डोंगरात राहणाऱ्या २३ वर्षीय रानो सिंगला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या आणि तिचा नवरा आणि सासू लगबगीने घरातून बाहेर आले. पहाट झाली होती, ५ वाजले होते. त्यांना दीड किलोमीटरची चढण चढून जायची होती, त्यानंतर मुख्य रस्ता लागणार. भाड्याने केलेली गाडी तिथे थांबली होती जी त्यांच्या गावाहून, सिवलीहून रानीखेतच्या खाजगी दवाखान्यात घेऊन जाणार होती.
डोली आणायचा त्यांनी प्रयत्न केला होता. ठाकूर समाजाच्या गरोदर बायांना एरवी चार भोई डोलीमधून चढ चढून नेतात. डोलीतून मुख्य रस्त्याला लागलं की थांबलेलं वाहन बाईला खाजगी दवाखान्यात नेऊन जातं. पण त्या दिवशी सकाळी डोली नव्हती आणि त्यामुळे त्यांनी चालायला सुरुवात केली.
रानो केवळ अर्धा रस्ता पार करू शकली. “आम्ही फार फार तर अर्धी वाट पार केली असेल, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की [वेदनांमुळे] मी काही पूर्ण रस्ता पार करू शकणार नाहीये. ज्या क्षणी मी चालायचं सोडून रस्त्यात बसले, माझ्या नवऱ्याच्या सगळं लक्षात आलं आणि त्याने जवळच्याच एका कुटुंबाला साद घातली. ते आमच्या ओळखीतलेच होते. चाची १० मिनिटातच पाणी आणि एक चादर घेऊन आली. आणि मग माझी सासू आणि चाचीच्या मदतीने मी तिथेच बाळंत झाले.” (रानोचा नवरा ३४ वर्षांचा आहे आणि एका रेशन दुकानात मदतनीस म्हणून काम करतो. त्याला महिन्याला ८,००० रुपये पगार मिळतो. त्यांच्या कुटुंबातली तीन मोठी आणि एका बाळासाठी कमाईचा हाच एकमेव स्रोत आहे. तिला त्याचं नाव सांगायचं नव्हतं.)
“माझा मुलगा [जगत] इथे या जंगलात, अर्ध्या वाटेत जन्माला आला,” ती सांगते. झाडांनी वेढलेल्या त्या जंगलातल्या एका अरुंद वाटेवर झालेल्या बाळंतपणाच्या आठवणींनी आजही तिच्या अंगावर काटा येतो. “माझं बाळ असं जन्माला येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आजही त्याचा विचार केला तर अंगावर शहारा येतो. पण देवाची कृपा, माझं बाळ सुखरुप होतं. आणि तीच सगळ्यात मोलाची गोष्ट आहे.”
२०२० च्या फेब्रुवारी महिन्यातल्या त्या सकाळी जगत जन्माला आला आणि त्यानंतर लगेच रानो चालत घरी परतली होती. तिच्या सासू, ५८ वर्षीय प्रतिमा सिंग नवजात जगतला आपल्या कुशीत घेऊन घरी आल्या होत्या.
गरोदरपणात रानो फक्त एकदाच रानीखेतमधल्या एका खाजगी दवाखान्यात गेली होती. दुसऱ्या महिन्यात अचानक वेदना होऊ लागल्या आणि त्याचं कारण काय ते शोधण्यासाठी सोनोग्राफी करण्यात आली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात डोंगरात ती प्रसूत झाली त्यानंतर तीन दिवसांनी गावातली आशा कार्यकर्ती तिच्या घरी आली. “आशा दीदी बाळाचं वजन घ्यायला आणि इतर गरजेच्या तपासण्या करायला आली होती. तिने आम्हाला सांगितलं की बाळाची तब्येत चांगली आहे. एक आठवडाभर माझा रक्तदाब कमी जास्त होत होता. पण आता मी एकदम ठणठणीत आहे. पहाडात आम्हाला अशा सगळ्या गोष्टींची सवय असते,” रानो म्हणते.
सिवली उत्तराखंडच्या अलमोडा जिल्ह्याच्या तारीखेत तालुक्यातला पाडा आहे. ६८ उंबरा आणि ३१८ वस्ती असणाऱ्या या पाड्यावरचे लोक सांगतात की अशी रस्त्यात बाळंतपण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण उत्तराखंड राज्यामध्ये मात्र किमान ३१ टक्के बाळंतपणं घरी होतात असं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (एनएफएचएस-४, २०१५-१६) नोंदवलं आहे. मात्र दवाखान्यात (जास्तकरून सरकारी) होणाऱ्या बाळंतपणांचं प्रमाण दुपटीहून अधिक वाढलं आहे, एनएफएचएस-३ (२००५-०६) मध्ये ते ३३ टक्के होतं ते चौथ्या पाहणीत ६९ टक्के इतकं वाढलं आहे (उत्तराखंडमध्ये होणाऱ्या एकूण जन्मांच्या दोन-तृतीयांश).
तरीही, कुमाऊँच्या डोंगराळ भागात आजही दवाखान्यात पोचणं हे बाईसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी मोठं आव्हान आहे असं रानीखेतमध्ये आरोग्यसेवा देणाऱ्या एक स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात. पक्की सडक घरापासून बहुतेक वेळा दूर असते, वाहतुकीची साधनं दुर्मिळ आणि भाड्याने गाडी करणं महाग.
आणि गेल्या वर्षी, महामारीमुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे तर तारीखेत तालुक्यतल्या गरोदर बायांच्या अडचणीत आणखीच भर पडली. रानोच्या गावापासून २२ किलोमीटरवर असलेल्या पाली नडोली गावात ऑगस्ट २०२० मध्ये मनीषा सिंग रावत घरी बाळंत झाली. बाळंतपण त्यांच्या कुटुंबाच्या ओळखीच्या दाईच्या हाती झालं. “मी दवाखान्यात गेले नाही. माझ्या मुलीचा जन्म १४ ऑगस्ट [२०२०] रोजी इथेच झाला,” शेजारच्या खोलीकडे बोट दाखवत ती सांगते. खोलीतल्या पलंगाच्या एका पायाला विटांचा आधार आहे. भिंतीवर मनीषा आणि तिचा नवरा, धीरज सिंग रावत, वय ३१ यांचा लग्रातला फोटो भिंतीवर लटकवलेला आहे.
सप्टेंबर महिन्याची सकाळ आहे. साडेआठ वाजून गेलेत. उजव्या हातात गवताचा एक भारा आणि डोक्यावर दुसरा असं घेऊन मनीषा नुकतीच घरी आलीये. भारे जमिनीवर टाकते आणि पोटमाळा असलेल्या घराच्या निळ्या रंगाने रंगवलेल्या कुमावनी लाकडी खिडकीतून आपल्या एक महिन्याच्या तान्ह्या मुलीला, राणीला हाक मारते, “चेली! देखो कौन आया!”
रानीचा जन्म झाल्यानंतर अगदी दोनच आठवड्यात मनीषाचं डोंगरातलं कष्टाचं काम सुरू झालं. तारीखेत तालुक्यातल्या ८७३ लोकसंख्येच्या पाली नडोली गावापासून सुमारे १.५ किलोमीटर अंतरावर, अर्धा तास चालत जाऊन आपल्या घरच्या तीन शेरडांसाठी चारा गोळा करून आणायचा. या भागातल्या बाया दररोज पाणी, जळण आणि चारा आणण्यासाठी अनेक किलोमीटर अंतर, तेही बहुतेक चढणीच्याच वाटांनी, पायी तुडवतात. मनीषाचं दोन खोल्यांचं घर माती-सिमेंटचं बांधकाम केलेलं आहे. घराबाहे हापसा असल्यामुळे तिचा तेवढा तरी वेळ वाचतो.
