दररोज सकाळी, अरिफ (डावीकडे) आणि शेरू (गाढव) मांडव्याच्या गल्लीबोळात फिरून फळं आणि भाज्या विकतात. कोबी, फ्लॉवर, भेंडी, वांगी, केळी आणि इतरही बराच भाजीपाला लादलेली गाडी शेरू ओढतो आणि याआधी बांधकाम कामगार असलेले ४० वर्षीय अरिफ मोहम्मद आणि त्यांचा मदतनीस (ज्यांनी नाव सांगायला नकार दिला) दोघं राजस्थानच्या झुनझुनु जिल्ह्यातल्या या गावात नेहमीच्या आणि नव्या गिऱ्हाइकांशी घासाघीस करतात. आठ एक तास थोडाफार भाजीपाला विकून झाला की संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते थांबतात. तोवर अरिफ सांगतात, ३००-४०० रुपयांची कमाई झालेली असते. एवढं बोलून ते घाईघाईने पुढे निघतात. ऐन धंद्याची वेळ आहे आणि शेरू देखील चुळबुळ करतोय.

कधी काळी राजस्थानात, खास करून बारमेर, बिकानेर, चुरू आणि जैसलमेर जिल्ह्यात असे असंख्य शेरू होते. आणि अगदी आजही, भारतातल्या दर पाचातलं एक गाढव याच राज्यात आहे. पण २० व्या पशुधन जनगणनेचे (२०१९) आकडे सांगतात की गाढवांची संख्या झपाट्याने खालावत चालली आहे. भारतभरात, त्यांचा आकडा २०१२ च्या जनगणनेत ३,३०,००० वरून २०१९ च्या जनगणनेत १,२०,००० असा, ६२ टक्क्यांनी घटला आहे. राजस्थानात तर ही घसरण जवळ जवळ ७२ टक्के – ८१,००० वरून २३,००० इतकी झालीये.

PHOTO • Sharmila Joshi

राजस्थानातल्या भटक्या पशुपालकांसाठी किंवा अगदी गरीब समुदायांसाठी ही काही चांगली घडामोड नाही. कारण त्यांच्यासाठी गाढव हा उपजीवेकिचा मुख्य नसला तर महत्त्वाचा स्रोत आहे. प्रचंड उष्ण वातावरणात किंवा चारा टंचाईसारख्या परिस्थितीतही इतर जनावरांच्या तुलनेत गाढवं तगून राहू शकतात. मात्र अवजड आणि अति कामामुळे त्यांना हालही सोसावे लागतात.

छोट्या अंतरासाठी वाहन म्हणून, माल वाहून किंवा लादून नेण्यासाठी त्यांचा वापर आता मागे पडत चाललाय आणि हे त्यांच्या घटत्या संख्येमागचं मोठं कारण आहे. गाढवं पाळणाऱ्या गरिबातल्या गरीब समुदायांनी त्यांचा कामधंदा बदलल्यामुळेही त्यांना आता त्यांची नीट देखभाल ठेवता येत नाहीये.

पुढची पशुधन गणना होईल तेव्हापर्यंत तर गाढवांची संख्या आणखीच रोडावली असेल. खास करून टाळेबंदीच्या काळात लोकांच्या उपजीविका ज्या झपाट्याने हिरावून घेतल्या गेल्या त्या पाहता आपल्या आणि आपल्या गोतांच्या हातून वेळ निसटून चाललीये याची जाणीव होऊन तर शेरू चुळबुळ करत नसेल ना!

अनुवादः मेधा काळे

Sharmila Joshi

শর্মিলা জোশী পিপলস আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়ার (পারি) পূর্বতন প্রধান সম্পাদক। তিনি লেখালিখি, গবেষণা এবং শিক্ষকতার সঙ্গে যুক্ত।

Other stories by শর্মিলা জোশী
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে