सुधीर कोसरे जरा अवघडून खाटेवर बसतो आणि अंगावरच्या जखमा दाखवू लागतो. उजव्या पायावरची खोल जखम, मांडीवर कापल्यासारखी झालेली जवळपास पाच सेंमी लांब जखम, उजव्या दंडावर खालच्या बाजूला चवताळलेल्या प्राण्याने घेतलेल्या चाव्याच्या खुणा. या जखमेला टाके घालावे लागले होते. शिवाय शरीरभर कुठे ना कुठे खरचटलेलं आणि लागलेलं.

सुधीरभाऊच्या घरी आम्ही बोलत होतो. दोन खोल्यांचं, विटा-मातीचं, बिनगिलाव्याचं साधंसं घर. तो या हल्ल्याने पुरता हादरून गेलाय. आणि तितकंच नाही त्याला असह्य वेदना होतायत, अस्वस्थ होता तो. त्याची पत्नी, आई आणि भाऊ शेजारीच बसलेले होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. मोठी ओढ दिल्यानंतर, लोकांची चिंता वाढवल्यानंतर पाऊस मनसोक्त बरसत होता.

२ जुलै २०२३. शेतात मजुरीसाठी गेलेल्या ३० वर्षीय सुधीरवर एका दांडग्या आणि चवताळलेल्या रानडुकराने हल्ला केला. गाडी लोहार या इतर मागासवर्गीय समाजाचा सुधीरभाऊ भूमीहीन शेतमजूर आहे. बारीक पण काटक शरीरयष्टी असलेला सुधीर या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला. नशीब म्हणजे छाती आणि चेहरा वाचला, ते सांगतात.

आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यात कावठी या गावी त्याला भेटलो. जगाच्या नजरेपासून लांब, हे गाव इथल्या घनदाट वनांमध्ये लपलेलं आहे. ८ जुलै रोजी संध्याकाळी आम्ही तिथे पोचलो तेव्हा नुकताच तो दवाखान्यातला मुक्काम संपवून घरी आला होता.

तो सांगतो की त्याने आरडाओरडा सुरू केला आणि बरोबर काम करणाऱ्या एका मजुराने त्याचा आवाज ऐकून त्याच्याकडे धाव घेतली. क्षणभर स्वतःच्या सुरक्षेचा विचार बाजूला ठेवत त्यानी त्या रानडुकरावर दगड भिरकावायला सुरुवात केली.

बहुधा ती रानडुकराची मादी असावी. सुधीरबाऊ जमिनीवर पडला होता आणि ती आपल्या शिंगाने त्याच्यावर हल्ला करत होती. भरून आलेल्या आभाळाकडे पाहत सुधीर पडून राहिला होता. भीतीने थिजून गेला होता. “ते दूर जायचं आणि परत हल्ला करायचं. आपलं लांब शिंग अंगात घुसवायचं,” सुधीर सांगतो. त्याची पत्नी दर्शना हे ऐकून काही तरी पुटपुटते. आपल्या नवऱ्याचा साक्षात मृत्यूशी सामना झालाय हे ती ओळखून आहे.

नंतर ते रानडुकर तिथल्या झुडपात पसार झालं. पण तोपर्यंत सुधीर गंभीररित्या जखमी झाला होता.

Sudhir Kosare recuperating from a wild boar attack that happened in July 2023. H e is with his wife, Darshana, and mother, Shashikala, in his house in Kawathi village of Saoli tehsil . Sudhir suffered many injuries including a deep gash (right) in his right foot.
PHOTO • Jaideep Hardikar
Sudhir Kosare recuperating from a wild boar attack that happened in July 2023. H e is with his wife, Darshana, and mother, Shashikala, in his house in Kawathi village of Saoli tehsil . Sudhir suffered many injuries including a deep gash (right) in his right foot
PHOTO • Jaideep Hardikar

जुलै २०२३ मध्ये झालेल्या रानडुकराच्या हल्ल्यातून बचावलेला सुधीर कोसरे. सावली तालुक्यातल्या कावठीत घरी आई शशिकला आणि पत्नी दर्शना यांच्यासोबत. सुधीरभाऊच्या अंगावर कित्येक जखमा आहेत आणि उजव्या पायावर मोठी खोल जखम आहे

त्या दिवशी सुधीर ज्या रानात काम करत होता तिथे अगदी हलकाच पाऊस झाला होता. दोन आठवड्यांनी रखडलेल्या पेरण्या अखेर सुरू झाल्या होत्या. जंगलाच्या बाजूला असलेली बांधबंदिस्ती करण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी ४०० रुपये मजुरी मिळणार होती. शेतात अशीच बाकी कामं करून तो आपलं पोट भरतो. गावातल्या इतरांप्रमाणे पोटासाठी स्थलांतर करून दूरदेशी जाण्यापेक्षा अशी कामं निघण्याची वाट पाहतो.

जखमी सुधीरवर सावलीच्या सरकारी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर ३० किमीवरच्या गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे टाके घालण्यात आले आणि सहा दिवस रुग्णालयातच भरती करण्यात आलं.

कावठी चंद्रपूर जिल्ह्यात आहे, पण इथून चंद्रपूर शहरापेक्षा गडचिरोली जास्त जवळ आहे. चंद्रपूर इथून ७० किलोमीटरवर आहे. रेबीजची पुढची इंजेक्शन घेण्यासाठी आणि जखमेची मलमपट्टी करण्यासाठी त्यांना सावलीच्या कुटिर रुग्णालयात जावं लागणार आहे.

शेतीमधली जोखीम या विषयाची चर्चा करत असताना आता सुधीर यांच्यावर झालेल्या रानडुकराच्या हल्ल्याचाही विचार करावा लागेल. शेतमालाच्या भावातले चढउतार, लहरी वातावरण आणि इतर अनेक कारणांमुळे शेती करणं जोखमीचं झालं आहेच. पण इथे चंद्रपूरमध्ये आणि संरक्षित अभयारण्य आणि इतर वनक्षेत्रात शेती करणं आता वेगळ्या अर्थाने जीवघेणं ठरायला लागलं आहे.

जंगली श्वापदं येऊन पिकं खातायत, राखणीसाठी शेतकरी रात्री जागून काढतायत, त्यांना हाकलून लावण्यासाठी भन्नाट क्लृप्त्या करतायत. इतकं सगळं केल्यानंतर कदाचित चार पैसे हातात येण्याची शक्यता आहे. वाचाः ‘हा एक नवीन प्रकारचा दुष्काळच आहे’

ऑगस्ट २०२२ आणि खरं तर त्या आधीपासूनच मी वाघ, बिबट्या आणि इतर जंगली जनावरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक शेतकऱ्यांना, शेतमजुरांना भेटलो आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही. मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, भद्रावती, वरोरा आणि चिमूर ही वनक्षेत्रात येणारी तसंच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातली गावं आहेत. वन्यजीव-मानव संघर्षाचा खासकरून वाघाच्या संदर्भात या विषयाचा मागोवा गेल्या दोन दशकांपासून घेतला जात आहे.

Farms bordering the Tadoba Andhari Tiger Reserve (TATR) in Chandrapur district where w ild animals often visit and attack
PHOTO • Jaideep Hardikar

चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वेशीवर असलेल्या शेतांमध्ये जंगली जनावरांची कायम येजा असते, आणि हल्लेही होत असतात

गेल्या वर्षी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात ५३ जणांचा जीव गेला. त्यातले ३० सावली आणि सिंदेवाही पट्ट्यातले आहेत असं मी गोळा केलेल्या वनविभागाच्या आकडेवारीतून दिसून येतं. अर्थातच हा पट्टा मानव-वाघ संघर्षाचा केंद्रबिंदू झाला आहे.

जीवहानी आणि इजांपलिकडे जाऊन ताडोबा प्रकल्प क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये भीतीचं गडद सावट असल्याचं जाणवत राहतं. शेतीवर काय परिणाम होतोय ते लगेच कळून येतंय. शेतकरी आता रब्बीचं पीक घेईनासे झालेतय रानडुकरं, हरणं आणि नीलगायींपासून काहीही वाचत नाही हाच त्यांचा अलिकडचा अनुभव आहे.

सुधीरभाऊ वाचला हेच त्याचं नशीब. त्याच्यावर वाघाने नाही तर रानडुकराने हल्ला केला म्हणून. वाचाः खोलदोड्यातल्या रानात मचाणावरची जागली

*****

२०२२ चा ऑगस्ट महिना. पावसाळ्यातली दुपार. वीस वर्षांचा भाविक झरकर सोबतच्या मजुरांसोबत रानात भाताची लावणी करत होता. तेवढ्यात त्याच्या वडलांच्या मित्राचा, वसंत पिपरखेडे यांचा त्याला फोन आला.

पिपरखेडेंना भाविकला सांगितलं की त्याच्या वडलांवर भक्तादांवर काहीच क्षणापूर्वी वाघाने हल्ला केला होता. भक्तादा जागीच गतप्राण झाले आणि वाघाने त्यांना जंगलात ओढत नेलं.

ते आणि त्यांचे तीन साथीदार जंगलाला लागून असलेल्या शेतात काम करत होते. तितक्यात अचानक वाघाने झडप घातली आणि ओणवं काम करत असलेल्या भक्तादांवर मागून हल्ला केला. कदाचित शिकार समजून त्यांनी त्यांची मानच धरली.

“वाघ त्यांना ओढत झुडपात घेऊन गेला. आम्ही फक्त बघत राहिलो, काही करू शकलो नाही,” पिपरखेडे सांगतात. तो सगळा भयंकर प्रसंग त्यांच्या मनातून जात नाही आणि अपराधीपणाची भावनाही.

“आम्ही खूप आरडाओरडा केला,” तिथेच रानात काम करत असलेले त्या हल्ल्याचे साक्षीदार असलेले संजय राऊत सांगतात. “पण तोपर्यंत वाघाने भक्तादांची मान धरली होती.”

त्यांच्या जागी आम्हीही असू शकलो असतो, दोघं म्हणतात.

In Hirapur village, 45-year old Bhaktada Zarkar fell prey to the growing tiger-man conflict in and around TATR. His children (left) Bhavik and Ragini recount the gory details of their father's death. The victim’s friends (right), Sanjay Raut and Vasant Piparkhede, were witness to the incident. ' We could do nothing other than watching the tiger drag our friend into the shrubs,' says Piparkhede
PHOTO • Jaideep Hardikar
In Hirapur village, 45-year old Bhaktada Zarkar fell prey to the growing tiger-man conflict in and around TATR. His children (left) Bhavik and Ragini recount the gory details of their father's death. The victim’s friends (right), Sanjay Raut and Vasant Piparkhede, were witness to the incident. ' We could do nothing other than watching the tiger drag our friend into the shrubs,' says Piparkhede.
PHOTO • Jaideep Hardikar

हिरापूर गावात, ४५ वर्षीय भक्तादा झरकर वाघाच्या हल्ल्यात बळी पडले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाचे ते आणखी एक बळी. त्यांची मुलं (डावीकडे) भाविक आणि रागिणी आपल्या वडलांवर झालेल्या भयंकर हल्ल्याचे तपशील सांगतात. या हल्ल्याचे साक्षीदार त्यांच्या वडलांचे मित्र संजय राऊत आणि वसंत पिपरखेडे. ‘वाघ त्यांना ओढत झुडपात घेऊन गेला. आम्ही फक्त बघत राहिलो, काही करू शकलो नाही’, पिपरखेडे सांगतात

अनेक दिवस या भागात वाघ फिरत होताच पण शेतात त्याच्याशी गाठ पडेल असं काही त्यांच्या मनात आलं नव्हतं. भक्तादा या गावातले वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेले पहिलेच. पूर्वी लोकांची गायीगुरं, शेरडं वाघाने नेली होती. सावली आणि आसपासच्या गावांमध्ये मात्र गेल्या वीस वर्षांपासून प्राण्यांच्या हल्ल्यात माणसांचे बळी गेले आहेत.

“मी थिजून गेलो,” हिरापूर गावी भाविक त्याच्या घरी आम्हाला सांगतो. सुधीर यांच्या गावापासून हे गाव फार दूर नाही. त्याची बहीण, १८ वर्षांची रागिणी त्याच्या शेजारी बसली होती. ही बातमी म्हणजे मोठा धक्काच होता. तो सांगतो की भक्तादांना असं मरण आलंय यावर घरच्यांचा अजूनही विश्वास बसत नाहीये.

आता घराची सगळी मदार या भावा-बहिणीवर आहे. आम्ही गेलो तेव्हा त्यांची आई लताबाई घरी नव्हत्या. “ती अजून धक्क्यातून सावरली नाहीये,” रागिणी सांगते. “आमच्या बाबांना वाघाच्या हल्ल्यात मरण आलं हे अजून पचनी पडत नाही,” ती म्हणते.

अख्ख्या गावावर भीतीचं सावट आहे. इथले शेतकरी म्हणतात, “आजही, एकटं कुणीच बाहेर निघत नाहीये.”

*****

सागाचे उंच वृक्ष, बांबूची बेटं आणि त्यात अधेमधे भाताची खाचरं असा भवताल. आयताकृती नक्षी असावी असं हे चित्र भासतं. खाचरात पाणी अडवण्यासाठी घातलेल्या बांधांनी असं चित्र तयार झालंय. जैवविविधतेचा विचार केला तर चंद्रपूरमधला हा सर्वात समृद्ध प्रांत आहे.

सावली आणि सिंदेवाही ताडोबा अभयारण्याच्या दक्षिणेला आहेत आणि व्याघ्र संवर्धनाच्या कामाला आता इथे यश मिळू लागलं आहे. २०१८ साली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ९७ वाघांची नोंद झाली होती आणि २०२२ साली ती संख्या ११२ झाल्याचं स्टेटस ऑफ टायगर कोप्रीडेटर्स या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या २०२३ साली प्रकाशित झालेल्या अहवालात नमूद केलं आहे.

Women farmers of Hirapur still fear going to the farms. 'Even today [a year after Bhaktada’s death in a tiger attack] , no one goes out alone,' they say
PHOTO • Jaideep Hardikar
Women farmers of Hirapur still fear going to the farms. 'Even today [a year after Bhaktada’s death in a tiger attack] , no one goes out alone,' they say
PHOTO • Jaideep Hardikar

हिरापूरच्या शेतकरी बाया आजही शेतात जायला बिचकतायत. वाघाच्या हल्ल्यात भक्तादा मारले गेले त्याला वर्ष झालं ‘पण आजही एकट्याने कुणी बाहेर निघत नाही,’ त्या सांगतात

अनेक जण संरक्षित क्षेत्राबाहेर राहतात, या वनांमध्ये अधून मधून मानवी वस्ती आढळते. आताशा संरक्षित वनांमधून बाहेर पडून दाट मानववस्तीत शिरणाऱ्या वाघ-बिबट्यासारख्या प्राण्यांची संख्या वाढत चालली आहे. वाघाचे सर्वात जास्त हल्ले बफर झोन आणि आसपासच्या क्षेत्रात झाले आहेत. याचाच अर्थ काही वाघ आता संरक्षित क्षेत्राच्या बाहेर पडू लागले आहेत.

सगळ्यात जास्त हल्ले वनांमध्ये, त्यानंतर शेतात आणि विरळत गेलेल्या वनांमध्ये झाले आहेत. ईशान्येकडे प्राण्यांचा संचार असलेला पट्टा आहे, त्याद्वारे संरक्षित क्षेत्र, बफर झोन आणि काही विखुरलेली वनं जोडली गेली आहेत. हल्ल्यांच्या संख्येचा विचार केला तर हा भाग तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात २०१३ साली झालेल्या एका अभ्यासात आढळून आलं आहे.

व्याघ्र संवर्धनाची मोहिमेने अगदी कळस गाठला आणि त्याचाच विपरित परिपाक म्हणजे मानव-व्याघ्र संघर्ष. अलिकडेच, जुलै २०२३ मध्ये पार पडलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना असं सांगितलं की सरकारने गोंदियातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पूर्ण वाढ झालेले दोन वाघ हलवले आहेत. आणि ज्या वनांमध्ये जागा आहे तिथे आणखी काही वाघांना हलवण्याचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्याच उत्तरात त्यांनी असंही सांगितलं की वाघाच्या हल्ल्यात जीवितहानी किंवा अपंगत्व आल्यास, गाईगुरं मरण पावल्यास किंवा पिकांची नुकसानी झाल्यास देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईतही वाढ केली जाईल. सरकारने अशा हल्ल्यात प्राण गमावल्यास कुटुंबाला २० लाखाऐवजी २५ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. पण पिकांची नासधूस किंवा गुरांचा जीव गेल्यास देण्यात येणाऱ्या रक्कमेत मात्र कसलीच वाढ करण्यात आलेली नाही. पिकांसाठी जास्तीत जास्त २५,००० रुपये आणि गाईगुरं गेल्यास ५०,००० रुपये देण्यात येतात.

नजीकच्या भविष्यात तरी या संकटावर कसलाही उपाय दिसेनासा झाला आहे.

Tiger attacks are most numerous in forests and fields in the buffer zone and surrounding landscape, suggesting that some tigers are moving out of TATR
PHOTO • Jaideep Hardikar

वाघांचे सर्वात जास्त हल्ले बफर झोन आणि आजूबाजूच्या क्षेत्रात झाले असल्याने वाघ ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या बाहेर पडत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे

“भारताच्या मध्य प्रांतात असलेल्या महाराष्ट्रातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गेल्या दोन दशकांमध्ये माणसांवर मांसभक्षी प्राण्यांच्या हल्ल्यांची तीव्रता अचानक वाढली आहे,” असं ताडोबा-अंधारीमध्ये केलेल्या एका सविस्तर अभ्यासात नोंदवण्यात आलं आहे.

२००५-२०११ या काळात झालेल्या या अभ्यासामध्ये “ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ आणि बिबट्याचे माणसांवर झालेले हल्ले, त्यांचे मानवी आणि परिसिस्थितिकीय पैलू तपासून माणूस आणि मोठ्या मांसभक्षी प्राण्यांमधल्या संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी शिफारशी करण्यात आल्या आहेत.” एकूण १३२ हल्ले झाले असून त्यातले ७८ टक्के वाघाने केले असून २२ टक्के बिबट्याचे हल्ले आहेत.

“लक्षणीय बाब अशी की इतर हालचालींच्या तुलनेत सर्वात जास्त हल्ले गौण वनोपज गोळा करताना झालेले दिसतात,” असं हा अभ्यास नोंदवतो. वनं आणि इथल्या गावांपासून दूर असल्यास हल्ल्यांची शक्यता कमी कमी होत जाते. ताडोबा-अंधारी प्रकल्पाजवळ माणसाचा वावर कमी आणि नियंत्रित केला जावा जेणेकरून मानवी जीव वाचतील आणि इतर संघर्ष टाळता येईल असा निष्कर्ष या अभ्यासाने काढला आहे. तसंच जळणासाठी पर्यायी व्यवस्था (उदाहरणार्थ सौरऊर्जा आणि बायोगॅस) उपलब्ध करून दिल्यास त्यासाठी संरक्षित वनांमध्ये जाण्याची गरज उरणार नाही.

प्रकल्पाच्या बाहेर पडत असलेले मांसभक्षी प्राणी आणि मानवी वस्ती जास्त असलेल्या भागात जंगली भक्ष्याचा तुटवडा यामुळे वाघांच्या हल्ल्यात वाढ होत असण्याची शक्यता आहे.

पण अलिकडच्या वर्षांमध्ये मात्र केवळ जंगलातून काही आणत असताना किंवा गुरं चारत असतानाच नाही तर शेतात काम करत असताना वाघाचे हल्ले वाढले आहेत. वन्य प्राणी, खासकरून तृणभक्षी प्राणी पिकांची नासाडी करतायत आणि चंद्रपूरमधल्या शेतकऱ्यांसाठी ही तर मोठी डोकेदुखीच ठरतीये. पण त्याच सोबत ताडोबा-अंधारीच्या जवळच्या परिसरात वाघ आणि बिबट्याचे शेतात किंवा वनांच्या वेशीवरचे हल्ले प्रचंड वाढले असून त्यापासून सुटका मिळण्याचा मार्ग मात्र दिसत नाही.

या भागामध्ये भ्रमंती करत असताना एक लक्षात येतं की वाघांचे हल्ले ही लोकांची सगळ्यात मोठी तक्रार आहे. आणि याचे दूरगामी परिणाम आहेत. पुणे स्थित वन्यजीवशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वाटवे म्हणतात की या सर्व घटनांचे भारताच्या व्याघ्र संवर्धन कार्यक्रमावरही परिणाम होऊ शकतात. जर अशा हल्ल्यांमुळे लोक जंगली प्राण्यांच्या विरोधात उभे राहिले, आणि त्यात काही वावगं नाही, तर संरक्षित वनांबाहेर वन्यजीव सुरक्षित कसे राहू शकतील?

Villagers at a tea stall (left) n ear Chandli Bk. village. This stall runs from 10 in the morning and shuts before late evening in fear of the tiger and wild boar attacks. These incidents severely affect farm operations of the semi-pastoralist Kurmar community (right) who lose a t least 2-3 animals everyday
PHOTO • Jaideep Hardikar
Villagers at a tea stall (left) n ear Chandli Bk. village. This stall runs from 10 in the morning and shuts before late evening in fear of the tiger and wild boar attacks. These incidents severely affect farm operations of the semi-pastoralist Kurmar community (right) who lose a t least 2-3 animals everyday
PHOTO • Jaideep Hardikar

चांदली बु. गावापाशी चहाच्या टपरीपाशी उभे असलेले गावकरी. ही टपरी सकाळी १० वाजता सुरू होते आणि संध्याकाळी अंधाराच्या आत बंद होते कारण वाघ किंवा रानडुकराच्या हल्ल्याची भीती आहे. शेती आणि पशुपालन करणाऱ्या कुरमार समुदायाच्या जगण्यावर या हल्ल्यांचे गंभीर परिणाम झाले आहेत कारण दररोज २-३ जनावरं हल्ल्यात मारली जात आहेत

सध्याचं संकट काही एका वाघामुळे आलेलं नाही. या भागात एकाहून अधिक वाघ आहेत आणि भक्ष्य समजून ते माणसांवर हल्ले करत आहेत. ज्यांचे जिवलग अशा हल्ल्यांमध्ये दगावतात आणि ज्यांनी हे हल्ले पाहिले आहेत त्यांच्या मनावर कायमचा आघात होतो.

प्रशांत येलट्टीवार सावली तालुक्यातल्या चांदली बु. गावचे रहिवासी आहेत. हे गाव हिरापूरपासून ४० किमीवर आहे. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांची पत्नी स्वरुपा वाघाच्या हल्ल्यात बळी पडली. सोबतच्या पाच जणींनी तो भयंकर हल्ला पाहिला. वाघाने स्वरुपाताईंवर झेप घेतली आणि त्यांना ओढत जंगलात नेलं. १५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ च्या सुमारास हा सगळा प्रकार झाला.

“ती जाऊन सहा महिने झाले,” २०२३ मध्ये आम्ही येलट्टीवारांशी बोलत होतो. “काय झालं तेच समजून नाही राहिलं.”

येलट्टीवार कुटुंबाची एकरभर जमीन आहे. शेती करत ते दुसऱ्याच्या रानात मजुरीला जायचे. स्वरुपा आणि इतर काही जणी गावातल्याच एकाच्या रानात कापूस वेचायचं काम करत होत्या. भाताचं पीक घेणाऱ्या या भागात कापूस तसा नवाच आहे. गावाजवळच्या या शेतात वाघाने स्वरुपाताईंवर उडी मारली आणि जंगलात अर्धा किमी आतपर्यंत त्यांना ओढून घेऊन गेला. हल्ला झाल्यानंतर काही तासांनी वनखात्याचे अधिकारी आणि सुरक्षारक्षकांच्या मदतीने गावकऱ्यांनी त्यांचा जखमी झालेला मृतदेह परत आणला. या भागात वाघाच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या यादीत स्वरुपांची भर पडली.

“वाघाला घाबरवण्यासाठी आम्हाला खूप आवाज करावा लागला. थाळ्या बडवल्या, ढोल वाजवले,” विस्तारी अल्लुरवार सांगतात. स्वरुपाताईंचा मृतदेह आणायला जंगलात गेलेल्यांमध्ये त्याही होत्या.

“आम्ही सगळा प्रकार पाहून हादरून गेलो होतो,” येलट्टीवारांचे शेजारी मारुती पाडेवार सांगतात. त्यांची सहा एकर शेती आहे. या सगळ्याचा परिणाम काय? “गावावर भीतीचं सावट आहे,” ते सांगतात.

Prashant Yelattiwar (left) is still to come to terms with his wife Swarupa’s death in a tiger attack in December 2022. Right: Swarupa’s mother Sayatribai, sister-in-law Nandtai Yelattiwar, and niece Aachal. Prashant got Rs. 20 lakh as compensation for his wife’s death
PHOTO • Jaideep Hardikar
Prashant Yelattiwar (left) is still to come to terms with his wife Swarupa’s death in a tiger attack in December 2022. Right: Swarupa’s mother Sayatribai, sister-in-law Nandtai Yelattiwar, and niece Aachal. Prashant got Rs. 20 lakh as compensation for his wife’s death
PHOTO • Jaideep Hardikar

प्रशांत येलट्टीवार (डावीकडे) यांच्या पत्नी स्वरुपा डिसेंबर २०२२ मध्ये वाघाच्या हल्ल्यात मरण पावल्या. प्रशांतभाऊ त्यातून अजून सावरलेले नाहीत. उजवीकडेः स्वरुपाताईंची आई, सायत्रीबाई आणि जाऊ नंदाताई येलट्टीवार आणि पुतणी आंचल. प्रशांत यांना पत्नीच्या मृत्यूची नुकसान भरपाई म्हणून २० लाख रुपये मिळाले

लोकांमध्ये संताप होता. वनखात्याने नरभक्षी वाघांना पकडावं किंवा संपवावं आणि गावकऱ्यांची सुटका करावी अशी त्यांची मागणी होती. पण काही काळाने सगळं प्रकरण निवळलं.

स्वरुपाताई गेल्यापासून प्रशांत कामासाठी घराबाहेर पडूच शकले नाहीयेत. आजही वाघ गावाच्या वेशीपाशी येऊन जातो, ते सांगतात.

“आठवड्याखाली आमच्या रानात वाघ पाहिला,” दिड्डी जगलू बड्डमवार, वय ४९ सांगतात. त्यांची सात एकर शेती आहे. “आम्ही परत काही शेतात काम करायला गेलो नाही,” ते सांगतात. जुलै महिन्याची सुरुवात होती आणि चांगला पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरुवात झाली होती. “हा प्रकार झाला, रब्बीच्या पेरण्याच कुणी केल्या नाहीत.”

प्रशांत येलट्टीवारांना पत्नीच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळाली पण त्यांची पत्नी परत येणार आहे का, ते म्हणतात. एक मुलगा आणि मुलगी आईविना पोरकी झाली.

*****

२०२३ सालातही हल्ल्यांचं सत्र सुरूच आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शेतांमध्ये वाघ आणि रानडुकरांचे जीवघेणे हल्ले सुरूच आहेत.

महिन्याभरापूर्वी (२५ ऑगस्ट, २०२३) साठीच्या लक्ष्मीबाई कन्नाके या आदिवासी शेतकरी वाघाच्या हल्ल्यात बळी पडल्या. त्याचं गाव टेकाडी भद्रावती तालुक्यात येणाऱ्या ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या वेशीवर आहे. या घनदाट अभयारण्यात जाण्यासाठी ज्या मोहरालीमधून प्रवेश करावा लागतो, तिथून जवळच.

हल्ला झाला त्या दिवशी संध्याकाळी त्या इरई धरणाच्या जलाशयाला लागून असलेल्या आपल्या शेतात सुनेबरोबर काम करत होत्या. संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सूनबाईला, सुलोचना यांना लक्ष्मीबाईंच्या मागे वाघ दबा धरून बसलेला दिसला. उंच वाढलेल्या गवतातून तो दबकत पुढे सरकत होता. आपल्या सासूला इशारा करण्याआधीच वाघाने त्यांच्यावर झेप घेतली, मान तोंडात पकडून त्यांनी लक्ष्मीबाईंना धरणाच्या पाण्यात ओढत नेलं. सुलोचना कशाबशा सुरक्षित ठिकाणी धावत गेल्या आणि लोकांना गोळा करून शेतात पोचल्या. अनेक तासांनंतर लक्ष्मीबाईंचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

Farmer Ramram Kannane (left) with the framed photo of his late wife Laxmibai who was killed in a tiger attack in Tekadi village in August 25, 2023. Tekadi is on the fringe of TATR in Bhadrawati tehsil , close to the famous Moharli range
PHOTO • Sudarshan Sakharkar
Farmer Ramram Kannane (left) with the framed photo of his late wife Laxmibai who was killed in a tiger attack in Tekadi village in August 25, 2023. Tekadi is on the fringe of TATR in Bhadrawati tehsil , close to the famous Moharli range
PHOTO • Sudarshan Sakharkar

रामराव कन्नाके (डावीकडे) यांच्या पत्नी लक्ष्मीबाई कन्नाके (तसबिरीत) २५ ऑगस्ट २०२३ रोजी टेकाडी गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात मरण पावल्या. हे गाव भद्रावती तालुक्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वेशीवर असून सुप्रसिद्ध मोहराली डोंगररांगांजवळ आहे

वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्मीबाईंच्या अंत्यसंस्कारासाठी तातडीने ५०,००० रुपये देऊ केले आणि लक्ष्मीबाईंचे पती ७४ वर्षीय रामराव कन्नाके यांना २५ लाख रुपये वाढीव नुकसान भरपाईही दिली. गावातील लोकांचा रोष वाढू नये आणि त्यातून काही आंदोलन उभं राहू नये याचीच जणू काही खबरदारी घेण्यात आली.

टेकाडीमध्ये वनखात्याचे अनेक सुरक्षारक्षक राखणीचं काम करतायत, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले आहेत. गावकरीही गटाने शेतात जातात, अख्ख्या गावावर भीतीचं सावट आहे.

याच तालुक्यात आमची भेट २० वर्षीय मनोज नीळकंठ खेरेशी झाली. २० वर्षांचा हा तरुण पदवीचं दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेतोय. १ सप्टेंबर २०२३ रोजी रानडुकराच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यातून तो अजून बरा झालेला नाही.

“मी आमच्या वडलांच्या शेतात खुरपायच्या कामावर लक्ष ठेवायला गेलो होतो,” मनोज सांगतो. “मागून रानडुक्कर आलं आणि शिंगांनी माझ्यावर हल्ला केला.”

भद्रावती तालुक्यातल्या पिरली या गावी तो आपले मामा मंगेश असुतकर यांच्या घरी खाटेवर निजला होता. त्या हल्ल्याचे सगळे तपशील आजही त्याच्या मनात ताजे आहेत. “तीस सेकंदाचा खेळ होता सगळा,” तो सांगतो.

डुकराने त्याच्या डाव्या मांडीत शिंग घुसवलं. पोटरीचा इतक्या जोरात चावा घेतला की अख्खा स्नायू हाडापासून वेगळा झाला होता. पोटरी नीट करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलंय. हे उपचार म्हणजे या कुटुंबासाठी मोठा भुर्दंड ठरणार आहे. “नशीब की मी वाचलो,” तो म्हणतो. बाकी कुणी जखमी झालं नाही.

Manoj Nilkanth Khere (left) survived a wild boar attack in early September 2023, but sustained a grievous injury. The 20-year old was working on his father’s fields in Wadgaon village when 'a boar came running from behind and hit me with its tusks.' Farm hands have begun working in a group (right), with someone keeping vigil over the fields to spot lurking wild animals
PHOTO • Sudarshan Sakharkar
Manoj Nilkanth Khere (left) survived a wild boar attack in early September 2023, but sustained a grievous injury. The 20-year old was working on his father’s fields in Wadgaon village when 'a boar came running from behind and hit me with its tusks.' Farm hands have begun working in a group (right), with someone keeping vigil over the fields to spot lurking wild animals
PHOTO • Sudarshan Sakharkar

मनोज नीळकंठ खेरे (डावीकडे) सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या रानडुकराच्या हल्ल्यातून बचावला पण त्याच्या पायाला गंभर जखम झाली आहे. वडगाव गावात तो आपल्या वडलांच्या शेतात कामाला गेला होता आणि तेव्हाच ‘मागून रानडुक्कर आलं आणि शिंगांनी हल्ला केला.’ शेतमजूर आजकाल घोळक्याने कामाला जातात (उजवीकडे) आणि रानात कुणी जंगली श्वापद नाही ना यावर कुणी ना कुणी लक्ष ठेवून असतं

एकुलता एक मुलगा असलेला मनोज चांगला धट्टाकट्टा आहे. त्याचं गाव वडगाव दुर्गम आहे आणि दळणवळणाची फारशी सोय नाही म्हणून त्याचा मामा त्याला पिरलीला घेऊन आला आहे. इथून २७ किमीवर असलेल्या भद्रावतीला दवाखान्यात जाणं तुलनेने सोपं जाणार आहे.

त्याच्या स्मार्टफोनवर मनोज आम्हाला जखमा ताज्या असतानाचे फोटो दाखवतो. ते पाहून हल्ला किती भयंकर होता ते लगेच कळतं.

लोकांचे जीव जातायत, गंभीर जखमी होतायत हे एका बाजूला पण या घटनांमुळे शेतीची कामं पुरती ठप्प झाल्याचं चिंतामण बालमवार सांगतात. चांदली गावचे बालमवार कुरमार या इतर मागासवर्गीय पशुपालक जमातीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. “शेतकऱ्यांनी आता रब्बीचं पीक घ्यायचं सोडून दिलंय आणि मजुरांना शेतात जायची भीती भरलीये,” ते म्हणतात.

जंगली प्राण्यांचे हल्ले आणि वाघाचा वावर यामुळे खास करून रब्बीच्या पेरण्यांवर परिणाम झाल आहे. रात्रीचे पहारे आता थांबले आहेत कारण अंधार पडल्यानंतर गावातून बाहेर पडण्याचीच आता लोकांना भीती वाटू लागली आहे. अचानक काही उद्भवलं तर ते रात्रीचेही बाहेर पडायचे या आधी.

तिथे कावठीमध्ये शेतमजुरी करणाऱ्या शशिकलाबाईंना सुधीरवर, त्यांच्या पोरावर रानडुकराने केलेला हल्ला किती भयंकर होता याची पुरती कल्पना आहे.

“अजी, माझा पोरगा वाचला जी,” त्या परत परत म्हणत राहतात. “आम्हाला त्याचाच आधार आहे.” सुधीरचे वडील हयात नाहीत. ते जाऊन कित्येक वर्षं उलटली आहेत. शशिकलाबाईंचा प्रश्न मनात घर करून राहतो, “डुक्कर नसता आणि वाघ असता तर काय घडलं असतं?”

Jaideep Hardikar

Jaideep Hardikar is a Nagpur-based journalist and writer, and a PARI core team member.

Other stories by Jaideep Hardikar
Editor : PARI Team
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale