“हे पांढरे स्वच्छ दाणे बघताय?” तळ हातातावरील सोयाबीन दाखवत अशोक गाटकळ विचारतायत. “बाजारात याला ३००० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल इतकी किंमत येती. पन यंदा जास्त माल तर डागाळलेला आन् बुरशी लागलेलाच हाय,” दुसऱ्या तळहातावरचं खराब झालेलं सोयाबीन दाखवत ते पुढे म्हणतात. “या असल्या मालाला काय बाजार नाय. कायीक कमाई नाय व्हायची यातून.”

११ नोव्हेंबरला रथगल्लीतल्या त्यांच्या शेतात गेल्यावर गाटकळ खराब झालेलं पीक कोयत्यानं सपासप कापत होते. ते एकटेच राबत होते. “मजुरी द्यायला कसं परवडायचं?” कपाळ आणि नाकावरून टपाटपा गळणारा घाम ते पुसून टाकत ते विचारतात.

ऑक्टोबर महिन्यात जवळजवळ दोन आठवडे गाटकळ यांच्या तीन एकरातली पिकं पाण्याखाली होती. अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातलं जवळपास ९० टक्के सोयाबीन सडून गेलंय. नाशिक जिल्ह्यात १ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरच्या दरम्यान १७३.२ मिमी इतका पाऊस कोसळला. त्यांचं गाव याच नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यात आहे. (भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार) एरवी या कालावधीत ७१ मिमी इतका पाऊस पडतो.

रथगल्लीत पावसाळ्याच्या सुरूवातीला जूनमध्ये पाऊस कमी होता मात्र सप्टेंबरच्या अखेरपर्यंत त्याने बराच जोर धरला, यामुळे ५१ वर्षांच्या अशोक गाटकळ यांना चांगलं पीक होईल अशी आशा होती. पण अचानक पडललेल्या पावसामुळे ते पूर्णच खचून गेले. ऑक्टोबरच्या अखेरीस, तलाठी कार्यालयात त्यांनी त्यांचा पीकनुकसानीची माहिती दिली, मात्र दोन आठवडे पालटले तरी अद्याप पाहणीसाठी कोणीही फिरकले नाही.

The soybean crops on Ashok Gatkal’s three acres were submerged for close to two weeks in October
PHOTO • Jyoti
The soybean crops on Ashok Gatkal’s three acres were submerged for close to two weeks in October
PHOTO • Jyoti

ऑक्टोबरमध्ये अशोक गाटकळ यांच्या तीन एकरातलं सोयाबीन जवळजवळ दोन आठवडे पाण्याखाली होतं

“अधिकाऱ्यांची वाट पाहत राह्यलो, तर रब्बीचं पीकही हातचं जाईल. पंचनाम्यासाठी अजून वाट नाय पाहू शकत. नोव्हेंबरचा पंधरवडा आला, गव्हासाठी वावर तयार करावंच लागेल. किती दिवस रान असंच ठेवणार?,” ते सांगतात.

दरवर्षी अशोक यांच्या हातात ऑक्टोबरपर्यंत १५ ते २० क्विंटल सोयाबीन आणि जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत ३० क्विंटल गहू येतो. बियाणं, खत, मजुरी, ट्रॅक्टरचं भाडं आणि इतर खर्च वगळूनअशोक यांचं वार्षिक उत्पन्न ८०,००० ते १,२०,००० रुपये इतकं होतं. त्यांच्या पत्नी चंद्रिका, वय ४८, त्याही शेतात काम करतात. आणि तिशीत असणाऱ्या त्यांच्या दोन्ही मुलांची लग्नं झालीयेत आणि दोघंही दिंडोरी तालुक्यातच गवंडी काम करतात.

“मागच्या वर्षी राखी पौर्णिमेनंतर [ऑगस्ट महिना] पाऊस गायबच झाला. पिकांना पाणीच नाय मिळालं,” पावसाचा लहरीपणा वाढत असल्याबद्दल ते म्हणतात. “[वाघाड] धरणातलं पाणी मिळावं म्हणून पाटबंधारे विभागाला एका दिवसाचे ६००० रुपये भरले. पन मला नाय वाटत दोन क्विंटलहून जास्त सोयाबीन व्हईल. २०,००० येतील हातात. गव्हाच्या पेरणीचा अजून काय पत्त्या नाय. पहिल्यानेच एवढं मोठं नुसकान झालंय.”

अशोक यांच्या शेतापासून सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरावर, बोरस्तेवाडीत तुषार मावळ त्यांच्या तीन एकरवरील टोमॅटोच्या रोपांवर औषधांची फवारणी करतायंत. तिथलं साचलेलं पावसाचं पाणी नोव्हेंबरच्या सुरूवातीपर्यंत ओसरलं नव्हतं.

On Tushar Mawal's tomato farm, the buds and flowers rotted, so there won't be any further crop growth this season
PHOTO • Jyoti
On Tushar Mawal's tomato farm, the buds and flowers rotted, so there won't be any further crop growth this season
PHOTO • Jyoti

तुषार यांच्या टोमॅटोच्या शेतात, कळ्या आणि फुलं कुजलीत, ज्यामुळे या हंगामात तरी फळ लागणार नाहीये

“मी २० किलो सडलेले टोमॅटो फेकून दिले,” २८ वर्षांचे शेतकरी सांगतात. “रोपांची फुलं जास्त पावसानं सडून मेली, मग अजून टोमॅटो नाय यायचे. औषधं मारून वाचवायचा प्रयत्न तर सुरू हाये, पन एक टनपेक्षा जास्त टोमॅटो निघतील असं नाय वाटत . बाजारभाव पन कमी हाय [१०-११ रुपये प्रती किलो]. केलेला खर्च पन नाय निघायचा माझा. अधिकारी यायची वाट बघतोय, नुकसानीची पाहणी करायला.”

नाशिक जिल्ह्यातल्या १,९२६ गावांमध्ये, अशोक आणि तुषार सारखे ३,१७,३७९ हून अधिक शेतकरी (दिंडोरी तहसीलदार कार्यालयातील आकडेवारीनुसार) पिकं हाती येतानाच पडलेल्या अवकाळी पावसानं केलेल्या नुकसानीचा कसा मुकाबला करायचा याने गांगरून गेलेत. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र (नाशिक जिल्हा या विभागात मोडतो) आणि मराठवाड्यात १ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान १८३.१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. एरवी या काळात या प्रदेशांमध्ये सरासरी ८०.१ मिमी इतका पाऊस होतो. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, भात, भुईमूग, मका, टोमॅटो सारख्या खरीप पिकांचा दर्जा आणि एकूण उतारा घटला असल्याचं राज्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

बोरस्तेवाडीच्या वेशीवर, सरला बोरस्ते, वय ५२, अति पाण्यामुळे त्यांची द्राक्षाची बाग कशी बाधित झालीये हे मला दाखवत होत्या. सप्टेंबरमध्ये त्यांनी तीन एकरावरील त्यांच्या द्राक्ष वेलींची छाटणी केली होती. द्राक्षांची वाढ होण्यासाठी साधारण ११०-१२० दिवसांचा कालावधी लागतो. पण ऑक्टोबरच्या अचानक आलेल्या पावसामुळे पानांवर डावण्या [डावनी मिल्ड्यू] नावाचा रोग बळावला आहे, यासोबत फुलांची वाढही खुंटली आहे. “ऑक्टोबरचा फुलोऱ्याचा महिना महत्त्वाचा असतो,” सरला सांगतात. “या वेळेपर्यंत द्राक्षांचे लहान-लहान घड तयार व्हायला हवे होते. मी जवळजवळ तीन लाख गुंतवलेत शेतीत. सगळं नुकसान आहे.”

This is a complete loss', says Sarala Boraste at her grape orchard.
PHOTO • Jyoti
What will I earn from these rotten groundnuts', ask Rohini Boraste
PHOTO • Jyoti

डावीकडे: ‘सगळंच नुकसान आहे’, सरला बोरस्ते त्यांच्या द्राक्षाच्या बागेत सांगतायत. ‘या सडलेल्या शेंगांतून काय कमवायचं मी,’ (उजवीकडे बसलेल्या) रोहिणी बोरस्ते म्हणतात

६ नोव्हेंबरला, माध्यमांनी प्रसारित केलेल्या बातम्यांनुसार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अवकाळी पावसामुळे राज्यात ७० लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असल्याचं, तसंच यामुळे ६० लाख शेतकरी बाधित झाले असल्याचं म्हटलं होतं. ते असंही म्हणाले की १९ लाख हेक्टरवरील कापूस आणि ११ लाख हेक्टरवरच्या सोयाबीनच्या पेरण्याही पूर्णत: वाया गेल्या आहेत.

३ नोव्हेंबरला (माजी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०,००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आणि विमा कंपन्यांकडून दिली जाणारी नुकसान भरपाई तात्काळ मिळेल याची खात्री करून घेण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. शेतकरी मात्र या घोषणांच्या अंमलबजावणीबाबत गोंधळात पडलेत. कारण भाजपा-शिवसेना युती सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्याने १२ नोव्हेंबरपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

“राज्याला आता कोणी वालीच नाही राह्यला, घोषणा आणि आश्वासनं काय कामाची,” तुषार म्हणतो. “त्यांच्या योजनांचं [प्रधानमंत्री पीक विमा योजना] गावपातळीवर काय होतोय त्याचा आधी त्यांनी अभ्यास केला पाहिजे. शेतकऱ्याने जास्त हप्ता भरायचा आणि मिळणारी नुकसान भरपाई अगदी तुटपुंजी. वर वेळही खूप जातो. बऱ्याच शेतकऱ्यांना भरपाई मिळतही नाही, मग हप्ता भरण्याचा काय उपयोग?”

तुषार यांच्या शेतापासून काही अंतरावरच रोहिणी बोरस्ते, वय ३५, भुईमुगाच्या सडलेल्या ढिगाऱ्यातून चांगल्या शेंगा वेचत बसल्या होत्या. “मुख्यमंत्रीच्या खुर्चीसाठी त्यांच्यात[भाजप-शिवसेना] रस्सीखेच सुरू आहे त्यात ते व्यस्त आहेत. पण या सगळ्यात हाल भोगावे लागणाऱ्या मजुर आणि शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्यावर लय अडचणीची वेळ आहे आज, सरकारनं तातडीनं काय तरी केलं पायजेल. पन त्यांना कसलं काय कोनाचं पडलंय?”

रोहिणी यांच्या दोन एकर शेतातील भुईमुगाचं पीक ऑक्टोबर महिन्यात पाण्याखाली गेलं होतं. “पाऊस थांबलाच नाय नं. या सडलेल्या शेंगातून मी काय कमवायचं? त्यांनाच [भाजप-शिवसेना] विचारा,” त्या म्हणतात. रोहिणी यांनी दोन आठवडे नुकसानीच्या पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांची वाट पाहिली, पण शेवटी गव्हाच्या पेरणीसाठी शेत मोकळं करावं लागलं.

On Sarala Boraste's farm, labourers taking a break from spraying pesticides on infected grape plants.
PHOTO • Jyoti
Sunil and Uma Wasale are landless farm labourers, whose work has nearly dried up this year
PHOTO • Jyoti

डावीकडे: सरला बोरस्ते यांच्या बागेत द्राक्षांच्या वेलींवर औषध मारणारे मजूर विश्रांती घेतायत. उजवीकडे: सुनील आणि उमा वसाळे भूमीहीन शेतमजूर आहेत, यंदा त्यांना मिळणारं काम घटलंय

दिंडोरी तहसीलदार कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात पंचनाम्याची प्रक्रिया ९ नोव्हेंबरपर्यंत ९० टक्के पूर्ण झाली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील २,८५,४६८ हेक्टरवर पेरा असणाऱ्या ३३ टक्के खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. मात्र प्रत्येक बाधित शेतकऱ्याला मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम संपूर्ण जिल्हाच्या पंचनाम्यानंतरच ठरवली जाणार आहे.

पावसाने घातलेल्या थैमानामुळे शेतमजुरांचं कामही घटलं आहे. काढणीच्या दिवसात ते गावोगावी भटकंती करत असतात. सुनील वसाळे, वय ३४, हा सुरगाणा तालुक्यातल्या मुरूमदारी गावातून १ नोव्हेंबरला आपली पत्नी उमा आणि ९ वर्षांच्या मुलासोबत दिंडोरीला आलाय. दर वर्षी ऑक्टोबरच्या सुरूवातीला ते दुसऱ्या गावांमध्ये स्थलांतर करतात आणि टोमॅटो, भुईमूग, सोयोबीन काढणीची कामं घेतात. यंदा पावसाचा मुक्काम जास्त लांबल्यानं त्यांनी उशिराच आपलं गाव सोडलं. ते जेव्हा दिंडोरीत दाखल झाले तेव्हा सर्व शेतं पाण्याखाली होती. “पानी कमी व्हायची वाट बघावी लागली. ७ नोव्हेंबरला पावसाचा मार बसलेल्या द्राक्षाच्या बागेतऔषधं मारायचं काम मिळालं, [प्रत्येकी] २०० रुपये दिवसावर,” तो सांगतो.

“आमाला जमीन नाय, मग असंच फिरावं लागतं. कापणी आनं पेरणीच्या वेळस कमाई होते थोडी. पन या वेळंला नेहमीच्या शेतकऱ्यांकडे काय काम नाय मिळालं,” उमा सांगते.

चौथीत शिकणारा त्यांचा मुलगा, कपिल शाळा अर्धवट सोडून सोबत आलाय. “आमच्या मागं घरी बघायला कोनी नाय ना. त्याचं शिक्षन मागं राहतं मग,” सुनील म्हणतो. “आमच्या पोराचं भविष्य आमच्या इछेनुसार नाय पाहता येत आणि पाऊस पन कधी आपल्या मनासारखा नाय पडत. आणि आमचं दु:ख त्या मंबईत बसनाऱ्यांना[राजकारणी] कुटं कळतंय.”

अनुवादः ज्योती शिनोळी

Jyoti

জ্যোতি পিপলস্‌ আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়ার বরিষ্ঠ প্রতিবেদক। এর আগে তিনি 'মি মারাঠি' মহারাষ্ট্র ১' ইত্যাদি সংবাদ চ্যানেলে কাজ করেছেন।

Other stories by Jyoti
Translator : Jyoti

জ্যোতি পিপলস্‌ আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়ার বরিষ্ঠ প্রতিবেদক। এর আগে তিনি 'মি মারাঠি' মহারাষ্ট্র ১' ইত্যাদি সংবাদ চ্যানেলে কাজ করেছেন।

Other stories by Jyoti