“सगळे तरणेताठे आजारी पडले आणि गोळ्या खात होते. मी नाय. मी चालणं थांबवलं नाय,” अभिमानाने कमळी सांगतात.
वारली आदिवासी असणाऱ्या कमळी मार्च २०१८ मध्ये नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पल्ला पार करणाऱ्या ऐतिहासिक लाँग मार्चमधल्या ४०,००० शेतकऱ्यांपैकी एक. त्यांच्यासारख्या मेणाहून मऊ पण लढवय्या शेतकऱ्यांची चिकाटी पाहूनच सरकारला त्यांच्या सगळ्या महत्त्वाच्या मागण्या मान्य करणं भाग पडलं.
दोन महिन्यांनी, ३ मे रोजी कमळी पुन्हा एकदा रस्त्यात उतरल्या होत्या, या वेळी डहाणूमधल्या निर्धार मोर्चात सामील होण्यासाठी. लाँग मार्चप्रमाणे हा मोर्चादेखील अखिल भारतीय किसान सभेने आयोजित केला होता, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा त्यांचा निर्धार व्यक्त करण्यासाठी. या मोर्चालाही ३५,००० शेतकरी आले होते. दुपारच्या भाजून काढणाऱ्या उन्हात कमळी मोर्चासोबत चालत होत्या. लाँग मार्चचं यश आणि हा लढा पुढे कसा चालू ठेवायचा याबद्दल किसान सभेचे नेते काय सांगत होते ते त्या जिवाचा कान करून ऐकत होत्या.
कमळी बाबू बाहोटा या ज्येष्ठ क्रांतीकारी आहेत. ठाणे पालघरच्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सदस्य असणाऱ्या कमळी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या चरोटी नाक्याजवळ आवळवेडा पाड्यावर राहतात. आजवर शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. किसान सभेच्या दिल्लीत झालेल्या [२०१२ आणि २०१५] दोन सभांमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या.
कमळीचे पती आणि त्यांचे आजोबाही शेतकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये सहभागी होते. त्यांचे पती आता हयात नाहीत. त्यांचं कुटुंब दोन एकर वनजमीन कसतं, शिवाय त्यांना १९४८ मुंबई कूळ व शेतजमिनी कायद्याअंतर्गत मिळालेली पाच एकर जमीन आहे. “गेली वीसहून अधिक वर्षं आम्ही एकत्र काम करतोय,” ठाणे पालघरच्या जनवादी महिला संघटनेच्या सचिव लहानी दवडा सांगतात. “चाळीस वर्षं ती तिच्या जमिनीच्या तुकड्यासाठी झगडतीये.”
राज्यभरातले आदिवासी शेतकरी २००६ च्या वन हक्क कायद्यानुसार त्यांच्या हक्काच्या वनजमिनींसाठी लढा देत आहेत. बहुतेकांकडे जमिनींचे नोंदणीकृत पट्टे नाहीत, काहींकडे पट्टे आहेत मात्र सर्वेक्षणात त्यांच्या जमिनी कमी मोजण्यात आल्या आहेत. “इतरांप्रमाणेच कमळीनी पण तिच्या जमिनीची मोजणी व्हावी म्हणून अर्ज केलाय. काही वेळा सोबत कागदपत्रं नाहीत म्हणून अर्ज फेटाळला जातो किंवा अर्जदाराला [निबंधकाकडे जमिनीची नोंद होण्यासाठीचा] अर्जच मिळत नाही,” दवडा सांगतात.
त्यांचं वय तरी काय? कमळी हसतात. त्यांना काही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये. लहानी दवडांच्या मते, ६५ च्या वरती तर नक्कीच. कमळींच्या मुलालाही हे पटतं.
तुम्हाला कशाचं भय नाही वाटत? “ऐसे भी मरना ही है,” त्या म्हणतात. मरण तर अटळ आहे.
तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुम्ही काय करणार? परत मोर्चा काढणार?
“मग, काढणारच! गरज पडली तर दिल्लीवर पण मोर्चा नेईन मी,” रागे रागे कपाळाला आठ्या घालून त्या ठणकावतात. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावर एरवी आठ्या फारशा दिसत नाहीत. हातातल्या लाल बावट्याने जणू काही डोक्यात टोला हाणावा असा झेंडा त्या मिरवतात आणि खुदकन हसतात.
अनुवादः मेधा काळे