कारगिलच्या मुख्य बाजारातून फेरफटका मारला तर एक वळणावळणाची अरुंद गल्ली लागते. दोन्ही बाजूला दुकानं. प्रत्येक दुकानाबाहेर रंगीबेरंगी रुमाल आणि ओढण्या फडफडत असतात. आणि आतमध्ये सलवार कमीझचं कापड, गरम कपडे, दागिने, चपला, लहान मुलांचे कपडे आणि किती तरी वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात.
हे आहे ‘कमांडर मार्केट’, स्थानिकांच्या मते याचं असं नाव पडण्याचं कारण म्हणजे ही दुकानं ज्या जागेवर उभी आहेत ती जागा एका ‘कमांडर’च्या मालकीची आहे. आणि इथल्या सगळ्या दुकान मालकिणी शिया आहेत.
लडाखच्या सीमेवर जवळच कारगिल वसलंय, मागे हिमालयाच्या पर्वतरांगा. १९४७ मध्ये फाळणीने भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषा तयार केली गेली तोपर्यंत मध्य आशियाच्या रेशीम मार्गावरचं दक्षिणेकडचं हे महत्त्वाचं ठिकाण होतं. या शहराच्या ११,००० लोकसंख्येत (जनगणना २०११) प्रामुख्याने मुस्लिम आहेत, काही बौद्ध आणि थोडीफार शीख कुटुंबं. त्यांच्या अनेक पिढ्यांनी आजतोवर तीन युद्धं पाहिली आहेत, त्यातलं अखेरचं होतं १९९९ सालचं.
कमांडर मार्केटमधलं पहिलं दुकान तीस वर्षांपूर्वी एका बाईने सुरू केलं. तेव्हा या जागेला कमांडर मार्केट हे नाव मिळालं नव्हतं. तिला खूप विरोध झाला आणि वाईट वागणूक सहन करावी लागली, असं सध्याची दुकान मालकीण सांगते आणि त्यामुळेच तिचं नावही सांगायला ती तयार नाही. मात्र कालांतराने त्या पहिल्या दुकान मालकिणीच्या संघर्षापासून प्रेरणा घेऊन इतर दोघीतिघींनी त्याच ठिकाणी भाड्याने जागा घेतल्या. आता या जागेत सुमारे ३० दुकानं आहेत, आणि त्यातली फक्त तीन वगळता सगळी दुकानं बाया चालवतात.
१० वर्षांमागे कारगिलमध्ये सार्वजनिक ठिकाणी क्वचितच कुणी बाई दिसायची. त्या पार्श्वभूमीवर कमांडर मार्केटचं हवं तितकं कौतुक केलं गेलं नाही असंच म्हणावं लागेल. इथल्या तरुण दुकानदारांच्या मते साक्षरतेत वाढ होत असल्यामुळे हा बदल घडून आला आहे (२००१ मध्ये ४२% ते २०११ मध्ये ५६%). दुकान चालवणाऱ्या बायांना मिळालेलं आर्थिक स्वातंत्र्य पाहूनही इतर काही जणी मार्केटमध्ये सामील झाल्या – काहींना कमावणं गरजेचं होतं तर काही त्यांच्या पूर्वजांची प्रेरणा घेऊन आल्या होत्या. त्या म्हणतात, कारगिलने हा बदल आता स्वीकारला आहे.
मी या फोटो निबंधासाठी जेव्हा कमांडर मार्केटला भेट द्यायला गेले तेव्हा काही जणींनी कॅमेऱ्यासमोर यायचं टाळलं, काहींना त्यांचा फोटो छापला जाईल याबाबत चिंता होती आणि काही जणींना त्यांचं पूर्ण नाव सांगायचं नव्हतं. पण बहुतेक जणींनी आनंदाने आणि अभिमानाने त्यांची कहाणी मला सांगितली.