बीड जिल्ह्यातल्या माजलगावच्या या माय-लेकी गौतम बुद्धाची स्तवनं गातात. लोकांच्या रोजच्या आयुष्यात बुद्धाचा वास आहे आणि तो आपल्या शिकवणीतून त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करतो हे या ओव्यांमधून दिसून येतं.
२६ मे. आज बुद्ध पौर्णिमा. पण यंदा गौतम बुद्धांची जयंती साजरी करण्यासाठी कसलेच सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केलेले नाहीत. “जिथं तिथं करोना झालाय ना, कसलंच काही साजरं करता येईना गेलंय,” बीडच्या सावरगावमधल्या ७५ वर्षीय राधा बोऱ्हाडे म्हणतात.
“आम्ही घरीच प्रार्थना करू आणि पोरांसाठी गोडाचं म्हणून खीर करणारे.” कोविड-१९ महासाथीमुळे २०२० साली देखील बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम झाले नव्हते, आणि यंदा पण तेच, फोनवर बोलणाऱ्या राधाबाईंच्या आवाजातली खंत स्पष्ट जाणवते.
एप्रिल २०१७ मध्ये पारीची टीम बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या जात्यावरच्या ओव्या प्रकल्पामधल्या कलावंतांना भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा आम्हाला सावरगावला राधाबाईंना भेटायला जा असं सांगितलं होतं. हे गाव माजलगावपासून १० किलोमीटरवर आहे. जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाच्या मूळ चमूने रेकॉर्ड केलेल्या काही ओव्या त्यानंतर आम्ही सादर केल्या होत्या. राधाबाईंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्तुतीत गायलेली ‘एक लाख ववी माझ्या भीमाला पुरंना’ ही ओवी आणि सोबतच्या इतर ओव्यांमध्ये बाबासाहेबांनी शिक्षण, एकी आणि स्वाभिमानाला दिलेलं महत्त्व अधोरेखित होतं.
माजलगावची गाणी, महूच्या आठवणी या ओव्यांमध्ये नवबौद्ध असणाऱ्या राधाबाई आणि इतर काही जणी डॉ. आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. जातीने केलेल्या छळाला छेद देऊन त्यांनी नवयान बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यांना नवी ओळख दिली. धन्यतेची गाणी, उत्सवाचा जागर या ओव्यांमध्ये राधाबाई बुद्धाची शिकवण सांगतात, दलितांच्या कल्याणासाठी आणि अस्पृश्यतेचा कलंक धुऊन टाकण्यासाठी बौद्ध धर्म आला असल्याचं त्या या ओव्यांमधून गातात.
आम्ही जेव्हा माजलगावला गेलो होतो तेव्हा आम्हाला कमल साळवे (राधाबाईंची मुलगी) आणि रंगू पोटभरे अशा दोघींचीही भेट घ्यायची होती. पण त्या बाहेरगावी नातेवाइकांकडे गेल्या होत्या. रंगूबाईंच्या आई, पार्वती भादरगेंना भेटणं आमच्या नशिबात नव्हतं. काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं.






