“जर प्रत्येकानेच आपल्या गच्चीत शेती करायची ठरवली तर सगळ्यांनाच पुरेसं खाणं मिळू शकेल.”
आम्ही एका वर्गात होतो. ग्रामीण भागाबद्दल शहरी विद्यार्थ्यांच्या जाणिवा जागृत करण्यासाठी आम्हाला बोलावण्यात आलं होतं. आणि तेव्हाच एका विद्यार्थ्याचं हे विधान येतं आणि एकदम शांतता पसरते. जर ते आम्ही तसंच विरू दिलं असतं तर ते बरंच घातक ठरलं असतं. या देशातल्या 'आहे रे' वर्गातल्या तरुण विद्यार्थ्यांच्या या वर्गात 'प्रत्येक जण' म्हणजे कोण याची चुकीची व्याख्या रुजली असती. त्यामुळे ते सोडून न देता त्याचाच धागा पकडून आम्हाला अर्थपूर्ण संवाद घडवून आणणं गरजेंचं होतं. अशीही घरं असतील का ज्यांना गच्ची, बाल्कनी किंवा मोकळी जागा नाहीये?
पारी एज्युकेशन हा पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया – पारीचा शिक्षणाचं काम करणारा विभाग आहे. असे क्षण शोधून रुळलेल्या साजेबद्ध प्रतिमा दूर करणं आणि विचारांच्या कक्षा रुंदावण्याचं काम आम्ही करतो. पारीवरच्या गोष्टींचा वापर करून शहरी भागांमधल्या शाळा आणि महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण आणि वंचित समूहांबद्दल सम-अनुभूती निर्माण व्हावी, या जगाचा त्यांनी शोध घ्यावा, इथल्या लोकांशी संवाद साधावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हे करत असतानाच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या समाजांबद्दल लिहावं, नोंदी ठेवाव्यात, त्यांच्याच जगण्याचा समावेश असणारी उद्याची पाठ्यपुस्तकं तयार करण्यात त्यांचा सहभाग असावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. ‘समाजाची पुनर्रचना’ शिक्षणाच्या पुनर्रचनेतूनच होऊ शकेल, जिथे विद्यार्थी आपल्या देशातल्या बहुविध वास्तवांबद्दल जाणून घेऊ शकतील, त्याबद्दल वाचतील, ऐकतील असा ठाम विश्वास मारिया माँटेसरींंनी व्यक्त केला होता.
शिक्षक म्हणून आम्ही हे जाणतो की आपल्या विद्यार्थ्यांनी ‘वैश्विक नागरिक’ बनावं या खटाटोपामध्ये ते आपल्या भवतालापासून आणि मोठ्या शहरांपल्याडच्या भारतापासूनही परात्म होत चालले आहेत. या अनेकविध भारतांकडे दुर्लक्ष केल्याने, अभ्यासक्रमात त्यांना जागाच न दिल्यामुळे आपण जणू काही असाच संदेश देतोय की त्यांचं काहीही मोल नाही. पारीचे संस्थापक संपादक, पी. साईनाथ म्हणतातः ‘भारतात एक सबंध पिढी स्वतःच्याच देशात परदेशी असल्यासारखी मोठी होतीये.’
गोष्टींमधले दुवे शोधणं, सहसंबंध स्पष्ट करणं आणि वर्गातल्या आणि अभ्यासक्रमांमधल्या साचेबद्ध प्रतिमांचं खंडन करणं हे पारीच्या शिक्षणविषयक विचाराच्या गाभ्याशी आहे. आमचं वार्तांकन आणि कामातून आम्हाला सगळ्यांनाच हे सांगायचंय की ग्रामीण भारत बकाल, गरीब आणि एकजिनसी नाहीये. उलट, भारताचे गाव-पाडे अतिशय चैतन्यमय, विलक्षण वैविध्य असणारे आणि रंजक आहेत आणि आपल्याला त्यांतून शिकण्यासारखं खूप काही आहे.
‘स्वानुभवातून शिक्षणा’ची व्याख्या करणारे शिक्षण तज्ज्ञ कर्ट हान म्हणतात, “लहानग्यांसोबत जिंकायचे तीन मार्ग असतात. मागे लागणं, सक्ती करणं आणि आकर्षण निर्माण करणं.” पारी एज्युकेशनवर आम्हाला तर्काच्या आधारे तरुणाईला प्रवृत्त करायचंय, त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत करून त्यांना गळ घालायचीये आणि उत्तम कहाण्या ऐकवून त्यांचं रंजन करायचं.
प्रचंड आर्थिक आणि सामाजिक विषमता असलेल्या भारतासारख्या देशात तर हे वैविध्य आणि भिन्न वास्तव याविषयी बोलणं निकडीचं आहे. आपल्याकडे पराकोटीची विषमता आहे – उतरंडीत सर्वात वर असलेल्या १० टक्के भारतीयांकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा ५५ टक्के वाटा आहे.
भारतातल्या आजच्या तरुणाईला ते राहतात तो प्रदेश काय आहे, ते खातात ते अन्न कोण पिकवतं, त्यांना मिळणारी वीज आणि पाणी येतं तरी कुठून, त्यांच्या रोजच्या वापरातले रस्ते आणि इमारती कोण बांधतं या सगळ्याची जास्त चांगली जाणीव होणं गरजेचं आहे. त्यांच्याप्रमाणे सगळ्यांना आरोग्याचा, शिक्षणाचा, उपजीविकांचा लाभ का मिळत नाही याबद्दल त्यांनी डोळे उघडे ठेवून प्रश्न विचारणं गरजेचं आहे. पण हे प्रश्न विचारण्याआधी आपल्या युवा मित्रांना ही माहिती मिळवण्याची साधनं आणि ती समजून घेण्यासाठी लागणारी सहृदयता देणं आपलं काम आहे.
भाताच्या खाचरात ओणवं होऊन उन्हाच्या कारात भाताची रोपं लावणाऱ्या स्त्रीचा फोटो पाहिल्यावर ते दृश्य एखाद्या विद्यार्थ्याला समजेलही. पण दिसतंय त्या पलिकडे आपण जाऊ शकतो का, काय घडतंय याचा मागोवा घेऊ शकतो का? ती शेतकरी आहे, खंडाने शेती करतीये का शेतमजूर आहे? या शेतकरणी स्वयंपाकही करतात, धुणी-भांडी करतात, मुलांना वाढवतात, पशुधन सांभाळतात आणि किती तरी इतर गोष्टी करतात. आणि आज त्या कृषी कायद्यांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत, आपल्या लोकशाही हक्कांवर प्रभाव टाकणाऱ्या आंदोलनाला पाठबळ देत आहेत.
आता अभ्यासक्रमात हे मुद्दे नाहीतच असं म्हणता येणार नाही. राष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम सहज चाळला तर त्यात ‘गरिबी’, ‘राष्ट्रीय उत्पन्न’, ‘श्रम’ आणि असे इतरही अनेक शब्द सापडतात. पाठ्यपुस्तकांमध्ये या संकल्पना विषद केलेल्या दिसतात आणि त्या पक्क्या होण्यासाठी उपक्रमांमध्येही त्यांचा उल्लेख येतो. पण प्रत्यक्षात मात्र फार मोठी तफावत आढळून येते. परीक्षेतले प्रश्न हे बहुतेक वेळा गुण देण्यासाठी सोयीस्कर आणि बुद्धीला कमीत कमी ताण देणारे असतात. गरिबी किंवा दारिद्र्याचंच उदाहरण घेऊ या. अंतिम प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांनी ‘दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांवर एक अहवाल लिहावा’ असं ११ वीच्या अभ्यासक्रमात सूचित केलं आहे. १७ वर्षांचा कुठलाही डोकेबाज विद्यार्थी झटक्यात गुगलवर जाऊन जवाहर रोजगार योजना, रोजगार हमी योजना अशा आणि इतरही योजनांची यादी तयार करेल. याला दारिद्र्याविषयी शिकणं म्हणायचं का?
शालेय अभ्यासक्रम पाहिला तर आतापर्यंत जे आपल्याला कधी दिसलेच नाहीत अशा लोकांना स्वतः भेटणं, त्यांच्याबद्दल जाणून घेणं अशा स्वरुपाचे उपक्रम गृहपाठ म्हणून देता येतात. अभ्यासक्रमाचाच भाग म्हणून असे उपक्रम घेतले पाहिजेत कारण त्या बाहेरचं काहीही जास्त काळ चालू राहत नाही आणि कालांतराने बंद पडतं.
आम्ही पारीचा शाळेसाठीचा पहिला उपक्रम अर्थशास्त्राच्या शिक्षकांसोबत बसून तयार केला. सखोल शिक्षण, गुणांकन आणि अभ्यासक्रम असे सगळे पैलू विचारात घेतले गेले. ऑगस्ट २०१८ मध्ये आम्ही पहिल्यांदा एका शाळेत त्यांच्या निमंत्रणावरून ग्रामीण भारताच्या विविध अंगांबद्दल बोलण्यासाठी गेलो होतो. मी आणि माझी सहकारी विशाका जॉर्ज सकाळी ८ वाजता संपूर्ण शाळेसमोर उभ्या होतो. आमच्या साथीला होते बिनभरवशाचा प्रोजेक्टर आणि लपंडाव करणारं इंटरनेट. लोकशाहीमध्ये बातम्यांचं मोल काय आहे यापासून सुरुवात करून आम्ही त्रिपुरा राज्याच्या अगरतलामधल्या बांबू वाहून नेणाऱ्या बिस्वासच्या गोष्टीपर्यंत आलो. बिस्वासला कायम केंद्रस्थानी ठेवून अनेक विषयांचा, विद्याशाखांचा मागोवा घेणारी शिक्षकांसाठी हुकमी एक्का असावी अशी ही गोष्ट आहे.
हळूहळू आम्ही अशा विद्यापीठांशी बोलू लागलो जिथे संशोधनासाठी प्राथमिक माहिती गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वंचित समूहांशी संबंध येत होता. पदवीसाठी तयार केलेल्या प्रबंधांचं रुपांतर पारी एज्युकेशनवरच्या कहाण्यांमध्ये व्हायला लागलं – अभ्यासाचा दुवा कारागीर, शेतकरी, पशुपालक आणि कित्येकांच्या स्वतःच्या अनुभवाशी जोडला जाऊ लागला. शाळेची सहल म्हणजे प्रत्यक्षात जाऊन तिथून वार्तांकन करण्याची संधी होऊ लागली, फार कुणाला माहित नसलेल्या जीविका, व्यवसाय आणि आयुष्यांचे दस्तावेज बनू लागले.
पारीचे पत्रकार म्हणून जेव्हा आम्ही वर्गांमध्ये शिक्षकांच्या भूमिकेत जातो तेव्हा आम्ही आमचे स्वतःचे वार्तांकनाचे अनुभव सांगू शकतो. इतरांच्या कुणाच्या तरी गोष्टींपेक्षा हे जास्त खरेखुरे असतात. आणि गेल्या तीन वर्षांतला आमचा अनुभव आम्हाला सांगतो की शाळेतल्या अगदी १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांपासून ते पदवीचं आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांशी संवाद साधण्याचा हा हुकमी मार्ग आहे.
पीएचडी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने कबुली दिलीः “प्रत्यक्षात जाऊन काम करणं गरजेचं आहे. माझे सुरुवातीचे मसुदे पाहिले तर ते एखाद्या शोधनिबंधासारखे वाटतात. पण घडणाऱ्या गोष्टी कशा नोंदवायच्या आणि लिहीत असताना त्या गोष्टीतल्या व्यक्तीचीच गोष्ट कशी सांगायची, आपली मतं कशी बाजूला ठेवायची, हे सगळं मला पारीकडून शिकता आलं.” प्रत्येक विद्यार्थ्याच्या वार्तांकनाखाली तुम्हाला संपादकांचं टिपण दिसेल – हे असे अनुभव नोंदवून ठेवण्याच्या प्रक्रियेतला हा महत्त्वाचा भाग आहे.
“आमच्या विद्यार्थ्यांना समाजाचं जास्त चांगलं भान आलं आहे,” एका शाळेतला उपक्रम संपल्यानंतर आम्हाला तिथल्या शिक्षिकेनं सांगितलं. “आणि सध्या त्याचीच गरज आहे.”
पारी एज्युकेशनचा गट प्रत्येक विद्यार्थ्यासोबत अगदी जवळून काम करतो. त्यांनी दिलेलं लिखाण वैध आहे का, सरधोपट कल्पनांच्या पलिकडे जाणारं आहे का हे पाहत असतानाच ज्यांच्याविषयी लिहितोय त्यांचा सन्मान, सुरक्षितता आणि आदर जपला जातोय ना याकडे लक्ष देणं आमचं काम आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबतचं काम नीट आखून देतो आणि याचा उपयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात प्रश्न विचारायला, माहिती घ्यायला आणि निरीक्षण करण्यासाठी होतो. आणि जेव्हा ते लिहितात तेव्हा आपल्या स्वतःच्या अनुभवांचं सार कसं काढायचं, उदा. भाजीमंडई किंवा गावाला जाऊन आल्यावर आलेले अनुभव आणि त्याला प्रादेशिक स्तरावरच्या आकडेवारीची जोड कशी द्यायची यात आम्ही त्यांना मदत करतो. आपल्याला मिळालेल्या माहितीची वैधता जनगणनेतील माहितीच्या आधारे कशी जोखायची हे शिकवत असताना लोकशाहीमध्ये या संपूर्ण प्रक्रियेचं महत्त्व देखील आम्ही अधोरेखित करत राहतो. शिक्षणाचं ‘स्थानन’ किंवा ज्याला इंग्रजीत लोकलायझेशन म्हणतात त्याला या प्रक्रियेने वेगळा अर्थ प्राप्त होतो.
पारी एज्युकेशनच्या अगदी सुरुवातीच्या उपक्रमांपैकी एक होता, ‘स्थलांतराचं अर्थशास्त्र’. उच्च माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आसपास राहणाऱ्या बंगळुरूच्या शहरी भागात स्थलांतर करून आलेल्यांची स्वतः भेट घेऊन माहिती गोळा करायची होती. त्यांना एक ‘चीट शीट’ (पारीवर ‘पारीसाठी लिहा’ मध्ये उपलब्ध) देण्यात आली होती. ज्यामध्ये कुणाला भेटायचं, संमती कशी घ्यायची आणि इतर अनेक बाबींचा समावेश होता.
अपेक्षेप्रमाणे बहुतेक विद्यार्थ्यांना स्थलांतरित कामगारांबद्दल फारशी काहीच माहिती नव्हती. किंवा त्यांच्या मनात अतिशय साचेबद्ध प्रतिमा होत्या. उदा. ते बेघर, आळशी आणि अडाणी असतात. त्यांच्यावर भरवसा ठेवता कामा नये, ते अधाशी असतात, इत्यादी. विद्यार्थ्यांना पक्की खात्री होती की हे काम ते चुटकीसरशी करतील.
त्यांनी लोकांना भेटून मुलाखती घ्यायला सुरुवात केली. आजपर्यंत ज्यांना फक्त बांधकाम मजूर, स्वयंपाकी, रखवालदार, घरकामगार, टॅक्सीचालक याच पद्धतीने पाहत आलो त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेत असता ही मुलं चकित झाली होती. या उपक्रमामुळे ज्यांना आजवर केवळ त्यांच्या कामावरून, ‘गार्ड’, ‘धोबी’ किंवा फक्त ‘भैय्या’ आणि ‘दीदी’ म्हणून ओळखत होतो त्यांची अधिकची ओळख करून घ्यावी लागली होती.
त्यांचं पूर्ण नाव आणि ते कुठून आलेत हे विचारणं तर निव्वळ उपचाराचा भाग होता. पण तिथेच खरी संवादाला सुरुवात होत होती. मग आजवर ज्याला केवळ ‘रामू’ म्हणून ओळखत होतो त्याचं खरं नाव रामचरण देव आहे आणि तो बिहारच्या बैकबिशनपूर गावातला होता. सीमांत शेतकऱ्यांचं हे गाव शतकानुशतके मधुबनी कलाकारीसाठी प्रसिद्ध होतं. त्यांच्या नजरेत तो आता फक्त एक आचारी नव्हता. त्याच्याशी बोलत असताना त्यांना कुटुंबावरचं कर्ज, बालमजुरी, शिक्षणाची स्वप्नं याबद्दल तर समजलंच पण सोबत घरापासून इतकी वर्षं दूर राहिल्यानंतर येणारा एकाकीपणा, आपली मुलं मोठी होत असताना तिथे नसणं, म्हाताऱ्या आईबापांपासून दूर राहणं हे अनुभव नक्की काय आहेत हेही जाणून घेता आलं.
आजवर आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या, काम करणाऱ्या या लोकांबद्दल आपल्याला किती कमी माहिती आहे हे त्यांना लक्षात यायला लागलं. १८ वर्षांची पुलिना तिची मुलाखत घेणाऱ्या, ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा केवळ एकच वर्षांनी मोठी आहे आणि ती त्याच्या घरी घरकाम करते. शेवयांच्या कारखान्यात, पॅकेजिंगच्या कंपन्यांमध्ये नोकरी शोधत शोधत पुलिना आसामहून केरळ, कर्नाटक आणि तमिळ नाडूमध्येही जाऊन आलेली आहे, तिथेच काय जिथे काम मिळेल तिथे ती गेली आहे. अनाथ असलेली पुलिना आपल्या लहान बहिणीच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा खर्च आता स्वतः करतीये.
या अशा कहाण्या ऐकल्या की गोष्टी बदलायला लागतात. १७ वर्षांच्या एका विद्यार्थ्याच्या शब्दातः
“इतर प्रोजेक्ट गूगल किंवा विकीपीडियावरून करता येऊ शकतात. पण पारी एज्युकेशनच्या प्रकल्पांसाठी आम्हाला स्वतःच माहिती काढावी लागली. ग्रामीण भागातून आलेल्या एका स्थलांतरिताची मुलाखत घेतल्यावर माझ्या लक्षात आलं की आपल्या देशामध्ये प्रचंड सामाजिक आणि आर्थिक दरी आहे.”
“माझ्या प्रकल्पातून मला समजून आलं की केवळ ५,००० रुपये जादा मिळतायत म्हणून हजारो किलोमीटर प्रवास करायची लोकांची तयारी आहे. हे मनाला स्पर्शून गेलं आणि प्रेरितही करून गेलं.”
“... उत्पन्नातील तफावत, प्रादेशिक असमतोल, शासकीय सुधारणा, सामाजिक कुप्रथा इत्यादी संकल्पना आता मला जास्त चांगल्या समजायला लागल्या आहेत.”
* * * *
आता जरा भारताच्या गावपाड्यांवर सफरीला जाऊ या. किती वेगवेगळी पिकं घेतली जातात, आपण जे अन्न खातो ते पिकवणारे गडी आणि बाया आपल्याला भेटतात, म्हशी राखणाऱ्यांमुळे आपल्याला दूध मिळतं, आणि आपली वीज तयार होते, पाणी जिथून येतं त्या धरणांच्या आणि नद्यांजवळ राहणारी माणसं आपल्याला कळतात. “मला माझ्या समाजाला आमचे हक्क समजावून सांगायचेत आणि मोठ्या लोकांपुढे दबायची त्यांच्या मनातली भीती काढून टाकायचीये,” जमुना सांगते. “भीकेवर आमचा समाज अवलंबून आहे ते मला बदलायचंय आणि मुलींची लहान वयात लग्नं होतात, तेही. आपलं पोट भरायला फक्त भीकच मागायला पाहिजे असं काही नाही. शिक्षण घेतलं तरी तुम्हाला चार घास खाता येतात.”
सिबु लोयांच्या छपरावरचा मळा तुम्हाला पहायचाय? झारखंडच्या भूमीहीन कष्टकरी लोयांच्या पोटाला आधार आहे हा भाजीपाला. किंवा उंचावरच्या लेह पाडुम महामार्गाचं काम करणारी पेमा आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलाची, एंगोडुपची गोष्ट तुम्हाला पहायचीये? रस्त्याचं खडतर काम पेमा करत असते तेव्हा हा पिटुकला तिथेच धोकादायक परिस्थितीत खेळत असतो हे सगळं तुम्हाला फोटोंमधून समजून येईल.
कधी कधी आम्हाला शिक्षकांपासून सुरुवात करावी लागते.
“जातीबद्दल फार काही बोलू नका हं. आमच्या मुलांना फारसं काही माहित नाहीये.”
“पण आपल्या मनातले पूर्वग्रह तसेच पुढे चालू राहतात याबद्दल त्यांना जागरुक करायला नको?”
“बरोबर आहे, पण कसंय... आम्हाला त्यांना दुखवायचं नाहीये.”
शिक्षकांकडून त्यांच्या बहुमोल ‘तासिका’ मिळवणं हे फार सोपं नाही आणि त्यांचा विश्वास संपादन करणं देखील. आम्ही हे ‘का’ करतोय याबद्दल त्यांच्या शंका दूर करणंही तसंच अवघडच. पारी ना-नफा आणि मुख्यतः देणग्यांवर काम करतं, आमच्या वेबसाइटचा वापर पूर्णपणे मोफत आहे याचा उपयोग होतो. पण हे सगळं शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर. शिक्षकांनाच सध्याच्या आपल्या जगातले प्रश्न – जात, विषमता, अन्याय – याबद्दल बोलायला सांगितलं, त्यांचा त्यात सहभाग घेतला तर त्याचा प्रभाव निश्चित जास्त होतो. पाठ्यपुस्तकाच्या बाहेर पडून ते वास्तवातली उदाहरणं देऊ शकतात.
एका शिक्षकाचा अभिप्रायः “शरमेची बाब आहे की आजवर मी आणि माझ्या मुलांनी (विद्यार्थ्यांनी) आजपर्यंत हा भारत आणि त्या भारताचे लोक कधी पाहिलेच नव्हते. पारीमुळे तो आमच्या समोर आला. सुलेखन करणाऱ्यांच्या बोटावरची शाई आम्हाला दिसली, कुथमपल्लीच्या सुती साड्यांचा ताणा-बाणा आम्हाला समजला. भाषा देखील अस्तंगत होऊ शकतात हे आम्हाला समजलं. आणि आमच्या इतिहासाच्या पुस्तकात नसलेल्या किती तरी स्वातंत्र्य सैनिकांशी आमची गाठ-भेट झाली.”
“टाळेबंदीच्या काळात मुलांनी स्थलांतरितांच्या संकटाबद्दल अनेक गोष्टी वाचल्या. टीव्ही आणि वर्तमानपत्रात दाखवतायत त्याच्याहूनही हे संकट खूप जास्त गहिरं असल्याचं पाहून खरं तर ते अचंबित झाले होते.”
तर आम्ही हे असं सगळं करत असतो – लोकांशी जोडून घेणं, त्यांच्याविषयी जाणून घेणं आणि सम-अनुभूतीने त्यांचा विचार करणं. एका विद्यार्थ्याची प्रतिक्रियाः “पारीमुळे आमच्या आसपास असलेल्या, ज्यांच्याकडे आजवर आम्ही दुर्लक्षच केलं अशा सगळ्यांची देखील आयुष्यं आहेत हे आज आम्हाला समजायला लागलंय. आता आम्ही त्यांचा जास्त सहृदयतेने विचार करू लागलोय.”
पारी एज्युकेशन गटः विशाका जॉर्ज (संपादक, समाज माध्यमे), अदिती चंद्रशेखर (वरिष्ठ संपादक, मजकूर) आणि प्रीती डेव्हिड (संपादक, पारी एज्युकेशन)
पूर्वप्रसिद्धी (भिन्न शीर्षकासह): द थर्ड आय ( www.thethirdeyeportal.in ). लिंगभाव, लैंगिकता, तंत्रज्ञान आणि शिक्षण यामधले सहसंबंध शोधणारा स्त्रीवादी विचारगट निरंतर ट्रस्टने ( www.nirantar.net ) सुरू केला आहे.
अनुवादः मेधा काळे