“हा फोटोच माझं रक्षण करतो, माझी ताकद आहे तो,” अनंतपूर मंडलातल्या कुरुगुंटा गावच्या ३५ वर्षीय शेतकरी सी. अलिवेलम्मा म्हणतात. अलिवेलम्मांनी त्यांच्या पतीचा फोटो एटीएम कार्डासोबत छोट्या कव्हरमध्ये जपून ठेवला आहे. “आम्ही इथे न्याय मागण्यासाठी आलोय, जेणेकरून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.”

खंडाने शेती करणारे अलिवेलम्मांचे पती, सी. वेंकटरामुडु यांनी २०१३ साली भुईमुगात ठेवण्यासाठी वापरात असणाऱ्या रासायनिक गोळ्या खाऊन आत्महत्या केली. “त्यांनी मला सांगितलं होतं की कर्जाचा मोठा बोजा आहे आणि शेतीतून काहीच नफा निघत नाहीये. ते मला म्हणायचे, ‘सावकार पैशाबद्दल विचारतात. माझ्या छातीत धस्स होतं. काय करावं तेच कळत नाही. भुईमुगाच्या पेरणीसाठी तरी पैसा जमा होईल का नाही तेच कळंना गेलंय’.” भुईमूग लावू नका असं अलिवेलम्मा सतत त्यांना सांगायच्या पण त्यांचं एकच उत्तर असायचं, “जिथे हरपलंय, तिथेच शोधावं.”

C. Alivelamma
PHOTO • Rahul M.

“ते पैसा घालतात आणि गमवून बसतात,” अलिवेलम्मा त्यांच्या हयात नसलेल्या पतीविषयी वर्तमानकाळात बोलतात, कदाचित त्यांनी अजून त्यांचं जाणं स्वीकारलेलं नाही. त्यांच्या पतीची एक वही सोबत नेणं त्यांनी इतक्यात थांबवलंय. वेगवेगळ्या सावकारांची किती देणी आहेत ते त्यांचे पती या वहीत नोंदवून ठेवायचे

अलिवेलम्मा आता एका सामाजिक संस्थेने भाड्याने दिलेल्या आठ एकर रानात खंडाने शेती करतात. आयटीआयमध्ये शिकणाऱ्या मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांचं शेत समूह शेतीचा हिस्सा आहे आणि ते कसणाऱ्या काही विधवा आहेत किंवा त्यांचे नवरे त्यांना सोडून निघून गेले आहेत.

मी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी अलिवेलम्मांना रामलीला मैदानात भेटलो. त्या म्हणतात, “आम्ही इथे न्याय मागण्यासाठी आलोय, जेणेकरून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.”

अनुवादः मेधा काळे

Rahul M.

2017 ರ 'ಪರಿ' ಫೆಲೋ ಆಗಿರುವ ರಾಹುಲ್ ಎಮ್. ಅನಂತಪುರ, ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶ ಮೂಲದ ಪತ್ರಕರ್ತರಾಗಿದ್ದಾರೆ.

Other stories by Rahul M.
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale