२०१८ चा नोव्हेंबर महिना. दिवाळीच्या आदल्या दिवशीची सकाळ होती. पश्चिम ओडिशातून आलेला ३०-४० वादकांचा एक ताफाच रायपूरच्या बुद्ध तलाव चौकात जमला होता. त्यांचा पेहराव आणि वाद्यांवरुन मी समजून चुकलो की ते बालंगीर, कालाहंडी किंवा नुआपाडा जिल्ह्यातलेच असले पाहिजेत. ते सगळे गंडा या अनुसूचित जातीचे होते.

त्यांच्या कार्यक्रमाला स्थानिक भाषेत गाना-बजा’ म्हणतात. (महाराष्ट्रात बँडवाले असतात तसे) हे लोकसंगीत ओडिशात लोकप्रिय आहे. लग्न, पूजा आणि इतर सण-समारंभ यानुसार त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळा ताल, वाजवण्याच्या वेगवेगळ्या शैली असतात. सुमारे ५-१० वादक – त्यातही परंपरेनुसार, फक्त पुरुष मंडळीच - एक मंडळ किंवा ताफा तयार करतात, प्रत्येकजण ढाप, ढोल, झांज, माहुरी, निशान आणि ताशा अशी पारंपारिक वाद्यं आणतात, वाजवतात.

पश्चिम ओडिसातील कोसली (किंवा संबलपुरी) भाषेत मी त्या वादकांना विचारलं, की ते कुणाची वाट पाहत आहेत? माझं बोलणं ऐकून, बालंगीर (किंवा बोलांगीर) जिल्ह्याच्या टिटलागढ तहसीलमधील कंदाखल गावचे आणि साधारण ३० वर्षांपासून इथं येत असणारे - बेनुधर चुरा म्हणाले, “आम्ही राऊत-नाचा पार्ट्यांची वाट पाहत आहोत. त्यांचा नाच असतो ना, त्याच्यासाठी आमच्याशी बोलणी करतील.”

Benudhar Chhura with his Gana-baja troupe
PHOTO • Purusottam Thakur
A member of the Raut community (with the cycle) watches and evaluates a Gana-baja performance
PHOTO • Purusottam Thakur

डावीकडे: बेनुधर चुरा मागील तीन दशकांपासून त्यांचा ‘गाना-बजा’ बँड घेऊन  रायपूरला येत आहेत. जवळपास २० वर्षांचे असतानाच त्यांनी हे काम सुरू केलं, एक बँड तयार केला. आता ते साधारण पन्नाशीचे आहेत. उजवीकडे: राऊत समाजाचे एक सदस्य (सायकलसोबत) ‘गाना-बाजा’ बँड कार्यक्रम आणि त्यांची कला बारकाईने पाहतायत

राऊत किंवा यादव (ओबीसी) समाज दिवाळीत गोवर्धन पूजा साजरी करताना ‘राऊत-नाचा’ नावाचं नृत्य सादर करतात. “त्या नृत्यासाठी त्यांना संगीत गरजेचं असतं. ते येतात आणि सगळं पाहून योग्य तो बँड निवडतात,” ही माहितीही बेनुधर यांनीच दिली.

तुमच्या बँडला किती बिदागी देतील आणि तुम्ही इथं किती दिवस राहाल? मी त्यांना विचारलं. “ते त्यांच्या मनावर आहे. १५,००० रुपयांपासून ते ४०,००० रुपयांपर्यंत. ते डान्स पार्टीवर अवलंबून असतं आणि ते कोणता बँड निवडतात यावरही. आमच्याशी ते एक हप्त्याची बोली करतात किंवा आठ दिवसांसाठीची. तुम्हीच बघा, शेकडो बँड हे काम मिळण्यासाठी वाट पाहत असतात. ‘राऊत-नाचा’ पार्टी येईल आणि ‘गाना-बजा’ला निवडेल. गौरी-गौराची पूजाही यावेळी केली जाते, मग बँड जर त्यासाठीच निवडला गेला असेल तर बोली दोन दिवसांचीच असते आणि त्याचे आम्हाला फक्त १५,०००-२०,००० [रुपये] मिळतील.”

तुम्ही केव्हापासून इथे येताय, मी जवळच उभ्या असलेल्या शंकर सगरियांना विचारलं. ते बालंगीर जिल्ह्यातील सरगुल गावचे आहेत. “मी गेल्या १२ ते १५ वर्षांपासून इथं येतोय,” असं त्यांनी सांगितलं. "माझ्या सोबतचा वादक - उपासू तर माझ्यापेक्षाही जास्त काळापासून येतोय." मग मी उपासूंना विचारलं, की ते त्यावेळेस किती कमावत होते. “७००० ते ८००० रुपयांपर्यंत” त्यांनी आठवून सांगितलं.

Gana baja troupes display their musical prowess to Raut-nacha members
PHOTO • Purusottam Thakur

वर डावीकडे: बालंगीर जिल्ह्यातील सरगुल गावातले शंकर सागरिया. ते निशाण वाजवतात म्हणून निशानवाला. चामड्याचा आणि लोखंडाचा एक ढोल म्हणजेच निशाण गाना-बाजा बँडच्या मध्यभागी असतो. वर उजवीकडे: गाना-बाजाच्या ताफ्यातील एक ट्रान्सजेंडर व्यक्ती नाचत आहे; वादकांचं वादन ऐकून त्यावरच त्यांना काम मिळेल की नाही हे ठरत असतं. खाली डावीकडे: गाना-बाजाचे बँड त्यांचं गाणं-बजावणं किती जोरकस आहे ते राऊत नाचा पार्टीसमोर सादर करतात. खाली/ तळाशी उजवीकडे: एक माहुरिया आहे, जो माहुरी (ट्रम्पेट) वाजवतो, त्याचा बँड चांगला आहे, हे सिद्ध करण्याचा तो अतोनात प्रयत्न करतो – राऊत नाचांनी त्याचा बँड निवडावा ही आशा तो मनी बाळगून आहे

जेव्हा तुम्ही तुमच्या गावी असता, ताफ्यासोबत नसता, तेव्हा तुम्ही काय करता? “आम्ही सगळे छोटे/अल्पभूधारक शेतकरी आहोत, शेतमजूर आहोत. म्हणून भातशेती, सुगीचा काळ संपल्यावरच, आम्ही लग्न समारंभांना आणि अशा बाकीच्या कार्यक्रमांना जातो.  वाजंत्री म्हणून काम करतो. आणि मग आम्ही दिवाळीची वाट बघतो आणि त्यासाठी  रायपूरला येतो,” शंकर सगरिया सांगतात.

मी ऐकलं होतं, की मागे ओडिशाच्या त्या भागात दुष्काळ पडला होता, म्हणूनच मी कळीच्या मुद्याकडे चर्चा वळवली. अशा काळात पीक-पाण्याचं काय होतं?  आताही तिथं दुष्काळ आहे का? “आतासुद्धा दुष्काळ पडलाय, आमची पिकं हातची गेली आहेत,” उपासू म्हणतात.

आम्ही बोलत असताना, एक बँड वाद्यं वाजवू लागला आणि मी त्यांना पाहण्यासाठी पलीकडे गेलो. राऊत समाजातील तीन जण गात होते आणि गाना-बाजाची वादक मंडळी  वाद्यं वाजवत होती. - राऊतांना स्वतःच्या ताफ्याकडे आकर्षित करण्याचा अगदी अतोनात प्रयत्न करत होती, जेणेकरून त्यांची निवड केली जाईल.

The Raut-nacha dancers use this stick while dancing.
PHOTO • Purusottam Thakur
People from Achhoti are taking the musicians to the village in an autorickshaw
PHOTO • Purusottam Thakur

डावीकडे: राऊत-नाचाचे नर्तक नाचताना ही काठी वापरतात. उजवीकडे: दुर्ग जिल्ह्यातील अछोटीमधील लोकांनी गाना-बजाच्या ताफ्याशी बोली केली आणि आता ते या वादकांच्या ताफ्याला घेऊन, ऑटोरिक्षाने त्यांच्या गावी निघाले आहेत

थोड्याच अंतरावर, गाना-बाजाच्या बँडमधल्या एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने नाचण्यास सुरुवात केली आणि लक्ष वेधून घेतलं. तर पलीकडे गाना-बाजा बँड आणि काही राऊत-नाचाचे नर्तक रिक्षात बसून निघाले होते. मी धावत जाऊन ढोलकीवादकाला विचारलं: सौदा कितीचा झालाय?

“सात दिवसांसाठी १८,५०० रुपये,” तो म्हणाला. कोणत्या गावात जाणार आहात तुम्ही? तो उत्तर देणार इतक्यात राऊत समाजातील आणि छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील अछोटी गावचे सोनूराम यादव म्हणाले, "आम्ही या बँडची निवड केली आहे आणि त्यांना घेऊन आम्ही आठ दिवसांचं आयोजन करु."

Purusottam Thakur

পুরুষোত্তম ঠাকুর ২০১৫ সালের পারি ফেলো। তিনি একজন সাংবাদিক এবং তথ্যচিত্র নির্মাতা। বর্তমানে আজিম প্রেমজী ফাউন্ডেশনে কর্মরত পুরুষোত্তম সমাজ বদলের গল্প লেখায় নিযুক্ত আছেন।

Other stories by পুরুষোত্তম ঠাকুর
Translator : Prajakta Dhumal

Prajakta Dhumal is a communicator and facilitator in the field of gender equality, health and sexuality education. Based in the Purandar block of Pune district Prajakta writes, edits and translates.

Other stories by Prajakta Dhumal