निळ्या लाकडी खिडक्यांमधून येणाऱ्या सकाळच्या कोवळ्या उन्हात रानीच्या पाळण्याच्या स्टीलच्या कडा सोनेरी होऊन गेल्या होत्या. “आशानी आम्हाला सांगितलं की सकाळचं कोवळं ऊन तिला दाखवायला पाहिजे, म्हणजे तिला व्हिटॅमिन मिळतील. कोणती व्हिटॅमिन ते काही मला माहित नाही. तीन दिवसांपूर्वी आशा तिला तपासायला आली होती, तेव्हा तिचं वजन कमी भरलं होतं. एका आठवड्यानंतर ती परत येणार आहे,” मनीषा मला सांगते. ४१ वर्षांच्या ममता रावत आशा आहेत. त्या सांगतात की बाळाचं वजन ३ किलो होतं, जे एक महिन्याला ४.२ किलो असायला हवं.
मनीषा प्रसूतीसाठी दवाखान्यात का बरं गेली नाही? “मला दवाखान्यात बाळंतपण करायचं नव्हतं,” ती सांगते. “तिथे काही सुविधा असतीलही. पण माझ्या घरच्यांनी जो काही निर्णय घेतला तो ठीकच आहे.”
मनीषाचे सासरे, पान सिंग रावत यांनी तिला दवाखान्यात नेण्याऐवजी दाईला घरी बोलवायचं ठरवलं. “ते म्हणाले, की माझ्या पहिल्या मुलाच्या वेळी खूप खर्च [रु. १५,०००] झालाय,” ती म्हणते. दोन वर्षांचा रोहन पाली नडोलीहून १२ किलोमीटरवर असलेल्या रानीखेतच्या एका खाजगी दवाखान्यात जन्माला आला (आणि तिथे जाण्यासाठी पक्की सडक येईपर्यंत तिला डोलीत घालून नेलं होतं). “करोनाची पण भीती होती [तिची मुलगी जन्मली तेव्हा, ऑगस्ट २०२० मध्ये महामारीने टोक गाठलं होतं]. दवाखान्यात जायचा सगळा तीम-झाम [गोंधळ] टाळायचं तेही एक कारण होतं,” मनीषा सांगते.
मनीषाचं नऊ जणांचं एकत्र कुटुंब आहे, ज्यात तिची दोघं मुलं, तिचा नवरा, सासू-सासरे, दीर-जाऊ आणि त्यांचं बाळ असे सगळे आहेत. नववीपर्यंत शिक्षण झालेल्या मनीषाचं वयाच्या अठराव्या वर्षी लग्न झालं. तिचा नवरा धीरज सिंग रावत बारावीपर्यंत शिकलाय आणि एका स्थानिक प्रवासी कंपनीत चालक म्हणून काम करतो. “ते पर्यटकांना अलमोडाहून नैनीताल, भीमताल, रानीखेत आणि इतर ठिकाणांना घेऊन जातात. त्यांना महिन्याला साधारणपणे २०,००० रुपये मिळतात,” ती सांगते. टाळेबंदीच्या काळात काहीच काम मिळत नसल्याने, त्यांच्या कुटुंबाने मनीषाचे सासरे, पान सिंग यांच्या बचतीतून सगळा खर्च भागवला.
“या महामारीच्या काळात इथून पार अलमोड्याला [इथून ८० किलोमीटरवर, जिल्ह्याचं ठिकाण] जाऊन आमचा जीव आम्हाला धोक्यात घालायचा नव्हता. म्हणून मग आम्ही घरीच बाळंतपण करून घ्यायचा निर्णय घेतला,” ६७ वर्षीय पान सिंग तोमर सांगतात. रानीखेतमध्ये एका सरकारी कचेरीतून ते निवृत्त झाले. “शिवाय, दवाखान्यात जायचं तर आम्हाला जवळच्या बाजारापासनं भाड्याने गाडी करावी लागली असती, इथून दोन किलोमीटर जाऊन त्या गाडीने ८० किलोमीटरचा प्रवास करावा लागला असता.”
घरी बाळंतपण करायचं तर आई आणि बाळाच्या जिवाची त्यांना काळजी वाटत नव्हती का? “त्याची आई [त्यांची स्वतःची पत्नी] आणि मी आता म्हातारे झालोय,” ते सांगतात. “त्या काळात करोना पसरला होता आणि तेव्हाच दवाखान्यात जायचं तर आमच्याच जिवाला धोका होता. आणि घरी जी दाई येणार होती, ती आमच्या परिचयातली होती त्यामुळे [कोविडची लागण होण्याची] जोखीमही कमी होती. तिने आमच्या गावात आणि आसपासही अनेक बाळंतपणं सुखरुपरित्या केली आहेत,” ते सांगतात.
एनएफएचएस-४ (२०१५-१६) नुसार सर्वेक्षणाअगोदरच्या पाच वर्षांमध्ये उत्तराखंडमध्ये एकूण प्रसूतींपैकी ७१ टक्के प्रसूती प्रशिक्षित-कुशल आरोग्यदात्याच्या सहाय्याने झाल्या होत्या. यामध्ये डॉक्टर, परिचारिका आणि ‘महिला आरोग्य कार्यकर्ती’ (LHV – Lady Health Visitor) यांचा समावेश होतो. घरी झालेल्या बाळंतपणांपैकी केवळ ४.६ टक्के बाळंतपणंच कुशल आरोग्यदात्यांच्या सहाय्याने करण्यात आली. घरी झालेली बहुतेक बाळंतपणे दाईच्या किंवा सुईणीच्या मदतीने करण्यात आली.
तारीखेत तालुक्यातल्या पाली नडोली, दोबा आणि सिंगोली (तिन्ही गावांची एकूण लोकसंख्या १२३७) या तिन्ही गावांमध्ये ममता रावत एकट्याच आशा कार्यकर्ती आहेत. प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर काय काळजी घ्यायची याबद्दल त्या मनीषाच्या कुटुंबाशी सातत्याने फोनवर संवाद साधत होत्या. “मी मनीषाला पहिल्या तिमाहीत दवाखान्यात घेऊन गेले होते,” ममता मला सांगतात. त्या दोघी ममताच्या स्कूटीवर पाली नडोलीला सगळ्यात जवळ असणाऱ्या तारीखेतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या होत्या.
“मी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देखील तिच्याशी फोनवर बोलले होते, तिच्या बाळंतपणाच्या अगदी १० दिवस आधी. तेव्हा मी तिला सगळी काळजी आणि सुरक्षा उपायांसह हॉस्पिटलमध्ये [प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीकक्ष आहे] जायला सांगितलं होतं. तिची तारीख उलटून गेली तरी तिच्या घरच्यांचा काही फोन आला नाही. मग मीच चौकशी करायला फोन केला. आणि मलाच आश्चर्याचा धक्का बसला, मनीषा घरीच बाळंत झाली होती. दवाखान्यात बाळंतपण करायचा माझा सल्ला फुकट गेला म्हणायचा,” ममता सांगतात. आपला सल्ला ऐकला नाही यामुळे त्या खट्टू झाल्या आहेत.
दरम्यान, मनीषाच्या घरी सप्टेंबर महिन्याच्या त्या सकाळी सूर्य वर चाललाय. अजून झोपेत असलेल्या आपल्या दोन वर्षांच्या मुलाला बिछान्यातून उचलून ती कडेवर घेते आणि सांगते, “उठा! बघ बघ, तुझी बहीण जागीसुद्धा झाली.”
आणि मग प्रसूतीचा विषय मागे पडतो. ती तिच्या नवऱ्याला, धीरजला क्रिकेटचं कसं वेड आहे ते अगदी कौतुकाने सांगते. “आमचं लग्न झालं होतं, ना तेव्हा ते रोज सराव करायचे. मग हळूहळू जबाबदाऱ्या वाढायला लागल्या. तिथे खणात सगळे पुरस्कार आणि ढाली दिसतायत ना, त्या त्यांच्या आहेत,” निळ्या भिंतीतल्या फळीवर इथून तिथे मांडलेल्या पुरस्कारांकडे पाहताना तिचा चेहरा उजळून गेलेला असतो.
शीर्षक चित्र : लाबोनी जांगी. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा
अनुवादः मेधा काळे