हिंदू धर्म आणि देव नाकारणारे आंबेडकर मुक्ताबाई जाधवांच्या छोटेखानी घरात, सगळ्या देवांच्या रांगेत ठामपणे उभे आहेत. एप्रिल १९९६ मध्ये त्यांच्या काही ओव्या ओवी संग्रहासाठी रेकॉर्ड केल्या होत्या. २०१७ मध्ये बीड जिल्ह्यातल्या भीम नगरमध्ये आम्ही त्यांची परत एकदा भेट घेतली.

"मुक्ताबाईच घर कोणतं"?, असं विचारल्यावर एका बाईने दहा बाय पंधराच्या एका चौकोनी खोलीकडे बोट दाखवलं. एका बाजूला तारेने पत्र्याचे तुकडे जोडून बंदिस्त कुंपण केलेलं होतं. त्यातून उरलेल्या फटीतून एक उघडा  दरवाजा दिसत होता. एक आजीबाई फटीतून डोकावल्या. बहुधा याच मुक्ताबाई असाव्यात. एप्रिल १९९६ मध्ये माजलगावच्या भीमनगरमध्ये आम्ही त्यांच्या ओव्या ऐकल्या होत्या. दोन ते तीन तासांच्या भेटीत आम्ही त्यांच्या ओव्या रेकॉर्ड केल्या होत्या.

आज, बरोबर २१ वर्षांनी मी भीमनगरमध्ये आलो होतो. अलगदपणे तारेची कडी काढून  पत्र्याचा दरवाजा उघडत मुक्ताबाई म्हणाल्या," या देवा!! ". निळी साडी, गळ्यात भली मोठी मण्याची माळ, कपाळावर लावलेला बुक्का, काळेभोर केस, अंदाजे साठीच्या असलेल्या मुक्ताबाई किंचित खाली वाकत, आम्हाला हात जोडत पुन्हा म्हणाल्या, "या देवा!!".


Muktabai Jhadav, in her house


घराच्या दरवाजा समोरच डाव्या हाताला दोन खड्डे आणि त्यामध्ये पाण्याचा नळ. कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे ते भरता यावे म्हणून हे खड्डे तयार केल्याचं दिसत होतं. गटार ओलांडून स्वतःला जपत आम्ही आत शिरलो. दरवाजातून आत डोकावल्यावर घरात अनेक गोष्टींची दाटी झालेली दिसत होती. बारा बाय पंधराच्या खोलीत मुक्ताबाईंचा सारा संसार होता. टीव्हीवर आस्था चॅनल चालू होता. एका बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. त्याच फोटोवर त्यांनी घेतलेल्या २२ प्रतिज्ञा लिहलेल्या होत्या (टीप पहा). शेजारीच तुळजापूरच्या देवीचा फोटो होता. सैलानी बाबा, प्रजापिता विश्वब्रम्हकुमारी, दत्त आणि इतर असंख्य देवतांचे फोटो भिंतीवर टांगलेले होते. भिंतीत असलेल्या देव्हाऱ्यामध्येही काही देव विराजमान झालेले होते. असंख्य देवतांच्या या गर्दीत मुक्ताबाईंनी आम्हा चौघांना जागा दिली.

(टीपः दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीव रबौद्ध धर्मात प्रवेश केला. त्या वेळी त्यांनी सगळ्यांना दीक्षा देताना २२ प्रतिज्ञा घेतल्या. दीक्षाभूमीवरील स्तंभावर त्या कोरलेल्या आहेत. बौद्ध धर्माचे मूलाधार असणारे बुद्ध, धम्म आणि संघ, त्यासोबतच हिंदू धर्मातील अनिष्ट रुढी परंपरांचा त्याग, समानतेवरील विश्वास आणि समानता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा यामध्ये समावेश आहे.)

जमिनीवर एक शाल टाकून मुक्ताबाईंनी आमची बसण्याची व्यवस्था केली. मी त्यांना म्हणालो, "मागे आलो होतो तेव्हा तुम्ही डॉ. आंबेडकरांवरील ओव्या सांगितल्या होत्या. आता पुन्हा तुमच्या ओव्या ऐकायच्या आहेत", त्यावर मुक्ताबाईंनी आम्हाला बाबासाहेबांवरील ओवी ऐकवली

"गेले गेले भीमराज,

चंदनपाट टाका न्हाया

भीमा तुम्हाला ओवाळाया

अख्ख्या मुंबईच्या बाया "


नंतर त्यांनी आणखी काही ओव्या सांगितल्या. पण त्या अर्धवट होत्या. शब्द आठवेनात म्हणून मुक्ताबाईंनी डोळ्याला पदर लावला.  मुक्ताबाई आम्हाला पुन्हा पुन्हा जेवायचा, काहीतरी खायचा आग्रह करत होत्या. कढईत केलेल्या भाजीकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, "देवा, थोडं तरी खा. माझ्याकडे आलेला माणूस तसा कधीच जात नाही. चहा तरी करते." चहा नको म्हटल्यावर त्यांनी भला मोठा चमचा भरुन साखर दिली. त्यातील चिमूटभर साखर घेवून आम्ही तोंड गोड केलं. मुक्ताबाई म्हणाल्या, " नारळ तरी घेवून जा देवा,  माझ्याकडे आलेला कोणीही रिकाम्या हाताने जात नाही". त्यांनी घरातील एक नारळ मोठ्या प्रेमाने मला दिला. निरोप देताना त्या पुन्हा म्हणाल्या, " या देवा !!"


व्हिडिओ पहाः आसपासच्या माणसातच देव पहायचा


२० वर्षांपूर्वी ओव्या गोळा करत असताना परभणीला गंगुबाई अंबोरे भेटल्या होत्या. कुष्ठरोग झाला आणि घर दुरावलं म्हणून देवळालाच घर करणा-या गंगुबाई ‘आकाशातील चंद्र माझ्या अंगणात येतो’ याचा आनंद व्यक्त करत होत्या. आणि इथे मुक्ताबाईंनी तर घरालाच मंदिर बनवलं होतं. या मंदिरात त्या माणसातल्या देवांना बोलवत होत्या. या देवा...

मुक्ताबाईंना मुलबाळ नाही. पती वारले. त्यामुळे घरी त्या एकट्याच असतात. त्यांच्या एकटीच्या जीवनात आपुलकीचा ओलावा टाकणारं आपलं माणुस नव्हतं. म्हणूनच की काय त्यांच्या घरातील टीव्ही सारखा चालू होता. शेजारी पाजारी देतात, त्याच्यावरच त्यांची गुजराण होत होती.

विविध विचारधारा, संप्रदायाची दैवतं त्यांच्या घरामध्ये होती. त्यांचं एकटेपण देवाचा धावा करत होतं. आपल्याकडे माणूस येणार नसेल तर निदान देव तरी नक्की येईल आणि येणारा माणूस आपल्यासाठी देवच असेल... म्हणून तर त्या, या देवा म्हणत नसाव्यात ना.... त्यांचं एक वाक्य पुन्हा पुन्हा मला आठवत होतं. "मन नाही बदललं तर भगवान बदलत नाही. कष्ट करायचं आणि परमेश्वर बघायचं".

मुक्ताबाईंच्या आयुष्याचं गणित मला सुटत नव्हतं. तारेच्या कुंपणात बंदिस्त केलेलं घर, पण घराचा दरवाजा मात्र सदैव उघडा. एकीकडे देव नाकारणारे आंबेडकर, मात्र मुक्ताबाईच्या भिंतीवर देवांच्या रांगेत ठामपणे उभे. अजब आहे.

(टीप - माजलगाव मधील भीमनगरमध्ये राहणाऱ्या मुक्ताबाई जाधव यांना भेटायचा योग २ एप्रिल २०१७ रोजी बरोबर २१ वर्षानंतर जुळून आला होता. हे काही ठरवून वगैरे झालं नव्हतं. मुक्ताबाईंनी आम्हाला डॉ. आंबेडकरांवरील काही ओव्या सांगितल्या होत्या. ज्यांनी ओव्या सांगितल्या त्यांचे फोटो आणि फिल्म आम्हाला हव्या होत्या. माझ्याबरोबर नमिता वाईकर आणि संयुक्ता शास्त्री आल्या होत्या.)


Jitendra Maid

জিতেন্দ্র মেইদ স্বতন্ত্র সাংবাদিক হিসেবে শ্রুতি-ঐতিহ্য নিয়ে কাজ ও গবেষণা করেন। বেশ কয়েক বছর আগে পুণের সেন্টার ফর কোপারেটিভ রিসার্চ ইন সোশ্যাল সায়েন্সসে তিনি গবেষণা-সমন্বয়কারী হিসেবে গি পইটভাঁ এবং হেমা রাইরকারের সঙ্গে কাজ করতেন।

Other stories by Jitendra Maid
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে