जात्यावरच्या ओव्या प्रकल्पासाठी खडकवाडीतल्या या बाया स्मृतीचे कोपरे न कोपरे चाळत पावसाच्या या काही ओव्या गातायत – ओली माती, पेरणी, भावाची आटत चाललेली माया आणि पंढरीची वारी

पड पड तू पावसा वल्या होऊ दे जमिनी
डोई भाकरीची पाटी शेता जाऊ दे कामिनी

३० एप्रिल २०१७. भर उकाड्यात सकाळीच आम्ही कोळावडे गावाच्या खडकवाडी या वाडीत पोचलो होतो. आणि बाया ही ओवी गात होत्या. यांच्यापैकी एक सीताबाई उभे आता साठीच्या पुढे आहेत. त्यांना मोबाईल फोनचा भारी सोस. एकदा नाही, बऱ्याच वेळा त्या फोनवर बोलण्यासाठी म्हणून उठून बाहेर गेल्या. मी त्यांचा फोन नंबर विचारला तेव्हा त्यांनी एक कागदाचा चिटोरा काढून माझ्या हातात दिला, त्यावर इंग्रजीत त्यांचा नंबर लिहिलेला होता.

“माझ्या लेकानं लिहून दिलाय मला,” त्या सांगतात. “मला लिहाया- वाचाया येत नाही.”

Summer season
PHOTO • Namita Waikar

कोळावड्याच्या या बाया पेरणीआधी लेक शेताची कशी मशागत करतोय ते गातायत

सुमारे वीस वर्षांपूर्वी जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाच्या मूळ चमूने या वाड्यांवरून ओव्या गोळा केल्या होत्या. आता हा ओव्यांच्या संग्रह पारीवर सादर केला जात आहे आणि सध्याचा गट यातल्या काही जणींना पुन्हा भेटण्यासाठी गावांना भेटी देत आहे.

खडकवाडीच्या या मैत्रिणी कित्येक वर्षांपूर्वी त्यांनी गायलेल्या ओव्या आठवण्यासाठी एकमेकींना मदत करत होत्या. गेल्या वर्षी पारीवर उन्हाळ्याची सात गाणी सादर केली होती – त्यामध्ये या गावातल्या बाया उन्हाळ्यातल्या दिवसांविषयीच्या ओव्या गाताना दिसतात. या मालिकेत त्या गाणी गातायत ती पावसाची.

गावात पोचताना वाटेत भाताच्या पेरण्यांसाठी शेतकरी राब करताना दिसत होते.

आम्ही कोळावड्याला पोचलो आणि ५८ वर्षांच्या लीलाबाई कांबळेंनी आम्हाला थेट रामाच्या देवळाच्या मंडपात नेलं. मंडपाला पत्र्याचं छत आहे. तिन्ही बाजूला कट्टे बांधलेत, बाकी भिंती नसल्याने मोकळं आहे. कट्ट्यावरच सगळे बसतात.

त्यानंतर लीलाबाई एकेकीला बोलवायला त्यांच्या घरी गेल्या आणि हळू हळू सहा जणी मंडपात गोळा झाल्या. आमच्याकडच्या यादीतल्या बऱ्याच जणी गावात नाहीत, काही मधल्या काळात निवर्तल्या तर काहींचा कुणालाच पत्ता नाही.

सगळ्याच जणींनी सांगितलं की त्या अधून मधून डाळी किंवा घावनासाठी तांदळाचं पीठ दळायल्या आणि लग्नाची हळद फोडायला जातं वापरतात.

आम्हाला खडकवाडीत भेटलेल्या बायांपैकी सगळ्यात तरूण होत्या सुलोचना ढगे, वय ४५. जात्यावरच्या ओव्या संग्रहाला २०० हून जास्त ओव्या देणाऱ्या झिंगाबाई उभेंच्या त्या कन्या. काही वर्षांपूर्वी झिंगाबाई वारल्या, त्यांच्या शेवटच्या दिवसात त्या त्यांच्या लेकीकडे आणि जावयाकडेच होत्या.

Sitabai Ubhe is an avid mobile phone user
PHOTO • Namita Waikar
Sindhu Ubhe, Sitabai Ubhe and Sulochana Dhage
PHOTO • Namita Waikar

डावीकडेः सीताबाई उभेंना मोबाइल फोनचा भारी सोस आहे. उजवीकडेः सिंधू उभे, सीताबाई उभे आणि सुलोचना ढगे देवळात बाकीच्या बायांची वाट पाहत थांबल्यायत

सुलोचनांनी आम्हाला सांगितलं की त्या गावातल्या इतरांसोबत दर वर्षी वारी करतात. ­“आम्ही पार पंढरपूरपर्यंत जात नाही. आम्ही आळंदी ते पुणे ज्ञानोबांच्या पालखीसोबत दोन दिवस पायी जातो. तसं नाही तर तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत देहूहून पुण्याकडे चालत जातो.”

हिंदू कालगणनेनुसार वर्षातून दोनदा वारी निघते – आषाढात (जून/जुलै) आणि मग कार्तिकात (ऑक्टोबर-नोव्हेंबर). आषाढी वारी जास्त लोकप्रिय आहे कारण ती पेरण्या झाल्यावर निघते. शेतकरी, धनगर, गुराखी आणि महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातले किती तरी लोक दर वर्षी वारीला जातात.

सुलोचना आणि बाकी सहा जणी ओळीने बसल्या आणि एकमेकीची मदत घेत, कुजबुजत गुणगुणू लागल्या. त्यांच्याच गावातल्या बायांच्या अनेक पिढ्यांनी पुढच्या पिढीला दिलेल्या ओव्या आणि गळे त्या आठवायचा प्रयत्न करत होत्या. आणि त्यांना त्या आठवल्याः सहा पाऊसगाणी आणि वारीवरचं एक कडवं त्यांच्या गळ्यातून बाहेर पडलं.

पहिल्या ओवीत बाई गाते की पावसाची धार लागलीये आणि तिचा लेक रानाची मशागत करतोय, पाभराने भाताचा पेरा चालू आहे. दुसऱ्या ओवीत शेती पाभर गव्हाची आहे असं ती गाते. तिसऱ्या ओवीत त्या गातात की चांगला पाऊस पडू दे आणि भाकरीची पाटी घेऊन कामिनी शेतात जाऊ दे.

चौथ्या ओवीत ओसरून गेलेल्या वळवाची उपमा बहिणींवरची माया कमी झालेल्या भावाला दिली आहे. भावाला लेकी झाल्या की तो बहिणींना विसरतो असं ओव्यांमध्ये गायलं जातं. पाचव्या ओवीत रानाची मशागत केली त्याचं वर्णन आहे. नांगरानं नागरलं, कुळवानं जमीन हलकी केली आणि पाभराने पेरा केला. सहाव्या ओवीत गायलंय की जसं पावसावाचून जसा जमिनीला ओलावा नाही तसं भरतारावाचून कामिनीला सुख नाही.

‘वळीव पाऊस ह्यो गं पडुनी वसरला, भावाला झाल्या लेकी ह्यो गं बहिणी विसरला,’ कोळावड्याच्या बाया या चित्रफितीत गातायत,

या ओव्यांनंतर सहा ओळींचं एक पालुपद येतं. सुरुवात होते त्यात एक जण सांगते की आंब्याच्या दिवसामध्ये तिचा भाऊ पाहुणा आलाय. त्यानंतर त्या वारीबद्दल गातात. पावसाने वाटा ओल्या होतात आणि पालखी येते. ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका चांदीच्या पालख्यांमध्ये ठेवलेल्या असतात. या पादुकांचंच भक्त दर्शन घेतात. आणि दर वर्षी वारीसोबत या पालख्या पंढरीला जातात. वारीच्या वाटेवर वारी गावात आली की हळदी कुंकवाचा शिडकावा केला जातो.

दर वर्षी येणाऱ्या वारीमुळे सगळीकडे प्रसन्न आणि मंगल वातावरण तयार झालंय. या सगळ्या वातावरणाला जणू काही एक न्यारा रंग आलाय. इथे वारी पंढरपुराकडे प्रस्थान करते (लाखो वारकऱ्यांच्या सोबत) आणि तिथे पंढरीचा विठोबा जरीचा शालू लेऊन भक्तांच्या स्वागतासाठी सजला आहे असंही या पालुपदात गायलं आहे.

वळीव पावसानी फळी धरली कवायाची
माझ्या बाळाच्या शेतामधी, शेती पाभार भातायाची

वळीव पावसानी फळी धरली कवायाची
बाळाच्या शेतामधी चाले पाभार गव्हायाची

पड पड तू पावसा ओल्या होऊ दे जमिनी
डोई भाकरीची पाटी शेता जाऊ दे कामिनी

वळीव पाऊस ह्यो गं पडुनी वसरला
भावाला झाल्या लेकी ह्यो गं बहिणी विसरला

नांगरानं नांगरिलं कुळवाणी वजं केली
पाभर बाई शेता सुगरण नेली

पावसावाचुनी दल नाही त्या जमिनीला
भरतारावाचुनी सुख नाही त्या कामिनीला

बाई पाव्हणा माझा बंधू,
आला आंब्याच्या दिवसामधी

वाट वली वली, वाट वली वली
हळदी कुंकाची गर्दी झाली, पालखी आली
रंग न्यारा न्यारा, रंग न्यारा न्यारा
देव जरीचा शालू ल्याला, शोभतो त्याला

ओवी गाणाऱ्या कलावंतः सीताबाई उभे, सिंधू उभे, मुक्ताबाई उभे, सुलोचना ढगे, लक्षमीबाई उभे, नंदा उभे

गावः कोळावडे

वाडीः खडकवाडी

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः मराठा

दिनांकः या ओव्या (आणि काही माहिती) जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाच्या मूळ चमूने सर्वप्रथम ६ जानेवारी १९९६ रोजी नोंदवून घेतल्या होत्या. या लेखातले फोटो आणि ओव्यांचं ध्वनीमुद्रण आणि चित्रीकरण ३० एप्रिल २०१७ रोजी करण्यात आलं.

पोस्टरः सिंचिता माजी

अनुवादः मेधा काळे

PARI GSP Team

পারি গ্রাইন্ডমিল সংগস্ প্রজেক্ট টিম: আশা ওগালে (অনুবাদ); বার্নার্ড বেল (ডিজিটাইজেশন, ডেটাবেস নির্মাণ, রূপায়ণ এবং রক্ষণাবেক্ষণ); জিতেন্দ্র মেইদ (প্রতিলিপি এবং অনুবাদ সহায়ক); নমিতা ওয়াইকার (প্রকল্প প্রধান এবং কিউরেশন); রজনী খলাদকর (ডেটা এন্ট্রি)

Other stories by PARI GSP Team

নমিতা ওয়াইকার লেখক, অনুবাদক এবং পিপলস আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়া, পারির নির্বাহী সম্পাদক। ২০১৮ সালে তাঁর ‘দ্য লং মার্চ’ উপন্যাসটি প্রকাশিত হয়েছে।

Other stories by নমিতা ওয়াইকার