१६ जून २०२२ ची रात्र होती. आसामच्या नागाव गावात लोबो दास आणि इतरही अनेक जण नानोई नदीच्या तीरावर लगबगीने रेतीच्या गोण्या रचत होते. ४८ तास आधी त्यांना कळवण्यात आलं होतं की ब्रह्मपुत्राची उपनदी असणारी नानोई पात्र सोडून वाहणार आहे. नदीच्या तीरावरच्या दर्रांग जिल्ह्यातल्या या रहिवाशांना जिल्हा प्रशासनाकडून या गोण्या पुरवण्यात आल्या होत्या.
“[जून १७ रोजी] मध्यरात्री १ च्या सुमारास बांध फुटला,” लोबो सांगतात. सिपाझार तालुक्यातल्या नागावच्या हिरा सुबुरी पाड्यावर ते राहतात. “आम्ही काहीच करू शकलो नाही. बांध वेगवेगळ्या ठिकाणी फुटायला लागला.” सलग पाच दिवस पावसाची झड लागलेली होती. आणि खरं तर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राज्याला झोडपून काढलं होतं. भारतीय हवामान वेधशाळेने देखील रेड अलर्ट जाहीर केला होता. १६ ते १८ जूनच्या दरम्यान आसाम आणि मेघालयात ‘तीव्र मुसळधार पाऊस’ (दररोज तब्बल २४४.५ मिमी किंवा त्याहून जास्त) पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
१६ जून रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास नानोई नदी रोंरावत नागावच्या दक्षिणेला असलेल्या खासडिपिला गावाच्या कालितापारा पाड्यामध्ये घुसली. जयमती कालितांच्या कुटुंबाचं सगळं काही पुरात वाहून गेलं. “साधा चमचा देखील राहिलेला नाही,” त्या सांगतात. निवाऱ्यासाछी ताडपत्रीची खोप करून त्यावर पत्रा टाकला आहे. “आमचं घर, साठवलेलं धान्य, गुरांचा गोठा सगळं काही पाण्यासोबत वाहून गेलं,” त्या सांगतात.
आसाम राज्य आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनंदिन पूर अहवालानुसार, १६ जून रोजी राज्यातल्या २८ जिल्ह्यांमधल्या १९ लाख लोकांना पुराचा फटका बसला. एकट्या दर्रांगमध्ये ३ लाख लोक पुराने बाधित आहेत. त्या दिवशी राज्यातल्या सगळ्यात जास्त नुकसान झालेल्या तीन जिल्ह्यांमध्ये दर्रांग आहे. नानोई तर पात्र सोडून वाहत होतीच पण राज्यातल्या इतर सहा नद्या – बेकी, मानस, पगलडिया, पुथीमारी, जिया-भराली आणि ब्रह्मपुत्र – धोक्याच्या पातळी रेषेच्या वर वाहत होत्या.

























