गुडगावमध्ये काम करते आहे. मी दौसा, राजस्थानची आहे, माझं कुटुंब तिथे राहातं. तीन महिन्यांनंतर मी दिवाळीसाठी घरी जाईन. पण आता मला जायला हवं, नाहीतर उशीर होईल.” असं म्हणत सीतादेवी घाईघाईने साईटकडे पळते.

सध्या गुडगावमध्ये ड्रायव्हरचं काम करणारा वझीर आम्हाला गाडीतून ३ किमी. दूरच्या घाटागावला नेतो; तिथे भूमी विकासाचं काम सुरु आहे. हायवेवर स्त्रिया, पुरुष आणि काही मुलेसुद्धा नेणारे ट्रॅक्टर आमच्या बाजूने पळताना दिसतात. घाटागाव हळू हळू जागं होतंय, हवा गरम आणि कुंद आहे. गावाच्या अरुंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना एक किंवा दोन मजली घरं दिसतात. थोड्याशा तीन मजली इमारती सुद्धा आहेत. दूरवर पाहिलं तर गुडगावमधल्या उंच मनोऱ्यासारख्या इमारती दिसतात – सीतादेवी सारख्यांच्या कष्टाची  ही फळं.


04_Migrant women at work in Gurgaon

“ही घरं स्थानिक रहिवाश्यांची आहेत. त्यांनी भूमिविकास आणि जमीन गुंतवणूक प्रकल्पांसाठी राज्य सरकारला जमिनी विकल्या. त्यातून मिळालेल्या थोड्याफार पैशांतून त्यांनी ही छोटी घरं बांधली. त्यातल्या काही खोल्या ते बाहेरून आलेल्यांना भाड्याने देतात. घरासमोर बांधलेल्या छोट्या झोपड्यांप्रमाणेच या वरच्या मजल्यावरच्या काडेपेटीसारख्या खोल्याही भाड्याने दिल्या जातात. राहतं कोण या खोल्यांत?

“ राजस्थान आणि हरियाणाच्या इतर भागातून आलेले स्थलांतरित मजूर या खोल्यांत राहतात. ते झाडलोट, घरकाम, बांधकाम वगैरे सर्व प्रकारची कामं करतात.” अशा खोल्या भाड्याने देणं स्थानिक रहिवाश्यांसाठी उत्पन्नाचं साधन आहे.

एवढ्यात दुरून एक बाई, डोक्यावर गवताचा भारा घेऊन येत असते. हाताच्या हलक्या आधाराने तो भारा मोठ्या सहजतेने पेलत ती आमच्या जवळ  येते. आम्ही तिच्याशी बोलायला थांबतो. डोक्यावरच्या ओढणीखालून तिचे पिकलेले केस डोकावतात. तिचा कुडता – खरं तर पुरुष वापरतात तसा गंजी (बनियन) - घामाने भिजलेला आहे.

गिलौडी गुज्जर इथे घाटागावमधेच, या मागच्याच एका घरात राहते. “माझ्या घरचे  मला म्हणतात की काम नको करूस. पण मी लहानपणापासून काम करत आलेय, त्यामुळे मी ते करतच राहणार. दुसरं करण्यासारखं आहे काय? आम्ही आमची जमीन विकून टाकली त्यामुळे शेतीची कामं नाहीत. मग मी सकाळच्या वेळात आमच्या दोन गाईंसाठी गवत गोळा करते. त्यांचं पुरेसं दूध येतं, बाजारातून विकत घेण्याची गरज पडत नाही.”

Migrant women at work in Gurgaon

वझीर तिच्या डोक्यावरचा भारा उचलून रस्त्यालगतच्या भिंतीवर ठेवतो. ती फोटो काढून घ्यायला संमती देते पण सांगते की मला अनोळखी माणसांशी बोलायची भीती वाटते. वझीर तिला सांगतो की आम्ही सरकारी माणसं नव्हे, हे ऐकून ती थोडी मोकळी झाल्यासारखी वाटते आणि बोलू लागते.

MCG Block- F Gurgaon

इथून थोडं पुढे, भूमिविकास प्रकल्पाची जागा आहे. तिच्याभोवती काटेरी तारेचे कुंपण आहे. तिथे एक निळी पाटी उभारलेली आहे - MCG BLOCK – F MAINTAIN BY A.E.(HORT.) – MCG म्हणजे गुडगावची महानगरपालिका. विकास झाल्यावर, या जमिनीचे छोटे भूखंड आखून विकले जातील. अशा कामासाठी सुमारे १५० मजूर वेगवेगळ्या साईट्सवर काम करत आहेत. बाया बोलत असताना काही पुरुष ऐकत आहेत, काही बिड्या ओढत आहेत, काही नुसतेच उभे आहेत. “आम्ही जमीन खणतो, इथली झुडपं उपटतो. ही जमीन सपाट करून आम्ही ही झाडं  लावलीत. आता दिवसाला दोनदा पाणी घालतो.”, अक्कावाली खेड्यातून आलेली धर्माबाई सांगते.

