७४ वर्षांचे प्रेमराम भाट सुमारे ६० वर्षांपूर्वीची आठवण सांगताना म्हणतात, “माझ्या बाबांनी या दोऱ्या माझ्या बोटांना बांधल्या आणि मला बाहुल्या कशा नाचवायच्या हे शिकवलं.”
“मी नऊ वर्षांचा असल्यापासून बाबा मला त्यांच्यासोबत वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांच्या कठपुतळ्यांच्या कार्यक्रमाला घेऊन जायचे,” ते म्हणतात. “मी तेव्हा ढोल वाजवायचो, काही दिवसांनी मलाही बाहुल्या नाचवायला आवडायला लागलं. लालूराम भाट, माझे बाबा, त्यांनी मला बाहुल्या कशा वळवायच्या हे शिकवलं, हळू हळू मलाही ते जमायला लागलं.”
प्रेमराम पश्चिम जोधपूरमधील प्रताप नगर भागात फूटपाथवर एका झोपडीत राहतात. त्यांची पत्नी सत्तरीची जुग्नीबाई, त्यांचा मुलगा सुरेश, सून सुनिता आणि त्यांची तीन ते १२ वर्षं वयोगटाची ४ नातवंडं असे सगळे एकत्र राहतात. हे कुटुंब भाट जातीत येते (ही जात राजस्थानमध्ये ओबीसी किंवा इतर मागासवर्ग प्रवर्गात मोडते). समाजातील जाणते लोक सांगतात की अनेक भाट कुटुंबं सुमारे १०० वर्षांपूर्वी राज्यातील नागौर जिल्ह्यातून स्थलांतर करून राजस्थानमधील जोधपुर, जयपूर, जैसलमेर आणि बिकानेर यांसारख्या विविधं शहरात स्थायिक झाली.
“मी बाहुल्या बनवण्याचं किंवा नाचवण्याचं कुठलेही ट्रेनिंग घेतलेले नाही, मी ही कला बाबांना बघत बघत शिकलोय,” ३९ वर्षांचे सुरेश सांगत होते. तेही आपल्या वडिलांसोबत १० वर्षांचे असल्यापासून वेगवेगळ्या गावांमध्ये बाहुल्यांचा कार्यक्रम सादर करायला जायचे व प्रेमराम यांना जमेल तेवढी मदत करायचे. घरी असताना ते बाहुल्या बनवायला मदत करायचे. “आणि १५ वर्षांचा होईपर्यंत मीसुद्धा बाहुल्यांचा खेळ व्यवस्थित शिकलो. मी एकटा गावांमध्ये जाऊन कार्यक्रम करायला लागलो,” ते सांगतात.




