के. एन. महेशा प्रशिक्षित निसर्ग वैज्ञानिक आहे, त्याने पूर्वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेतलं आहे. तो आणि त्याचे वडील कुणगाहळ्ळी गावात शेती करतात. या निबंधासाठी जेव्हा छायाचित्रं घेतली तेव्हा तो एका स्थानिक सामाजिक संस्थेसोबत बंडीपूर राष्ट्रीय उद्यानातील काही माजोरी तण काढण्याचं काम करत होता.
वन्य प्राण्यांबरोबरचं जीवन या विषयावरच्या एका मोठा छायाचित्र प्रकल्प एकत्र सुरू आहे, त्यातल्या पारीवरच्या सहा निबंधांच्या मालिकेतलं हे चौथं पुष्प. “पहिल्यांदा माझ्या हातात कॅमेरा आला तेव्हा मला फोटो कसा काढायचा हेही माहित नव्हतं आणि मी फोटो काढायला फार लाजायचो,” २७ वर्षीय महेशा सांगतो. “त्यानंतर मात्र मला जे जे नवीन आणि रंजक वाटेल अशा सगळ्याचे मी फोटो काढायला लागलो. मला हा प्रकल्प फार आवडलाय, कारण त्यातूनच आपण गावाकडे काय चाललंय ते पाहू शकतो.”