Child _Migrant women at work in Gurgaon

या सगळ्या घोळक्यात क्रिश हा एकच लहान मुलगा आहे. त्याची आई ज्योती १८-१९ वर्षांचीच (किशोरवयीनच) असेल. फोटो काढताना होणाऱ्या त्याच्या गमती जमती पाहून छोट्या सुटीमध्ये विश्रांती घेत बसलेल्या बायका हसताहेत. त्यांच्यातलीच एक, बबलीबाई, इतरांचं हसणं थांबवत ठामपणे म्हणते, “आम्ही काम करत असताना तुम्ही आमचे फोटो काढायला हवेत.” ती क्रिशची तरुण आजी आहे.

Migrant women at work in Gurgaon_woman

दुसरी एक तरुण बाई सांगते की मला गावी ठेऊन आलेल्या माझ्या दोन मुलांची आठवण येते. “माझे सासूसासरे त्यांची काळजी घेताहेत”, ती सांगते. गावातही काम आहे पण सगळ्यांना पुरेल इतकं नाही. प्रत्येक कुटुंबातील काही जण गावी राहतात तर काही वाढत्या शहरी भागात कामासाठी येतात.

Migrant women at work in Gurgaon

“आम्हाला इथे निदान काम तरी मिळतं,” लच्छोबाई म्हणते. तिचे तरुण मुलगे गावातच आहेत. “ते तिथे काम करतात आणि आम्ही इथे. आम्ही कामाशिवाय जगूच शकत नाही.”

सध्या ते कुठे राहताहेत? मागेच उभारलेल्या, प्लास्टिकच्या चादरीची छतं असलेल्या बांबूच्या मांडवाकडे लच्छोबाई बोट दाखवते. पण इथे स्वयंपाक करता येत नाही. “ठेकेदार आम्हाला दिवसातून दोनदा, जेवणाची पाकिटं देतो – डाळ, भाजी आणि चपात्या,” ती सांगते. त्यांनी स्वयंपाकात वेळ घालवू नये म्हणून किंवा या बांबूच्या तात्पुरत्या निवाऱ्यांचं घरात रुपांतर होऊ नये आणि त्यांनी इथे शहराजवळ स्थाईक होऊ नये म्हणूनही ही सोय असेल.

Migrant women at work in Gurgaon_tent

त्यांची छोटी सुटी संपली आणि सगळ्याजणी रांगेने आपापल्या हिरव्या प्लास्टिकच्या झाऱ्या भरायला एका सिमेंटच्या गोल हौदाकडे गेल्या. जवळच्याच एका जोहड मधून (मुद्दाम तयार केलेलं तळं) टँकर भरून हौदात पाणी आणलं जातं. बोअरचं पाणी या जोहडमध्ये पडतं.  हे तळं एरवी गुरांना पाणी पिण्यासाठी वापरलं जातं.

Migrant women at work in Gurgaon

हे सगळे स्त्री-पुरुष फतेहाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून स्थलांतरित झालेले शेतमजूर आहेत. काही जण डोहना तालुक्यातील अक्कावली आणि भट्टू या गावांतील आहेत तर काहीजण रतिया तालुक्यातील जल्लोपूर गावातील.

Migrant women at work in Gurgaon_man having hukka

ते सगळे काम करत असताना त्यांचा ठेकेदार एका चटईवर चादर अंथरून बनवलेल्या बैठकीवर बसून पितळेचा चकचकीत हुक्का ओढत होता. त्याचं नाव आहे नंदकिशोर आणि तो हिसार जिल्ह्यातील बर्बला तालुक्यातील खर्कदा गावाचा रहिवासी आहे.

हे मजूर राजपूत आहेत आणि राजपुताना ही राजस्थानी बोली बोलतात. फाळणीच्या काळात त्यांची कुटुंबं बिकानेरच्या भारत-पाक सीमेवरील गावांमधून इथे हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात स्थलांतरित झाली. तेव्हापासून ते फतेहाबादचे रहिवासी आहेत; आणि आता ते गुडगावच्या सीमेवर घाटागावमध्ये बिनदरवाजाच्या, चूल नसलेल्या खोल्यातून  राहत आहेत - जमिनी सपाट करत आणि मोठे मनोरे उभारत. त्यांना भविष्याबद्दल विचारलं तर ते खांदे उडवत म्हणतात, “आम्ही कदाचित आमच्या खेड्याकडे जाऊही. नाहीतर मग इथेच एखादं काम पाहू – बांधकामाच्या साईटवर किंवा घरकामाचं.”

कोणालाच खात्री देता येत नाही.

Migrant women at work in Gurgaon_poster


मराठी अनुवाद: छाया देव

ಬರಹಗಾರ್ತಿಯೂ, ಅನುವಾದಕರೂ ಆದ ನಮಿತ ವಾಯ್ಕರ್ ‘ಪರಿ’ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಸಂಪಾದಕಿಯಾಗಿ ಕಾರ್ಯ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ‘ದ ಲಾಂಗ್ ಮಾರ್ಚ್’ ಎಂಬ ಇವರ ಕಾದಂಬರಿಯು 2018 ರಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಗೊಂಡಿದೆ.

Other stories by Namita Waikar
Translator : Chhaya Deo

Chhaya Deo is a Nashik based activist of Shixan Bazaarikaran Virodhi Manch, a group working against commercialisation of education and for quality education which is a constitutional right of Indian citizens. she writes and also does translation work.

Other stories by Chhaya Deo