गादीच्या वरच्या दुसऱ्या फडताळातून तिच्या मुलीने एक जुनं पुस्तक काढलं. या भागातल्या मुलांसाठी दिवसा शाळा आणि रात्री निवारा चालवणाऱ्या संस्थेतल्या एका बाईंनी तिला ते पुस्तक दिलं होतं. या मुलीला वाचायला आवडतं हे त्यांना लक्षात आल्यावर त्यांनी तिला वाचण्यासाठी पुस्तक दिलं होतं. “माँ, मी तुला गोष्ट वाचून दाखवू?” नऊ वर्षांची पिंकी आपल्या आईशेजारी बदली, आपलं फाटकं तुटकं पुस्तक हातात घट्ट पकडून, आईच्या होकाराची वाट पाहण्याआधीच तिनी तिची आवडती गोष्ट वाचायला सुरुवात केली होती, दि पेपरबॅग प्रिन्सेस.

कोंदट वास येणाऱ्या, गठुडी झालेल्या ज्या गादीवर पिंकी आईबरोबर पहुडली होती, त्या गादीने त्या रहायच्या ती अख्खी खोली, पिंकीचं ‘घर’ व्यापलं होतं. आपल्या मुलांना घर मिळावं, खरं तर या जागेला घर तरी कसं म्हणावं? म्हणून सीताला दर महिन्याला ६,००० रुपये भाडं भरावं लागत होतं. त्या घराने ना सुरक्षा दिली ना ऊब. खरं तर घर मालकीण एचआयव्ही बाधित मुलींना हाकलून लावायची त्या थंडी सडक पेक्षा हे घरही फार काही वेगळं नव्हतं. सध्याच्या या नयी बिमारीच्या (कोविड-१९) दुष्ट काळाचाही तिच्यावर काही परिणाम झाला नाही. गेल्या आठवड्यात सीताच्या जवळच्या मैत्रिणीवर, रोशनीवर ही पाळी आली. आदल्या रात्री तिने रोशनीला रस्त्यावर निजलेलं पाहिलं होतं. ती आताशा दुर्मिळ झालेल्या गिऱ्हाइकाची वाट बघत समोरच्या फूटपाथवर ताटकळत उभी होती. आणि एका चुटकीत ती वर्तमानात आली. पेपरबॅग प्रिन्सेस राजकुमाराची सुटका करण्यासाठी ड्रॅगनच्या मागे लागली होती, आणि तिच्या लेकीचा एकसुरी आवाज कानावर येत होता. त्या नकोशा राजकुमाराची भेट व्हायला अजून वेळ होता, त्यामुळे सीता परत आपल्या विचारांच्या दुनियेत गढून गेली.

आपल्या १५ वर्षांच्या मुलाबद्दल ती उगाचच विचार करत बसली. त्याची काळजी करत रात्री जागून काढणे किंवा त्याचा शोध घेत पोलिस स्टेशन ते रेल्वे स्टेशनच्या वाऱ्या करायचे दिवस आता संपले होते. काहीही न सांगता घर सोडून जाण्याची ही त्याची तिसरी वेळ होती. आणि या वेळ तो सगळ्यात जास्त काळ घराबाहेर राहिला होता. तब्बल एक आठवडा त्याने फोन देखील केला नव्हता. त्याचं मन किती चंचल आहे ते तिला माहित होतं, दैवाने त्याच्यासाठी मांडलेला डाव त्याला बिलकुल मान्य नाही, आणि या गल्लीचे तिरस्काराने भरलेले कटाक्ष सारून उंच भराऱ्या घेण्याची त्याच्या आतली ऊर्मी हे सगळं ती जाणून होती. २० वर्षांपूर्वीच्या रेल्वे प्रवासाचं तिकीट तिने आजही शेल्फातल्या प्लास्टिकच्या पिशवीत जपून ठेवलं होतं. तेव्हा ती फक्त १२ वर्षांची तर होती...

पिंकीची गोष्ट वाचून झाली होती...

सुधन्वा देशपांडेंच्या आवाजात ही कविता ऐका

Sex workers in Kamathipura have been struggling to give their children a life of dignity. Here is a poem inspired by two stories about the realities faced by these women caught in a pandemic of misery
PHOTO • Aakanksha

कामाठीपुरा

आजकाल आभाळही येतं
चार बाय सहाच्या खोक्यात कोंबून
खजुराहोच्या तेलकट भिंतींवर
थंड करड्या रंगाची
हात-पाय नसलेली धडं फडफडतात
गुदमरलेली आशा तरंगत राहते
दुर्लक्षित फडताळातल्या
धुळीने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये.

सरलेल्या काळाचा
सडका वास
इंच इंच करत
भेदून जातो
तिच्या छातीचा पिंजरा.

शरीरावरच्या जखमांचे
स्वतःच्या हाताने कशिदा केलेले
धातुवत त्वचेवरचे कोळशासारखे, करडे वण लेऊन,
ती बाहेर उभी असते
चांदण्याच्या दिशेने हात हलवत
एखादा रुप्याचा किरण स्पर्श करून सुखावून जाईल या आशेत
फॉकलंड रोडच्या काळोख्या, एकाकी फूटपाथवरती
आणि तिथे तिचा मुलगा
अनोळखी शहरांमध्ये
अंधाऱ्या सिमेंटच्या रस्त्यांवर
चतुरांचा माग काढतोय
आणि या कृष्ण धवल जगात
तिच्या मुलीला पडणारी स्वप्नं असतात
गोड गुलाबी

ध्वनीः सुधन्वा देशपांडे जन नाट्य मंचसोबत अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून काम करतात आणि ते लेफ्टवर्ड बुक्समध्ये संपादक आहेत.

ज्या गोष्टींवरून ही कविता स्फुरली त्या नक्की वाचाः इथे मुलींचं काय होतं ते सगळ्यांना माहितीये’ , पुन्हा पुन्हा, तीच ती, बिकट आणि खडतर वाट

अनुवादः मेधा काळे

Pratishtha Pandya

ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಪಾಂಡ್ಯ ಅವರು ಪರಿಯ ಹಿರಿಯ ಸಂಪಾದಕರು, ಇಲ್ಲಿ ಅವರು ಪರಿಯ ಸೃಜನಶೀಲ ಬರವಣಿಗೆ ವಿಭಾಗವನ್ನು ಮುನ್ನಡೆಸುತ್ತಾರೆ. ಅವರು ಪರಿಭಾಷಾ ತಂಡದ ಸದಸ್ಯರೂ ಹೌದು ಮತ್ತು ಗುಜರಾತಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಲೇಖನಗಳನ್ನು ಅನುವಾದಿಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಸಂಪಾದಿಸುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಗುಜರಾತಿ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಕವಿಯಾಗಿಯೂ ಗುರುತಿಸಿಕೊಂಡಿದ್ದು ಅವರ ಹಲವು ಕವಿತೆಗಳು ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗಿವೆ.

Other stories by Pratishtha Pandya
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale