१५ नोव्हेंबर २०२३. एन. संकरय्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. वय १०२. त्यांच्या मागे त्यांचे पुत्र चंद्रसेकर आणि नरसिंहन तसंच कन्या चित्रा असा परिवार आहे.

२०१९ साली डिसेंबर महिन्यात पी. साईनाथ आणि पारीच्या चमूने संकरय्यांची एक मुलाखत घेतली होती. अगदी मोकळेपणी त्यांनी आपला जीवनपट आमच्यासमोर उलगडून दाखवला होता. निम्मं आयुष्य तर संघर्ष आणि आंदोलनांमध्येच गेलं होतं. वाचाः संकरय्याः क्रांतीची नव्वद वर्षं

तेव्हा त्यांचं वय होतं ९९. पण शंभरीला टेकले आहेत असं काही त्यांच्याकडे पाहून वाटत नव्हतं. ठाम बोलणं, तल्लख स्मृती. आयुष्याविषयी रसरसून बोलणाऱ्या, भविष्याबद्दल दांडगी आशा असलेल्या संकरय्यांची ती भेट हा आमच्यासाठी विलक्षण अनुभव होता.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात संकरय्या आठ वर्षं तुरुंगवासात होते. १९४१ साली मदुरईच्या अमेरिकन कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेत असताना एकदा आणि १९४६ साली मदुरई कटातील आरोपी म्हणून, दुसऱ्यांदा. भारत सरकारने नंतर मदुरई कट भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा भाग असल्याचं मान्य केलं.

कॉलेजमध्ये संकरय्या अभ्यासू विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. मात्र इंग्रजांविरोधात निदर्शन केल्यामुळे त्यांना १९४१ साली अटक करण्यात आली. तीही बीएच्या अंतिम परीक्षेआधी १५ दिवस. त्यामुळे त्यांना पदवी काही मिळू शकली नाही.

भारताच्या स्वातंत्र्यसंध्येला, १४ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. १९४८ साली कम्युनिस्ट पक्षावर बंदी घालण्यात आली त्यानंतर तीन वर्षं संकरय्या भूमीगत होते. त्यांचे मामा पेरियारवादी असल्याने राजकारणाचं, राजकीय विचारांचं बाळकडू संकरय्यांना मिळालं होतंच. आणि कॉलेजमध्ये असताना त्यांची डाव्या चळवळीशी ओळख झाली. स्वातंत्र्यसंध्येला तुरुंगातून सुटका झाल्यानंतर संकरय्या कम्युनिस्ट पक्षात सक्रीय झाले. तमिळनाडूमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसंच इतर अनेक चळवळींमध्ये त्यांची भूमिका कळीची होती.

संकरय्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय होते, सोबतच इतर कम्युनिस्ट नेत्यांप्रमाणे इतर मुद्द्यांवरही त्यांनी आवाज उठवला. “समान वेतन, अस्पृश्यता आणि मंदीर प्रवेशासाठी आम्ही लढलो,” पारीशी बोलताना ते म्हणाले होते. “जमीनदारी व्यवस्था मोडीत काढणं ही फार मोठी गोष्ट होती. आणि त्यासाठी लढले ते कम्युनिस्टच.”

पी. साईनाथ यांनी घेतलेली मुलाखत वाचाः संकरय्याः क्रांतीची नव्वद वर्षं आणि व्हिडिओ पहा

PARI Team
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে