“स्वातंत्र्य,” सुंदर बगारियांच्या सांगण्यानुसार, “फक्त श्रीमंत आणि बलवानांसाठी आहे.” गेली तीस वर्षं गुजरातमधील बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर काला घोडा सर्कलपाशी, भारताचे छोटे झेंडे सुंदर विकतायत. “काही दिवस आम्ही थोडं जास्त खातो, काही दिवस कमी आणि खूप दिवस तर आम्ही रिकाम्या पोटी निजतो...” त्या सांगतात.
दर दिवशी त्यांच्यासारखेच बगारिया समुदायाचे सुमारे २० जण इथे छोट्या टपऱ्या/पथाऱ्या टाकतात. सकाळी ९ वाजता दिवसभराच्या कामाची तयारी सुरू होतेः रस्त्यात अंथरलेल्या प्लास्टिकच्या कागदावर स्टायरोफोमची खोकी ठेवलेली असतात, त्यावर झेंडे अडकवायचे, तिरंगी बॅज लावायचे, स्टिकर आणि मनगटात घालायचे बॅण्ड स्टायरोफोमच्या उभ्या कागदाला अडकवायचे. काही झेंडे पदपथावरच्या खांबांना अडकवायचे. बाकी तिरंगी टोप्यांसोबत प्लास्टिकच्या कागदावर मांडायचे.
रात्री ११ वाजता त्यांचं दुकान बंद होतं, १४ तासात त्यांची सुमारे २०० रुपयांची कमाई होते. काही जण फतेहगंज उड्डाणपुलापाशी जातात, काही जण सयाजीगंज भागातल्या रेल्वे स्थानकापाशी, काही जण गिऱ्हाइकाच्या शोधात वर्दळ असणाऱ्या इतर चौकांमध्ये थांबतात.
सगळ्यांकडे हंगामानुसार माल विकायाल असतो – झेंडे, राख्या, मेणबत्त्या, सांता टोप्या.
त्यांच्यातलीच एक आहे, १६ वर्षांची लक्ष्मी बगारिया (शीर्षक छायाचित्र पहा), जी सहा वर्षांची असल्यापासून झेंडे विकतीये. ती तिच्या नातेवाइकांसोबत राजस्थानातल्या टोंक जिल्ह्यातल्या उनैरा तहसिलाच्या काकोड गावातून इथे वर्षातून तीनदा येते – स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि नाताळ. “महानगरपालिकेचे लोक येऊन आम्हाला इथनं निघून जायला सांगतात, पण काही तरी करून आम्ही परत येतोच,” ती सांगते.
राकेश बगारिया, वय १९, वयाच्या पाचव्या वर्षापासून या धंद्यात आहे. “आमचं हातावर पोट आहे,” तो म्हणतो. तो दिल्लीच्या सदर बाजार मधून तिरंग्याच्या या सगळ्या वस्तू घेऊन येतो, रेल्वेने प्रवास करून. हा सगळा माल भरण्यासाठी तो त्याच्या गावातल्या सराफाकडून वर्षाला २४ टक्के व्याजाने २०,००० रुपये कर्ज काढतो.
राकेशचं कुटुंब सवाई माधोपूर तालुक्यातल्या धिंगला जटवारा गावी राहतं. इथल्या इतर बगारियांप्रमाणे – जे मागास वर्गात मोडतात – त्याचे आई वडील शेतमजुरी किंवा बटईने गहू आणि बाजरी करतात. रस्त्यात असे झेंडे विकण्याचा त्यांचा व्यवसाय किमान तीस वर्षांपासून चालू आहे असा या विक्रेत्यांचा अंदाज आहे. गावाकडे शेतातली कामं कमी व्हायला लागल्यावर कामाच्या शोधात बगारिया शहरांकडे आणि मोठ्या गावांकडे स्थलांतरित हाऊ लागले तेव्हापासून हा धंदा सुरू झाला आहे.
धंद्याचा जोर कमी व्हायला लागला की राकेश घरी परततो – १६ ऑगस्टला आपल्या गावी जाण्याचा त्याचा मानस आहे – तिथे तो सरकारी शाळेत १० वीत शिकतोय. “तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर लोक तुम्हाला वेड्यात काढतील,” तो म्हणतो.
महेंद्र हा लक्ष्मीचा भाऊ लागतो. त्याचं दुकान इथून काही मीटरच्या अंतरावर आहे. तो १८ वर्षांचा आहे आणि तिच्याप्रमाणेच गावी सरकारी शाळेत १० वीत शिकतोय. तो कधी कधी त्याच्या आई-वडलांबरोबर अशी काही हंगामी विक्री करायला बडोद्याला येतो. या कुटुंबाने माल भरण्यासाठी गावातल्या सराफाकडून ११ हजारांचं कर्ज घेतलंय पण आतापर्यंत त्यांची केवळ ४ हजाराची कमाई झालीये.
“आम्ही काही स्वतंत्र नाही,” महेंद्र म्हणतो. “सरकारकडून कसलीही मदत मिळत नाही, आमचं दुःख काय आहे हेही कुणी आम्हाला विचारत नाही. मम्मी आणि पप्पा इथेच राहतात, एरवी काही तरी छोटी खेळणी, फुगे विकून थोडं फार कमावतात. मला या सगळ्यातून बाहेर पडायचंय आणि मोठं बनायचंय. अजून अभ्यास करायचाय आणि माझ्या आई-वडलांचे कष्ट कमी करायचेत.”
झेंडे विकणारे सगळे पदपथावरच झोपतात. ज्यांची लहान लेकरं आहेत ते तिथेच झोळ्या बांधतात. विश्वामित्री नदीवरच्या पुलाच्या कठड्यापलिकडे त्यांची प्लास्टिकच्या तंबूंची कुडमुडी घरं दिसतात. रात्री पाऊस यायला लागला की सगळंच अवघड होतं आणि मग ते जवळच्या बँकेच्या इमारतीखाली आडोशाला जातात. तिथल्या सुरक्षा रक्षकांशी भांडण रोजचंच. जवळच्या सार्वजनिक शौचालयात दर खेपेला ५ रुपये शुल्क असल्याने ते उघड्यावरच आपले विधी उरकतात.
आम्ही बोलत असतानाच महेंद्रच्या आईने, मोराबाईने त्याच्यासाठी खायला वडा पाव आणला – दहा रुपयांचा. “आमची अख्खी जिंदगी कष्टात गेली, पण लेकरांच्या गरजा काही आम्हाला पुऱ्या करता येत नाहीत बगा,” त्या म्हणतात.
“काही गाड्या येतात, खिचडी विकायला, [१० रु. प्लेट], पण तिची चव इतकी वाईट असते, की कुत्रं पण त्याला तोंड लावणार नाही,” सुंदर बगारिया सांगतात. त्यांची टपरी इथनं जवळच आहे. मग हे विक्रेते मिळून पदपथावरच काही तरी बनवतात. “कधी कधी आम्ही स्वयंपाक करतो – नाही तर बिस्किटं खाऊन आमची भूक मारतो. किंवा मग मी माझ्या पोराकडे पैसे मागून घेते... कसं तरी भागवावं लागतंच.”
सुंदर, इतरांइतकेच म्हणजे दिवसाला २०० रुपये किंवा जास्तीत जास्त ३०० रुपये कमवतात – २-३ जण मिळून चालवत असलेल्या एका टपरीची ही कमाई. त्यांच्या मुलाची, सुरेशची पथारी इथनं १०० मीटरच्या अंतरावर आहे. निळ्याभोर आकाशात या स्वतंत्र देशाचे झेंडे कसे लहरतायत. हे कुटुंब सवाई माधोपूर तालुक्यातल्या करमोडा गावचं आहे. सुरेश त्यांच्या पत्नीसोबत, कमलेशीसोबत हा व्यवसाय करतो. त्यांचा मुलगा विशाल पाचवीत आहे आणि मुलगी प्रियांका तीन वर्षांची आहे. सुरेश यांनी कोटा विद्यापीठातून हिंदी विषयामध्ये बीए केलंय “मी पदवीधर आहे, पण माझ्याकडे नोकरी नाही...” ते सांगतात.
गेल्या वर्षी सुरेश यांनी राजस्थान राज्य पोलिस सेवेसाठी अर्ज केला होता, पण त्यांची निवड झाली नाही. “मूठभर जागांसाठी भरपूर स्पर्धा असते,” ते सांगतात. “सत्तेत आलो तर रोजगार निर्माण करू असं आश्वासन राजकीय पक्ष निवडणुकीआधी देतात, पण दर वेळी ते अपयशी ठरतात आणि त्यांच्यासोबत आमच्या पदरीही अपयशच येतं.”
लहानगा विशालसुद्धा घरच्यांना त्या धंद्यात मदत करतो. तो वाहनांच्या गर्दीत जाऊन छोटे झेंडे विकतो. लोक हे झेंडे का बरं घेतायत असं त्याला विचारलं तेव्हा त्याच्याकडे काही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.
साठी पार केलेले चिरंजीलाल बगारिया या रस्त्यांवरचे सर्वात वयस्क विक्रेते आहेत. त्यांची पथारी विनोबा भावे पथावर आहे, राकेशच्या जवळच. “आम्ही भूमीहीन आहोत, माधोपूरमध्ये आमची एक झोपडी आहे. मग, आता मी दुसरं काय करणार, सांगा?” ते सवाल करतात.
चिरंजीलाल यांचा थोरला मुलगा अलाहाबाद विद्यापीठात शिकत होता. तो एका अपघातात वारला. “माझी सारी आशाच धुळीला मिळाली,” ते सांगतात. “आणि आता ती परत पल्लवित व्हावी असं काही माझ्यापाशी नाही,” चिरंजीलाल विधुर आहेत आणि त्यांची इतर तीन मुलं सवाई माधोपूरमध्ये मजुरी करतात. “महानगरपालिकेचे कर्मचारी कधी कधी आमचा माल जप्त करतात आणि आम्हाला पोलिस स्टेशनात घेऊन जातात,” ते सांगतात. “त्यांचे हात ओले केल्यावरच ते आमचा माल परत करतात.”
आम्ही चिरंजीलाल यांच्याशी बोलत असतानाच एक एसयूव्ही येते आणि त्यातलं गिऱ्हाइक झेंड्याच्या किंमतीवरून घासाघीस करायला लागतं. “साहेब, मी गरीब माणूस आहे,” चिरंजी गयावया करतात. “मी जास्त किंमत नाही सांगितली तुम्हाला.”
ते गिऱ्हाइक गेल्यानंतर मी चिरंजीलालना विचारतेः तुम्ही गेली २० वर्षं इथे आहात आणि तुम्ही केंद्रातली आणि दोन्ही राज्यातली अनेक सरकारं पाहिलीयेत. तरीही तुमच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही, असं का? “खरंय, सगळे एकाच माळेचे मणी आहेत,” ते उत्तरतात. “खरं तर असं आहे की आम्ही गरीब मतदारच हाल अपेष्टा सहन करणार. बहुतेक मतदार गरीब किंवा मध्यम वर्गातले आहेत, पण आपण सरकार निवडून देतो ते मात्र श्रीमंतांसाठी.” दूर गेलेल्या एसयूव्ही गाडीकडे नजर टाकत ते म्हणतात, “आपण काय फूटपाथवाले आहोत. आपणही या पक्क्या सडकेने जाऊ असा दिवस कधी यायचा?”
आदित्य त्रिपाठी आणि कृष्णा खाटीक यांनी माहिती घेण्यासाठी आणि ध्रुव मच्ची यांनी छायाचित्रांसाठी मदत केली आहे.
अनुवादः मेधा काळे